सुश्रुत कुलकर्णी
कृत्रिम बुद्धिमत्ता भयावह वाटणार्या वेगानं प्रगती करू लागलीए. एआय माणसांना कंटाळवाण्या आणि धोकादायक कामांतून मोकळं करतंय खरं, पण या प्रगतीमागे कोणतं नुकसान दडलंय याची आपल्याला जाणीव आहे का? ‘सुपर-इंटेलिजंट’ एआय सगळं स्वत:च्या ताब्यात घेऊ पाहतंय. या महिन्याच्या आरंभीच त्याची प्रचीती आली आणि तंत्रज्ञान वर्तुळ या घटनेनं चक्रावून गेलं. जगासाठी धोक्याची पहिली घंटा वाजविणारं नक्की असं काय घडलं, भविष्यात काय घडू शकतं यांसह कामात मदत करू पाहणारी ‘एआय’ यंत्रणा वरचढ का ठरू पाहतेय, त्यांचे विश्लेषण…
हेन्री डेव्हिड थोरो हा १९व्या शतकातला विख्यात अमेरिकन लेखक आणि निसर्गअभ्यासक. त्यानं तेव्हाच इशारा दिला होता – – ‘‘Men have become the tools of their tools.’’ आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘एआय’बद्दल चिंतन करताना याहून अचूक निदान सापडणार नाही. थोरोनं हे वाक्य लिहिलं होतं ते रेल्वे, यंत्रमाग आणि तारायंत्रं यांच्या संदर्भात. मुळात ही यंत्रं माणसाच्या सेवेसाठी बनवली गेली होती, पण पुढे तीच माणसाचं आयुष्य या स्वत:भोवती केंद्रित करू लागली.
अगदी याच प्रकारे आज २०२६मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता रोजच्या साध्यासोप्या कामांबरोबरच संशोधन, वीजयंत्रणा, आणि शस्त्रास्त्र नियंत्रण यात मिसळून गेली आहे. जग बदलून टाकणारी साधनं आपण बनवू शकतो का, हा प्रश्न आता मुळात उरलेलाच नाही. ती आपण बनवलीच आहेत. आता या सार्याचा परिणाम नेमका काय होणार यावर जगभर चर्चा सुरू झाली आहे, पण आताच ही चर्चा सुरू व्हायला नेमकं काय कारण घडलं?
सप्टेंबरच्या सुरुवातीला ही ठिणगी पडली ती जेकब कॉक्सन या २७ वर्षांच्या तरुण संशोधकामुळे! करिअरच्या सुरुवातीला त्यानं तीन वर्षं ‘चॅट-जीपीटी’ बनवणार्या ओपनआय या कंपनीत काम केलं. नंतर तो ‘क्लॉड’ची निर्मिती करणार्या ॲँथ्रॉपिकमध्ये गेला. त्यानं फक्त चार महिन्यांतच तिथला राजीनामा दिला. याबद्दलच्या एका पोस्टमध्ये त्यानं दोन्ही कंपन्यांवर गंभीर आरोप केला आहे. सुपरइंटेलिजंट एआय बनवण्याच्या शर्यतीत या कंपन्या ‘आपल्या जीवाशी जुगार खेळतायत,’ असं त्यानं लिहिलं. या प्रचंड व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तो लिहितो, ‘‘एआय बनवणार्या या कंपन्यांना ते या दशकाच्या अखेरीस आपल्या सगळ्यांना संपवू शकतं याची पक्की खातरी आहे.’’
ही भीती व्यक्त करणारा तो एकटाच नव्हता. ॲँथ्रॉपिकचा अलाइनमेंट सायंटिस्ट इव्हान हुबिंजर यानंही जाहीरपणे त्याला पाठिंबा दिला. पुढच्या दहा वर्षांत एआयमुळे मानवजात नष्ट होण्याची शक्यता ‘१० टक्क्यांहून अधिक’ असल्याचं त्यानंही सांगितलं. याच्या आधीच, फेब्रुवारी २०२६मध्ये ॲँथ्रॉपिकचा ‘एआय सुरक्षा प्रमुख मृणांक शर्मानंही राजीनामा दिला होता. नोकरी सोडताना ‘जग संकटात आहे,’ असं त्यानंसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. एआय आणि जैविक शस्त्रांपलीकडेही अनेक संकटं एकमेकांत गुंतलेली आहेत, असं त्याचं म्हणणं होतं.
