४ एप्रिल १९८७… घराच्या अंगणात कडुलिंबाच्या झाडावर शांतपणे बसून लेखन- वाचन करण्यासाठी बांधलेली मचाणवजा खोली दाखवायला म्हणून कविराज अज्ञेयांनी चार-पाच जवळच्या मित्रांना आमंत्रित केलं होतं. ‘ट्री हाऊस’मधली पहिली यार-दोस्तांची मैफल! एकांतप्रिय अज्ञेयांना दिल्लीच्या वातावरणात येणार्या-जाणार्यांच्या गजबजाटात तगून राहण्यासाठी, चोहीकडून फक्त शांतता आणि नैसर्गिक प्रकाशाने घेरलेलं घरकुल आवश्यक वाटत होतं. मोठ्या हौसेनं त्यांनी ते स्वत: डिझाइन केलं होतं. त्यात कधी पाऊलदेखील टाकायला मिळणार नाही हे माहीत असून, नुसत्या कल्पनेनंच आम्ही ‘जगावं तर असं’ वगैरे वाटणारी कच्ची मडकी हुरळून गेलो होतो. कुमार गंधर्वांच्या सुरांच्या साक्षीनं पंचाहत्तरी पार केलेल्या अज्ञेयजींना, तिथे शांतपणे त्यांच्या लाडक्या खुर्चीत बसून काही तरी वाचताना मनोमन बघत होतो. पण झालं भलतंच, त्याच दिवशी अज्ञेयजींना हृदयविकाराचा झटका आला आणि सगळं संपलं. ते ‘ट्री-हाऊस’ केविलवाणं होऊन बघतच राहिलं… अशोक वाजपेयींच्या शब्दांत- ‘भर दिवसा सूर्यास्त झाला होता.’
ऐंशीच्या दशकात केवेंटर लेनमधलं ‘दालमिया हाऊस’ हे दिल्लीतल्या प्रत्येक साहित्यप्रेमी वाचक, लेखक, अभ्यासकांसाठी एक प्रतिष्ठास्थान होतं. आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह ‘अज्ञेय’ (हिंदी उच्चार अग्येय) सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन (१९११-८७) या वजनदार नावाच्या, उंच्यापुर्या हस्तीला शोभणारं घर. अज्ञेयांचे प्रशंसक आणि टीकाकार भरपूर असले तरीही तिथे एखाद् दोन वेळा सकारण जाऊन आल्याखेरीज तुम्ही साहित्यिक परिघात दाखल झाल्याचं मानलं जात नसे. ‘‘मौन ही एक अभिव्यक्ती आहे.’’, ‘‘जे तुमचं सत्य असेल तेवढंच बोला.’’ किंवा ‘‘वाढदिवसाचा एक दिवस येतो आणि एक वर्ष घेऊन निघून जातो.’’ असं बरंच काही लघुकवितेतून सांगणारे लेखक, कवी, द्रष्टे, चिंतनकार, संपादक, शिक्षक अज्ञेय (१९११-१९८७). बहुआयामी प्रतिभेचं जितं-जागतं रूप होते. जीवनाच्या मेळ्यात सर्वार्थाने मुक्त विहरत असलेल्या, कमालीच्या आत्मविरोधाने भरलेल्या आणि बदलाची भीती नसलेल्या अज्ञेयजींच्या विशाल अनुभव क्षेत्राचा आढावा घ्यायचा म्हटलं तर एक सुरस जिंदगीनामा तयार होईल. (अक्षय मुकुल यांनी इंग्लिशमध्ये Writer, Rebel, Soldier, Lover : The Many Lives of Agyeya या पेंग्विन प्रकाशित डेफिनिटिव्ह बायोग्राफीमधून तो अतिशय समर्थपणे केलाच आहे.) त्यांच्या विविध साहित्यप्रकारांमधल्या संचाराचीच म्हणजे कवितासंग्रह, कादंबर्या, कथासंग्रह, वैचारिक निबंध लेखन, संस्मरण, प्रवासवर्णनं, नाटक, समीक्षा, डायर्या, अनुवाद आणि संपादित साहित्यिक ग्रंथांची संख्या ५०हून अधिक भरते. आधुनिक हिंदी