राज्य पर्यटन विकास महामंडळाने अजिंठय़ातील अनमोल चित्र-शिल्पकारी जपण्यासाठी अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी व्हिजिटर सेंटर उभारण्याचा हाती घेतलेला प्रकल्प निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, या केंद्राचा योग्य तो उपयोग केला जाणे ही मोठी जबाबदारी असणार आहे. अभिव्यक्ती हिरावून घेण्याच्या आजच्या कालखंडात इतिहासाचा कॅनव्हास समजून घेण्याची संधी म्हणून या व्हिजिटर सेंटरकडे पाहायला हवे.
गेली सहाशे वर्षे शिल्प आणि चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या अनाम कलाकारांची अभिव्यक्ती म्हणजे अजिंठा लेणी. काय मनोभूमिका असेल या कलावंतांची? लेण्यांचा हा आविष्कार इतक्या उंचीचा आहे, की सारे जग या कलाकृती थक्क होऊन पाहते. बुद्ध तत्त्वज्ञानाचा केवढा प्रभाव असेल कलाकारांवर! हा प्रभाव एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे कसा सोपवला असेल? त्यांच्यात समान अंतप्रेरणा असतील? अशा प्रश्नांच्या उत्तरात न शिरता त्यांची सर्जनशीलता नव्या तंत्रज्ञानाने चिमटीत पकडू पाहणारा केरळचा साबू, पश्चिम बंगालचा शंकर व संजय बिस्वास, झारखंडचा तापेश्वर मंडल गेल्या दीड वर्षांपासून अजिंठय़ाच्या पायथ्याशी तो कलावारसा पुन्हा नव्याने घडवीत आहेत.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी हुबेहूब नव्याने उभी करायची आहे, असे जेव्हा ‘सुपरस्टोन’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठोड यांनी सांगितले, तेव्हा मूर्तिकार व चित्रकारांसमवेत काम करणाऱ्या कंपनीच्या संचालक तेजल महादेवय्या जवळजवळ किंचाळल्याच. कसे करणार हे, असा प्रश्न घोंघावत आला. सगळे काम सिमेंट आणि वाळूच्या मदतीने करायचे. पण प्रश्न निर्माण झाला- लेण्यांची त्रिमिती तरी आहे का? स्थापत्यशास्त्राची संस्कृती त्या- त्या काळातील समाजमनात असतेच. एखाद्या मोठय़ा मंदिराचा दरवाजा एकच व्यक्ती जाण्याएवढा असतो. ईश्वरासमोर जाताना लीनता असावी, याकरता. तेच अजिंठा लेण्यांच्या सौदर्याचे. त्यांची भव्यता निर्माण करणे हे अवघड आव्हान! त्याकाळी अभियांत्रिकी भाषेतील नकाशे नव्हते. मग मूर्तीचा आकार, अंग-उपांग समजावून कसे घ्यायचे? जे काम कलाकारांकडून करून घ्यायचे, त्याने त्याची नवनिर्माणाची इच्छा वळचणीला ठेवायची आणि जशास तसे लेणे घडवायचे, हेच खरे तर आव्हान.
भारतात कलाकारांची कमतरता कधीच नव्हती. आजही ती नाही. काही कलावंत शोधले गेले. सिमेंटमध्ये कलाकुसर करणारे मूर्तिकार दक्षिणेतून आले, तर चेहरा घडवणारे कलाकार पश्चिम बंगालचे. चित्रकलेत उच्च शिक्षण घेणारे काहीजण आणले गेले आणि प्रतिरूप अजिंठा बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली.
अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी व्हिजिटर सेंटरमध्ये हुबेहूब शिल्पे बनवण्यापूर्वी कलाकारांनी लेण्यांचे तासन् तास निरीक्षण करावे, ते सौंदर्य डोळ्यांत साठवून घ्यावे, ही निमिर्तीची पहिली प्रक्रिया. शंकर, संजय बिस्वास, साबू  या कलाकारांसह मूर्तिकला शिकलेले ५० जण रोज लेण्यांमध्ये जायचे. ही प्रक्रिया सुरू होती तेव्हा लोकप्रिय असलेल्या १, २, १६ व १७ क्रमांकांची लेणी कशी बनवायची त्याचे आरेखन व त्रिमितीचा अभ्यास सुरू झाला. प्रत्येक लेण्याची आणि मूर्तीच्या अंग-उपांगांची मोजमापे घेण्यात आली. त्यासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी घेण्यात आली. कागदावरचा अभ्यास आणि अभियांत्रिकीचा अनुभव यांचा मेळ घालताना पर्यटन केंद्राच्या इमारतीत डोंगर असल्याचा आभास निर्माण करणे हे अवघडच काम होते. पण लोखंडी सळ्या आणि बांधकामातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून केरळच्या साबू या कलाकाराने डोंगर उभारला. सभामंडप उभारताना त्याचे खांब उभारण्याचा अनुभव राजेश राठोड यांच्या चमूला नवा नव्हता. समान मापात खांब उभारले जातात. पण अजिंठा लेण्याच्या सभामंडपातील खांबांची रचना तशी नाही. दोन खांबांतील अंतर सारखे नाही. कारण तिथे डोंगरातील कोरीवकाम आहे. कलाकृती ढासळू नये अशा पद्धतीने त्यांनी ते स्थापत्यशास्त्र जपले. पण ते व्हिजिटर सेंटरमध्ये उतरवणे नव्या अध्ययनाचा भाग होता. दुसरी अडचण होती खांबांच्या जाडीची. सिमेंटचा खांब उभारण्याची एक सर्वमान्य पद्धत जगभरात आहे. त्यापेक्षा त्याचा आकार वाढवणे अभियांत्रिकीत न बसणारे. म्हणून आकार वाढविण्यासाठी सिमेंटच्या खांबाला स्टायरोफॉर्म जोडण्यात आला. स्टायरोफॉर्म म्हणजे थर्माकोलसारखा प्रकार. अभियंते त्याला इपीएस (एक्सपान्डेड पॉलीस्टारलिंग) म्हणतात. सिमेंटच्या खांबातून आलेल्या सळ्या थर्माकोलला पकडणाऱ्या. हवा तेवढा आकार झाला की त्यावर पुन्हा सिमेंट आणि वाळूचा थर. बांधकामाची ही पद्धत तशी नवीच.
अजिंठा लेण्यांतील प्रत्येक बुद्धमूर्तीचा भावाविष्कार वेगळा! प्रकाशकिरणानुसार एकाच मूर्तीमधील भाव बदलण्याचे सामथ्र्य ज्या शिल्पांत आहे, त्यांची नक्कल करणे कठीणच. ‘अद्वितीय’ या शब्दाचा अर्थ क्षणोक्षणी जाणवत असल्याचा अनुभव प्रत्येकजण घेत होता. पण ते साकारणे एका नव्या अध्ययनाचा भाग होता. पश्चिम बंगालमधील मूर्तीकाम करणारे कलाकार जेव्हा बुद्धमूर्ती बनवायला  घ्यायचे तेव्हा तो तथागतांच्या चेहऱ्यावरील शांत भाव कसा आणायचा, हे त्यांना सांगून कळणारे नव्हते. दुग्रेची मूर्ती उग्ररूपात साकारण्याची ज्यांची परंपरा- त्यांना भगवान बुद्धाचा चेहरा कोरण्यास सांगितले गेले. मूळ वैचारिक दरीच मोठी. तरीही तेजल महादेवय्या यांनी हे काम स्वीकारले. केलेली मूर्ती नक्की कोठे चुकली, हे समजावून सांगण्यासाठी त्यांना शब्दांची बरीच कसरत करावी लागे. कारण कोणालाच ‘तुमचे चुकले’ असे सांगितलेले आवडत नाही. कलाकार तर अधिकच संवेदनशील. बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा साकारता न आल्याने अनेकदा ते काम पुन्हा करावे लागले. ही प्रक्रिया थकविणारी आहे.