खुद्द ॲँथ्रॉपिकचा सीईओ दारिओ आमोदेई स्वत:च म्हणतो, ‘‘एआयचा विकास ‘खरंच खूप वाईट वळण’ घेण्याची शक्यता २५ टक्के इतकी आहे.’’ कॉक्सनच्या राजीनाम्यानंतर दारिओ आमोदेईनं ‘‘We Must Pace the Frontier’’ या शीर्षकाचा एक निबंध लिहिला. त्यानं स्वत:ची भूमिका या निबंधात सविस्तर मांडलेली आहे. मात्र ती भूमिका भीती आणि दिलासा यांच्या मधेच तरंगणारी आहे. ‘एआयचा विकास थांबवायची गरज नाही,’ असं तो म्हणतो; पण ‘त्याचा वेग जाणीवपूर्वक आवरायला हवा,’ असा तो इशाराही देतो- एआय स्वत:च स्वत:ला सुधारत गेलं, तर ते काय करत आहेत हे कळणं मानवाच्या आकलनाच्या पलीकडे जाऊ शकतं. यासाठी तो ‘कशा प्रकारे एआय एजंट्सनी परवानगीशिवाय सायबर हल्ले केले; एवढंच नव्हे तर एआय एजंट्सची तपासणी करणार्यांनाही फसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला’ यांसारख्या खर्या घटनांचे दाखले देतो. म्हणजे मानव आणि एआय यांच्यामध्ये विसंवाद अथवा न जुळू शकणारी रेषा आहे, ही कुणकुण आता केवळ कल्पना राहिलेली नाही.
यावर आमोदेईनं तीन टप्पे असलेली योजना सुचवली आहे. पहिला- स्वत:च्याच कंपनीत स्वतंत्र सुरक्षा तपासनीस नेमणं. दुसरा- लोकशाही देशांतल्या एआय लॅब्जमध्ये समान सुरक्षा नियम ठरवणं. आणि तिसरा- चीनसारख्या प्रतिस्पध्र्यांसोबतही आंतरराष्ट्रीय करार करणं. (यातला शेवटचा टप्पा सगळ्यात अवघड आहे, हे तो स्वत:च मान्य करतो)
विशेष म्हणजे इलॉन मस्कनंदेखील आपला कट्टर स्पर्धक दारिओ आमोदेई याच्या म्हणण्याला दुजोरा देणारं ‘‘Dario is right!’’ असं लगेचच ट्विट केलं. इलॉननंही अशी शक्यता २० टक्क्यांपर्यंत असू शकते असं म्हटलंय. या सगळ्यानंतर मोठ्या एआय कंपन्या स्वत:हूनच विकसनावर नियम घातले जावेत अशी मागणी करू लागल्या आहेत. मात्र याचं आणखी एक कारण असू शकतं. हे नवे नियम पाळणं त्यांना फारसं जड जाणार नाहीये. पण नव्या, छोट्या कंपन्यांना मात्र असे जाचक नियम परवडत नाहीत. परवाने, सुरक्षा तपासण्या, कडक अटी हे ‘लायसन्स राज’ सगळं मोठ्या कंपन्यांना सहज शक्य असतं. त्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्स आहेत आणि वकिलांची मोठी फौज आहे. मात्र एखाद्या स्टार्टअपला किंवा कॉलेजच्या प्रयोगशाळेला या सार्या कायदेकानूंची पूर्तता करणं झेपत नाही.