कवितेला ‘नयी कविता’चं नवं वळण देणारे शीर्षस्थ कवी म्हणून त्यांचं योगदान महत्त्वाचं आणि हिंदी साहित्यात प्रयोगवादाची ताजी झुळूक आणण्याचे धाडसही त्यांचेच. त्यांच्या काळाचा प्रतिनिधी असलेल्या, समाजाच्या चौकटीत घुसमटणार्या, स्वत:चा शोध घेणार्या तरुणाची कहाणी ‘शेखर : एक जीवनी भाग १ व २’ (१९४१-४४) आणि ‘नदी के द्वीप’ (१९५१) या कादंबर्यांचं हिंदी साहित्यात तेच स्थान आहे, जे आपल्याकडे ‘कोसला’ किंवा ‘बनगरवाडी’चं आहे. पण महत्त्वाचा फरक म्हणजे कोसला अजूनही गावांमधून शहरात येणार्या तरुणांना आपली कहाणी वाटते. मात्र आज ७५ वर्षांनंतर अज्ञेयांची विशेषत: ‘नदी के द्वीप’मधली संस्कृतजडित हिंदी आम वाचकाला जडजंव्याळ वाटते. तर त्यांतील पात्रं ठोकळेबाज, कालबाह्य. पण ‘अरे यायावर रहेगा याद’सारखी प्रवासवर्णनं संस्कृतनिष्ठ भाषेतली असूनही अधेमधे बोलीभाषेचा वापर आणि वर्णनांच्या प्रांजलपणामुळे वाचनीय!
अज्ञेयांची घडणही आगळी-वेगळी! कोवळ्या वयात विद्वान शिस्तप्रिय वडिलांच्या दबावाखाली घुसमटत विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पदवी घेतली खरी; पण पिंड लेखकाचा, कवीचा होता हे त्यांना स्वत:पुरतं कळलं होतं. काही काळ दिशाहीन भटकत राहिले, त्या काळात जैनेंद्र आणि बनारसीदास चतुर्वेदी त्यांची बौद्धिक आधारस्थानं होती. या दोन्ही ज्येष्ठ चिंतकांनीही त्यांच्यातली प्रतिभा आणि वेगळेपण ओळखलं होतं. कॉलेज जीवनात नेहरूंच्या प्रभावाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली, तीन-चार वर्षं कारावासात राहिले, ‘शेखर : एक जीवनी’ याच काळात झपाटल्यासारखी लिहिलेली. तुरुंगवासातून ते कविता प्रकाशनासाठी बाहेर पाठवत, तेव्हा त्यांची ओळख गुप्त राहावी म्हणून त्यांना संपादक प्रेमचंदांनी ‘अज्ञेय’ (ज्ञातापलीकडचा) हे टोपणनाव दिलं होतं- ते वात्स्यायनजींना स्वत:ला फारसं पसंत नव्हतं. पण त्यांचं खरं नाव लांबलचक असल्याने ‘अज्ञेय’ रूढ झालं. काही वर्षं दुसर्या महायुद्धात फॅसिझम विरोधात ब्रिटिश भारतीय सेनेत कॅप्टन म्हणून दाखल झाले, त्या काळात लिहिलेली एक कविता ‘जो पुल बनायेंगे’ माझ्या अनुवादात :
‘‘जे पूल बांधतात
ते अटळपणे
मागे पडतील.
सैन्यं त्यांच्यावरून पार होतील
युद्धांत रावण मारले जातील
रामांच्या विजयाचा उद्घोष होईल
बांधणारे
इतिहासात नमूद होतील
वानरं म्हणून’’
कधीकधी ‘‘अगर मैं अपने से बड़े किसी विचार, आदर्श, आयडिया के लिए जीता हूँ तो स्पष्ट है की मेरा जीवन एक यज्ञ है : उस विचार या आदर्श के लिए अर्पित आहुति मैं हूँ’’ किंवा ‘‘साहित्य तुम्हारी तुम्हीं से पहचान और गहरी करता है.’’ असं काही सहजच बोलून जाणारे आणि बोलता- बोलता विचारात हरवून जाणारे अज्ञेय एक अस्वस्थ आत्मा वाटायचे.
