प्रियांका डंक
मानवी इतिहासात तंत्रज्ञानाकडून ठेवलेल्या अपेक्षांचा पट पाहिला, तर त्यामागे एक साधे आणि अत्यंत व्यावहारिक समीकरण दिसते. यंत्रांनी माणसाचे कष्टप्रद आणि धोकादायक शारीरिक श्रम कमी करावेत, संगणकाने गुंतागुंतीची आकडेमोड जलद करावी, इंटरनेटने माहितीचे लोकशाहीकरण करावे आणि कारखान्यांतील ऑटोमेशनने उत्पादनाचा वेग वाढवावा. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतही ( AI) सुरुवातीची मध्यवर्ती कल्पना यापेक्षा फार वेगळी नव्हती. पुनरावृत्तीची, कंटाळवाणी आणि वेळखाऊ कामे अल्गोरिदमकडे जातील, ज्यामुळे मानवी मेंदूला विचार, कल्पकता आणि धोरणात्मक निर्णयांसाठी अधिक मोकळा वेळ मिळेल.

थोडक्यात सांगायचे तर- श्रमसाध्य अंमलबजावणी यंत्रांची, तर धोरण आणि दिशा माणसाची अशी ही कामाची स्पष्ट आणि सोपी विभागणी होती; परंतु जनरेटिव्ह एआयच्या आगमनानंतर या पारंपरिक समीकरणाची मोडतोड अपेक्षेपेक्षा फार वेगाने झाली. आज आपण एआयला केवळ ‘माझे हे काम करून दे’ असा आदेश देत नाही, तर ‘या प्रचंड माहितीच्या साठ्यात महत्त्वाचे काय?’, ‘माझा प्राधान्यक्रम काय असावा?’, ‘उपलब्ध पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडावा?’ आणि ‘या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा?’ अशा वैचारिक आणि धोरणात्मक पातळ्यांवर विचारणा करू लागलो आहोत. आदेशांच्या थेट अंमलबजावणीपासून ते मार्गदर्शन आणि पर्यायांच्या निवडीपर्यंतचा हा प्रवास वरवर पाहता केवळ भाषेतील किंवा वापराच्या पद्धतीतील फरक वाटू शकतो; परंतु तो माणूस आणि तंत्रज्ञानाच्या संबंधांमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सूक्ष्म सत्तांतर सूचित करतो. आपले आदेश पाळणारे सॉफ्टवेअर अबोलपणे आपल्या लक्ष्याचा क्रम, आपल्या आवडीनिवडी आणि निर्णयांच्या चौकटीवर प्रभाव टाकू लागले आहे.

