जागतिक पातळीवर वावरणारे कवी, शिकागो युनिव्हर्सिटीत भाषाशास्त्राचे प्रोफेसर बापमाणूस ए. के. रामानुजन प्रत्यक्ष भेटण्याआधी त्यांच्या भारतीयतेत खोल मुळं असलेल्या इंग्रजी कविता कॉलेज जीवनात इकडेतिकडे वाचूनही लक्षात राहाव्यात इतक्या आवडल्या होत्या. इतक्या की, त्यांनी आणखी कुठे काय लिहिलंय याचा माग घेतला जायचा. भारतीय संस्कृतीला अवघड प्रश्न विचारणार्या धारदार बौद्धिक कविता… आर. पार्थसारथी, अय्यप्पा पणिक्कर, चित्रे, कोलटकरांच्या कवितेशी नातं सांगणार्या. तो जमाना कॉम्प्युटरआधीचा. त्यातून ते भाराभर लिहिणार्या लेखकांपैकी नव्हते, मोजकेच प्रकाशनार्थ पाठवत. सुजाण मनाचं लक्षण असलेला ‘सेल्फ डाऊट’ त्यांना कायम सतावत असे. दुसरीकडे TLS (Times Literary Supplement) वगैरे चाळून आपण गेल्या काही वर्षांत काही प्रकाशित केलं नाहीये याचीही टोचणी लागलेली असायची (असं नंतर कळलं). स्वत:ला ते लेखक मानत नसत- चार इंग्रजी आणि तीन कन्नड कवितासंग्रह आणि एक कन्नड कादंबरी आणि बरेचसे दर्जेदार अनुवाद प्रकाशित झालेले असूनही! दोन्ही भाषांत लिहीत असल्याने कविता कन्नडमध्ये लिहावी की इंग्रजीमध्ये हाही प्रश्न पडे! अशा स्वनिर्मित अडथळ्यांमधून वाट काढत, परदेशी प्रकाशित होऊन भारतीय वाचकांपर्यंत पोहोचणार्या कविता!
Still Another View of Gracel अमेरिकेत नव्यानं दाखल झालेल्या सर्वसाधारण भारतीय तरुणांच्या मनातल्या अस्वस्थतेची कोंडी फोडणारी. पारंपरिक भारतीय संस्कारांत रुतलेलं मन आणि नैसर्गिक खुलेपणानं सामोरं येणारं अमेरिकन विश्व यांची सांगड घालतानाची उलघाल शब्दांत सांगून टाकणारी ‘मच अँथोलोजाईज्ड’ कविता मला आजही भारतीय इंग्रजीमध्ये लिहिल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट कवितांपैकी वाटते.
Still Another View of Grace I burned and burned. But one day I turned and caught that thought by the screams of her hair and said : Beware, Do not follow a gentleman’s morals with that absurd determined air. Find a priest. Find any beast in the wind for a husband. He will give you a houseful of legitimate sons. It is too late to sin, even for treason. And I have no reason to know your kind. Bred Brahmin among singers of shivering hymns I shudder to the bone at hungers that roam the street beyond the constable’s beat. ll But there She stood upon that dusty road on a night lit april mind and gave me a look. Commandments crumbled in my fatherl s past. Her tumbled hair suddenly known as silk in my angry hand, I shook a little and took her behind the laws of my land.
काही वर्षांनी रामन यांचा (‘सरां’चा हे मनातल्या मनात म्हणायचं इति- डी. आर. नागराजन) एक जबरा निबंध समोर आला : Is there an Indian way of thinking? तो १०-११ पानांत भारतीय संस्कृतीच्या संदर्भात जगातील विचारधारांचा केलेला ऊहापोह तेव्हा गागर में सागर वाटे. देशी भाषांमधील साहित्याचा आढावा घेऊन ‘भारतीय म्हणवणारं मन अमुक एकप्रकारे विचार करतं’ असा ठोकताळा बनवणं म्हणजे लहान / थोर परंपरा, प्राचीन / आधुनिक, ग्रामीण / शहरी, अभिजात / लोक यांचं अस्तित्व नाकारून सरसकटीकरण करणं आहे. एवढंच नव्हे, तर प्रत्येक भाषा, जात आणि धर्माचा असा एक विचाराचाही साचा असतो. पण या बहुमुखी देशीयतेला जोडणारा वैदिक परंपरेचा पायाही असतो, हा निष्कर्ष. गणित व संख्याशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या स्वत:च्या वडिलांचं उदाहरण देत. कपाळी वैष्णव भक्तांप्रमाणे लाल व पांढरे दुबोटी गंध, अंगात लांब-कोट वा जॅकेट, द्रविडीपद्धतीचं धोतर आणि पायात चामड्याचे बूट- मोजे घालणार्या, मनात खगोलशास्त्र आणि ज्योतिष किंवा भगवद्गीता आणि बुद्धिप्रामाण्यवादी बट्र्रांड रसेल/ इंगरसोल सुखेनैव कसे नांदतात असा प्रश्न रामनना पडे. पण तसा विरोधाभास वडिलांना जाणवत नसे. मेंदूत वेगवेगळे कप्पे असतात एवढंच ते म्हणत. भारतीयता म्हणजे नक्की काय, यावर वेळोवेळी खल होत आला आहे. यावर मात्र सर्वांचं एकमत की, आपण एक ढोंगी समाज आहोत. खरं वाटतं ते आपण मोकळेपणानं सांगत नाही आणि मतं वेळ बघून बदलत राहतो. म्हणूनही भारतीय विचारपद्धतीबद्दल एकवचनात बोलणं कठीण आहे अशी काहीशी मांडणी.