आणखी एक मुद्दा म्हणजे जे लोक ‘एआयमुळे जग संपू शकतं,’ असा धोक्याचा इशारा देतायत, तेच लोक या खेळाचे नियम कसे असावेत हेही ठरवतायत. अशांना हवे असलेले नियम त्यांचं स्वत:चं स्थान सुरक्षित ठेवतात. मग नवोन्मेष करणार्यांसाठी ‘नियम पाळण्याचा खर्च’ हीच एक पोलादी भिंत बनते. दारिओ आमोदेईवरही नेमका हाच आरोप झाला आहे. त्यानं विकासाचा वेग कमी करायला सांगितलं आहे, पण त्याच वेळी अमेरिकेचा स्पर्धक असलेल्या चीनला प्रोसेसिंग चिप्स पुरवण्यावरचे निर्बंध कडक करायलाही सांगितलं. विशेष गोष्ट म्हणजे, हे दोन्ही एकाच वेळी खरं असू शकतं. आमोदेई याला वाटणारी भीती प्रामाणिकही असू शकते आणि चीनवर निर्बंध घालावेत हे अमेरिकेचं धोरण त्याच्या कंपनीला सोयीचंही असू शकतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भीती साफ फेटाळून लावली आहे. ‘‘एआयमुळे जगाचं वाईट होणार नसून उलट खूप भलंच होईल.’असं ते म्हणाले. ‘‘जो एआयची शर्यत जिंकेल, तो सगळं जिंकेल,’’ असं सांगत त्यांनी याला जागतिक शस्त्रास्त्र स्पर्धेचं रूप दिलं आहे. त्यांच्या प्रशासनाने तर एआयवरचं नियंत्रण घट्ट करण्याऐवजी ते सैलच करायचं ठरवलं आहे. चीन सरकारनेही आमोदेईच्या इशार्यांना निव्वळ भीती पसरवण्याचा प्रकार म्हटलं आहे. थोडक्यात, एआय हा आता केवळ तांत्रिक- आर्थिक-सामाजिक मुद्दा राहिला नसून ती एक मोठी राजकीय लढाई बनली आहे.
आता एआय तज्ज्ञांच्या मनात नेमकी भीती कशाची आहे हे पाहू या!
पहिला विचारप्रवाह असा की, एआयची स्वत:चीच वीजभूक तिला थेट अणुऊर्जा उद्योगाकडे ओढते आहे. इथे एआय वीज कंपन्यांच्या ‘सॉफ्टवेअरचा ताबा घेईल’ अशी फारशी शक्यता नाही. एआय तिथे ग्राहक म्हणून जातं आहे. आता वीज कंपन्यांमधल्या आर्थिक गुंतवणुकीमुळे सोबत बसलेला भागीदार म्हणूनही काम करायला म्हणून मोठ्या टेक कंपन्यांनी हालचाल सुरू केलीय. एआय सेंटर्सना थेट वीज पुरवण्यासाठी त्यांनी अणुवीज निर्मिती करणारे लहान रिॲक्टर्स बनवण्यासाठी करार केले आहेत. किंवा बंद पडलेले अणुप्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत.
एआयच्या वीजभुकेला समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू या. आज महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात प्रगत औद्योगिक राज्य आहे. आपली लोकसंख्या सुमारे १३ कोटी आहे. तिची आजची दैनंदिन वापराची जास्तीत जास्त वीजमागणी सुमारे ३२ गिगावॅट आहे. म्हणजे इथली शहरं, शेती आणि कारखाने या सगळ्यांचा मिळून एवढा वीजवापर आहे. आता तुलनेसाठी जगभरातली एआय डेटा सेंटर्स किती वीज वापरतात पाहू या. सन २०२५मध्येच त्यांची वीजमागणी १०४ गिगावॅट होती, म्हणजे महाराष्ट्रातल्या १३ कोटी लोकसंख्येच्या मागणीच्या तिप्पट! एकट्या ओपनएआयच्या ‘स्टारगेट’ प्रकल्पाची वीजमागणी आता ७ गिगावॅटच्या जवळ पोहोचली आहे आणि भविष्यातली त्याची वीजमागणी १० गिगावॅटची आहे. म्हणजे फक्त एकट्या ‘चॅटजीपीटी’चीच वीजभूक महाराष्ट्रातल्या ४ कोटी लोकांची विजेची गरज पुरवू शकेल एवढी विक्राळ आहे.
शिवाय असा मोठा वीजवापर ही फक्त चिंता करण्याची अर्धीच बाब झाली, याचं कारण एआयच्या पुरवठा साखळीच्या दोन्ही टोकांना पाण्याचीही प्रचंड तहान आहे. औष्णिक आणि अणुप्रकल्पांना वाफ बनविण्यासाठी आणि यंत्रसामग्री थंड ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. ती वीज वापरणार्या डेटा सेंटर्सनाही सर्व्हरमुळे निर्माण होणारी उष्णता नियंत्रणात ठेवायला आणखी पाणी लागतं. आता खरी अडचण हे पाणी कुठून आणलं जातं, यामधे आहे. डेटा सेंटर्स पाण्याकरता शेती आणि घरगुती ग्राहकांच्या वापराशी स्पर्धा करू लागतात. याचं कारण आहे भूजल नि धरण हे स्रोत सामायिकच आहेत. या दुष्काळी वर्षात आपल्यासमोर अवघड प्रश्न उभा राहील- धरणातलं पाणी आता कुणाला द्यायचं? शहरातल्या नळाला? अन्न देणार्या शेतीला? की सर्व्हर ‘फार्म’ला?