वैयक्तिक वापरातील अदृश्य प्रभाव

हा बदल अचानक किंवा एका रात्रीत घडलेला नाही. जनरेटिव्ह एआयच्या आधीपासूनच डिजिटल साधनांनी आपल्या नकळत आपल्या दैनंदिन निवडींची दिशा ठरवायला सुरुवात केली होती. ‘गूगल मॅप्स’ने ‘तुम्ही याच रस्त्याने जा’ अशा शिफारशी करीत माणसाला स्वत:च्या दिशाज्ञानावर अवलंबून राहण्याची गरज बर्‍याच अंशी कमी केली होती; तर नेटफ्लिक्स, यूट्यूब, स्पॉटिफाय आणि विविध समाजमाध्यमांतून शिफारस करणार्‍या अल्गोरिदमांनी ‘तुम्ही पुढे काय पाहावे किंवा ऐकावे’ या निवडींवर सूक्ष्म प्रभाव टाकायला सुरुवात केली. माहितीच्या अफाट स्फोटाच्या या युगात हजारो पर्यायांमधून स्वत: निवड करत बसण्यापेक्षा यंत्राने तीन-चार सुसंगत पर्याय पुढे ठेवणे माणसाला सोयीचे वाटले आणि आपण ही सोय सहज स्वीकारली. मात्र, जनरेटिव्ह एआयने या प्रक्रियेला एका वेगळ्या आणि अधिक खोल टप्प्यावर नेले. तो आता फक्त पर्यायांची रांग लावत नाही तर त्यांची तुलना करतो, त्यांचे गुण-दोष मांडतो, महत्त्वाचे मुद्दे ठळक करतो आणि पुढच्या कृतीचा मार्ग सुचवून एका अर्थाने आपल्या विचारप्रक्रियेचा भाग बनतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील साध्या प्रसंगांचेच उदाहरण घ्या- एखाद्या सहकार्‍याला वाढदिवसाचा किंवा कौतुकाचा संदेश पाठवणे असो, सुट्टी घालवण्यासाठी पर्यटनाचे ठिकाण निवडणे असो, की स्वत:साठी करिअरची नवी वाट शोधणे असो… आपण स्वत:च्या आवडीनिवडींचा आणि अनुभवांचा विचार करण्याऐवजी स्क्रीनवर उमटणार्‍या एआयच्या शिफारशींवर विसंबून राहू लागतो. आपण स्वत: विचार करून निष्कर्ष काढण्याऐवजी जेव्हा एआयने तयार करून दिलेल्या निष्कर्षालाच अंतिम मानू लागतो; तेव्हा आपल्या नकळत मदतनीस आणि बॉस यांच्यातील सीमारेषा अस्पष्ट होऊ लागते.

विचारप्रक्रियेचे परावलंबित्व?

वैयक्तिक पातळीवर चॅटजीपीटी किंवा जेमिनीसारख्या साधनांमुळे आपले काम सोपे आणि जलद झाले आहे. सुरुवातीला छायाचित्रांना कलात्मक शैली देणे, परभाषेतील ई-मेलचा मसुदा तयार करणे किंवा क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत समजून घेणे यापुरता मर्यादित वाटणारा हा वापर वेगाने आपल्या रोजच्या अभ्यासाचा आणि कामाचा भाग बनला. एखादा लांबलचक दस्तावेज वाचून स्वत: निष्कर्ष काढण्याऐवजी आपण एआयला ‘यात महत्त्वाचे काय?’ असे विचारतो आणि तो जे तीन मुद्दे पुढे ठेवतो त्यावरच आपले लक्ष केंद्रित करतो.

इथे अंतिम निर्णय कागदोपत्री माणसाचाच असतो; परंतु कुठे आधी लक्ष द्यायचे, कशाला प्राधान्य द्यायचे आणि कोणता मार्ग बाजूला सारायचा, हे यंत्राने ठरवलेले असते. वैयक्तिक आयुष्यात जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:च्या लेखनशैलीची, भाषासौंदर्याची किंवा विश्लेषणाची जागा एआयने तयार केलेल्या मसुद्याला देते तेव्हा तिच्या स्वत:च्या मौलिक आवाजाची ( individual voice) आणि व्यक्तिमत्त्वाची धार बोथट होऊ लागते. हा ‘अल्गोरिदमिक प्रभाव’ केवळ कॉर्पोरेट कार्यालयांतच घडतो असे नाही, तर जेव्हा आपण आपल्या रोजच्या कामात स्वत:चा मेंदू वापरण्याऐवजी प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी एआयवर अवलंबून राहू लागतो; तेव्हा आपण नकळत एका अदृश्य अल्गोरिदमच्या प्रभावाखाली जात असतो. ‘बॉस’ म्हणजे फक्त थेट आदेश देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या लक्ष्याचा क्रम आणि विचारांची चौकट ठरवणारी ताकदही तीच भूमिका बजावत असते.