रामन यांचं सगळंच काहीतरी वेगळं असायचं. दरवर्षी ते भारतात येत तेव्हा दिल्लीतली त्यांची कलाक्षेत्रातली तालेवार मित्रमंडळी म्हणजे गिरीश कर्नाड, अनंतमूर्ति, चंद्रशेखर कंबार, हरीश त्रिवेदी, शिशिर कुमार दास, त्यांना सेमिनार / व्याख्यानमाला/ नाट्यचर्चा/ मुलाखतीसारख्या निमित्तांनी त्यांना बोलावून कशा ना कशावर त्यांची व्याख्यानं ठेवत, त्यामुळे सगळ्यांचाच फायदा होई. मौखिक परंपरेतून आल्याने विरामचिन्हे नसणारं, तामिळ संगम काव्य आणि कन्नडमधील अकराव्या शतकांतील वीरशैव कवींच्या वचना- रचना आणि त्यांचे इंग्रजीमध्ये अनुवाद; आणि जागोजागी बायाबापड्यांकडून ऐकलेल्या लोककथा आणि समकालीन भारतीय साहित्य त्यांचे आवडीचे विषय. खरं सांगायचं तर तामिळ किंवा कन्नड भाषीय नसणार्या भारतीयांचीही पुरातन संगम आणि बाराव्या शतकात बहरलेल्या वचना कवितेशी तोंडओळख इंग्रजीमधून का होईना, रामानुजनांमुळेच झाली.
स्वत:ला ‘इंडो-अमेरिकन’ या शब्दातला हाईफन म्हणणार्या रामनसरांना आमने-सामने ऐकण्याची संधी १९९०च्या सुरुवातीला एका साहित्योत्सवात आली; आणि लागोपाठ दोन-तीन वर्षं वेगवेगळ्या व्यासपीठांवरून येतच राहिली. गौर वर्ण, किरकोळ देहयष्टी, पण आवाजाची फेक अध्यापनाने कमावलेली, श्रोत्यांना विचारप्रवृत्त करणारी शैली! प्रत्येक व्याख्यानाला जाणकारांची उपस्थिती आणि जेएनयू, दिल्ली युनिव्हर्सिटी, जामिया मिलीयामधले स्नातकोत्तर विद्यार्थीही! सत्रात विचारले गेलेले प्रश्नही अभ्यासू. नंतर रामन आरामात विद्यार्थ्यांच्या कोंडाळ्यात बसून प्रश्नांची सख्ख्या शिक्षकाच्या आत्मीयतेनं उत्तरं देत. पूर्व -पश्चिम संस्कृतींचा व्यासंग आणि विनोदाची मुबलक पखरण असलेली शैली कमावलेले विद्वान, भाषाशास्त्रज्ञ डॉ. ए. के. रामानुजन, शिकागो विश्वविद्यालयात ‘द्रविडीयन स्टडीज् अँड लिंग्विस्टिक्स’ शिकवत. हा त्यांच्यासाठीच निर्मिलेला विभाग त्यांनी ३० वर्षं समर्थपणे सांभाळला. भाषाशास्त्र माझा विषय नसूनही, एकंदरीत त्यांच्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटायचा. आता असंही वाटतं की, त्यांची तीन-चार भाषणं प्रत्यक्ष ऐकायला मिळाली ती डी. आर. नागराजन (१९५४-९८) या अतिशय तल्लख अनुवादक, समीक्षक मित्राच्या साथीनं. त्यांच्याशी बोलता आलं, (तेव्हा त्यांच्या ‘काव्याचा अनुवाद एक कवीच करू शकतो’ या विधानावर तिघांचं जोरदार एकमत) दुसर्यांदा संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष गिरीश कर्नाडांच्या कार्यालयात छोट्याशा कामासाठी संवादाची संधी मिळाली, हेही नसे थोडके. कर्नाडांनी आणि त्यांनी लोककथा संग्रहावर आणि ‘नाग-मंडल’ आणि ‘ताले दंडा’ या नाटकांवरही एकत्र काम केलं होतं.
