‘लोकरंग’मधील (२० सप्टेंबर) ‘भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट!’ हा डॉक्टर सुलभा कुलकर्णी यांचा लेख भावला. जर्मन वैज्ञानिक अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्टने जे काही भाकीत वर्तविले होते हे तब्बल दोन शतकांनी खरे ठरले. मनुष्यहानी आणि वित्तहानी होण्यामागे मनुष्य कारणीभूत आहे, कारण मनुष्याने केलेली निसर्गाची हानी हे प्रमुख कारण आहे. मनुष्याने किती शिखरे सर करून घेतली तरी निसर्ग आपले रौद्ररूप दाखवतोच. विशेष आश्चर्य वाटले ते म्हणजे अमेरिकन अध्यक्ष थॉमस जेफरसन यांचे. एके ठिकाणी आपण गुलामीच्या विरुद्ध आहोत आणि आपण लोकांचे रक्षण करणारे आहोत आणि दुसर्‍या ठिकाणी गुलामाला कस्पटासमान वागणूक देणारे हे नेते खरे निसर्गाचे मारक आहेत. आपल्या भारताकडे लक्ष दिले तर निसर्गच काय परंतु मनुष्यालादेखील काडीचीही किंमत राहिलेली नाही. जेम्स अंतोनी लोपीस, वसई

हम्बोल्ट भारतात आले असते तर?

‘लोकरंग’मधील (२० सप्टेंबर) ‘भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट!’ हा डॉक्टर सुलभा कुलकर्णी यांचा लेख वाचला. नेपाळमधील महाभयंकर अशा जलप्रलयाने जागतिक पातळीवर विचार करावी अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा हिमनद्या वितळत होत्या तेव्हा कोणत्याच सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, कारण प्रत्येकाचा स्वार्थ त्यात दडलेला होता. ज्या हम्बोल्टने हे भाकीत वर्तवले त्यांचे ऋण फेडायचीच गरज निर्माण झाली आहे. कारण आज विकासाच्या नावाने भारतात जो हैदोस चालू आहे त्याला विरोध करणार्‍यांना राष्ट्रद्रोही ठरवले जाते. गेल्या काही वर्षांपासून तर सार्‍या महाराष्ट्रापासून सार्‍या देशात विविध प्रकारचे महामार्ग चालू आहेत कधी चार पदरी तर आता ते सहा पदरी केले जाणार आहेत,

पण त्यातून होत असलेली जंगलतोड, उत्पादित अशी बागायती शेती, जिरायती शेतीदेखील कवडीमोल भावात शेतकरी वर्गाकडून घेताना शेतीदेखील उद्ध्वस्त होईल. हम्बोल्ट यांच्या भाकिताकडे आपण कानाडोळा केला आहे. कारण हिमालय असो किंवा इतर पर्वत तिथले हिमनग वितळत आहेत हे लक्षात घ्यायला हवे होते, पण त्याच पर्वतरांगेत आज काय परिस्थिती आहे तर- भल्या भल्या लोकांनी पर्यटन केंद्रे उभी करून कोट्यवधीची माया जमा करून ठेवली आहे. त्या काळात हम्बोल्ट भारतात आले असते तर भारतखंडाच्या निसर्गाला वेगळे वळण लागले असते, त्यातून काही कायदे नियमही बनले असते, पण ते घडले नाही आणि हे अक्रित घडले आहे असे म्हणावे लागेल. सुनील समडोळीकर, कोल्हापूर.

आपण काय शिकलो?