‘घर’ हा आयुष्यभर काळजातला हळवा कप्पा असूनही एका ठिकाणी, एका कामात, एका व्यक्तीत फार काळ मन रमत नसे. आणि प्रवासही रात्री-बेरात्री ट्रकसारखी अवजड वाहनं चालवत, निशाचर प्राणी -पक्षी निरखत. अज्ञेय हे एक वेगळंच रसायन होतं. निसर्गसुंदर पहाडांचं त्यांना अतिशय आकर्षण. नदी आणि बेटं ही त्यांच्या लिखाणात वारंवार येणारी स्वभावातल्या प्रवाहीपण आणि एकटेपणाची रूपकं… नैनितालजवळ एक घर विकत घेऊन ठेवलं होतं. तिथे बाहेर बसून निसर्ग न्याहाळत बसणं त्यांना खूप आवडत असे. पण त्यात ते कायमचे येऊन राहू शकले नाहीत. तिथे लिहिलेल्या कवितांपैकी एक साधी, पण बहुचर्चित ठरलेली कविता :
दूर्वांचल
पार्श्व गिरि का नम्र, चीड़ों में
डगर चढ़ती उमंगों-सी।
बिछी पैरों में नदी ज्यों दर्द की रेखा।
विहग-शिशु मौन नीड़ों में।
मैंने आँख भर देखा।
दिया मन को दिलासा-पुन: आऊँगा।
(भले ही बरस-दिन-अनगिन युगों के बाद!)
क्षितिज ने पलक-सी खोली,
तमक कर दामिनी बोली-
‘अरे यायावर! रहेगा याद?’
अज्ञेय हे ‘दिनमान’ या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ समूहाच्या हिंदी साप्ताहिकाचे पहिले संपादक होते. त्यांनी त्या तीन वर्षांत ‘दिनमान’ला सांस्कृतिक अभिरुचीचं परिमाण दिलं. व्याख्यानं किंवा परिषदांसाठी जितक्या वेगवेगळ्या देशांत, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींमध्ये ते गेले तिथून वेचक काही घेऊन मन समृद्ध करून परतले. जपानहून परतल्यावर त्यांनी ज्या लघुकविता लिहिल्या त्यावर झेन विचारसरणीचा प्रभाव जाणवतो आणि हायकूच्या आकृतिबंधाचाही! एकदा त्यांनी मधेच ज्ञानेश्वरीतली एक ओळ विचारली होती, ती सांगता न आल्याची मला लाज वाटली होती. ती महत्प्रयासाने शोधून दुसर्याच दिवशी त्यांना नेऊन दिली. ‘‘आता मराठीतलं काही लागलं तर मी तुलाच फोन करणार बरं का!’’ हे ऐकल्यावर मी कशीबशी मान डोलावली होती…
आपल्या लिखाणाचा देश आणि पलीकडे भरपूर सन्मान झालेला बघण्याचं भाग्य या गांभीर्याच्या धुक्यामागे राहणार्या चंचल प्रपाताला याचि देही याचि डोळा लाभलं खरं, पण त्याच्या मनाचा ठाव लागल्याचा दावा कोणी करू शकेल असं वाटत नाही. जवळचे मानले जाणारे मित्र टिकायचे नाहीत, सारखे बदलायचे असंही रघुवीर सहाय, बलराज सहानी, धर्मवीर भारती, फणीश्वरनाथ रेणू यांच्या अनुभवांतून कळतं. त्यांना मित्र नाही अनुयायी हवे असत असं म्हटलं जाई. ‘‘माझं सगळं आयुष्य मी मनातून जगत राहिलो आणि कधी व्यक्त करू शकलो नाही. दुसरं, वरकरणी दिसणारं आयुष्य, जवळजवळ अवैयक्तिक आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर जेकिल आणि मिस्टर हाईड ही सत्यकथा असेल तर तो मीच असेन,’’ असं त्यांनी एका घनिष्ठ मित्राला पत्रातून लिहिलं होतं. व्यक्तिगत आयुष्यात स्वयंपाक, सुतारकाम, शिलाई, फोटोग्राफी अशा उपयोगी कला त्यांच्या आवडीचे प्रांत. माझ्या दोन मित्रांना त्यांनी बनवलेली मखाने की खीर ‘स्वादिष्टतम्’ वाटली होती हे आठवतंय. दहा भावंडांच्या गोतावळ्यात जन्मलेले, वाढलेले अज्ञेय स्वत: मात्र नात्यांची बंधनं आणि जबाबदार्यांपासून दूरच राहिले, पण मन कनवाळू होतं. गरज असलेल्या कोणालाही ते व्यवहारीपणाबाहेर जाऊन मदत करत. ज्ञानपीठ पुरस्काराचे पैसे त्यांनी उदयोन्मुख लेखकांच्या मदतीसाठी वापरले जावेत म्हणून ‘वत्सलनिधी ट्रस्ट’ स्थापन केला होता.
‘मैं मरुंगा सुखी. मैंने जीवन की धज्जियां उडायी हैं’’ म्हणणार्या अज्ञेयजींचं वैयक्तिक आयुष्यही गुंतागुंतीचं. पुस्तकात एके ठिकाणी अक्षय मुकुलने निरीक्षण नोंदवलंय की बर्याच स्त्रिया आयुष्यात येऊनही न ते कुठल्या नात्यात फार काळ रमले, न त्या स्त्रिया आनंदात राहू शकल्या. याला कारण त्यांचा वर्चस्व गाजवण्याचा स्वभाव आणि वृत्तीतला अलिप्तपणा असावा. पहिला प्रेमविवाह संतोष मलिक यांच्याबरोबर पाच वर्षं अडखळत चालला आणि संपला. ते त्यांच्या सुकुमार, बुद्धिमती धाकट्या मेहुणीच्या प्रेमात पडले. या म्हणजे नंतर प्रशासकीय अधिकारी व सुप्रसिद्ध कलाइतिहासतज्ज्ञ ठरलेल्या डॉ. कपिला वात्स्यायन. हे मनस्वी आणि लौकिकार्थाने परिपूर्ण नातं अज्ञेयजींना हवं असलेलं जबाबदारीमुक्त, पूर्णस्वातंत्र्य आणि पूर्णवेळ लेखन वाचनासाठी मोकळीक देणारं होतं. बौद्धिक साहचर्य इतकं उत्तम की दोघांना परदेशी विद्यापीठांमध्ये शोधकार्याबरोबर अध्यापनासाठी ‘रॉकेफेलर’सारख्या अभ्यासवृत्ती मिळत, व्याख्यानांची निमंत्रणं येत. अमेरिकेत बर्कले विद्यापीठात अज्ञेयांना हिंदीच्या अध्यापनासाठी वर्षभर आमंत्रित केलं गेलं होतं. वयात अंतर असूनही दोघे एकमेकांना अनेकार्थाने अनुरूप वाटावीत अशीच होती. हे लग्न १४ वर्षं टिकलं आणि घटस्फोट झाला, कारण अज्ञेय परत प्रेमात पडले होते- त्यांच्याहून तीसेक वर्षं लहान असलेल्या इला दालमियांच्या. या नव्या नात्याबद्दल कळताच मानिनी कपिलाजींनी वेगळा मार्ग पत्करला आणि कधी मागे वळून पाहिलं नाही. अज्ञेयजींच्या अंत्यदर्शनाला मात्र त्या अतिशय शांत गांभीर्याने येऊन गेल्या, अगदी काहीच क्षण. राजधानीने पाहिलेली एका युगान्ताची मूक अंत्ययात्रा होती ती!
arundhati.deosthale@gmail.com
