ठाकूर बलदेवसिंह सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये ती सफेद मर्सिडिज आली तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. एका कर्मचाऱ्याने धावत येऊन कारचा दरवाजा उघडला. गाडीतून मा. श्री. वीरेंद्रसिंह उतरले. त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, ‘कैसे हो कल्लू?’

कल्लू कसनुसा हसला. म्हणाला, ‘आप की क्रिपा है सरकार.’
कृपाच म्हणायची. कालिया गेल्यानंतर त्याच्या या मुलाचे खूप हाल झाले. अखेर बापाने दरोडेखोरीत कमावलेला पैसा किती दिवस पुरणार? भीक मागायची वेळ आली होती. पण वीरेंद्रसिंहांनी त्याला आधार दिला. आधी पार्टीच्या कार्यालयात त्याची सोय केली. मग इथं कारखान्यात चिकटवला. आता खाऊनपिऊन बरे चालले होते त्याचे.
त्याच्या हाताचा आधार घेत वीरेंद्रसिंह गेस्ट हाऊसच्या पायऱ्या चढू लागले.
त्यांनी विचारले, ‘भीतर कितने आदमी है?’
‘तीन सरकार.’
‘तो रामलालचा पोरगा आलाय का?’
‘नाही सरकार.’
वीरेंद्रसिंह यांच्या चेहऱ्यावर संतापाची एक लकेर उमटून गेली. या रामलालच्या पोराला एकदा धडा शिकवलाच पाहिजे. मौसी जलसिंचन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत फिरतोय. रक्ताचे पाणी करून आपण ही योजना राबवली. सगळे रामगढ सुजलाम् सुफलाम् केले. नाही तर इथं होतं काय? एक ती पाण्याची टाकी! ती सुसाईट करायच्याच कामाची! शेतकरी जेव्हा पाण्यावाचून मरतात तेव्हा त्याला ‘सुसाईट’ म्हणतात, हेसुद्धा या गँवार लोकांना कळत नव्हतं!
या योजनेमुळे गेल्या २५ वर्षांत इथं एकापण शेतकऱ्याने सुसाईट केलं नाही की पाण्यासाठी हाणामाऱ्या झाल्या नाहीत. नाहीतर त्या हाणामाऱ्यांमुळे कित्येक गाववाल्यांना जेलमधे चक्की पिसिंगसाठी जावं लागत होतं.
पण आज हा रामलालचा नमकहराम पोरगा अपोझिशनवाल्यांच्या नादाने गब्बरगिरी करत फिरतोय. राधाभाभीचा लाडला तो. तिच्या लाडप्यारमुळेच बिघडलाय तो.
राधाभाभीचे नाव येताच त्यांना अचानक एक आठवण झाली.
ते कल्लूला म्हणाले, ‘‘अरे, ते हवेलीतलं रॉकेल संपलंय. त्या अहमदच्या भावाला फोन कर. म्हणावं, ताबडतोब एक कॅन पाठवून दे, नाहीतर राधाभाभीचं कंदीलव्रत अडेल. त्यांना अंधारातच बसावं लागेल. किती वेळा सांगितलं, घरात लाइट कनेक्शन देतो, पण.. तो निरोप लगेच दे. आणि आत सगळी व्यवस्था केलीय ना?’
‘‘जी सरकार. मघाशीच हरीरामसेठच्या बारमधली माणसं आली होती.’’
हा हरीराम साला बहुत काम की चीज आहे. हजामती करता करता त्याने सलून काय काढलं. मग ब्युटी पार्लर काय सुरू केलं. ते करता करता बार काय काढला.. बारला नाव पण बढिया दिलं- ‘धन्नो बार’! साला, धन्नो भी खूश, बसंती भी खूश!
बसंतीच्या आठवणीने वीरेंद्रसिंहांना किंचित उदास वाटू लागले. महिना झाला, तिकडं अमेरिकेत पोरांकडं जाऊन बसलीय नातवंडांना सांभाळत. म्हातारी इथं असली म्हणजे तिच्या बडबडीने कान किटून जातात. पण नसली की वाटतं, इतना सन्नाटा क्यूं है भई?
ते आत येताच सगळे अदबीने उठून उभे राहिले.
‘‘बैठो बैठो. तुम्हाला एका महत्त्वाच्या कामासाठी बोलावलंय मी..’’
‘‘जी सरकार?’’ मोहनसिंह सांभा विनयाने म्हणाला.
‘‘आपल्या रामगढचे स्वातंत्र्यसैनिक आणि आमचे जिगरी दोस्त शहीद जयसिंगजी यांची चाळिसावी पुण्यतिथी यंदा आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपली जान दिली. त्यांच्या त्या नाण्याचे कर्ज आहे गाववाल्यांवर..’’
वीरेंद्रसिंह यांचा वृद्ध आवाज भरून आला होता.
‘‘त्यांच्या नावाने आपण इथं कॉलेज सुरू केलं. ज्या पुलावर त्यांनी देह ठेवला त्याला त्यांचं नाव दिलं. त्यांच्या नावाने जय रामगढ पॅसेंजर ट्रेन सुरू केली. पण आज ४० वर्षांनीही गावात त्यांचा पुतळा नाही..’’
‘‘ऐसे केसे बोल रिये हो सरकार. बसंती इंग्लिस इस्कूलमध्ये है ना एक इस्टॅचू. इनिसपेक्टर खुरानाच्या हस्ते उद्घाटन केलं होतं त्याचं. आम्ही पण पैसे दिले होते..’’ धरमा भोपाली म्हणाला. वीरेंद्रसिंहांनी त्याच्याकडे हसत पाहिलं. पक्कंआजोबांवर गेलं होतं पोरगं! कोण म्हणेल हा पंचायतीचा सदस्य आहे?
‘‘अरे, तो काय पुतळा आहे? आमच्या जयचा पुतळा दुनियेत सगळ्यात मोठा पाहिजे. त्याच्या नावाने एक-दोन योजना सुरू झाल्या पाहिजेत. काय ते तुम्ही ठरवा..’’ असे म्हणत ते आपल्या नेहमीच्या कामाकडे वळले.
टीपॉयवरील द्राक्षासव त्यांची वाट पाहत होते.
०००
दुसऱ्या दिवशी रामगढमध्ये जय स्मारक समितीची स्थापना झाली. प्रत्येक गाववाल्याने स्मारकासाठी एक पोते गव्हाचे पैसे द्यायचे. कारखान्यातील प्रत्येक कामगाराने एक दिवसाचा पगार द्यायचा. गावागावातून स्मारकासाठी काडतुसाचे लोखंड गोळा करायचे असे ठरले.
शहीद जयसिंग यांचे नाव कोणत्या योजनेला द्यायचे, हा प्रश्नच होता. तो प्रश्न राधाभाभींनी सोडवला. जयसिंग यांच्या नावाने अपंगांना कृत्रिम हात-पाय बसवण्याचा कार्यक्रम सुरू करा.. म्हणजे गावात यापुढे तरी कोणी कोणाचे हात मागणार नाही, असे त्या म्हणाल्या.
हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यांत विझलेले दु:खाचे शोले मात्र कोणालाच दिसले नाहीत. ल्ल
अप्पा बळवंत –
balwantappa@gmail,com