scorecardresearch

प्रगल्भतेकडे नेणारी कादंबरी

आम्ही हळहळ पावलो’ या त्यांच्या नव्या कादंबरीत या तंत्राचा अधिक आशयघन आविष्कार झालेला आहे.

प्रगल्भतेकडे नेणारी कादंबरी
‘आम्ही हळहळ पावलो’- श्याम मनोहर, पॉप्युलर प्रकाशन, पाने- ३२१, किंमत- ४२५ रुपये.

प्रा. विद्यागौरी टिळक

श्याम मनोहर हे एक प्रयोगशील मराठी कादंबरीकार म्हणून वाचकांना परिचित आहेत. आपल्यासमोरच्या वास्तवाचा वेध घेण्यासाठी साहित्यप्रकारांच्या बाबतीतले रूढ संकेत मोडीत काढत रचनाबंधाचे विविध प्रयोग त्यांनी केलेले आहेत. लेखक आणि साहित्यकृतीतील व्यक्तिरेखा, लेखकाच्या भोवतालचे वास्तव आणि कल्पित यांच्यातल्या सीमारेषा धूसर बनवून त्यांना एकमेकांमध्ये मिसळत आशयाच्या विविध शक्यता सूचित करण्याचे उत्तरआधुनिक तंत्र आता वाचकांच्या ओळखीचे झाले आहे. ती ओळख करून देण्यात श्याम मनोहरांचाही वाटा आहे.

‘आम्ही हळहळ पावलो’ या त्यांच्या नव्या कादंबरीत या तंत्राचा अधिक आशयघन आविष्कार झालेला आहे. भाषेचा वेगळा, अनपेक्षित वापर हेही त्यांच्या साहित्याचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़. येथेही ‘आम्ही हळहळ पावलो’ या शीर्षकापासूनच ते जाणवू लागते. ‘हळहळ’ या शब्दाचा असा प्रयोग प्रचलित नाही, तर ‘हळहळ वाटणे’ असा आहे. तेथे अपरिहार्य अशा काही गोष्टींमुळे, घटनांमुळे मनाची झालेली तात्कालिक प्रतिक्रिया सुचवली जाते. ‘पावणे’ या क्रियापदासोबतचा प्रयोग स्थितीकडे निर्देश करू लागतो. स्वाभाविकच त्याची कारणे आणि हे ज्यांच्याबाबतीत घडले, ते ‘आम्ही’ यांच्याविषयी वाचकाच्या मनात जिज्ञासा निर्माण होते.

हे ‘आम्ही’ म्हणजे वर्कशॉप चालवणारे, आपापला उद्योग सांभाळणारे, आनंदात जगायचे असे ठरवून तसा आयुष्यक्रम आखलेले एकमेकांचे मित्र असलेले पाच लघुउद्योजक आहेत. वाचनसंस्कृती जोपासण्याची गरज मान्य असूनही त्यांच्या आयुष्यात वाचनाला स्थान नाही. अचानक त्यांच्यापैकी एक जण गोष्टी वाचून दाखवू लागतो. त्या त्याला रात्री कोणीतरी सांगत असते, असे त्याचे म्हणणे. या गोष्टी जीवनाचे सामान्यत: दुर्लक्षित राहिलेले, तसे ठेवलेले विविध पैलू पुढे आणतात. ज्याला ‘गोष्टी येतात’ तो मित्र आणि ऐकणारेही त्या आशयाने कधी तणावाखाली येतात, कधी अतिशय अस्वस्थ होतात, तर कधी एखादा हास्यास्पद पैलू समोर आला तर हसतातही. सांगणारा अतिशय तळमळीने सांगतो आहे म्हणून आपण त्याला साथ देणार असे लिहून घेणाऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे तो कोण, का सांगतो आहे, हे सगळे प्रश्न काही काळ मागे पडतात आणि गोष्टी महत्त्वाच्या होतात.

आजच्या वास्तवातील जगण्याचे विविध पैलू या गोष्टींमधून प्रकाशात येत राहतात. व्यक्तींच्या सहज, स्वाभाविक क्षमता आणि मर्यादांकडे आप्तस्वकीयांनीही केवळ प्रतिष्ठाप्राप्त जीवनसरणीच्या चौकटीतून पाहिल्याने त्या व्यक्तींसाठी निर्माण होणारी जीवघेणी, भयावह परिस्थिती पहिल्याच गोष्टीतून चित्रित होते. समाजाचा दबाव, कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आयुष्याचे व्यवस्थापन करण्याचा कर्त्यां व्यक्तींचा सोस, प्रत्यक्ष काळजीपेक्षा ती काळजी दर्शविण्याचे आणि लक्षात आणून देण्याचे आप्तांना वाटणारे महत्त्व अशा विविध बाबी या लहानशा गोष्टीतून निर्देशित होतात.