वैयक्तिक अनुभवाची चौकट आणि मानवी मर्यादा

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत जेव्हा एआयचा असा खोलवर शिरकाव होतो; तेव्हा वैयक्तिक पातळीवर विचारांचे काम बाह्य साधनाकडे सोपवण्याची सवय- ज्याला cognitive offloading म्हटले जाते- वाढू शकते. पूर्वी एखादी अडचण किंवा प्रश्न उपस्थित झाला की माणूस स्वत:च्या जुन्या अनुभवांची उजळणी करायचा, ज्येष्ठांचा किंवा मित्रांचा सल्ला घ्यायचा किंवा पुस्तके चाळून स्वत:चे उत्तर शोधायचा. या मंथनातून मिळणारे वैयक्तिक शहाणपण आणि निर्णयक्षमता कोणत्याही सर्च इंजिन किंवा एआय टूलमधून तंतोतंत मिळणे कठीण आहे. एआय प्रचंड प्रमाणातील माहिती काही सेकंदांत शोधून, संकलित करून किंवा विश्लेषित करून देऊ शकतो, पण त्या माहितीचा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याशी आणि मूल्यांशी कसा सांधा जोडायचा, हे शेवटी व्यक्तीच्या स्वत:च्या विवेकबुद्धीवरच अवलंबून असते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या तरुणाला आपल्या करिअरमध्ये किंवा शिक्षणक्रमात कोणता निर्णय घ्यावा याबद्दल गोंधळ असेल तर एआय त्याला विविध क्षेत्रांतील भविष्यातील आर्थिक संधी आणि पगाराची आकडेवारी मांडून दाखवेल. परंतु त्या तरुणाची स्वत:ची आंतरिक आवड, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याची जोखीम घेण्याची क्षमता आणि त्याची मानसिक स्थिती या गोष्टी डेटाच्या कोणत्याही चौकटीत तंतोतंत बसू शकत नाहीत. वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय जेव्हा निव्वळ अल्गोरिदमच्या तर्कावर आणि आकडेवारीवर घेतले जातात; तेव्हा त्यातून मानवी भावभावना, कौटुंबिक संदर्भ आणि अनुभवांचा ओलावा बाजूला पडण्याचा धोका असतो.

वेग, शहाणपण आणि मानवी विवेक

या तंत्रज्ञानाची दुसरी बाजू पूर्णपणे नाकारणे व्यावहारिक ठरणार नाही, कारण एआयमुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक उत्पादकतेत वाढ झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. अभ्यासातील माहिती वेगाने शोधणे असो किंवा नवशिक्या कर्मचार्‍यांना कामाची दिशा दाखवणे असो, एआय हा तांत्रिक शिक्षकाच्या (‘k digital mentorl) भूमिकेत नक्कीच उपयुक्त ठरू शकतो; परंतु वैयक्तिक वापरामध्ये एका मूलभूत फरकाचे भान ठेवणे आवश्यक आहे- वेग आणि शहाणपण ( speed and wisdom) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

एआय अथांग माहितीच्या साठ्यातून अत्यंत वेगाने निष्कर्ष काढू शकतो; पण तो निष्कर्ष एखाद्या विशिष्ट मानवी परिस्थितीत, कौटुंबिक संदर्भात किंवा वैयक्तिक मूल्यांच्या चौकटीत योग्य आहे का, याचे उत्तर केवळ डेटा देऊ शकत नाही. त्यासाठी मानवी अनुभव लागतो, परिस्थितीचा संदर्भ समजावा लागतो आणि नैतिक संवेदना महत्त्वाची असते. डॉक्टरला एआय निदानाची दिशा दाखवेल, पण उपचाराचा संवेदनशील निर्णय डॉक्टर आणि रुग्णाने वैद्यकीय संदर्भ, जोखीम आणि मूल्ये लक्षात घेऊन घ्यावा लागतो. इंजिनीअरला एआय डिझाइन सुचवेल, पण त्या डिझाइनच्या सुरक्षेची पडताळणी आणि जबाबदारी मानवी आणि संस्थात्मक प्रक्रियांतूनच निश्चित करावी लागते. म्हणूनच एआयला आपला सल्लागार मानणे ठीक आहे; परंतु त्याच्या हाती वैयक्तिक निर्णयाधिकाराचे सूत्र सोपवणे धोक्याचे ठरू शकते.