असामान्य विश्लेषक, रामानुजन व्यक्ती म्हणून कसे असतील याची उत्सुकता असायची. त्यांच्या मागून त्यांच्या मुलानं- कृष्णा रामानुजननं गिलेर्मो रॉड्रिग्झ या अभ्यासकाबरोबर संपादित केलेल्या ‘journeys A Poet’ पुस्तकात दिलेल्या दैनंदिनीतल्या स्वैर नोंदींमधून बरंच काही हाती लागलं. आपण घरातल्या आणि आसपासच्या खास ब्राह्मणी वातावरणात विजोड आहोत, तथाकथित मार्गी लागून यशस्वी होण्याच्या चाकोरीत बसणारे नाही, हे त्यांना अनंतमूर्ति आणि कर्नाड यांच्यासारखंच शिकतानाच उमगलं होतं. (अनंतमूर्तिंना ‘संस्कार’साठी याहून योग्य अनुवादक कुठे मिळणार होता?). आतल्या प्रचंड अस्वस्थतेमुळे नेति नेति करता-करता त्यांनी वेगवेगळ्या कॉलेजांमधून नोकर्या बदलल्या. अमेरिकेची उत्सुक ओढ लागलेली. १९५९ मध्ये फुलब्राइट स्कॉलरशीपनं रस्ता सापडला. भारतीय समाजात स्वत:ला मिसफिट मानणार्या रामनना देशी साहित्यावर काम करायला, ते शिकवायला आवडे हाही एक विरोधाभासच. ‘Conventions of Despair’ या कवितेतल्या अशाच त्यांच्या काही ओळी :
And when I burn / I should smile, dry- eyed, and nurse martinis like the Marginal man. But sorry, I cannot unlearn/ conventions of despair / They have their pride/ I must seek and find / my particular hell only in my Hindu mind/ must translate and turn / till I blister and roast.
१९९३ मध्ये शस्त्रक्रियेपूर्वी दिलेल्या अनास्थेशियात त्यांच्या अकस्मात निधनानं साहित्य जगताला हादरा बसला होता. साहित्य अकादमीने त्यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर केला. पद्मश्री आधीच मिळाली होती. ज्ञानपीठ किंवा बिर्ला फाऊंडेशनने नागरिकत्वाच्या नियमांना मुरड घालून ए. के. रामानुजनना सन्मानित करायला हवं होतं असं अनेकांना वाटे, हे एकीकडे. आणि दुसरीकडे सुविख्यात मॅकआर्थर फेलोशीप असो वा पद्मश्री- आपण सन्मानाला लायक आहोत का? अशासारखे आजकाल कोणालाच न पडणारे प्रश्न रामनना स्वत:ला फार त्रास देत म्हणून ते त्यानिमित्त होणार्या मुलाखती शक्यतो टाळत. वर्गात उत्कृष्ट शिकवणार्या विनयी रामनना कॅमेरासमोर अवघडलेपण येई म्हणून स्वत:चा रागही! पत्नी मॉली डॅनियल्स त्यांच्यासारख्याच फुलब्राइट स्कॉलर. दोघांनी दोनदा लग्न केलं आणि घटस्फोट घेतले, पण संबंध कायम मैत्रीपूर्ण. त्यांच्या माघारी त्यांच्या निवडक प्रकाशित /अप्रकाशित कवितांचा एक अप्रतिम संग्रह पत्नी मॉली, त्यांची दोन मुलं व सहयोगी विनय धारवाडकर यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेससाठी तयार करून दिला. त्यांच्यासाठी आयोजित शोकसभेत दोन होतकरू प्रोफेश्वरांची वक्तव्यं ऐकून ए. के रामानुजन यांच्या कवितांचे अनुवाद असोत वा अध्यापन, करणार्याने द्राविडी संस्कृतीत रुजलेलं स्वत्त्व आणि नंतर जीवनभरासाठी निवडलेलं अमेरिकन सांस्कृतिक लँडस्केप दोन्ही अनुभवलेली, किमान जाणलेली असतील तरच त्याला रामन बर्यापैकी कळतात / शिकवता येतात. नाहीतर तो प्रकार एकांगी, रामन यांच्यावर अक्षम्य अन्याय करणारा ठरतो (डी. आर.च्या शब्दांत ‘बॅनल’ : अज्ञानापोटी असामान्याचं सामान्यीकरण करणारा या अर्थाने) यावर कर्नाडांसकट आमचं पक्कं एकमत होतं!
शेवटी सेल्फ-पोर्ट्रेट ही त्यांची कविता, मराठी अनुवादात!
मी अगदी प्रत्येकासारखा दिसतो
स्वत:ला सोडून आणि कधी कधी पाहतो
दुकानांच्या खिडक्यांत,
दृष्टीविज्ञानाचे नियम ज्ञात असूनही,
एका अपरिचित चेहर्याचं चित्र,
तारीख अज्ञात,
अनेकदा कोपर्यात सही असते
माझ्या वडिलांची.
arundhati.deosthale@gmail.com
