तंत्रज्ञान क्षेत्रात जादूची कांडी घेऊन आलेल्या स्टीव्ह जॉब्जने दोन वर्षांपूर्वी (५ ऑक्टोबर २०११ रोजी) अचानक या जगाचा निरोप घेतला. त्याच्या पश्चात अ‍ॅपलचे काय होणार, ही कंपनी सुरू राहणार की नाही, इथपासून अनेक बाबींसंबंधी चर्चाना ऊत आला होता. मात्र, स्टीव्ह जॉब्जने अ‍ॅपलवर केलेल्या संस्कारांमुळे आजही ही कंपनी जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात अधिराज्य गाजवीत आहे. स्टीव्ह जॉब्जच्या निधनानंतरही कंपनीने संशोधन तसेच नावीन्याचा पाठपुरावा आणि दर्जेदार सेवासुविधा यासंदर्भातला आपला नावलौकिक कायम राखला आहे. जॉब्जच्या पश्चात अ‍ॅपलने नेमके काय कमावले आणि काय गमावले, यावर टाकलेला दृष्टिक्षेप..
‘तुम्ही जे काम करता त्यावर प्रेम करा..’ असा केवळ संदेशच नाही, तर तशी प्रत्यक्ष वर्तणूक करून जगाला तंत्रज्ञानाचा अद्वितीय अनुभव देणारे ‘अ‍ॅपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी आपल्या कंपनीला दिलेले कामाचे, संशोधनाचे आणि विश्वासार्हतेचे संस्कार त्यांच्या निधनानंतर आज दोन वर्षांनीही तितकेच ताजे आहेत. म्हणूनच आजही ‘अ‍ॅपल’चे नाव मोठय़ा विश्वासाने घेतले जाते आणि तंत्रज्ञान चाहत्यांचीही ती पहिली पसंती ठरते. ‘अ‍ॅपल’वरील या दृढ विश्वासामुळेच अमेरिकेतील मोबाइलचे चाहते भल्यामोठय़ा रांगेत उभे राहून आजही आयफोन पाच एस, पाच सी विकत घेत आहेत. त्याचवेळी भारतासारख्या देशातील लोक अशा फोन्सची प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहेत. हे जॉब्जच्या पश्चात ‘अ‍ॅपल’चे सर्वात मोठे यश म्हणता येईल.
स्टीव्ह जॉब्ज गेल्यावर अ‍ॅपल कंपनीचे काय होणार, हा गहन प्रश्न अनेकांना पडला होता. हा प्रश्न पडणाऱ्यांमध्ये अगदी सामान्य ग्राहकांचाही समावेश होता. अर्थात् एका व्यक्तीच्या जाण्याने एवढी मोठी कंपनी लगेचच बंद पडते असे नाही. पण तिच्या विश्वासार्हतेवर मात्र काही काळासाठी का होईना, पण परिणाम होतो. ही विश्वासार्हता टिकवणं हे नंतर त्या पदावर आलेल्यांसमोर मोठेच आव्हान असते. हे आव्हान पेलण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या ‘अ‍ॅपल’च्या विद्यमान टीमला यश आले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अ‍ॅपलची घोडदौड आजही स्टीव्हच्याच मार्गाने सुरू असून त्याला आणखीन नव्या विचारांची जोड मिळाली आहे. यातूनच अ‍ॅपलने नुकतेच बाजारात आणलेले आयफोन पाच एस, पाच सी हे सर्व फोन्स, नव्याने येणारे आय वॉच, तसेच बाजारात आलेली मॅक बुकची नवी सीरिज या सर्व गोष्टींवर स्टीव्हच्या कार्यप्रणालीची छाप नक्कीच दिसून येते. स्टीव्ह जॉब्ज यांनी अ‍ॅपलची स्थापना कशी केली, त्यांनी कोणकोणत्या उत्पादनांचा शोध लावला, आणि त्यांचे तंत्रज्ञान क्षेत्रात काय योगदान आहे, याबद्दलची माहिती नवतंत्रज्ञानप्रेमी बहुतेक लोकांना आहे. पण स्टीव्ह जॉब्ज यांच्यानंतर अ‍ॅपल कंपनीचा प्रवास कसा सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी दोन मुद्दय़ांवर प्रामुख्याने विचार करायला हवा. आर्थिक आणि संशोधन असे हे दोन मुद्दे करता येतील. हे मुद्दे कोणत्याही कंपनीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. जॉब्ज यांच्या निधनानंतर काही प्रमाणात घसरलेले अ‍ॅपलचे शेअर अवघ्या दोन महिन्यांमध्ये उच्चांक गाठू लागले. त्यावरून कंपनीची आर्थिक स्थिती फारच चांगली असल्याचे स्पष्ट होते. अ‍ॅपलने गेल्या वर्षी- सन २०१२ मध्ये संशोधन आणि विकासासाठी मोठी गुंतवणूकही केली.
