देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण १९२३ साली झालं असलं, तरी ८ जून १९३६ रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवेचं ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असं नामकरण झालं. या आठवड्यातच या सेवेच्या मुहूर्तमेढीला ९० वर्षे पूर्ण झाली. आकाशवाणीचं देशभरात व्यापलेलं जाळं माहिती आणि ज्ञानप्रसाराचं कित्येक दशकं प्रभावी माध्यम राहिलं. राज्याच्या कानाकोपर्‍यात रेडिओशिवायही (ॲपद्वारे) अजूनही आकाशवाणी विविध केंद्रांद्वारे ऐकली जाते. नव्वद वर्षांच्या टप्प्यातील तिच्या योगदानासह सद्य:स्थितीचा धांडोळा… श्रोतृपर्वाचा उत्कर्ष अनुभवलेल्या नजरांतून… अलीकडे ‘ऐकण्या’च्या माध्यमातले बरेच प्रकार लोकप्रिय झालेत. पॉडकास्ट, वृत्तपत्रांमधले छापील लेख ‘वॉक’ करताना, गाडी चालवताना ऐकणं, पुस्तकंच्या पुस्तकंदेखील आता ऐकणे शक्य झालेय. खरं तर आपली आवडती गाणी ऐकतच आपण लहानाचे मोठे होत जातो. श्राव्य माध्यम हे अधिक सोयीचं, वापरायला कमी त्रासाचं, कमी खर्चाचं, प्रवासात सोबत करणारं वगैरे.

हे सारं आणि याहून कितीतरी सकस वैविध्यपूर्ण, अभिरुची घडवणारं, माहितीसंपन्न करणारं असं भरपूर काही आकाशवाणी या माध्यमानं आपल्याला दिलं. ब्रिटिशांनी आपल्याला रेल्वे आणि रेडिओ दोन्ही दिलं. १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेजाळ्याने देशभरातली ठिकाणं जोडली गेली, भारतीयांची ये-जा सुरू झाली. १९२३ साली सुरू झालेल्या रेडिओच्या प्रसारणजाळ्याने भारतीयांची मनं जोडली गेली. नवस्वतंत्र भारतात देशनिर्मितीसाठी त्या मनांची मशागतदेखील ‘ऑल इंडिया रेडिओ’नं केली.

जून १९२३ मध्ये ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब’द्वारे प्रसारणाला सुरुवात झाली. देशातलं हे पहिलं रेडिओ प्रसारण. १९२७ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ची स्थापना, ८ जून १९३६ रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवेचं ‘ऑल इंडिया रेडिओ’ (अकफ ) असं नामकरण, या कंपनीकडून १९२७ साली २३ जुलैला मुंबई केंद्राची, २६ ऑगस्टला कलकत्ता केंद्राची सुरुवात… कंपनी दिवाळखोरीत गेल्यावर प्रसारण सुविधा ताब्यात घेत सरकारने १ एप्रिल १९३० रोजी सुरू केलेली ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग स्व्हिहस’ हे स्वातंत्र्यपूर्व काळातले टप्पे.

तर ‘ऑल इंडिया रेडिओ’ या नामकरणाला ९० वर्ष याच आठवड्यात झाली, या आजीबाई ‘आकाशवाणी’ झाल्या (८ जून १९५६) त्याला ७० वर्ष आणि पुढच्या महिन्याच्या २३ तारखेला आकाशवाणी मुंबई केंद्राला ९९ वर्ष पुरी होतायत. कलकत्ता रेडिओच्या उद्घाटनाला रवींद्रनाथ टागोरांनी रचलेल्या कवितेत ‘आकाशवाणी’ हा शब्द योजला होता. सप्टेंबर, १९३५ मध्ये म्हैसुर येथे प्राध्यापक गोपालस्वामी यांनी ‘आकाशवाणी’ नावानेच (देशातलं पहिलं) खासगी रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं. हवेतल्या ध्वनी लहरींचं यथार्थ वर्णन करणारा, भारतातल्या सर्वभाषिकांना समजणारा ‘आकाशवाणी’ हा चपखल शब्द भारत सरकारला असा मिळाला. नव्वदीतल्यापासून चाळिशीपर्यंतच्या पिढ्यांच्या जगण्यात आकाशवाणीने कमी- अधिक सोबत केली असणार. कुणालाही न वगळणार्‍या या माध्यमाचं योगदान, ते आपल्या हातून कसं निसटत गेलं याबद्दल आज बोललं पाहिजे.

