बंडा जोशी
आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना २ ऑक्टोबर १९५३ या दिवशी झाली. तेव्हापासून श्रोत्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा वसा आकाशवाणीच्या पुणे केंद्राने घेतला. प्रत्येक पिढीने तो वारसा जपला. देशात नभोवाणी हे माध्यम येण्यापूर्वी सभासमारंभातील भाषणे हीच खरी ज्ञान आणि माहितीची साधने. ग्रामीण भागात मंदिरातील हरिकथा- कीर्तनांमुळे लोकांचे रंजन आणि प्रबोधन होई. तथापि आकाशवाणीमुळे शहरी आणि ग्रामीण भागात- अगदी निरक्षरांनाही ज्ञान आणि रंजनाचे साधन उपलब्ध झाले. श्रोत्यांनीही पत्रांद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून या माध्यमांना अधिक प्रभावी करण्याचे मोठे कार्य केले.

मराठीमध्ये ज्ञानी व्यक्तीला ‘बहुश्रुत’ असे म्हणतात. ज्याने खूप ज्ञान आणि माहिती ‘ऐकलेली आहे, तो बहुश्रुत!’ आकाशवाणीने श्रोत्यांना बहुश्रुत करण्याचे स्पृहणीय कार्य प्रदीर्घकाळ केले. आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्थापनेपासून- यात व्यंकटेश माडगूळकर, पुरुषोत्तम जोशी, पु. ल. देशपांडे, ज्योत्स्ना देवधर यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी मोठे योगदान दिले. पुलंनी म्हटले आहे, ‘‘आकाशवाणी हे माझं पहिलं प्रेम आहे. कारण यामध्ये श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. कार्यक्रम ऐकताना, ती व्यक्ती किंवा पात्राच्या आवाजावरून श्रोता आपल्या कल्पनेतून ते पात्र आणि प्रसंग प्रत्यक्ष दृष्टीसमोर आणत असतो.’’ आकाशवाणीवरून श्रोत्यांशी आपुलकीने संवाद साधला जातो.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य. त्यानुसार, साहित्य, नाटय, संगीत इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मनोरंजनाबरोबरच सामाजिक शिक्षण आणि प्रबोधन करणारे हे माध्यम. याचा प्रत्यय आकाशवाणी पुणे केंद्राच्या अनेक कार्यक्रमांतून येतो. आकाशवाणीच्या पुणे अ केंद्रावरून बहुतेक कार्यक्रम मराठीतून होतात. पुणे ब केंद्रावरून विविध भारतीचे कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येतात. यामध्ये मुंबईच्या विविध भारती केंद्रावरून सादर होणार्‍या हिंदी चित्रपटगीतांच्या बहुतेक कार्यक्रमांचे सहक्षेपण केले जाते. या पुणे ब केंद्रातर्फे काही मराठी गीतांचे कार्यक्रम सादर केले जातात.

पुणे अ केंद्रावरून विविध विषयांवर मराठी कार्यक्रम होत असतात. ‘उत्तम शेती कशी करावी’ याविषयी मार्गदर्शन मिळते. कृषिविषयक नवीन तंत्रज्ञानांची ओळख होते. शेतीतज्ज्ञांच्या मुलाखती होतात. अभंग आणि भक्तिगीतांनी सकाळ प्रसन्न होते. बातम्यांमधून देशविदेशातील घडामोडींचा आढावा घेतला जातो. महिलांसाठीच्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण केले जाते. यशस्वी आणि कर्तबगार स्त्रियांच्या मुलाखती प्रसारित केल्या जातात. स्त्रियांचे प्रश्न, समस्या याविषयी चर्चा केली जाते. बालमित्रांचे मनोरंजन करण्यासाठी नाटिका, गाणी याबरोबरच प्रबोधनपर गोष्टी सांगण्यात येतात. संगीताचा आधारस्तंभ म्हणून प्रामुख्याने आकाशवाणी ओळखली जाते. यामध्ये शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताचे कार्यक्रम होत असतात. अनेक जुन्या नव्या कलाकारांना वाव मिळतो. श्रोत्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यासाठी, ‘हॅलो डॉक्टर’ हा कार्यक्रम होतो. युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, नोकरी व्यवसायाच्या विविध संधी, अभ्यासक्रम याविषयी माहिती मिळते. ‘आठवणीतला गाव’ यांसारख्या कार्यक्रमात ज्येष्ठ मंडळी आपल्या गावातल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात.