संशोधनातले सातत्य
नव्या संशोधनाच्या संदर्भात बोलायचे झाले तर अ‍ॅपलने स्टीव्ह यांच्या तत्त्वांना धरूनच आपली संशोधन परंपरा कायम ठेवली आहे. या कालावधीत हार्डवेअरमध्ये अ‍ॅपलने मोठा विकास साधला आहे. यात सर्वात मोठी बाजी आयपॅड विथ रेटिना डिस्प्ले या उपकरणाने मारली आहे. गेल्या वर्षभरात या नव्या आयपॅडची तब्बल १७ दशलक्ष इतकी विक्री झाली. यानंतर आयपॅड मिनी आणि ‘मॅकबुक प्रो’ची रेटिना डिस्प्लेची मालिकेतील उत्पादनेही मोठय़ा प्रमाणावर गाजली. ग्राहकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी बाजारात आलेल्या ‘पाच एस’ आणि ‘पाच सी’ या दोन प्रकारच्या फोनची निर्मिती आणि आयओएस ७ ही उत्पादने अ‍ॅपलच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवून गेली आहेत. ही सर्व उत्पादने स्टीव्ह जॉब्ज यांनी साकारलेल्या संशोधनाचीच फलित आहेत, अशी टीका बऱ्याचदा होताना दिसते. पण ही उत्पादने स्टीव्ह जॉब्ज यांच्या विचारांची फलित असली तरी त्यांतील आकर्षक बदल हे सध्याच्या टीमनेच केलेले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयपॅड मिनी हे उत्पादन! हे उत्पादन आयपॅडच्या संशोधनावर आधारीत असले तरी ग्राहकांच्या गरजेनुसार त्याचे छोटे रूपांतर करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून अ‍ॅपलने आयपॅडचे छोटे रूप बाजारात आणले. यामुळे पुन्हा एकदा अ‍ॅपलच्या सर्व स्पर्धक कंपन्यांना त्यांच्या अनेक फोन्सचे छोटे रूप बाजारात आणावे लागले होते. कंपनीला अनेकदा टीकेची झोडही सहन करावी लागली होती. अ‍ॅपल मॅप आणि सिरीजमधील अडचणींमुळे अनेक टीकाकारांनी अ‍ॅपलला धारेवर धरले आणि स्टीव्ह जॉब्ज असते तर हे घडले नसते, असे वक्तव्य करून कंपनीचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. पण यामध्येही स्टीव्ह फॉम्र्युला त्यांना उपयोगात आणावा लागला आणि कूक यांनी अ‍ॅपल मॅपप्रकरणी जाहीर माफी मागितली.
उत्पादनाची काळजी..आपले उत्पादन ग्राहकांच्या हाती जाण्यापूर्वी ते विविध कसोटय़ांवर काटेकोरपणे तपासून घेतले पाहिजे, असा स्टीव्ह जॉब्ज यांचा आग्रह असायचा. त्यासाठी ते स्वत: कोणतेही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी तपासून घ्यायचे. त्यात जर कोणतीही त्रुटी आढळली तरी त्यांना ते खपत नसे. त्यामुळे बाजारात येणारे उत्पादन हे अत्यंत उत्तम दर्जाचेच असायचे. ते उत्तम दर्जाचेच असले पाहिजे असा त्यांचा ठाम आग्रह असे. हाच आग्रह आजही अ‍ॅपलने कायम ठेवला आहे. स्टीव्ह जॉब्ज ज्या विविध पातळय़ांवर आपले नवे उत्पादन तपासून घ्यायचे ते अ‍ॅपलचे धोरण आजही कायम राखण्यात आले असून, त्यामुळेच आजही आपल्याला चांगल्या दर्जाची अ‍ॅपलची उत्पादने मिळतात.
