अक्षय दया मोहिते यांची बिल्लाबाँग ही अलीकडेच प्रकाशित झालेली कादंबरी. मराठी कादंबरीच्या भाषिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक सीमारेषा ओलांडणारी आणि मराठी कादंबरीविश्वात मोलाची भर घालणारी… ही कादंबरी मध्यमवर्गीय जाणिवांच्या जगापासून कोसो मैल दूर असलेली… इथलं जग उलगडताना लेखक अक्षय मोहिते हे या कादंबरीतील बाबागँगचा नागसेन म्हणतो तसं ‘गॉडगॉड बोलून शब्दांच्या रांगोळ्या’ काढत बसत नाहीत, तर स्वत: पाहिलेल्या, अनुभवलेल्या जगातल्या लोकांच्या ‘सर्वायव्हल आणि सोसायटी’विषयी लिहितात. हे सर्वायव्हल केवळ खालच्या आर्थिक स्तरावरचं नाही तर ते खोल दरीत ढकलल्या गेलेल्या लोकांचं आहे. या आर्थिक आणि सामाजिक स्तरावर जगताना आपण जगण्याच्या कोणत्या ‘पीटहोल’मध्ये पडलो आहोत याची कल्पना आलेल्या आणि न आलेल्या लोकांचं आहे.
जगण्याचा गुंताडा आणि चुथडा करून टाकलेल्या व्यवस्थेनं तयार केलेल्या या जगात डॅनी कांडर, झवाडचाचा, चार्ली, चोमू, चमडीसुर्या, डब्ल्यू असे महफिलीतले मित्र; आणि लवंगी, सोमनाथ, नंदा, डब्ल्यूचा बाप, हंसा आजी यांच्या वेगवेगळ्या कहाण्या आणि सोबत ज्या मॅट्रीमोनीमध्ये डॅनी काम करतो तेथील वेगवेगळ्या जातीधर्मातले सहकारी आहेत. या सार्यांची वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या थांब्यांवर उलगडणारी कथा म्हणजे ही कादंबरी.
‘हा हूड होता पोरांचा. अंधार पडला की हूड जिंदा व्हायचा. फ्लायओव्हरखाली रेल्वेट्रॅकच्या बाजूला पिलरकडे एनीटाइम कॅट पसरलेले दिसतात. कदी हातगाडीवर तर कदी हुकमी रेल्वे ट्रॅकवर. पन फ्लायओव्हरखाली रोजच एक्के, दुर्या, रान्या, बादशे, मेंढ्या उतानी उपडी भटक्या कुत्र्यांगत पडून असायच्या. रात्रीच्या टायमाला आनंदनगर लोकलमदल्या प्रवाशांना अनी बाजुलाच उभ्या असलेल्या पारिजात टॉवरमदल्या लोकांना कायम ठरकी भासत होतं. पिसाट मोकाट जनावरामाफीक.’ हे असं ठरकी भासणारं आनंदनगर मोहिते यांनी एकीकडे या कादंबरीत रंगवलंय, तर दुसरीकडे रेशीमगाठी मॅट्रिमोनीचं जग. तिथं डॅनी नोकरी करतो. या साइटवर लग्नासाठी नाव नोंदवलेले आभासी आणि वास्तवातील असे अठरापगड जातीतले लोक येतात. त्यांची मानसिकता आणि आपापल्या जातीविषयी असलेले गंड, न्यूनगंड तर आहेतच, पण या समाजात राहताना मानेवर जूं सारखी बसलेली जातही दिसू लागते. ती सतत आपल्याला भेटते. कादंबरीच्या कथानकात वरच्या आणि खालच्या समजल्या जाणार्या तथाकथित सार्या जात धर्मांच्या लोकांचा वृथा अभिमान आणि अकारण बाळगलेले न्यूनगंड येतातच, पण त्यातून आलेला कडवटपणाही अधोरेखित होतो. या साइटवर रजिस्टर केलेल्या लोकांचे आणि तिथल्या कर्मचार्यांचे रोजचे कॉल आणि त्यातील संवाद ऐकले- वाचले तरी सडलेल्या समाजाचे, आर्थिक आणि लैंगिक भुका भागवण्याचे साधन करून टाकलेल्या विवाहसंस्था या व्यवस्थेचे विदारक चित्र समोर येते.