आकाशवाणीमधल्या कलाकाराचे पद कोणतेही असले तरी निवेदन, संहितालेखन, श्रुतिका किंवा नभोनाट्यात भूमिका, ध्वनिमुद्रण, ध्वनिसंकलन अशा सर्व गोष्टींमध्ये पारंगत अनेक कलाकार असतात. या कलावंतांना विविध कार्यक्रमात सहभाग घेता येतो. श्रोत्यांना आनंद देता येतो. स्वत:ला अजमावता येते. अशा हरहुन्नरी कलाकारांना, या माध्यमात भरपूर संधी मिळतात. त्यांचा त्यांना लगेच प्रतिसाद मिळतो. आपण सादर केलेल्या कार्यक्रमाला रसिकांचा कसा आणि किती प्रतिसाद मिळतो, याविषयी कलाकार उत्सुक असतात. तो प्रतिसाद पूर्वी पत्रांद्वारे, तर सध्या फोनवरून रसिक देतात. याचा आनंद खूप वेगळा असतो. असे सांगतात की, खूप पूर्वीच्या काळी रेडिओवर आपला कार्यक्रम लागला की अनेक कलाकार सायकलवरून गावात फिरत असत. किती आणि कोणत्या घरात आपला कार्यक्रम ऐकला जातो आहे हे पाहायला जात.

१९८२ ते २००३ या काळात मी आकाशवाणीत निवेदक-कलाकार म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी ‘आरसा’ ही कौटुंबिक श्रुतिकामाला घरोघरी आवर्जून ऐकली जायची. अनेक लोकप्रिय लेखक या कार्यक्रमासाठी उत्तम लेखनाचे योगदान देत. त्यामध्ये आकाशवाणीतील कलाकार, पात्रे म्हणून सहभागी होत असत. या कुटुंबातली पात्रे, या व्यक्ती, हे कुटुंब खरोखर अस्तित्वात आहे, असे अनेक भाबड्या श्रोत्यांना वाटत असे. त्यातले विषय आणि घटना-प्रसंगांशी श्रोते एकरूप होऊन जात. भगिनी वर्गासाठी गृहिणी आणि आपले माजघर हे कार्यक्रम सादर केले जात. ‘माजघरातल्या गप्पां’मधून स्त्रीविषयक अनेक प्रश्न हाताळले जात.

अनेक कर्तृत्ववान ्त्रिरयांच्या मुलाखती प्रसारित होत. शास्त्रीय संगीत, भक्ती-संगीत, लोकसंगीताचे कार्यक्रम होत. श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रम ‘आपली आवड’ हा विशेष लोकप्रिय होता. या कार्यक्रमासाठी श्रोते आपल्या आवडत्या गीतासाठी पसंतीचे पत्र पाठवत. ‘स्वरचित्र’ कार्यक्रमात दर महिन्याला एका विशेष गीताची निर्मिती केली जात असे. अनेक जुन्या- नव्या गीतकारांची गाणी निवडली जात. अनेक संगीतकार ही गीते संगीतबद्ध करत. आधी त्या रचनेचं निवेदकाकडून गद्य गीतवाचन आणि त्यानंतर ते गीत सादर केले जात असे.