सुरुवातीची गोष्ट ही लहान आहे, पण एकूण कादंबरीत दीर्घ कथाही आहेत आणि चक्क दोन पूर्ण नाटकेही आहेत. या साहित्यातून आजच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनातील विविध अंगांचे चित्र उभे राहत जाते. व्यक्तींची सत्ताकांक्षा व महत्त्वाकांक्षेपोटी बाकी सगळ्याचकडे साधन म्हणून पाहण्याची वृत्ती, भावना आणि विचारांचे तयार साचे आणि त्याबरहुकूम चालू पाहणारी माणसे, त्यातून आलेल्या अवास्तव अपेक्षा, या साचेबंदपणामुळे काही वेळा येणारी हास्यास्पदता आणि दयनीयता अशा अनेक घटकांचे एक कोलाज त्यातून तयार होत जाते. ते एकीकडे गुंतवून ठेवते आणि दुसरीकडे अस्वस्थही करते.

या गोष्टी आणि नाटकांना जोडणारे उद्योजक श्रोत्यांचे सूत्र कायम आहे. त्यांच्या माध्यमातून वास्तवातील घटना-प्रसंग येत राहतात. हे श्रोते ऐकता ऐकता अस्वस्थही होत राहतात. त्यांचा आनंद हिरावून घेणारे काही काही भोवतालीही घडते आहे. तीन मंत्रीपुत्रांचे अंतराअंतराने खून होतात. आपला राजकीय वारसा चालवू इच्छित नाहीत, गणित वा कलेत रस घेत आहेत म्हणून त्यांच्या वडिलांनीच हे घडवून आणले अशी चर्चा होते. तपासात अनेकांची चौकशी होते. त्यात संबंध नसताना हे पाच जणही येतात. वास्तवातला हा ताण आणि गोष्टी यांचे धागे एकमेकांत मिसळत राहतात. गोष्ट वाचणारा मित्र त्याचे कर्तृत्व त्यातल्याच एका मंत्रीपुत्राकडे देतो. तो गेल्यानंतर आता आपणच गोष्ट तयार केली पाहिजे असे या मित्रांना तीव्रतेने वाटू लागते. त्यामधून या कादंबरीचा उरलेला विस्तृत अंश सिद्ध होतो. या गोष्टीत जे काही घडते, त्यामुळे त्यांचे आनंदाने जगणे थांबून त्यांना हळहळ वाटत राहते. त्यांना वाटते त्या पद्धतीने त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांचे जीवन आकारत नाही. त्यांना तसे ते घडवता येत नाही. कारण आपली कल्पनाशक्ती कमी पडली, आपण वास्तव ओलांडू शकलो नाही असे त्यांना वाटते. नवे, अज्ञात असे काही यातून शोधता आले नाही, कारण आपल्याला ती प्रक्रियाच माहीत नाही ही खंतदेखील आहेच. मात्र हळहळ वाटणे हे पुरेसे नाही, ही जाणीव होता होता मग ‘पुढे काय?’ हा प्रश्न उभा ठाकतो- जो वेगवेगळ्या कक्षा छेदत जाणारा आहे.

श्याम मनोहर हे साहित्यकृतीमध्येही तर्क आणि बौद्धिकतेला स्थान देणारे लेखक आहेत. ‘आम्ही हळहळ पावलो’ हे शीर्षक, ‘बुद्धिमंतांनो, तुम्हीच सोल्यूशन काढा..’ ही अर्पणपत्रिका, दोन पृष्ठांचे आरंभीच येणारे ‘सार’, गोष्टी ऐकून होणाऱ्या प्रतिक्रियांचे कथन आणि शेवटचा चार पृष्ठांचा ‘भाग ३’ यामधून मधल्या गोष्टी आणि नाटके यांना त्यांनी एकत्र गुंफून टाकले आहे. त्यातून या साऱ्या मांडणीला आलेली एक प्रकारची सूत्रबद्धता पाहिली तर त्यातून काहीसा सोपेपणाचाही भास होईल. पण एकूण साऱ्या घटकांची परस्परसंगती जुळवू लागले की त्यातून सूचित होणाऱ्या आशयाची जटिलता प्रत्ययास येते.. कादंबरी म्हणून असलेले आव्हान जाणवू लागते. वाचकाला अनेक अर्थानी प्रगल्भतेकडे नेणारा हा प्रत्यय ठरतो.

‘आम्ही हळहळ पावलो’- श्याम मनोहर, पॉप्युलर प्रकाशन, पाने- ३२१, किंमत- ४२५ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amhi halhal pawalo book reviews by author shyam manohar zws