‘अक्षरधारा’चे असिधारा व्रत

पुण्यातील ‘अक्षरधारा’ या संस्थेला १३ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर मराठी पुस्तकांची प्रदर्शने भरवणाऱ्या, विविध साहित्यिक उपक्रम राबवणाऱ्या आणि साहित्य व वाचक यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करणाऱ्या या संस्थेविषयी..

पुण्यातील ‘अक्षरधारा’ या संस्थेला १३ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर मराठी पुस्तकांची प्रदर्शने भरवणाऱ्या, विविध साहित्यिक उपक्रम राबवणाऱ्या आणि साहित्य व वाचक यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करणाऱ्या या संस्थेविषयी..
१९८७ ची गोष्ट. ‘मी ढवळे ग्रंथयात्रेतून रमेश राठिवडेकर बोलतोय. तुम्हाला भेटायचंय, केव्हा आणि कुठे येऊ?’ असा फोन आला. आम्ही भेटलो.. आणि आम्ही मित्र झालो. १९८७-२०१४ अशी तब्बल २७ वर्षे आम्ही दोघे एकमेकांना ओळखतो. पुण्याला गेल्यावर रमेशची भेट झाली नाही असं होत नाही.
अक्षरधाराच्या उभारणीचे दिवस हे किती खडतर होते हे मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे रमेशसारखा मुलगा जेव्हा या व्यवसायात फारशी परंपरा नसताना भक्कमपणे उभा राहतो तेव्हा त्याचं कौतुकच वाटतं. ढवळे ग्रंथयात्रेचे संस्थापक रघुवीर ढवळे यांनी महाराष्ट्रात ग्रंथयात्रेला सुरुवात केली. महाराष्ट्रातील खेडोपाडय़ात जाऊन पुस्तकांचं प्रदर्शन भरवायचं आणि वाचकांना पुस्तकांच्या जवळ आणायचं असं त्यांनी ठरविलं. रमेश राठिवडेकर नावाचा पोऱ्या या संस्थेत शिपाई म्हणून १९८६ मध्ये दाखल झाला. १९९२ पर्यंत या संस्थेनं lr21महाराष्ट्रात ग्रंथविक्रीच्या क्षेत्रात अभूतपूर्व काम केलं. परंतु, काही कारणांस्तव ही ग्रंथयात्रा रघुवीर ढवळे यांना बंद करायला लागली. १९९२मध्ये जेव्हा ही संस्था बंद करायचं ठरलं तेव्हा रमेश या गं्रथयात्रेचा व्यवस्थापक होता. म्हणजे शिपाई ते व्यवस्थापक अशी कामं त्यानं या संस्थेत केली. या ग्रंथयात्रेमुळे महाराष्ट्रातील खेडोपाडय़ातील वाचकमंडळी रमेशला ओळखू लागली होती. या ग्रंथयात्रेदरम्यान विविध कामांचा अनुभव हा रमेशसाठी व्यावसायिक म्हणून जडणघडणीचा होता, असं म्हणावं लागेल. रमेशला पुस्तक विक्री आणि ग्रंथप्रदर्शन यातील अनेक बारकावे या दरम्यान माहीत झाले. या काळात त्याने अनेक माणसं जोडली. ग्रंथ आणि साहित्य व्यवहाराशी त्याचं अतूट नातं निर्माण झालं. याच दरम्यान रमेशने आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली होती. त्यामुळे नोकरी गेली म्हणून एरवी एखादा सैरभैर झाला असता. परंतु, रमेश डगमगला नाही. बंद पडलेल्या ग्रंथयात्रेचा त्याने एक संधी म्हणून उपयोग करायचा ठरविलं. दोन र्वष त्याने या व्यवसायाचा अत्यंत बारकाईनं अभ्यास केला आणि एक चांगला ग्रंथविक्रेता व्हायचा निर्णय घेतला.
सुप्रसिद्ध साहित्यिक कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे आशीर्वाद घेऊन रमेशने १३ ऑक्टोबर १९९४ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पुण्यात ‘अक्षरधारा’ची स्थापना केली. या वेळी शैलेश वाजा, सुनील चव्हाण, भाऊ लक्ष्मण राठिवडेकर आणि इतर मित्रमंडळी त्याच्या सोबत होती. ढवळे ग्रंथयात्रेत असताना रमेशने अनेक प्रकाशकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. रमेश आता काहीतरी वेगळे करू पाहतो आहे, म्हणून मान्यवर प्रकाशक, लेखक, वाचक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. रमेशने डोंबिवलीसारख्या मुंबईतील उपनगरामधून आपल्या ग्रंथप्रदर्शनाला सुरुवात केली आणि पाहता पाहता ती महाराष्ट्रभर पसरत गेली.
१९९४ पासून अक्षरधारा अखंडपणे ग्रंथोत्सव करीत आहे. या प्रवासादरम्यान केवळ पुस्तक विक्री आणि त्यातून पैसा कमविणे हा रमेशचा हेतू नव्हता. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं आणि आपला एक स्वतंत्र ठसा उमटावा या ध्यासानं तो सतत पछाडलेला असतो.