‘सुप्रभात’ हा काही घटना, प्रसंग आणि संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम श्रोत्यांना खूप आनंद देत असे. अवतीभोवती तसेच देश-विदेशात घडणार्‍या आनंददायक, सकारात्मक, स्वागतार्ह आणि अनुकरणीय घटना, आगळ्यावेगळ्या बातम्या, मनोरंजक संहिता गीतांसह सादर केल्या जात. शेतकर्‍याने आपल्या शेतात घेतलेली विक्रमी पिके, सामान्य माणसांना उपयोगी असा नवा शोध, आकाशवाणीवरील शिक्षणविषयक मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन जीवनात यशस्वी झालेले अनेक तरुण, तुमच्या आमच्यातील व्यक्तीने शोधून काढलेली एखादी नवी युक्ती, एखादी जगावेगळी गमतीदार बातमी, देश विदेशातल्या रंजक घटना यांचा समावेश केला जाई. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद येत असे. ‘हसवा-हसवी’ या कार्यक्रमासाठी श्रोत्यांकडून पत्राद्वारे विनोद मागवले जात. त्यातील निवडक विनोद या कार्यक्रमात नाट्यरूपात सादर होत असत. ‘हा कार्यक्रम ऐकताना आम्ही खूप हसलो,’ असा हसरा अभिप्राय श्रोत्यांकडून येत असे.

अशा विविध कार्यक्रमांसाठी अनेक श्रोते, नियमितपणे पत्र पाठवत असत. ‘लोभ असावा’ या सदरातून आकाशवाणीतले निवेदक ताई आणि दादा या भूमिकेतून श्रोत्यांच्या पत्रांना आपुलकीने उत्तरे देत. ‘फोन इन’ कार्यक्रमात श्रोत्यांचे अनुभव, मते संवादातून ध्वनिमुद्रित करून, ती संपादित करून प्रसारित केली जात. विशेषत: दृष्टिहीन बांधव, आकाशवाणी एकाग्र चित्ताने ऐकत असत. त्या कार्यक्रमांविषयी ब्रेल लिपीतून पत्रे पाठवत. दृष्टिहीन बासरीवादक रमेशजी गुलाणी तेव्हा आकाशवाणीच्या सेवेत होते. या ब्रेल लिपीतील पत्रांचा आशय ते समजावून सांगत. तो समजून घेऊन, त्या श्रोत्यांच्या पत्रांना अनुरूप उत्तर मिळत असे. तेव्हा त्या दृष्टिहीन बांधवांना आश्चर्य वाटे. ब्रेल लिपी निवेदकांना कशी कळते, त्याविषयी त्यांना उत्सुकता असे. असे श्रोते बांधव, पत्रातून तशी विचारणा करत. तेव्हा त्यांना वस्तुस्थिती सांगितली जाई. त्यांच्या अनेक संस्थांमधून, प्रत्यक्ष भेटीसाठी निमंत्रणे येत. सिटी बस किंवा एस.टी.मध्ये एखादा निवेदक कोणाशी बोलला तरी ते दृष्टिहीन श्रोते आवाजावरून नाव ओळखत. प्रेमाने मुद्दाम बोलत. हात हातात घेत. त्यांच्या संस्थांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधायला बोलवत.

आकाशवाणीवरील कार्यक्रमांमुळे अनेक नियमित श्रोते आकाशवाणीशी स्नेहाने जोडले जात. त्यांचा ऋणानुबंध प्रतिसादातून जाणवत असे. शेतकरी असलेले रघुनाथ राऊत, मु. पोंधवडी, जिल्हा सोलापूर यांच्यासारखे ग्रामीण भागातले जाणते श्रोते तर दर आठवड्याला निवडक कार्यक्रमांना अतिशय वळणदार अक्षरात, मोजक्या शब्दांत आपला अभिप्राय पाठवत असत. अशा अनेक श्रोत्यांची भरपूर पत्रे येत असत. काही जण आपल्या घरातल्या कौटुंबिक समारंभांची निमंत्रणे पाठवत. घरच्या लग्नाला, बाळाच्या बारशाला, आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या वाढदिवसाला, अमृत महोत्सवी सोहळ्याला येण्यासाठी गळ घालत. काही श्रोते पुण्यात आले की आकाशवाणीत आवर्जून भेटायला येत. ‘तुम्हाला बघायला आलो’ असे निवेदकांना सांगत. आकाशवाणीतील निवेदकाच्या आवाजावरून काही श्रोते वयाचा अंदाज बांधत. अनेकदा तो खरा वा खोटा ठरत असे. आवाजावरून एखादा निवेदक तरुण आणि उपवर आहे असे त्यांना वाटे. काही वधुपिते त्यांच्या मुलीसाठी ते स्थळ पाहायला येत. काही जण आपल्या गावातल्या मुलींची स्थळे घेऊन माहिती देत. प्रत्यक्षात त्या निवेदकाचे लग्न होऊन मुलेही झालेली असत. तेव्हा आम्हाला आणि या श्रोत्यांना आश्चर्य आणि हसूही येत असे.