‘लोकरंग’मधील (२० सप्टेंबर) ‘भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट!’ हा डॉक्टर सुलभा कुलकर्णी यांचा लेख वाचला आणि अलेक्झांडर हम्बोल्ट यांच्या दूरदृष्टीचे आश्चर्य वाटले. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी त्यांनी जंगलतोडीचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम ओळखले होते. आज बदलते हवामान, अतिवृष्टी, अचानक येणारे पूर आणि मातीची धूप यांमधून त्यांचे विचार किती अचूक होते याची जाणीव होते. या लेखाचे वैशिष्ट्य केवळ हम्बोल्ट यांच्या भाकिताची आठवण करून देण्यात नाही, तर निसर्गाशी केलेली छेडछाड अखेर मानवाच्याच मुळावर येते, हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली जंगलांचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा होत असलेला र्‍हास थांबवून पर्यावरणाचा समतोल राखणे ही आता केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हम्बोल्ट यांचे दोनशे वर्षांपूर्वीचे भाकीत आज खरे ठरले आहे; आता त्यांच्या इशार्‍यातून आपण काही शिकणार का, हा खरा प्रश्न आहे. सुभाष विष्णुपंत धारणकर, पुणे.

निसर्गाची अखंड साखळी अन्…

‘लोकरंग’मधील (२० सप्टेंबर) ‘भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट!’ हा डॉक्टर सुलभा कुलकर्णी यांचा लेख म्हणजे केवळ दोन शतकांपूर्वीच्या एका विस्मरणात गेलेल्या शास्त्रज्ञाची महती सांगणारे चरित्र नाही, तर तो आजच्या विनाशकारी हवामान बदलाच्या काळात मानवाने स्वत:च्या अस्तित्वासाठी अत्यंत गांभीर्याने वाचलाच पाहिजे असा एक जिवंत जाहीरनामा आहे. लेखिकेने अत्यंत ओघवत्या, संवेदनशील आणि नेमक्या शैलीत दोन शतकांपूर्वीच्या एका द्रष्ट्या वैज्ञानिकाची जीवनगाथा आजच्या जागतिक हवामान संकटाशी सुरेखपणे जोडली आहे.

नेपाळमधील भीषण महापूर आणि हिमनद्यांच्या अनियंत्रित वितळण्यासारख्या आजच्या समकालीन घटनांचा संदर्भ देऊन लेखिकेने अलेक्झांडर हम्बोल्ट यांच्या पर्यावरणविषयक भाकितांची अचूकता आणि त्यांची प्रासंगिकता अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केली आहे. हा लेख वाचताना आपल्याला जाणीव होते की, ज्या संकटांनी आज संपूर्ण मानव जात भयभीत झाली आहे, त्याचा पाया मानवाने अनेक वर्षांपूर्वीच स्वत:च्या हाताने रचला होता आणि त्याचा इशारा विज्ञान जगताने फार पूर्वीच दिला होता.

या लेखाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध पैलू म्हणजे हम्बोल्टच्या बालपणाचे आणि त्याच्या मानसिक संघर्षाचे केलेले चित्रण. एका अत्यंत श्रीमंत घराण्यात जन्मूनही त्याचे बालपण आईच्या अतिशिस्तीमुळे आणि स्वत:च्या कुशाग्र बुद्धीच्या भावाशी झालेल्या सततच्या तुलनेमुळे न्यूनगंडाने ग्रासलेले होते. समाजाच्या आणि शिक्षकांच्या निकषांवर ज्याला ‘मंदबुद्धी’ म्हणून नाकारले गेले, त्या बालकाने पुस्तकी पाठांतराच्या चौकटीबाहेर पडून निसर्गाच्या विशाल प्रयोगशाळेत स्वत:चे खरे अस्तित्व शोधले.

निसर्गाने त्याला दिलेली ओढ ही केवळ एका छंदिष्ट मुलाची भटकंती नव्हती, तर ती एका वैश्विक शास्त्रज्ञाची पूर्वतयारी होती. आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या पूर्वजांच्या संपत्तीचा वापर कोणत्याही विलासी सुखासाठी न करता, केवळ ज्ञानाच्या आणि निसर्गाच्या यात्रेसाठी युरोपबाहेर पडण्याचा त्याचा निर्णय थक्क करणारा आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. एका माणसाचा अंतर्गत न्यूनगंड जेव्हा निसर्गाच्या अथांग प्रेमात विरघळून जातो, तेव्हा एका महान वैज्ञानिकाचा जन्म होतो, हे सत्य लेखिकेने अत्यंत सुंदररीत्या मांडले आहे.