मार्केटिंगची पद्धत
‘लोकांना काय पाहिजे, यापेक्षा त्यांनी काय वापरले पाहिजे, ते तयार करा आणि त्यांना त्याची सवय लावा!’ असा अनोखा मूलमंत्र स्टीव्ह जॉब्ज यांनी दिला होता. हा मंत्र मार्केटिंगकरिता मोठे वरदान ठरले. त्यांच्या या मंत्रामुळे नवीन काहीतरी बाजारात आणले की प्रथम उत्सुकतेपोटी ग्राहक ते विकत घेतो आणि भविष्यात त्याला त्याची सवय लागते. असा विचार केल्याशिवाय कोणतेही संशोधन होऊ शकत नाही, असे जॉब्ज यांचे मत होते. यामुळेच मॅकिन्टोशपासून ते आयफोनपर्यंत नावीन्यपूर्ण संशोधने अ‍ॅपलमध्ये होऊ शकली. जॉब्ज यांचा हा मूलमंत्र आजही अ‍ॅपलच्या संस्कारांमध्ये रुजलेला असून त्याच मार्गावरून नवी टीमही काम करते आहे. जॉब्ज यांच्या बौद्धिक बैठकीतील अ‍ॅपलचे डिझायनर जॉन्थन इव हे कूक यांच्यासोबत खूप चांगले काम करत असून, तेच सध्या कंपनीच्या संशोधनाचा मुख्य आधार आहेत. या संशोधनाच्या जोरावरच कंपनीच्या मार्केटिंगची धुरा अवलंबून आहे. उत्पादन बाजारात आणताना ग्राहकाला चांगला अनुभव दिला तर तो नक्कीच त्याकडे आकर्षित होईल, या जॉब्ज यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आजही अ‍ॅपलची उत्पादने बाजारात आणताना ‘जॉब्ज स्टाईल’ आवर्जून वापरली जाते.
कायदेशीर लढा
स्टीव्ह जॉब्ज यांनी सर्वप्रथम जेव्हा आयपॅड बाजारात आणला तेव्हा गाण्यांच्या चोरीवरून संगीतकारांनी खूप आरडाओरड केली होती. त्यानंतर जॉब्ज यांनी आय-टय़ूनच्या माध्यमातून संगीतकारांना गाण्याच्या प्रत्येक डाऊनलोडिंगमागे मानधन मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. इतकेच नव्हे तर डाऊनलोड करणाऱ्यांना त्याची ई-पावतीही देण्याची सुविधा दिली. त्यामुळे गाण्यांच्या अनधिकृत डाऊनलोडिंगवर र्निबध आले. भविष्यातही हाच फॉम्र्युला कायम ठेवत अ‍ॅपलने आय-स्टोअरमध्ये प्रत्येक अ‍ॅप डाऊनलोडिंगसाठी पैसे आकारले आणि अ‍ॅपच्या विकासकांना त्याचा मोबदला मिळावयास सुरुवात झाली. जॉब्जच्या या प्रयोगामुळे मोबाइलमधील डाऊनलोडिंग व्यवहारातही पारदर्शकता आली. आणि या माध्यमातून होणारी चोरीही मोठय़ा प्रमाणावर रोखली गेली. याच्या उलट परिस्थिती अँड्रॉइडची आहे. ज्यावेळी अँड्रॉइड बाजारात आले त्यावेळी जॉब्ज यांना खूप राग आला होता. ‘मी अँड्रॉइड बाजारातून हद्दपार करून टाकेन, कारण ते चोरीचे उत्पादन आहे. यासाठी मला कोणत्याही प्रकारचे युद्ध करावे लागले तरी ते मी करेन,’ अशी तीव्र भावना स्टीव्ह जॉब्ज यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख वॉल्टर आयझ्ॉक्सन यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रामध्ये आहे. त्यानंतर अ‍ॅपलने अँड्रॉइडच्या विरोधात डझनभर खटले दाखल केले. जॉब्ज यांच्या निधनानंतरही अ‍ॅपलने हे खटले अटीतडीने लढवले आणि मागच्या उन्हाळय़ामध्ये अ‍ॅपलने यातील काही केसेस जिंकल्याही आणि सॅमसंगकडून त्यांना करोडो डॉलर्सची नुकसानभरपाईसुद्धा मिळाली.