पडताळणीचे नवे मानवी कौशल्य

नोकरी जाण्याच्या प्राथमिक भीतीपेक्षाही अधिक गंभीर आणि खोल प्रश्न असा आहे की, सातत्याने विचारप्रक्रियेचे काम एआयकडे सोपवल्यामुळे मानवी मेंदूची स्वतंत्रपणे आणि विश्लेषणात्मक पद्धतीने विचार करण्याची क्षमता ( critical thinking) क्षीण होणार का? मायक्रोसॉफ्ट रिसर्चच्या २०२५ मधील अभ्यासात असे दिसून आले की, एआयवरील विश्वास अधिक असणे आणि विश्लेषणात्मक पद्धतीने विचारक्षमता राबविणे यांच्यात संबंध आढळतो. तथापि, याच अभ्यासात असेही दिसून आले की, एआयसोबत काम करताना विचारप्रक्रियेचे स्वरूप बदलते- ‘उत्तर शोधण्यापासून’ ते ‘उत्तराची अचूकता तपासणे, संदर्भाशी जुळवाजुळव करणे आणि देखरेख करणे’ अशा कामांकडे ती सरकते.

इथेच भविष्यातील मानवी क्षमतेचा खरा निकष आणि नवे कौशल्य दडलेले आहे. गेल्या काही वर्षांत एआयला योग्य आणि अचूक प्रश्न विचारण्याच्या कौशल्याला- prompt engineering»FF- मोठे महत्त्व मिळाले; परंतु आगामी काळात त्याहून अधिक महत्त्वाचे कौशल्य असेल- एआयच्या उत्तरांची उलटतपासणी. एआयने सुचवलेला हा पर्याय सर्वोत्तम का आहे? त्यामागे कोणती माहिती आणि कोणती गृहीतके आहेत? यात काय राहून गेले आहे? आणि जर हे उत्तर चुकीचे ठरले तर त्याची किंमत कोणाला मोजावी लागणार?

सीमारेषा आखावी लागेल…

एआय आपला ‘बॉस’ होण्याचा क्षण तो आपल्याला थेट आदेश देईल तेव्हा येणार नाही; तो अधिक शांतपणे आणि नकळत येऊ शकतो- जेव्हा आपण त्याच्या सल्ल्याची आणि उत्तरांची पडताळणी करणे पूर्णपणे बंद करू. एआयच्या अथांग क्षमतेपासून दूर पळण्यात शहाणपण नाही आणि त्याच्याकडे विचार करण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यातही नाही.

आपली कामे सोपी करण्यासाठी तयार झालेला एआय आज कुठे लक्ष द्यावे आणि कोणता मार्ग निवडावा हे सुचवण्याच्या टप्प्यावर आला आहे. मुद्दा एआय वापरायचा की नाही हा मुळात नाहीच; खरा प्रश्न हा आहे की आपण त्याला आपल्या दैनंदिन विचारांवर आणि निर्णयांवर किती अधिकार देणार आहोत? त्यामुळे मदतनीस आणि बॉस यांच्यातील सूक्ष्म सीमारेषा तंत्रज्ञान स्वत: आखणार नाही. मानवी शहाणपण, विवेक आणि स्वत:च्या निर्णयाधिकाराचे भान ठेवून ती सीमारेषा माणसालाच स्वत: आखावी लागेल.
priyankadank@gmail.com
(प्रियंका डंक या गेल्या दीड दशकापासून एआय, मशिन लर्निंग आणि डेटा ॲनालेटिक्स क्षेत्रात कार्यरत असून जर्मनीत वास्तव्यास आहेत. गेले दशकभर त्या ‘एअरबस’ या प्रख्यात संस्थेत ‘एआयतज्ज्ञ’ म्हणून काम पाहतात.)