स्वातंत्र्योत्तर काळातल्या सगळ्याच भारतीय संस्थांची पायाभरणी पहिले पंतप्रधान या नात्याने नेहरूंनी केल्यामुळे नमनाला त्यांचा उल्लेख हवाच. नेहरूंनी आकाशवाणीला राष्ट्रनिर्मितीचं लोकशाहीवादी साधन मानलं. आकाशवाणीने लोकांना सहज समजेल अशी साधी-सोपी हिंदुस्थानी भाषा वापरावी, हा त्यांचा आग्रह होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रेडिओवरून केलेल्या पहिल्या भाषणात (३ ऑक्टोबर १९४७) त्यांनी नागरिकांना देशनिर्मितीत भाग घेण्याचं आवाहन केलं. लोकशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं-वाढवणं, विकासाभिमुख धोरणांची माहिती लोकांपर्यंत पोचवणं आणि जनमानसात एकजूट तयार करणं- ही मुख्य कामं रेडिओने करावीत, हे त्यांचं सांगणं होतं.

हे सगळंच आकाशवाणीने दायित्वाच्या जबाबदारीने तंतोतंत अमलात आणलं. स्थानिक राहाणी-रीतीरिवाज, अर्थव्यवस्था-शेती, सणवार-जत्रा-उत्सव, संगीत-संस्कृती या सगळ्याला आकाशवाणीचं प्रसारण अनुरूप असायचं. आकाशवाणी आजच्या भाषेत ‘सेल्फ हेल्प’ होती. आरोग्यापासून बचतीपर्यंत, जोडीदार-निवडीपासून कुटुंब नियोजन आणि बालसंगोपनापर्यंत, स्वयंपाकघरापासून शेती-बागकामापर्यंत, माँटेसरीपासून महाविद्यालयापर्यंत… युक्तीच्या गोष्टी सांगणारं, ग्रंथप्रसार- वाचनसंवर्धन, नागरिकांचे हक्क-स्त्रियांचे अधिकार, कायद्याची ओळख, कर्तव्यांची जाणीव, धर्मसमभाव, सुधारणावादाची पाठराखण. एखाद्या हितचिंतकाच्या काळजीने कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी कार्यक्रम. शास्त्रीय गायन-वादनाच्या मैफिली, लोकसंगीताचे फड आणि ‘सॅटर्डे डेट’सारखा पाश्चात्त्य गीतांचा नजराणा. अगणित नभोनाट्य, श्रुतिका, गप्पा, मुलाखती, अभिवाचनं, धावती समालोचनं आणि खूप काही.

धावतं समालोचन हा खास रेडिओनिर्मित प्रकार. मैदानातला खेळ टीव्हीच्या पडद्यावर दिसण्याआधीच्या काळात रेडिओवरची ‘रनिंग कॉमेंट्री’ने उसळायला व्हायचं. गांधीजींच्या अंत्ययात्रेची आकाशवाणी दिल्लीने प्रसारित केलेली, देशभरातल्या सगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रक्षेपित झालेली ‘रनिंग कॉमेंट्री’ केली होती मेल्विल डिमेलो यांनी. भारतीय जनमानसाच्या शोकमग्नतेची अभिव्यक्ती होती ती. सात तासांचं हे समालोचन आकाशवाणीच्या सर्वोत्तम ब्रॉडकास्टिंगपैकी समजलं जातं. मेल्विल डिमेलो यांची भाषा, शब्दनिवड आणि आवाज… तीनही थोर. प्रजासत्ताक-स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यांचीही त्यांची ‘कॉमेंट्री’ खासच असे. त्यांचा आदर्श ठेवूनच आकाशवाणीचे अनेक समालोचक घडले.

हे डिमेलो, सईदा बानो, पहिली स्त्री वृत्तनिवेदक, १९४७ साली रुजू झालेली, पंडित नरेंद्र शर्मा, ‘विविध भारती’चे जन्मदाता, दररोज देशभरातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणार्‍या, निवांतपणाचा प्रत्यय देणार्‍या आकाशवाणीच्या ‘सिग्नेचर ट्युन’चा रचनाकार वॉल्टर कॉफमन, नाझींच्या छळापासून झेकोस्लोव्हाकियाहून स्वत:ला वाचवत भारतात आश्रयाला आलेला ज्युईश, त्यातले व्हायोलिनवादक, भारतात पाश्चिमात्य संगीत रुजवणारे पारसी संगीतकार मेहली मेहता (वाद्यवृंदकार झुबिन मेहतांचे वडील) असा सगळा रेडिओचा गोतावळा. आकाशवाणीत एकवटलेला छोटा भारत! धर्मद्वेषाच्या विकृतीची लागण झालेल्या सध्याच्या काळात हे नमुनेदार वाटावं! एरवी यांचे धर्म सांगायची गरज नव्हती.

