१९६० साली आषाढाचा प्रारंभ २२ जून रोजी झाला होता. त्या दिवशी विख्यात साहित्यिक आणि पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे  यांनी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा नितांतसुंदर ललित लेख लिहिला होता. या वर्षीही २२ जून रोजीच आषाढास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने अत्र्यांचा हा उत्कट लेख खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी पुन:प्रसिद्ध करीत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. त्याची आठवण झाली की कविकुलगुरू कालिदासाच्या ‘मेघदूता’मधल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्र्लिष्टसानु। वप्रक्रिडापरिणतगज: प्रेक्षणीयं ददर्श’ या अमर पंक्ती ओठावर खेळू लागतात आणि आकाशातल्या मेघाकडे सहज डोळे वळून कारण नसतानाही मेघदूतातल्या यक्षाप्रमाणे आपले हृदय एकदम व्याकूळ होते. (‘आनंदी ही विकल हृदयी पाहता मेघ दूर, तो कैसा हो प्रियजन मिठी ज्यास देण्या अधीर?’) भारतीय मनावर कालिदासाचे इतके सूक्ष्म संस्कार उमटलेले आहेत की, मानवी जीवनात अशी कोणतीही भावना किंवा अनुभव नसेल की, जिच्या उत्कट अवस्थेत रसिक आणि सुसंस्कृत माणसाच्या मुखातून कालिदासाची एखादी अन्वर्थक ओळ आपोआप उचंबळणार नाही. सौंदर्याच्या दर्शनाने आणि संगीताच्या श्रवणाने चांगला सुखी माणूससुद्धा अस्वस्थ होतो. त्याच्या मनाला एकदम कसली तरी हुरहुर वाटू लागते. त्याबरोबर ‘रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्। प्र्युत्सुकी भवति यत्सुखिनोऽपि जन्तु:।।’  या ओळीचे एकदम स्मरण होते. अगदी फाटक्यातुटक्या कपडय़ांत एखादी सुंदर तरुणी चाललेली बघून ‘सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यम्। मलिनपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति। इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी। किमिवहि मधुराणां मण्डन नाकृतीनाम्?’ (‘जातीच्या सुंदराला काहीही शोभते!’) या पंक्ती कोणाच्या मुखातून बाहेर पडत नाहीत? लाखात एक अशी एखादी लावण्यवती बालिका पाहिली म्हणजे ‘हे न हुंगलेले फूल, हे न हात लावलेले कोवळे पान आणि हा न आस्वाद घेतलेला मधु, परमेश्वरानं कोणासाठी निर्माण केला आहे?’  ‘न जाने भोक्तारं कमिह समुपस्थास्यति विधि: !’ हाच विचार कालिदासाप्रमाणे आपल्या मनात येत नाही काय? मनुष्याच्या भोवती ऋतुचक्राचे भ्रमण तर एकसारखे चाललेले असते. पण त्यामुळे निसर्गाच्या आणि भावनेच्या सृष्टीत जे आंदोलन होते, त्याचे मनोज्ञ स्पंदन कालिदासाच्या काव्याखेरीज इतरत्र कुठे प्रतीत होणार?

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya pralhad keshav atre article ashad pratham diwase on ashad month zws
First published on: 21-06-2020 at 00:02 IST