काही शेतकरी बांधव ज्वारीच्या हंगामामध्ये, ‘आमच्या शेतामधला हुरडा खायला या ना!’ म्हणून आग्रह करत. दसर्‍याला सोने तर संक्रांतीला तिळाच्या वड्या आणि हलवा, प्रेमाने आणि आपुलकीने पोस्टाच्या पाकिटातून पाठवत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा मोसमाप्रमाणे एखाद्या दिवशी निवेदकांच्या आवाजात थोडाफार फरक पडे. प्रसारणामध्ये हा बदल श्रोते नेमका टिपत. काळजीने पत्र पाठवून, तब्येतीची विचारपूस करत. ‘काळजी घ्या,’ असा प्रेमळ सल्ला देत. ‘गावातल्या वैद्यांची रामबाण औषधं पाठवू का?’ अशी विचारणाही करत. आकाशवाणी कलाकारांनी कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेतला तरी काही चाणाक्ष श्रोते त्या कलाकाराचे नाव ओळखत.

अनेक श्रोत्यांना श्रुतिकामालिकेमधील पात्रे आणि ते कुटुंब खरेखरे आहे असे वाटे. आरसा मालिकेतील आमच्या कलाकार भगिनी बाळंतपणाच्या रजेवर गेल्या, त्यामुळे श्रुतिकेतले ते पात्र ‘बाळंतपणासाठी माहेरी गेले आहे’ असे श्रुतिकेमध्ये गुंफले. रजा संपल्यावर त्या परत आल्या तेव्हा ते पात्र परत आले. तिला बाळ झालं असे संवाद योजले होते. तेव्हा अनेक श्रोत्यांनी अभिनंदनाची आणि आनंदाची पत्रे पाठवली. काहींनी ‘बाळ बाळंतीण सुखरूप आहे ना?’ अशी आपुलकीने चौकशी केली. ‘बाळाचे नाव काय ठेवले?’ हे उत्सुकतेने विचारले. बाळाला तोंड भरून आशीर्वाद दिले. खेड्यातल्या एका सोनाराने तर बाळाच्या बारशासाठी चक्क चांदीचे वाळे धाडले. असा अकृत्रिम स्नेह पाहून कलाकार भारावून जात.

आकाशवाणीच्या कार्यक्रमांसाठी त्या त्या क्षेत्रातील विविध दिग्गज व्यक्तींच्या घरी ध्वनिमुद्रणासाठी जाण्याचे भाग्य लाभे. आकाशवाणीच्या कार्यक्रमांची ते प्रशंसा करत. आवर्जून ऐकत असलेल्या कार्यक्रमांविषयी कौतुकाने सांगत. मार्गदर्शन करत. आकाशवाणीवर प्रसारणासाठी आचारसंहिता असते. अनेक नियम आणि बंधनं असतात. त्या मर्यादा पाळून काही कार्यक्रमांत निखळ विनोदांचा समावेश असे. याचे कौतुक पुलंसारखे अनेक लेखक करत असत. मंगला गोडबोलेंसारख्या लेखिका अतिशय खुमासदार श्रुतिका आकाशवाणीसाठी लिहीत.