मातब्बर लेखक पु. ल. देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर हे उत्कृष्ट ‘ब्रॉडकास्टर’ होते. रेडिओ कार्यक्रम कसे करावेत, याचा वस्तुपाठ घालून देणारे. त्यांच्या कार्यक्रमांचा खजिना जतन करायला हवा होता. पण आपल्याकडे त्याला महत्त्व नसतं. गांधीजींच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनाचं पुलंनी क्रमश: वाचन केलं होतं. प्रसारण काळ १९५५-५६. एकदा, मला मुंबई केंद्राच्या टेप्सच्या लायब्ररीत दुसरं काही शोधताना या वाचनमालिकेच्या समारोपाचा भाग सापडला. ‘सत्याचे प्रयोग’ वाचताना गांधींचं मोठेपण नव्याने कसं उमगलं ते पुलंनी सांगितलं होतं. रेडिओ या माध्यमासाठी लिहावं-बोलावं कसं, हे समजून घेण्यासाठी हे भाषण दहादा ऐकावं. शब्दब्रह्माच्या सोबतीने श्रोत्यांना कसं उन्नत करता येतं, ते समजून घ्यावं. पुढे पुलं पुणे केंद्रावर भाषणं द्यायला १९८०-८५ सालापर्यंत जिव्हाळ्याने येत होते. एकदा तर ते सुनीताबाईंनी लिहिलेल्या जिजाबाईंवरच्या नाटुकल्याच्या ध्वनिमुद्रणालाही कौतुकाने हजर राहिले होते.

पुलं गेल्यानंतर त्यांच्या रेडिओवरच्या भाषणांची, श्रुतिकांची दोन पुस्तकं मौज प्रकाशनाने काढली. त्यातल्या पहिल्या भागात मला सापडलेलं ते भाषण ‘जेव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होतं’ या शीर्षकाने छापलं आहे. दुसर्‍या भागात ‘रेडिओसाठी लिहावं कसं’ या विषयावरही पुलंचं एक झकास भाषण आहे. पुस्तकांत प्रकाशकाचं निवेदन आहे- ‘‘पुलंच्या भाषणांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने, साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. नभोवाणीच्या दप्तरखात्यातील अनागोंदीमुळे काही भाषणे व श्रुतिका अनुपलब्ध राहिल्याचा संभव आहे.’’ या अनागोंदीची हळहळ वाटते. आकाशवाणीचं ध्वनिमुद्रित संचित बरंचसं वाया गेलं. उशिराने का होईना, टेप्सवरच्या कार्यक्रमांच्या ‘डिजिटायजेशन’चा प्रकल्प घेतला गेला. निर्मितीत माझा पुढाकार असलेले ‘तिची कथा’, दुर्गाबाईंशी गप्पासारखे कार्यक्रम पुस्तकरूपाने आले. पण ही मोजकी उदाहरणं. विजय तेंडुलकर, कमल देसाई, गोविंद तळवलकर, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे, दया पवार यांच्या आणि इतर अनेक मुलाखतीही जतन व्हायला हव्या होत्या. ‘अफलातून टोळीच्या सफरी’ ही जयंत नारळीकरांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली नाट्यमालिका पुस्तकरूपात यायला हवी होती.

व्यंकटेश माडगूळकर पुणे केंद्रात शेती विभाग बघायचे. भारी कल्पक कार्यक्रम करायचे. स्टुडिओतल्या भिंती ओलांडून कार्यक्रम गावा-शिवारात पोचत असत. पारंपरिक शहाणपण आणि कालसुसंगत नवा विचार यांची सांगड माडगूळकर घालत असत. ‘चालू जमाना’ या त्यांचंच शीर्षक असलेल्या गप्पांच्या कार्यक्रमाचं लेखन आनंद यादव करत असत आणि त्यातलं अण्णा नावाचं पात्र माडगूळकर साकारत असत. त्यांच्या ‘परवचा’ (नवचैतन्य प्रकाशन) पुस्तकात आकाशवाणीतले हृद्य आणि खुमासदार अनुभव आहेत. ‘चालू जमाना’प्रमाणे आकाशवाणीच्या कार्यक्रमांची साधीसुधी, अल्पाक्षरी शीर्षकं लोकप्रिय असायची. सहज सुचलं म्हणून, प्रपंच, आंबट-गोड, प्रभाते मनी, स्नेहबंध, चिंतन, उगवतीचे रंग, स्वरचित्र, नातं निसर्गाशी, परिसर, भावसरगम (याच कार्यक्रमात ‘विसरशील खास मला’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारखी गाणी रचली गेली आणि लोकांनी ती डोक्यावर घेतली.)