अक्षरधाराच्या माध्यमातून रमेशने निरनिराळे उपक्रम राबविले, योजना आखल्या, मराठीतले नामवंत लेखकांना प्रदर्शनाकडे वळवलं. लेखक, कवी, चित्रकार, संपादक, प्रकाशक यांचा वाचकांशी संवाद वाढवण्यासाठी मुलाखती, चर्चासत्रे, परिसंवाद असे अनेक उपक्रम राबविले. ‘एक विकत, एक मोफत’, ‘एक विकत, दोन मोफत’, ‘एक विकत, तीन मोफत’ अशा धाडसी योजनांमुळे अक्षरधाराने सातत्यानं मराठी वाचकांना आकर्षित केलं आहे. या योजनांपैकी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ‘वाचनप्रेमी ब्रँड अॅम्बॅसिडर’. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, राहुल सोलापूरकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, अनिल अवचट हे वाचनप्रेमी कलावंत ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून अक्षरधारासोबत जोडले गेले. रमेशच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळेच मराठी ग्रंथयात्रेतील तो एक ब्रँड बनलेला आहे.
एक आठवण सांगतो. अक्षरधाराचं प्रदर्शन औरंगाबादमध्ये येण्याआधी दोन दिवस रमेशचा मला फोन येतो. प्रदर्शनाच्या उद्घाटकांपासून ते विविध कार्यक्रमांबाबतीत अनेक गोष्टींसाठी आम्ही सल्लामसलत करतो. अर्थात, अशी अनेक माणसे त्याने जोडलेली आहेत. मला आठवतं, एकदा मी बोलता बोलता म्हणालो की, ‘सुधीर गाडगीळ सुरेख सूत्रसंचालन करतो. वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो. तर त्याचीच आपण मुलाखत घेऊ या.’ आणि रमेशने त्याचा कार्यक्रम घडवून आणला. कार्यक्रमाला नाव दिलं, ‘मुलाखतकाराची मुलाखत’. औरंगाबादच्या रसिकांनीसुद्धा उत्स्फूर्त दाद दिली.
‘अक्षरधारा’विषयी बोलताना राजहंस प्रकाशनचे प्रकाशक दिलीप माजगावकर एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘प्रकाशनविश्वाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा एक पान सुवर्णाक्षरांनी अक्षरधारावर लिहावं लागेल, इतकं महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं आहे.’ अक्षरधारा ग्रंथप्रदर्शनासाठी गावोगावी फिरताना पुस्तकांचं फिरतं दुकान असं स्वरूप येऊ न देता त्याला सांस्कृतिक सोहळ्याचं रूप रमेशने  दिलं आहे. अक्षरधारा ही संस्था वाचनसंस्कृतीतील एक दूत मानली जावी अशी तिची प्रतिमा तयार केली. यामुळेच प्रत्येक उपक्रमाला योग्य दिशा मिळत गेली.
मराठी साहित्य खेडोपाडी पोहोचविणारी फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची संस्था म्हणून अक्षरधाराचं नाव घ्यावं लागेल असं मला वाटतं. शुभम्, पाटील एन्टरप्राइजेस, ग्रंथाली, साहित्ययात्रा, मायबोलीसारख्या संस्थाही महाराष्ट्रात पुस्तक पोहोचविण्याचं काम करीत आहेत.   मौज आणि पॉप्युलर या प्रकाशन संस्थांनी छोटेखानी १०० प्रदर्शनं महाराष्ट्रभर भरविली. १९८६ ते १९९२ ढवळे ग्रंथयात्रेनं आठ वर्षांत १६० ग्रंथप्रदर्शनं केली. अक्षरधाराने हे सर्व विक्रम मागे टाकत आपलं वेगळं अस्तित्व प्रकाशनविश्वात निर्माण केलं आहे. वाचकांचं संपूर्ण समाधान हा अक्षरधाराच्या ध्येयधोरणांचा केंद्रबिंदू आहे. आजवर अक्षरधाराने वाचकांना अतुलनीय सवलती, भेटी, मोफत पुस्तकं देण्यासाठी सातत्यानं पुढाकार घेतला आहे. अक्षरधाराने वाचकांसाठी सादर केलेली प्रत्येक योजना वाचकांप्रमाणेच प्रकाशकांसाठीही आश्चर्य अन् कौतुकाचा विषय ठरल्या आहेत, इतरांनीही त्याचं अनुकरण केलं आहे.
आजवरच्या प्रयत्नातून आणि त्याला वेळोवेळी मिळालेल्या उत्स्फूर्त अन् विक्रमी प्रतिसादातून प्रेरणा घेऊन अक्षरधाराने पुण्यात ‘अक्षरधारा बुक गॅलरी’ हे कायमस्वरूपी अत्याधुनिक वातानुकूलित असं सुसज्ज सौंदर्यसंपन्न आणि सुशोभित
ग्रंथदालन उभारलं आहे. ही बुक गॅलरी म्हणजे अक्षरधाराने आपल्या वाचकांना समर्पित केलेलं सरस्वतीचं अक्षरमंदिरच आहे.
अशा प्रकारे शिपायापासून सुरू झालेला रमेशचा हा प्रवास बुक गॅलरीच्या मालकापर्यंत झाला आहे. तो केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून जिद्द, कष्ट आणि अपार मेहनत घेऊन उभ्या राहिलेल्या एका संस्थेचा हा प्रवास आहे. आज रमेशची प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये गणना होत असली तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ‘अक्षरधारा’च्या आणि रमेशच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshardhara pune