बंगालमधले मान्यवर गायक आणि संगीतज्ज्ञ कुमार प्रसाद मुखर्जी यांनी ‘लॉस्ट वर्ल्ड ऑफ हिन्दुस्तानी म्युझिक’ नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्यात अनेक कहाण्या आणि किश्शांची रेलचेल आहे. किराणा घराण्याचे अध्वर्यू वहीद खान खाँसाहेब आणि अमीर खान खाँसाहेब यांच्यासंबंधी एक रंजक कहाणी आहे. ही अर्थातच स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट…

दिल्लीच्या तवायफांच्या वस्तीत दोघांचाही बसेरा असे. त्यातल्या एका महिलेचे अमीर खान खाँसाहेबांशी खास नातं होतं. वहीद खान तिथे आले की ते ज्या खोलीत साधना करत त्या खोलीच्या शेजारी अमीर खानना लपवण्याची ती व्यवस्था करत असे. अशा रीतीने वहीद खान यांची विलंपत आणि बढंत अमीर खान खाँसाहेबांनी उचलली आणि आत्मसात केली असं कुमार प्रसाद सुचवतात. आपल्याला याचं समांतर उदाहरण महाराष्ट्रात सापडतं- राजारामबुवा पराडकर (१८९९ ते १९७५). हे दक्षिण मुंबईतल्या गोरा राम मंदिराचे पुजारी होते. सुरुवातीला ते मंदिरातले पेटीवादक म्हणून नावारूपाला आले. पण गायनविद्या मिळवण्याचा ध्यास त्यांना लागला होता. गायनाचार्य भास्करबुवा बखले १९२० च्या दशकात मंदिराजवळच्या परिसरात राहणाऱ्या एका कलावंत महिलेला शिकवायला येत. राजारामबुवा त्यांची शिकवणी चोरून ऐकत आणि त्याबरहुकूम रियाझ करून तान पलटे घोटत. ही मेहनत एकदा खुद्द बखलेबुवांच्या कानावर पडली आणि त्यांना पराडकर बुवांविषयी कुतूहल जागृत झालं. ते राजारामबुवांना शिकवायला उत्सुक होते; परंतु अचानक त्यांचं निधन झाल्यामुळे पराडकर बुवांना या तालमीला मुकावं लागलं.

bjp mp udayanraje Bhosale
अखेर भाजप कार्यालयात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र
anshuman singh wife smruti singh
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह चर्चेत कशा आल्या? त्यांच्यावरील अश्लील शेरेबाजीचा वाद काय?
ashok chavan keep bjp away from program on birth anniversary of shankarao chavan
शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; भाजपला दूर ठेवण्याची दक्षता!
ganesh naik marathi news
मंदा म्हात्रे यांच्या कार्यक्रमाला गणेश नाईक समर्थकांची दांडी
240 ganja plants worth 10 lakh seized near vita one arrested
विट्याजवळ १० लाखाची २४० गांजा झाडे जप्त, एकाला अटक
Supriya Sule, Tukaram Maharaj,
सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन, राज्य सरकारवर केली सडकून टीका
legendary bharatanatyam dancer c v chandrasekhar
व्यक्तिवेध : सी. व्ही. चंद्रशेखर
death anniversary of db patil
दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त जासई जन्मगावी अभिवादन, विविध कार्यक्रमांचे आयोजन

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: विनम्रतेची शाळा…

यंदाचं वर्ष हे राजारामबुवांच्या जन्माच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचं वर्ष आहे. त्यानिमित्ताने १९२५ ते १९७५ अशी प्रदीर्घ पाच दशकं दक्षिण मुंबई परिसरातील संगीत संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या या थोर संगीत साधकाच्या कार्याचं स्मरण करणं उचित ठरेल.

महाराष्ट्रात जन्मून आणि राहून उत्तर हिंदुस्तानातली ख्याल गायकी इथे आणणारे आणि रुजवणारे मोजके परंतु ध्येयासक्त कलाकार होते. एकोणिसाव्या शतकात प्रसंगी पायी प्रवास करून आणि अपार कष्ट झेलत त्यांनी ग्वाल्हेरात बहरलेली गायनविद्या महाराष्ट्रात आणली. त्यात वासुदेवराव जोशी, देवजीबुवा परांजपे, बळवंतराव बापट, कृष्णराव लळित, कृष्णशास्त्री धुळेकर, रामकृष्णबुवा वझे तसेच बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ही नावं प्रामुख्याने येतात. बाळकृष्णबुवा १८८० च्या दशकात काही दिवस मुंबईत राहिले होते. त्या काळातली मुंबई म्हणजे आत्ताची दक्षिण मुंबई. बाळकृष्णबुवांनी इथे एक विद्यालय काही काळ चालवलं होतं, अशी नोंद डॉ. अनीश प्रधान लिखित मुंबईतल्या संगीत संस्कृतीविषयक इतिहासात मिळते.