हम्बोल्टच्या संशोधनाची पद्धत त्या काळातील इतर पारंपरिक शास्त्रज्ञांपेक्षा पूर्णपणे भिन्न आणि क्रांतिकारी होती. तो बंद खोलीत बसून केवळ कागदावर सिद्धांत मांडणारा संशोधक नव्हता, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून, निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे बारकाईने मोजमाप करणारा एक धाडसी प्रवासी होता.
राजकारण्यांनी आणि तात्कालिक व संकुचित फायद्याचा विचार करणार्‍या समाजाने त्याच्या इशार्‍याकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाची मोठी किंमत आज संपूर्ण जग मोजत आहे, हा लेखिकेचा आक्षेप अतिशय समर्पक आणि आजच्या काळाशी सुसंगत आहे. प्रवीण नारायणराव डोईबळे

हम्बोल्टचे कुतूहल व परिश्रम महत्त्वाचे

‘लोकरंग’मधील (२० सप्टेंबर) ‘भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट!’ हा डॉक्टर सुलभा कुलकर्णी यांचा लेख अप्रतिम लेख व माहिती पूर्ण आहे. तसेच लेखातील १७६९ या वर्षीच्या संदर्भात आठवले की याच साली आर्मस्ट्रॉगचे चंद्रावर पाऊलदेखील योगायोग. हम्बोल्ट बंधूंची माहिती प्रेरणादायी आहे. आमच्या भारतीय मिथकात विविध युगांंच्या मोठ्या गप्पा मारतो, त्यापेक्षा हम्बोल्टचे कुतूहल व परिश्रम करत केलेले संशोधन दिशादर्शक आहे. हिमालयात न जाता केलेलं चित्र तर सृजनशील दृष्टीने काय साध्य करता येतं त्याचं अप्रतिम उदाहरण आहे. आपण व्यक्त केलेले भाष्य येथे निसर्ग शोषण करणार्‍या लोकांना ऐकू येणार नाही हे दुर्दैवी आहे. रंजन र. इं. जोशी, ठाणे</strong>

दुर्दैवाने भाकीत खरे ठरले

‘लोकरंग’मधील (२० सप्टेंबर) ‘भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट!’ हा डॉक्टर सुलभा कुलकर्णी यांचा लेख वाचला. जर्मन वैज्ञानिक अलेक्झांडर हम्बोल्ट यांनी दोन शतकापूर्वी जंगले नष्ट केल्यावर पावसाचे पाणी पर्वताच्या उतारावरून दगड माती वाहून नेते, त्यामुळे नद्यांना अचानक विनाशकारी पूर येतात हे प्रयोगातून वर्तवलेले भाकीत आजच्या घडीला नेपाळ महापुराने दुर्दैवाने खरे ठरले आहे. पर्वतीय प्रदेशात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढला असून, यामुळे त्या भागातील निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. विकासाच्या नावाखाली हे काय सुरू आहे? असा प्रश्न पडतो. सर्वसामान्य माणूस यावर काय बोलू शकत नाही, पण महापुराचे विपरीत परिणाम त्यालाच सहन करावे लागतात प्र. मु. काळे, नाशिक.

अद्भुत कार्य

‘लोकरंग’मधील (२० सप्टेंबर) ‘भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट!’ हा डॉक्टर सुलभा कुलकर्णी यांचा डार्विन ज्याला गुरुस्थानी मानत होता त्या हम्बोल्ट या वैज्ञानिकाचा माहितीपर लेख आवडला. ‘हे वेगळेचि तत्त्व’असे हम्बोल्ट बाबतीत म्हणता येईल. साधारण दोनशे वर्षांपूर्वी कोणत्याही सोयीसुविधा नसताना हा इसम दक्षिण अमेरिकेची मोहीम पाच वर्षांत पार करतो व आपली निरीक्षणे नोंदवितो आणि या निरीक्षणावरच डार्विन आपला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडतो हे क्रांतिकारकच आहे.

हम्बोल्ट चरित्राचा विशेष काय?