कादंबरीत भारतीय जातव्यवस्थेवर परखड भाष्य येते. भारतीय विवाहसंस्था ही पूर्णपणे जातीय आणि धार्मिक आहे. आजही जातीच्या उतरंडीवरचे ताणेबाणे या विवाहसंस्थेत अनुभवायला मिळतात. घटस्फोट झालेली मालिनी पोटे जेव्हा म्हणते, ‘मी तर चांभार शे, पन इतर जातीसनं पन चालतील. पन जयभीमवाला, म्हारमांगवाला अनी मुसलमानवाला नक्कोच्च.’ संविधानात कितीही जातधर्मलिंगावर आधारित समानतेविषयी बोललं गेलं असलं तरी लोकांची मानसिकताही विशेष बदललेली नाही हे ही कादंबरी अधोरेखित करते. डॅनीही हळूहळू आडनावाप्रमाणे जातींचं गणित समजून घेतो. उच्चवर्णीयांची बरीचशी आडनावं दलितांमध्येही सापडतात याचा शोध लागलेला डॅनी त्या आडनावांचा चपखल वापर करायला शिकतो. ‘सिस्टिमॅटिक कास्टसिस्टिम’, ‘फाचाड’, ‘मिडलक्लास’ या प्रकरणात यावर नेमकं भाष्य येतं.
डॅनी स्वत: मांग असतानाही आपल्या बायोडेटामध्ये मराठा असल्याचं नमूद करतो हे या न्यूनगंडातूनच आलेलं. आपल्या जातओळखीपासून दूर जाण्याचा त्याचा प्रयत्न अस्वस्थ करतो. त्याच्या मनात सतत हा आयडेंटिटी क्रायसिस दिसत राहतो. ‘हूड २’मध्ये निवेदक म्हणतो, ‘बाबागँगची पोरं बोलताना बहुजन हा शब्द बारबार वापरत होती. मग आपन भेंचो कोन? दलित बहुजन, मांग की हिंदू…? कन्फ्युजन नायटासारखं पसरत जायचं. त्यात मॅट्रिमोनी जॉईन केल्यापासनं त्याच्या सबकॉन्शीस मांइंडमदी बॅकग्राऊंडला मोबाइल ॲप माफीक जात धावत र्हायची.’
ही एखाद्या मोबाइल ॲप सारखी बरोबर धावत राहणारी जात डॅनीला आपल्या जगण्यापासून वेगळी करायची आहे. पण ती होत नाही ही शोकांतिका केवळ डॅनीची नाही तर भारतीय समाजाची आणि त्या समाजात राहाणार्या प्रत्येकाची आहे.
या कादंबरीतली ‘बाबागँग’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार्या मुलांची गँग. त्या गँगचा मेंबर म्हणजे आंबेडकरवादी असलेला नागसेन चार्लीला म्हणातो, ‘शब्दाच्या रांगोळ्या करत नाय बसायचं भेंचोत. आपल्या गोष्टी आपन आपल्या बोलीत सांगितल्या पायजे. हे शब्द आपलेयत. जिंदगी आपलीय. बाराखडी एकचय म्हनून काय भेंचो भवताल पण एकच असेल असं थोडीय.’
अनेकांना कादंबरीतली भाषा भाऊ पाध्ये यांची आठवण करून देईल. पण मला वाटतं, या कादंबरीकडे भाऊ पाध्ये यांचा मापदंड बाजूला ठेवून स्वतंत्रपणे पाहायला हवं. कारण ही कादंबरी आपल्याला केवळ भाषेत अडकवत नाही, तर ती समाजाच्या मॅनहोलमध्ये पडलेल्या, काळं-गढुळलेलं पाणी नाकातोंडात गेल्यावरही जगण्याची धडपड करणार्या, शारीर-लैंगिक पातळीवर जगतानाच त्याही जगण्याच्या पलीकडे घेऊन जाणार्या माणसांविषयी बोलते. त्यात सारं विसरण्यासाठी केली जाणारी नशा आहे, कारुण्य आहे, आनंदाचे थोडेफार क्षण आहेत, स्वप्नं आहेत. ती तुटताना येणारं नैराश्य आहे, विकलता आहे आणि हे सारं व्यक्त्त करण्याची आपली आपली अशी स्वतंत्र भाषा आहे. मराठी वाचकांनी आपला भाषिक, सांस्कृतिक चष्मा उतरवून या एका वेगळ्या जगाचा अनुभव घ्यायला हवा आणि त्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.
‘बिल्लाबाँग’,
अक्षय दया मोहिते, ललित प्रकाशन,
पाने-४९०, किंमत-६५०
nrajan20@gmail.com