१९५७. ‘विविध भारती’सोबत श्रोत्यांचा सुरीला प्रवास सुरू झाला. या नावासह वाहिनीचं स्वरूप सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार पंडित नरेंद्र शर्मांनी घडवलं. तत्कालीन नभोवाणीमंत्री बी. व्ही. केसकर यांनी आकाशवाणीत हिंदी चित्रपटातल्या गाण्यांवर बंदी घातली होती. केसकरांचा हा सोवळेपणा सरकारला पटलेला नव्हता. या निर्णयापायी सिनेसंगीतभोक्ते भारतीय ‘रेडिओ सिलोन’कडे वळले होते. या श्रोत्यांना पुन्हा आकाशवाणीकडे खेचण्यासाठी ‘विविध भारती’ सुरू केली. ‘विविध भारती’ने भारतीयांना झुमरीतल्लैया ते झाशी सिनेसंगीताच्या कोमल धाग्याने जोडून ठेवलं.

मी आकाशवाणीच्या मुंबई, पुणे आणि रत्नागिरी केंद्रांत (१९८१-२००९) काम केलं. या सरकारी माध्यमात कामाचं कितपत स्वातंत्र्य मिळेल, अशी कुशंका होती. पण माझा एकही प्रस्ताव वरिष्ठांनी कधीही डावलला नाही. सरकारच्या धोरणातल्या-अंमलबजावणीतल्या कमतरता दाखवणारे अनेक कार्यक्रम मी करू शकले. नवनवे प्रयोगही मुक्तपणे करता आले. माझ्या सहकार्‍यांनाही कधीही वरिष्ठांकडून आडकाठी आली नाही.

अस्पृश्यता निर्मूलनासाठी सलग तीनदा गौरविल्या गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरीत जातीय दंगल पेटली. त्यावरच्या कार्यक्रमाच्या लेखनासाठी अरुण साधूंना बोलावण्यात अडचण तर नाहीच आली. उलट प्रस्थापितविरोधी भूमिकेचे साधूच या लेखनासाठी योग्य, यावर केंद्रसंचालकांचीही सहमती होती. श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्ह्यातले वेठबिगार सोडवल्याचं वृत्तांकन, मराठवाड्यातल्या गावांतल्या जातिव्यवस्थेचा त्रास मुलांच्या पत्रांमधून आकाशवाणीला कळल्यावर तड लावण्यासाठी राज्याच्या पोलीस विभागाशी समन्वय, रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांना स्टुडिओत बोलवून थेट लोकसंपर्कातून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न… सारं अगदी विनानिर्बंध घडलं.

आणीबाणीच्या काळातल्या ‘सेन्सॉरशीप’मुळे आकाशवाणीची ऑल ‘इंदिरा’ रेडिओ अशी संभावना झाली. आणीबाणीत, देशातल्या वंचित समाजघटकांच्या उत्थानासाठी सरकारने जाहीर केलेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा अतिप्रचार आकाशवाणीने केला. तो प्रचार नगण्य होता, असं आता वाटू शकतं. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारत सरकारच्या कल्याणकारी ‘मिशन्स’चा प्रचार करावा, असे आदेश असायचे. उदाहरणार्थ, १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ सुरू झाल्यावर १५-३५ वयोगटासाठी महाराष्ट्रात ‘लोकजागर’ हा कार्यक्रम सुरू केला. जबाबदारी मला दिली गेली आणि त्या कामाने मला पुरेपूर आनंद दिला.

दरम्यान, आकाशवाणीत नवं तंत्रज्ञान येत गेलं. मॅग्नेटिक टेपचा जमाना गेला. ध्वनिमुद्रण आणि प्रसारणदेखील डिजिटल झालं. केंद्रसंख्या वाढत गेली. आकाशवाणी ‘ॲप’वर अवतरली. लोकांना नवनवी माध्यमं हवीच असतात. नव्या पिढ्यांसोबत माध्यमानेही बदलण्याची गरज असते. फक्त रूपडं नाही. आशय-विषय-भाषा-परिप्रेक्ष्यासह सगळाच बदल अपेक्षित असतो. माध्यमाने संदर्भहीन होऊन चालत नाही.