काम सुरू झाले तेव्हा पांढरी वाळू गुजरातमधून आणू, असा राजेश राठोड यांचा विचार होता. काम सुरू झाले आणि गुजरात सरकाने वाळूउपशावर बंदी घातली. मूर्ती साकारताना वा सभामंडपातील खांब उभे करताना किती वाळूमध्ये किती सिमेंट टाकायचे, याचे प्रमाण बदलावे लागे. दरवेळी हे मिश्रण योग्य होईलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी कलाकारांच्या हाताखाली असणारा मजूर सांगितल्याबरहुकूम वागेल असे घडत नाही. त्यामुळे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण दुबईमधून मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिल्पकलेचा हा भाग अधिक जिकिरीचा. कारण ज्या मूर्ती भंगल्या आहेत त्या तशाच साकारायच्या असे ठरले असल्याने त्यासाठी कलाकारांना वेगळीच मेहनत घ्यावी लागली. संजय बिस्वास सांगत होते- ‘सिमेंटमध्ये मूर्ती बनवणे तसे अवघड. वेळही कमी होता. काही मूर्ती आकाराने लहान आहेत. त्या बनवताना अडचण निर्माण झाली. हे काम वेगळ्या पद्धतीचं आहे. यापूर्वी रामोजी फिल्मसिटी उभारताना केलेले काम आणि हे काम यात खूपच फरक आहे.’अजिंठय़ातील चित्रेही अद्वितीय. ती चित्रकारी नव्याने साकार करणे अवघडच. सेंटरमधील चित्रे नव्याने केलेली नाहीत. चित्रांचे छायाचित्र घेण्यात आले. सलग संपूर्ण छताचे आणि भिंतींची छायाचित्रे घेता येत नाहीत. कारण सभामंडपातील खांब आड येत. त्यासाठी नव्या पद्धतीचा ट्रायपॉड विकसित केला गेला. त्यावर बसवलेला कॅमेरा लॅपटॉपच्या सहाय्याने हलवता यावा अशी सोय करण्यात आली. ती छायाचित्रे कॅनव्हास घेऊन िभतीवर डकविण्यात आली. अख्खी चित्रांची िभत कॅनव्हासवर दिसत असल्याने कोणालाही आपण लेण्यातच आहोत असा भास होतो. हे सगळे कशासाठी? अनमोल ठेवा अस्तित्वात असताना त्याची प्रतिकृती करण्याची गरजच काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. राज्य पर्यटन विकास महामंडळाला हा उपक्रम हाती का घ्यावासा वाटला, याचे उत्तर आपल्या लेणी व चित्रनिरक्षरतेत दडले आहे. आपल्याकडील बहुतांश पर्यटक फेरी मारण्यापलीकडे जात नाहीत. त्या स्थळाचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा झाली तरी त्यासाठी वेळ व पसा खर्च करण्याची तयारी नसते. जगभरातून येणाऱ्या पर्यटकांनाही अचूक माहिती दिली जावी, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पावर मोठा खर्च झालेला आहे. असेही अजिंठा लेण्यांजवळ चांगल्या पायाभूत सुविधा नाहीत. वेरुळ आणि अजिंठा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता ही बाब सहज लक्षात येते. गेल्या वर्षी वेरुळला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या १३ लाख होती. अजिंठय़ात मात्र ही संख्या केवळ चार लाख एवढीच होती. या लेण्यांचे औरंगाबादपासूनचे जास्त अंतर हे एक कारण असले तरी अजिंठय़ात सुविधांची वानवा आहे हेही कारण आहे.सातवाहनांचा कालखंड आíथक संपन्नतेचा होता. वाकाटक कालखंडात अर्थकारणाची घसरगुंडी सुरू होती, पण तरीही लेण्यांचे काम थांबले नाही. पण वाकाटक काळाचा वारसा जरी आज चालवता आला तरी पुरे आहे. संस्कृतीचा ठेवा जतन करताना त्याच्या साक्षरतेबाबत केलेला हा आगळा प्रयोग स्तुत्य आहे. पण त्याचा योग्य उपयोग ही मोठी जबाबदारी असणार आहे. अभिव्यक्ती हिरावून घेण्याच्या या कालखंडात इतिहासातील कॅनव्हास समजून घेण्याची संधी म्हणून या व्हिजिटर सेंटरकडे पाहायला हवे.suhas.sardeshmukh@expressindia.com