‘लोकरंग’ (२७ सप्टेंबर)मधील प्रियांका डंक यांचा ‘मदतनीस हळूहळू वरचढ ठरतोय!’ हा लेख वाचला. एआयमुळे जग बदलणार की जगाला धग लागणार, हे येणारा काळच ठरवेल. जेव्हापासून एआय प्रत्यक्षात आले तेव्हापासून त्याने विविध क्षेत्रांतील नोकर्यांना धडका द्यायला सुरुवात केली आहे.
या ठिकाणी माझा स्वत:चा एक अनुभव मला नमूद करावासा वाटतो. मी मुंबईतील एका शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी गेलो होतो. ओपीडीत कार्यरत असणारे शिकाऊ डॉक्टर त्यांच्यासमोर येणार्या रुग्णाला आजाराची लक्षणे विचारून लगेच ती लक्षणे आपल्या हातातल्या स्मार्टफोनद्वारे एआयला पुरवून, एआयने सुचविल्याप्रमाणे रुग्णांना औषधे लिहून देत होते. एआयच्या जमान्यात डॉक्टरांची सध्याची पिढी एआयच्या दावणीला बांधली गेल्याचे मला दिसले. डॉक्टरांची अशी ही एआयनिर्मित पिढी तयार होत असेल तर भविष्यात अशा डॉक्टरांकडून ‘संवेदनशील’ निर्णयाची अपेक्षा कशी बरे करता येईल? हा आजचा खरा प्रश्न आहे.
– धनराज खरटमल, मुलुंड
मानवावरच एआयचे सरळवळण अवलंबून
‘लोकरंग’ (२७ सप्टेंबर) मधील ‘जग बदलणार की जगाला संपवणार?’ हा सुश्रुत कुळकर्णी आणि प्रियांका डंक यांचा ‘मदतनीस हळूहळू वरचढ ठरतोय’ हा लेख वाचला. एआयमुळे माणसांच्या बुद्धीला गंज चढून तो निर्बुद्ध होऊ नये ही इच्छा. एआयवर मानव कसे ‘संस्कार’ घडवतो त्याच्यावरच त्याचे ‘सरळवळण’ अवलंबून राहाणार आहे. आपण बनवलेला एआय हे ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरू नये. हल्लीचा काळ बघता सर्वच क्षेत्रात भविष्यात काय घडू शकेल याचा अंदाज एआय करेल काय? एआयचा आधार घेणारे संभ्रमित होतील.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर, मुंबई</strong>
विचार करण्याची प्रवृत्ती नष्ट होऊ नये
‘लोकरंग’मधील (२७ सप्टेंबर) ‘मदतनीस हळूहळू वरचढ ठरतोय!’ हा प्रियांका डंक यांचा लेख वाचला. कृत्रिम बुद्धिमत्तेने आपला खूप विस्तार केला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. चॅटजीपीटी असेल किंवा गूगल जेमिनाय यांसारखे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मानवी जीवन खरोखरच अवघड झाले आहे. एआयमुळे मानवाची विचारशक्ती मानवनिर्मित संसाधनामुळे हळूहळू क्षीण होते की काय याचीच भीती वाटते. तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग व्हावेत यात शंकाच नाही, पण भविष्यात आपलीच विचार करण्याची प्रवृत्ती नष्ट होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
– शशिकांत कुलकर्णी, नांदेड</strong>
कोलाहलाची जाणीव
‘लोकरंग’मधील (२७ सप्टेंबर) ‘मदतनीस हळूहळू वरचढ ठरतोय!’ हा प्रियांक डंक यांचा लेख वाचला. कृत्रिम बुद्धिमत्ता ही खरी धोकादायक ठरत आहे. एआयमुळे तुमचे स्वत:चे कौशल्य हरवत चालले आहे. हा लेख प्रचंड कोलाहलाची जाणीव करून देणारा आहे. आम्ही आज अस्वस्थ शहराच्या झगमगाटी सैराटात लॅपटॉप घेऊन धावतो आहोत. काय करावं? तर लगेच एआय! हे दोन्ही लेख आपल्या डोळ्यांवर मनस्वी अंजन घालतात. लेखिका दीड दशकापासून एआय, मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्स क्षेत्रातल्या आहेत. यात विचारप्रक्रियेचे परावलंबित्व, वैयक्तिक अनुभवाची चौकट आणि मानवी मर्यादा, वेग, शहाणपण आणि मानवी विवेक व सीमारेषा आखावी लागले. आपण एआयच्या भयंकराच्या दारात आहोत उभे आहोत. वैयक्तिक आयुष्याशी आणि मूल्यांशी कसा सांधा जोडायचा, हे शेवटी व्यक्तीच्या स्वत:च्या विवेकबुद्धीवर अवलंबून असते. लेखिकेने अतिशय उत्तमपणे आजच्या वर्तमानाची अस्वस्थता मांडली आहे. आजचा तरुण हा आंतरिक आवड, कौटुंबिक पार्श्वभूमी याची जोखीम घेण्याची क्षमता व त्याची मानसिक स्थिती या गोष्टी डेटाच्या कोणत्याही चौकटीत तंतोतंत बसू शकत नाही. यामुळे आजचा उद्विग्न अवस्थेचा तरुण खर्या मायेच्या ओलाव्यापासून दूर जात आहे. म्हणून एआयचा वापर सावधानतेने करा.
– डॉ. प्रभाकर शेळके, जालना</strong>
‘एआय’च्या नवनिर्मितीचे भूत विध्वंसकच!
‘लोकरंग’ (२७ सप्टेंबर) मधील ‘जग बदलणार की जगाला संपवणार?’ हा सुश्रुत कुळकर्णी आणि ‘मदतनीस हळूहळू वरचढ ठरतोय’ हा प्रियांका डंक यांचा लेख वाचला. दोन्ही लेख वैचारिक पार्श्वभूमीवर वास्तवाची जाणीव करून देणारे तर आहेच, पण ती एक राजकीय लढाई बनत चालल्याने, तांत्रिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चिंतनीय आहे हेही निर्विवाद! निर्मिती ही सृष्टीच्या नवचैतन्याची पालवी असते, यात संदेह नसला तरी निर्मिती कुणापासून आणि कोणत्या पार्श्वभूमीवर होणार आहे, याची शहानिशा होणे मात्र सामाजिक गरज असू शकते. एआयचे भूत जर राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसले तर ते विध्वंसक मार्गावर घेऊन जाणारे अमानवीय पाऊल ठरेल. यावर कठोर बंधने हवीत, ती नसतील तर युद्धप्रेरक निर्णय अथवा युद्धास मदत करणार्या कृत्रिम मानव निर्मितीचा ध्यास धोकादायक ठरेल. राज्यकर्त्यांच्या वैचारिक नीतिमत्तेची पातळी केव्हा कधीही घसरू शकते. वैज्ञानिक क्रांती अवश्य व्हावी, पण एआयबाबतीत बंधने हवीत.
– डॉ. नूतनकुमार पाटणी
