मनीषा उगले
ऐश्वर्य पाटेकर लिखित ‘बाभूळकांड’ या कथासंग्रहातील कथा वाचकांना खोलवर अस्वस्थ करणार्‍या आहेत. गावगाड्यातील लोकजीवनाची नस लेखकाला नेमकेपणाने सापडली आहे. ग्रामीण जीवन जाणिवांच्या मुळांशी भिडणारे लेखन पाटेकर सातत्याने करत आले आहेत. त्यांच्या लेखनाला शेतीमातीचा, गावशिवाराचा आणि तिथल्या सजीव जगण्याचा गंध आहे. या वाटचालीतील ‘बाभूळकांड’ मराठी कथेला एका नव्या वळणावर घेऊन जाईल, असा विश्वास वाटतो.

ऐश्वर्य पाटेकर यांच्याकडे ग्रामीण वास्तवाचे सूक्ष्म आकलन आहे. सामान्य माणसांचे जगणे, त्यांचे भावविश्व, निसर्गाशी असलेले जिव्हाळ नाते, शेतीमातीवरचे आणि तिच्याशी जोडलेल्या प्राणीसृष्टीविषयीचे प्रेम; या माणसांच्या वागण्या-बोलण्याच्या तर्‍हेवाईक रीती आणि त्यांची विचार करण्याची पद्धत, या अनुभवसंचिताच्या बारकाव्यांनिशी ‘बाभूळकांड’मधील कथा आकाराला येतात. परिस्थितीच्या तडाख्याने पिचलेली, पण जिद्द न हारलेली माणसे लेखकाने मोठ्या ममत्वाने रेखाटली आहेत.

‘बाभूळकांड’या संग्रहातील कथा मानवी अगतिकतेच्या, आकांक्षांच्या आणि जगण्यातल्या प्रतिकूलतेविरोधात कंबर कसून उभे राहण्याच्या दुर्दम्य जीवनेच्छेच्या गोष्टी सांगतात. या संग्रहातल्या शीर्षककथेतील एका बाभळीच्या विध्वंसाची गोष्ट बेचैन करणारी आहे. त्यातील विनाशाच्या राखेतून नवनिर्माणाचे ‘बी’ रुजवण्यासाठी पुढे आलेले ‘पाखराचे पिलू’ हे मला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभे राहणार्‍या संघर्षशील माणसाचे प्रतीक वाटते. ‘अंगठ्याचा ठसा’ या कथेमधील ‘सावजीचा अंगठा’ ही व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक वाटते. ‘रघू मोर्चात मेला’ या कथेतून राजकीय घोषणाबाजीच्या धामधुमीत दिशाहीन युवकांचा बळी कसा घेतला जातो, याचे दाहक चित्रण लेखकाने केले आहे. ‘सुक्याची गाय’ आणि ‘शिळ्या भाकरीचं विमान’ या जगण्याचा आधार हरवलेल्या अगतिक व भावनाशील माणसांच्या गोष्टी आहेत. मुलाच्या प्रतीक्षेत स्वत:च विमान बनून उडणारा भ्रमिष्ट बाप नात्यांमधील अंतराचे वेदनादायी चित्र उभे करतो.

‘संतुक गोष्ट’ कथेतील ‘संतुक’ हा व्यवस्थेविरुद्ध उभा ठाकलेला धीरोदात्त नायक वाटतो. ‘बिघाभर बाप’मध्ये दुष्काळात पोटाची भूक मारून पुढील पेरणीसाठी बियाणे राखून ठेवणार्‍या शेतकर्‍याच्या मातीवरील निष्ठेची पराकाष्ठा दिसते, तर ‘मरणूक’सारखी कथा गरिबी आणि आजारपणामुळे माणसाच्या वाट्याला येणार्‍या विदारक परिस्थितीवर भाष्य करते. ‘बियावाली बाई’ जगण्यातल्या अभावांना उदात्त रूप देऊन जगण्याला नवा अर्थ देताना दिसते, तर ‘वाटणी’सारखी कथा नात्यांमधील ओलावा हरवून कोरड्या झालेल्या व्यवहाराचे दर्शन घडवते. ‘स्वप्नविक्या’ हे पात्र गावखेड्यातल्या भाबड्या माणसांच्या भरवशाला दगा देऊन त्यांचे निष्कपट जगणे उद्ध्वस्त करायला निघालेल्या, बनेल प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारे आहे. व्यवस्थेच्या निर्मम टाचेखाली भरडला जाणारा सामान्य माणूस आणि शेतीसंस्कृतीची सर्वार्थाने होत चाललेली अवनती, हे आजच्या बदलत्या गावगाड्याचे दुखरे वास्तव या कथांतून पाटेकरांनी समर्थपणे व्यक्त केले आहे.

या कथांतील निवेदकाची शैली ओघवती आणि वेल्हाळ असल्यामुळे वाचक केवळ प्रेक्षक राहत नाही, तर पात्रांच्या संघर्षव्यूहात स्वत:ला गुंतवून घेतो. या कथा बर्‍याचदा रूपकांच्या माध्यमातून बोलतात, त्यामुळे त्यांच्या आशयाचा बहुपदरी, बव्हर्थी विस्तार होतो. जगण्याचा अर्थ हरवलेल्या आणि पुन्हा तोच अर्थ शोधू पाहणार्‍या साध्या व फसवल्या गेलेल्या माणसांबद्दल लेखकाने पोटतिडकीने लिहिले आहे.

विचारांना कलाटणी देणारा तीक्ष्ण शेवट हे ‘बाभूळकांड’मधील कथांचे वैशिष्ट्यपूर्ण बलस्थान आहे. 

‘बाभूळकांड’, ऐश्वर्य पाटेकर,

लोकवाङ्मय गृह,

पाने-१७२, किंमत- २५० रुपये