या प्रश्नाचे उत्तर हेच की ‘अद्भुताची कार्य करणे.’ या पर्यावरणवादी शास्त्रज्ञाने केलेले भाकीत आजच्या काळात तंतोतंत लागू झाले आहे. मुळात पर्यावरण हा विषयच आर्थिक महासत्ता होऊ पाहणार्‍या देशाच्या अजेंड्यावर कधीच नव्हता. शाळेतील वीस गुणांच्या पलीकडे आपला आणि पर्यावरणाचा काही संबंध राहत नाही. आपल्याकडे होऊन गेलेले विद्वान माधवराव गाडगीळ यांचे पर्यावरणबाबतचे अहवाल धूळ खात पडले आहेत. त्याचं काय झालं? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू लागला आहे हे आता सिद्ध झाले आहे ‘यावर्षीपेक्षा गेल्या वर्षीचा उन्हाळा बरा’ हे याचेच सप्रमाण आहे.

पर्यावरण आणि विकास हे परस्पर पूरक आहेत. न्यू यॉर्कसारख्या मध्यभागी शहरात घनदाट अरण्य जसेच्या तसे ठेवण्यात न्यू यॉर्कला यश आले आहे. विकसित देशांत वैयक्तिक स्वच्छतेपेक्षा सामाजिक स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. आपण सर्वांनी पर्यावरणाबाबतीत हिमालयाप्रमाणे थंड राहून चालणार नाही. ‘प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली तर राष्ट्र सुधारणा चुटकी सरशी होईल’ हे तत्त्व पर्यावरणाबाबत तंतोतंत लागू होते. पंकज लोंढे, सातारा

कौतुकास्पद काम

‘लोकरंग’ मधील (२० सप्टेंबर) ‘नव्या जाणिवेचे प्रकाशन’ या सदरात बुद्धभूषण साळवे यांचा ‘सजग वाटेवरील ग्रंथनिर्मिती’ हा लेख अतिशय प्रेरणादायी आहे. कवी, संपादक चित्रकार, मुखपृष्ठकार व साक्षेपी प्रकाशकाने ‘ठसा प्रकाशन गृह’ या माध्यमातून कमी कालावधीत अनेक ग्रंथाची निर्मिती व आजच्या वर्तमानाची अस्वस्थता मांडली आहे. वाचक राहिला नाही. पुस्तके लिहिणारे भरपूर प्रमाणात झाले आहे. यात सजग ग्रंथ निर्मिती करणारे बोटावर मोजण्या इतकी आहे. या तळमळीच्या लेखनातून त्यांनी संवेदनशील प्रांजळ मत व्यक्त केले आहे. डॉ. प्रभाकर शेळके, जालना</strong>

जुन्या गोष्टी आठवल्या ‘लोकरंग’मधील ‘बालमैफल’मध्ये श्रीनिवास बालकृष्ण यांचा ‘केशरी शेंदुरी वळणे’ हा लेख वाचून जुन्या गोष्टी आठवल्या. आकाशात जमा झालेल्या ढगांत वेगवेगळ्या आकृती शोधण्याचा खेळ मला आजही खुणावतो. मनाचे खेळ संपून श्रद्धा कुठे सुरू होते ते कळतच नाही. वाटेवरच्या एखाद्या दगडाला शेंदूर लावलेला दिसल्यावर हाथ आपोआपच जोडले जातात. जय गर्ग

उल्लेखनीय गोष्ट

‘लोकरंग’ (२० सप्टेंबर) ‘बालमैफल’मधील राधिका विंझे यांची ‘पदार्थाचं वर्गीकरण’ ही गोष्ट खूप आवडली. शाळेमध्ये जे शिकवलं होतं ते विसरलो होतो, पण या गोष्टीमुळे ते पुन्हा समजलं. या गोष्टीत आपला भवताल, संस्कृतीतील कथा आणि रसायनशास्त्र यांचा सुंदर मेळ आहे. नवीन शिक्षण धोरणात असेच काही शैक्षणिक बदल अपेक्षित आहेत. महेंद्र दामले