इचलकरंजीकरांच्या शिष्यांची मालिका मोठी होती. त्यात विष्णू दिगंबर पलुस्कर तर होतेच. परंतु गणपतराव भिलवडीकरांपासून अनंत मनोहर जोशी आणि यशवंतबुवा मिराशीही होते. याच मिराशीबुवांकडे राजारामबुवा पराडकर शिकले. एका अर्थी इचलकरंजीकर बुवांनी मुंबईत विसाव्या शतकात सुरू केलेलं अध्यापन आणि आयोजन यांच्या माध्यमातून राजारामबुवा पराडकरांनी पुढे नेले. ज्येष्ठ तबलावादक सुरेश तळवलकर यांनी या संदर्भात एक हृद्या आठवण सांगितली, ‘‘मी लहान वयात असल्यापासून ‘ट्रिनिटी क्लब’मध्ये मुगभाट परिसरात तबला वाजवायला जात असे, एकदा राजरामबुवांबरोबर तबला वाजवत होतो. ते फार लयदार गात असत. त्यांनी मला ‘झुमरा’ हा ठेका वाजवायला सांगितला. त्यापूर्वी मला ‘झुमरा’ येत नव्हता. बुवांनी माझे गुरुजी नागेशकर यांना चिठ्ठी दिली आणि झुमऱ्याच्या ठेक्याची तालीम द्यायला सांगितली आणि काही दिवसांतच मी झुमरा वाजवू लागलो.’’

आणखी वाचा-‘कडकलक्ष्मी’चे आसूड…

गिरगावातल्या गोरा राम मंदिरात राजाराम बुवा पौरोहित्य करत असत. महाराष्ट्रात गायन परंपरा आणि मंदिरांमधील कीर्तन परंपरा यांचा एकत्र मिलाफ होत गेला. त्यामुळे अनेक गवयांना ‘बुवा’ हे संबोधन चिकटलं. राजारामबुवा मंदिरात पायपेटी वाजवण्यात तरबेज झाले होते. पण त्यांचं खरं ध्येय गायकी आत्मसात करणं हे होतं. माधवराव लेले, नरहर गोखले यांच्याकडे त्यांनी सुरुवातीचे धडे गिरवले. नंतर मात्र ते यशवंतबुवा मिराशींचे पट्टशिष्य झाले. गिरगावातून वाळकेश्वराला जाऊन रात्री तीन तीन तास त्यांची मिराशीबुवांकडे तालीम चालत असे.

ग्वाल्हेर गायकी ही अस्ताई अंतऱ्याच्या मांडणीतून फुलत जाणारी गायकी. मिराशीबुवांकडून ही गायकी राजाराम पराडकरांना मिळत गेली. ‘‘आम्ही गाण्याचं झाड बांधतो’’ असं बुवा म्हणत. म्हणजे बंदिशीच्या मांडणीतून आणि विकासातून रागाचं रूप उभं करणं. पराडकर या विद्योत पारंगत होते. त्या काळात संगीतकार आपली रसिकता आणि गुणग्राहकता व्यक्त करताना कंजुषी करत नसत. शीवच्या ‘श्रीवल्लभ संगीताश्रमात पराडकर ‘मलुहा केदार’ हा अप्रचलित राग गायले तेव्हा आचार्य रांजनकर उस्फूर्तपणे म्हणाले की, आजपासून आपण यांना मलुहा पराडकरबुवा असं संबोधूया. पराडकरांच्या गोरा राम मंदिरात एकदा चक्क फैयाज खान खाँसाहेब मिराशीबुवांचं गाणं ऐकायला आले होते. असा संगीतकारांचा परस्पर स्नेह होता. श्रीपाद पराडकरांच्या आठवणीनुसार मंदिरातली मैफल संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली की दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता संपे. त्यात रामभाऊ मराठे, विनायकराव घांग्रेकर, चिदानन्द नगरकर वगैरे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार सहभागी असत. शेकडो दंडबैठकांचाही नियमित रियाज करणारे राजारामबुवा हे अनोख्या संगीत संस्कृतीचे पाईक होते. सी. आर. व्यास, श्रीपाद पराडकर, प्रदीप नाटेकर, निर्मला गोगटे इत्यादी शिष्यांनी त्यांची परंपरा पुढे चालवली हे विशेष.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माझ्या आयुष्यातील रजतयोग!

विशेष मैफील

राजारामबुवा पराडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याची नोंदवजा दखल म्हणून ९ जून रोजी सकाळी १० ते २ या वेळेत दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे एका विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ग्वाल्हेर परंपरेचे कलाकार गायन सादर करणार आहेत.

amardhan@gmail.com

(लेखक ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि संगीत अभ्यासक आहेत.)