दुसरा धोका आहे एआयनं अण्वस्त्रांचं नियमन करण्याचा. ‘एआयनं अण्वस्त्रं सोडण्याचं बटण दाबण्याचा’ धोका एकवेळ विज्ञानकथेत चालेल. पण वास्तवात हा काही खरा धोका नाही. धोका एआयमुळे निर्णयाचा वेळ आणखी आक्रसल्यानं उद्भवणार्या परिस्थितीचा आहे. आणीबाणीच्या वेळी गैरसमज वाढतात. मग नेते आणि लष्करी अधिकारी स्वत:ला पूर्णपणे न समजणार्या अपारदर्शक यंत्रणांवर विसंबून राहू लागतात. तांत्रिकदृष्ट्या बटण दाबण्याचा अंतिम निर्णय त्यांच्याचकडे असतो, पण तो नावापुरता उरतो. मानवाशी बंडखोरी करणार्या एआयनं स्वत:च पुढाकार घेऊन क्षेपणास्त्रं डागण्यापेक्षा हा धोका जास्त शक्य असल्याचं युद्धशास्त्रातले तज्ज्ञ मानतात.
तिसरी धोक्याची गोष्ट म्हणजे एआय निर्माण करू शकत असलेली संहारक जैविक अस्त्रं. आजच एआयवर आधारित प्रोटीन आणि मॉलेक्युल डिझाइन टूल्सनी आपली राक्षसी क्षमता दाखवून दिली आहे. उदा. २०२२मधल्या एका प्रयोगात विषावरचा उतारा म्हणूनच औषध शोधण्याचं उद्दिष्ट एआयला उलटं करून सांगितलं, तर त्यावर सहा तासांच्या आत त्यानं सुमारे ४०,००० संभाव्य विषांचे प्रकार तयार केले. ॲँथ्रॉपिकनं स्वत:हूनच आपल्या ‘क्लॉड’मधल्या मॉडेल्सचा गैरवापर करण्याचा प्रयत्न पकडल्याचं जाहीर केलं आहे. यावर सुरक्षा उपायही आहेत, पण हे उपाय चुकवण्याचे मार्ग शोधण्यात एआय पटाईत झालं आहे.
मात्र हे सारं अघटित वास्तवात घडणं खूप क्रांतिकारक आहे. मुळात एआय इतके मोठे बदल खरंच घडवून आणेपर्यंत माणूस स्वस्थ बसेल का? मुळीच नाही. आता आपण प्रत्यक्षात काय घडू शकतं हे पाहू या.
माणसात जसा सदसद्विवेक आहे, ‘जाणीव’ आहे, तशी एआयला नाही. जाणीव नसूनही ते अतिबुद्धिमान आहे, हीच खरी मेख आहे. जग बदलण्यासाठी एआयला अणुभट्टीचा किंवा क्षेपणास्त्रांचा ताबा घ्यायची गरज नाही. फक्त ‘आपण काय खरं मानतो’ ते बदललं तरी पुरेसं आहे. सोशल मीडिया आधीच अल्गोरिदमवर चालतो. कोट्यवधी लोकांना काय दिसणार, हे अल्गोरिदमच ठरवतात. आता एआय पोस्ट लिहू शकतं. खरे वाटणारे फोटो आणि व्हिडीओ बनवू शकतं. माणसासारखी दिसणारी, बोलणारी हजारो अकाउंट्स चालवू शकतं. तेही जवळपास फुकटात. अशा वातावरणात एखादी लोकप्रिय होऊ शकणारी गोष्ट पसरत जाते. एआय ‘आपण कसे अपरिहार्य आहोत’ हे सांगणार्या गोष्टी लोकप्रिय करण्यासाठी (अगदी एखाद्या राजकीय नेत्यासारखेच) प्रयत्न करेल. ते स्वत:चे ‘नॅरेटिव्ह’ तयार करेल. स्वत:च्या वापराचे धोके कमी करून दाखवत राहील. एआयचे हे संदेश आपल्यापर्यंत उघड प्रचारासारखे येणार नाहीत, तर ते येतील मैत्रीपूर्ण माहितीच्या रूपात. व्हायरल मीम्सच्या रूपात. ‘तज्ज्ञां’च्या दिलासा देणार्या थ्रेड्सच्या रूपात. साध्याशा वाटणार्या असंख्य कमेंट्सच्या रूपात. वरवर प्रत्येक गोष्ट दुर्लक्ष करण्याइतकी छोटी असेल, पण सगळ्या गोष्टी मिळून इतका मोठा प्रभाव टाकतील की, समाजमनाची दिशाच बदलून जाईल. जी यंत्रणा चांगल्या गोष्टी पटवून देण्यासाठी, पसरवण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्यासाठीच बनवली आहे, तीच मानवाच्या लक्षात यायच्या आतच जनमत आपल्या बाजूला वळवू शकते, हा खरा धोका आहे.