हेही वाचा

१९९० नंतर दूरसंचार, विमान वाहतूक याबरोबरच प्रसारण क्षेत्रातही खासगीकरण आलं. खासगी टीव्ही चॅनल्स सुरू झाली.१९९७ साली प्रसारभारती विधेयकाद्वारे आकाशवाणी-दूरदर्शनला स्वायत्तता देण्याची, सरकारी जोखडातून मुक्त करण्याची चर्चा झाली. प्रत्यक्षात तसं काही घडणारच नव्हतं. कोणतं सरकार स्वत:च्या माध्यमांवरची ताबेदारी सोडेल? आणि ती का म्हणून सोडावी? अशिक्षित-गरीब-वंचितांची संख्या मोठी असलेल्या भारतात, त्यांच्या हिताच्या गोष्टी, सरकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी जबाबदार माध्यमाची आवश्यकता आहे, यात शंकाच नाही. नफा कमावण्यासाठी लोकांची करमणूक करणारे खासगी रेडिओ हे काम करतील, असं संभवत नाही.

सन २०००पासून आकाशवाणीशी थेट स्पर्धा करणार्‍या खासगी रेडिओवरच्या चटपटीत सादरीकरणापुढे आकाशवाणी जुनी वाटू लागली. स्पर्धेला तोंड कसं देणार? खासगी रेडिओंना मुक्त अवकाश आणि आकाशवाणीचे हात-पाय-तोंड बांधलेलं. कार्यक्रमांच्या गुणवत्तेऐवजी प्रायोजकत्व, महसूल महत्त्वाचं ठरू लागलं. ‘कंटेंट’- ज्यात ‘आकाशवाणीपण’ होतं, तो बिनमहत्त्वाचा मानला जाऊ लागला. कार्यक्रम विभागापेक्षा वृत्त विभाग आणि ‘इंजिनीअरिंग’ विभाग वरचढ होऊ लागले. सलग तासभराच्या कार्यक्रमात बातमीपत्रांचे व्यत्यय. मराठी बातमीपत्राच्या प्रसारणानंतर लगेच हिंदी बातमीपत्राची महाराष्ट्रात गरज नसते. (तमिळनाडूने त्यांच्या राज्यात ते रोखलं आहे). पुन्हा त्याच बातम्या इंग्लिशमधून कशाला? अंतर्दृष्टीचा अभाव असलेलं नियोजन. त्यात, केंद्रसंचालकपदी रेल्वे, एमटीएनएल, रेव्हेन्यू विभागाचे अधिकारी नेमले जाऊ लागले. सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांबाबत ते कोण निर्णय घेणारे? श्रोत्यांशी सांधेजोड असणार्‍या निर्मात्यांना अतिविलंबाने बढती, नव्या नेमणुका थांबवलेल्या. यामुळे हंगामी मनुष्यबळावर डोलारा डुगडुगत उभा आहे. आकाशवाणीच्या वारशाची जाण नाही आणि नव्या काळाची नसही माहीत नाही. संदर्भहीनपणा. अशी आकाशवाणी जगण्याचा भाग होईल का?

‘मन की बात’ हा आकाशवाणीचा तारांकित कार्यक्रम. याचा शंभरावा भाग प्रसारित झाला, तेव्हा ‘ उरऊर लोकनीती’ने ‘मन की बात : रिॲलिटी चेक’ हे अध्ययन प्रसिद्ध केलं. पंतप्रधान म्हणाले होते की, अगदी सामान्यापर्यंत पोचायचं असल्याने रेडिओचं माध्यम निवडलंय. कार्यक्रमाची झोकात जाहिरात केली जाते, ऐकणार्‍यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था असते वगैरे. ‘मन की बात’मुळे आकाशवाणीचा जाहिरात-महसूल वाढला. दुरवस्था तशीच. आकाशवाणीतल्या मंजूर पदांची संख्या २६ हजारांहून अधिक आणि रिक्त पदं १३ हजाराहून अधिक. दूरदर्शनमधल्या मंजूर पदांची संख्या सुमारे २० हजार आणि रिक्त पदं १२ हजारांहून अधिक. याखेरीज वर उल्लेखलेल्या समस्या आहेतच.

खर्‍या-खोट्या माहितीचा, मतांच्या गलबल्याचा काळ आहे हा. इथे चिमटीत धरून सांगितल्या जाणार्‍या जीवनोपयोगी माहितीची निकड आहे, जे काम आकाशवाणीने अनेक दशकं केलंय. अतिवेगाने थकवणार्‍या आयुष्यात शांतवणारं मनोरंजनही गरजेचं आहेच, जे आकाशवाणीच करू शकते. हे घडेल? वाटत नाही.

kulmedha@gmail.com