पंडित महादेवशास्त्री जोशी यांचे देहावसान झाले होते तेव्हा मी विविध साहित्यिकांच्या घरी जाऊन श्रद्धांजली ध्वनिमुद्रित करत होतो. त्यासाठी पुलंना त्यांच्या घरी जाऊन विनंती केली. तेव्हा त्यांची प्रकृती बरी नव्हती. ते म्हणाले, ‘‘मीही आकाशवाणीत होतो. आकाशवाणीत प्रसारणयोग्य आवाज असावा लागतो. माझा आवाज आत्ता प्रसारणयोग्य आहे का, हे तुम्हीच सांगा. माझी लिखित श्रद्धांजली तुम्हीच रेडिओवर वाचावी,’’असे ते म्हणाले. तेव्हा रेडिओ या माध्यमाची अचूक नस जाणणारा हा थोर कलावंत आहे याचा प्रत्यय आला. अशी अनेक मोठमोठी मंडळी आकाशवाणीच्या निमित्ताने भेटत होती.

प्रत्येक प्रसारणात आरंभी निवेदक आपले नाव सांगत नसत. तरीही आकाशवाणीवर कोणता निवेदक प्रसारण करत आहे, हे चाणाक्ष श्रोते बोलण्यावरून ओळखत. याशिवाय, काही कार्यक्रमाचे लेखन, निवेदन आणि सादरीकरणही कलाकार करत. अशा कार्यक्रमात निवेदकाचे वा सादरकर्त्याचे नाव सांगितले जाई. परंतु त्या त्या कलाकाराला प्रत्यक्ष पाहण्याची, भेटण्याची उत्सुकता श्रोत्यांना असायची. तशी कधी प्रत्यक्ष भेट झाली तर त्यांना कमालीचे समाधान आणि आनंद वाटे. त्याचे प्रत्यंतर अनेक कलाकारांना अजूनही येते. एखाद्या कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमात गेल्यावर अनेक लोक बघायला येतात. काही ठिकाणी नाव सांगितले की लोक ‘रेडिओवरचे तुम्हीच ना?’ असे विचारतात. आनंदाने भेटतात. प्रेमाने आदरातिथ्य करतात. खेड्यापाड्यातही श्रोत्यांच्या घरचा एक सदस्य असल्याप्रमाणे, आकाशवाणी कलाकारांना प्रेम आणि माया लाभते.

‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ या संतवचनाप्रमाणे आकाशवाणी पुणे केंद्राने आजवर वाटचाल केली आहे. आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांमुळे अनेकांच्या आयुष्याला चांगले वळण मिळाले. विविध विषयांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली. आपापल्या नोकरी-धंदा व्यवसायात प्रगती साधता आली. रेडिओवर ऐकलेल्या काही मौलिक सूचनांमधून आपापला प्रपंच सुखाचा करता आला नभोनाट्ये, श्रुतिका, मुलाखती, प्रत्यक्ष समारंभांचे ध्वनिमुद्रण, संगीताचे कार्यक्रम ऐकून मनोरंजन आणि प्रबोधन झाले. दैनंदिन व्यवहारात मौलिक सल्ला मिळाला. निराशेमध्ये आशेचा सूर गवसला. सामान्यज्ञान वृद्धिंगत झाले. प्रसारणातील आशय- विषयांमधून लहानथोरांना अनेक अडचणींतून मार्ग काढता आला. दिशा दाखवली. घरात आणि घराबाहेर अनेकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात करता आले. यशाचा आणि सौख्याचा राजमार्ग सापडला. मला या माध्यमात खूप वर्षे राहता आले. व्यंकटेश माडगूळकर, ज्योत्स्ना देवधर, पुरुषोत्तम जोशी यांच्यासारख्या जुन्याजाणत्या अधिकारी व्यक्तींचा सहवास लाभला. खूप काही शिकता आले. श्रोत्यांशी रेडिओवरून आणि प्रत्यक्ष संवाद साधता आला, याची मला आजही धन्यता वाटते. म्हणून पूर्वीच्या पत्रांप्रमाणे आणि पुणे केंद्राच्या ‘लोभ असावा’ या पत्रोत्तरांच्या सदराप्रमाणे निरोप घेतो.

bandadjoshi@gmail.com