ओएसची क्रांती
त्यांची आयओएसची सातवी आवृत्ती ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ओएसमध्ये सर्वात मोठी क्रांती म्हणता येऊ शकते. आयओएस पाच आणि सातमध्ये फारसा फरक नसल्याचा अनेकांचा दावा आहे. परंतु आयओएसमध्ये देण्यात आलेली सुरक्षायंत्रणा आजवर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमला देता येणे शक्य झाले नव्हते, हेही तेवढेच खरे. अ‍ॅपलची ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम उत्तम दर्जाच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. याशिवाय यात देण्यात आलेल्या इतर सुविधाही चांगल्या दर्जाच्या असून त्यामुळे ग्राहकांना अ‍ॅपलच्या फोनचा वापर अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येऊ शकेल.
अ‍ॅपलने गेल्या दशकात प्रामुख्याने तीन उत्पादने बाजारात आणली. त्यामध्ये आयपॉड, आयफोन आणि आयपॅड यांचा समावेश आहे. या काळात मॅकबुकचे विविध प्रकार बाजारात आले असले तरी मॅकबुक हे १९९५-९६ च्या दरम्यान केलेल्या संशोधनाच्या आधारावर पुढे विकसित करण्यात आले आहे. यानंतर आयपॉड, आयफोन आणि आयपॅड या उत्पादनांमध्ये अतिरिक्त संशोधन करून ती विकसित करण्यात आली. याचा अर्थ अनेकांनी असा घेतला, की जॉब्जनंतर अ‍ॅपलच्या संशोधनाची प्रक्रिया थंडावली आहे. पण जॉब्जच्या संस्कारांत वाढलेल्या टीमला हे जमणारच नाही. त्यामुळे त्यांनी ‘आयवॉच’ बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयवॉच बाजारात आणण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू केले असून, ते लवकरच बाजारात येणार असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत अद्याप तरी अ‍ॅपलने कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. हे ‘आयवॉच’ बाजारात आले की चालता-फिरता कॉम्प्युटरच आपल्या मनगटावर येऊन बसेल आणि त्याद्वारे आपण अवघ्या जगाला आपल्या कवेत घेऊ शकू. अँड्रॉइडची अशी अनेक घडय़ाळं आज बाजारात उपलब्ध असली तरी टेक्प्रेमी मंडळी आयवॉचची आतुरतेने वाट पाहत आहेत. संपूर्ण घर अ‍ॅपलमय करण्याचा अ‍ॅपलचा मानस असून त्यादृष्टीने आता त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट ‘अ‍ॅपल’मय होऊन एकाच उपकरणाच्या माध्यमातून आपण आपलं घर नियंत्रित करू शकू, अशी किमया लवकरच अ‍ॅपल करून दाखवणार आहे. ही किमया दाखवताना विविध पातळय़ांवर संशोधन होणार असून, त्यातून आणखी टेक्क्रांती होईल यात वादच नाही. म्हणूनच आजच्या घडीला स्टीव्ह जॉब्ज सगुण रूपात जरी अस्तित्वात नसला तरी तो निर्गुण रूपाने अ‍ॅपलची दोरी स्वत:च्या ताब्यात ठेवून आहे. कारण अ‍ॅपलची एकही वस्तू जॉब्ज यांच्या तत्त्वज्ञानाशिवाय काम करू शकत नाही. जॉब्ज यांची ही मजबूत बांधणीच कंपनीला प्रगतीपथावर नेत असून, ग्राहकांच्या मनातही अढळ विश्वास टिकवून आहे.