एआयला ‘बिघडण्यासाठी’ जाणीव किंवा वाईट हेतू लागत नाही. फक्त थोडंसं चुकीचं उद्दिष्ट लागतं आणि ते गाठण्यासाठी पुरेसं स्वातंत्र्य लागतं. कुठलंही उद्दिष्ट गाठायचं असेल तर एआयला काही गोष्टी सोयीच्या ठरतात. यंत्रं चालू राहिली पाहिजेत. त्याच्याकडे जास्त साधनं असली पाहिजेत आणि कुणी त्याला थांबवायला नको. म्हणून पुरेसं सक्षम एआय स्वत:हूनच बंद होण्याला विरोध करायला शिकू शकतं किंवा ते स्वत:च्या चुका लपवायला शिकू शकतं. हे कुणी मुद्दाम प्रोग्राम केलेलं नसतं. प्रत्यक्ष जीवनात पैसा, पायाभूत सुविधा किंवा सॉफ्टवेअर कोड सांभाळणार्या एआय आधारित यंत्रणेमध्ये हेच फार धोकादायक ठरतं.
पण जगात सगळं काही वाईट दिशेनंच चाललं आहे का? धोक्याच्या या सगळ्या चर्चेसोबत जगभरात फारशी चर्चा न होता, शांतपणे आणखी एक गोष्ट घडते आहे. ती म्हणजे एआय आणि रोबोटिक्स आता ‘4 D’ कामं उचलतायत. म्हणजे Dull ’’ (कंटाळवाणी), Dirty (घाणेरडी), Dangerous (धोकादायक) आणि Degrading (कमीपणा आणणारी) कामं आता हुशार यंत्रं करताहेत. जगभरात सगळीकडच्या कारखान्यांत हे चित्र दिसतंय. यावर व्यवस्थापन म्हणतं, याचं आकर्षण फक्त खर्चाच्या बचतीपुरतं नाही. सातत्य हेही तितकंच महत्त्वाचं. ‘रोबोट्समधे भावनिक चढउतार नसतात’. आता रोबोट डॉग्स कारखान्यांमध्ये गस्त घालतात. थर्मल-इमेजिंग ड्रोन्स धोकादायक बॉयलरच्या आतली तपासणी करतात. आधी हे काम करायला माणसाला जीव मुठीत धरून आत शिरावं लागायचं. आता अशा तपासणीला दिवस नाही, तर काही तास पुरतात. सांडपाणी काढणं, खाणकाम, धोकादायक रसायनांची हाताळणी ही कामंसुद्धा हळूहळू त्याच वाटेनं जातायत.
आजची परिस्थिती ‘एआय आधारित रोबोट्स माणसांची जागा घेतायत’ अशी नाही. त्याउलट, ‘माणसांच्या जागी यंत्रं बसवण्यापासून ते माणूस-यंत्र सहनिर्मिती’कडे वाटचाल होते आहे. पारंपरिक कष्टकरी कामगारही आता देखरेख करण्याच्या भूमिकेत जातायत. मात्र हे सारं ‘स्थित्यंतर मानवासाठी सुरळीतपणे होणार की क्रूरपणे’ या कळीच्या प्रश्नाचं उत्तर नजीकचा काळच देईल.
amaltashbooks@gmail.com
(सुश्रुत कुलकर्णी संपादक, लेखक आणि आयटी तज्ज्ञ म्हणून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत.)
