अफसाना लिख रही हूँ.. : ‘तेरे मेरे मीलन की ये रैना..’

एका सुरेल सहजीवनाची सुरुवात.. दोघांमधले नाजूक एकांतातले क्षण.. सुबीरनं सकाळी पियानोवर हलकेच छेडलेली धून.. ‘तेरे मेरे मीलन की ये रैना..’

अमिताभ आणि जया बच्चन

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

एका सुरेल सहजीवनाची सुरुवात.. दोघांमधले नाजूक एकांतातले क्षण.. सुबीरनं सकाळी पियानोवर हलकेच छेडलेली धून.. ‘तेरे मेरे मीलन की ये रैना..’ एकदा उमानं शास्त्रीय संगीताचं मर्म सांगितलं होतं. इथे सुबीर शब्दांतल्या ‘न सांगितलेल्या’ अर्थाकडे तिचं लक्ष वेधतो. इथंही त्या दोघांच्या वेगळ्या सांगीतिक पाश्र्वभूमीचा विचार आहे. खरं तर असंच सहजीवन एकमेकांना समृद्ध करतं. त्यासाठी सुसंवादी स्वरांच्या संगतीनं ही मैफल रंगायला हवी. पण दोघांनी म्हटलेलं एक गाणं ‘सुपरहिट्’ होतं आणि चित्र बदलतं.

‘लुटे कोई मन का नगर..’ (लता मंगेशकर, मनहर)

उमाचा रेकॉर्डिगचा हा पहिलाच अनुभव. तिचा नवखेपणा, सुबीरचं तिला धीर देणं हे फार सुंदर प्रत्ययाला येतं. या गाण्यातला ऱ्हिदम फार सुंदर. या गाण्यानं उमाचा आवाज घराघरांत पोहोचतो आणि खास तिच्यासाठी स्वतंत्र गाण्याची ऑफर घेऊन निर्माता घरी येतो.. क्षणभर चमकलेला सुबीर स्वत:ला सावरतो. स्वतंत्रपणे गायला अजिबात तयार नसलेल्या उमाला सुबीर समजावून राजी करतो. खरं तर ही संघर्षांची सुरुवात असते. तंबोऱ्याची जुळलेली तार किंचित हललेली असते. आणि येतं उमाचं पहिलं स्वतंत्र गाणं- ‘अब तो है तूमसे हर खमुशी अपनी..’ (लता मंगेशकर)

घरटय़ाबाहेरची पहिली झेप. नवीन आकाश, नवं क्षितीज.. उमटलेला पहिला स्वतंत्र सूर.. या गाण्याचं इतकं महत्त्व आहे की हृषिदा एकाच गाण्यात अनेक प्रसंग दाखवून जातात. बदलणारं वातावरण.. बदलतं नातं.. ‘पब्लिक’ची मानसिकता.. अशा अनेक गोष्टी ते या गाण्यात सहजी गुंफतात. मजरूहजींच्या काव्यातून उमाचा स्वभाव आणि ती या सगळ्याकडे कुठल्या दृष्टीनं पाहते हे दिसतं. बर्मनदांच्या चालीत एक वेग आहे.. नकळत अंगावर येणाऱ्या यशाचा वेग! एकदा लोकप्रियतेचं वादळ आलं की ते थोपवणं कुणाच्याही हातात नसतं.

‘तुझ्यातच सगळा आनंद.. तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यातच संपणारा.. यापरतं काहीच नकोय मला खरं तर!’ ही भावना उमाची वृत्ती दाखवते. उमाचा स्वभाव अजिबात आक्रमक नसणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं. कारण त्यामुळे तिला नकळत मिळालेली प्रसिद्धी, यश हे तिनं भांडून मिळवलेलं नाही.. तर ते आपसूक तिच्या गुणांमुळे तिच्याकडे चालत आलंय हे अधोरेखित होतं. उमा आक्रस्ताळी असती तर या सगळ्या कथेला काही अर्थच राहिला नसता. ते तिचं राजस व्यक्तिमत्त्व, तिची अदब यातल्या गाण्यांनी जपलीय. हृषिदांची उमा गीतकार-संगीतकारांनी खुलवली ती अशी.

‘जब हो गया तुम पे ये दिल दीवाना

अब चाहे जो भी कहे हमको जमाना

कोई बनाये बातें चाहे अब जितनी!’

खरं तर तुझ्या-माझ्यात काहीच यायला नको. लोकांनी पेरलेले समज-गैरसमज म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या अपरिहार्य गोष्टी; पण आपलं प्रेम या साऱ्यापलीकडचं..

‘तेरे प्यार में बदनाम दूर दूर हो गये

तेरे साथ हम भी सनम मशहूर हो गये!

देखो कहा ले जाये बेखुदी अपनी!’

प्रसिद्धीच्या या झोतात मीही न्हाऊन निघाले. आता हा झंझावात कुठून कुठे जाणार, हे माझ्याही हातात नाही..

पहिला आलाप दमदार.. अमिताभच्या चेहऱ्यावरची चिंता, मनातलं काहूर दाखवणारा गिटारचा पीस. ‘देखो कहा ले जाये..’ म्हणताना तीव्र होत जाणारा आवाज ‘ओहो..’ म्हणताना आपल्या हळव्या प्रियकराला जपण्यासाठी किती नाजूक होतो.. जणू त्याच्या जखमांवरची फुंकरच! सगळ्यात दाद देण्यासारखी या गाण्याची अरेंजमेंट. संपूर्ण धृवपदात कुठेही तबला वाजत नाही. गिटार आणि मादलची हलकीशी लय. गाणं काहीसं अधांतरी. आणि अचानक म्युझिक १ पासून सुरू होणारा ठेका उमाच्या आयुष्यातली प्रचंड कलाटणी दाखवतो. यासाठी संगीत संयोजक अनिल-अरुण यांना सलाम! उगवत्या सूर्याच्या मागे लागणारं पब्लिक.. दुखावला जाणारा सुबीर.. त्याचं फ्रेमच्या बाहेर ढकललं जाणं.. त्याच्या आत्मसन्मानाला पोचलेला धक्का.. हे सगळं एका गाण्यात दिसतं. ही दिग्दर्शकाची कमाल. यशस्वी पुरुषाच्या घराच्या भिंतींनासुद्धा यशाची सन्मानचिन्हं मिरवण्याची सवय झालेली असते. आता त्यात ही दुसरी व्यक्ती आली.. मग ती जिवाभावाची, आपलाच भाग असलेली उमा का असेना! जिथे फक्त मी व्यापून उरलो होतो, तिथे मला डावलून लोक उमासाठी जीव टाकतायत? उमाला गायला सांगून मी चूक केली का? आता सुबीर मनातून हललाय.. खरं तर गोंधळलाय. या क्षणी त्याच्यातला ‘पती’ जागा होतो. पत्नीनं मोठं व्हावं; पण त्याची चौकट ‘मी’ ठरवावी; आणि माझ्या चौकटीपेक्षा ती मोठी नसावी.. हा झगडा आहे इथे.

तानपुऱ्याची एक तार जरी सुरापासून किंचित ढळली तरी सगळी मैफल बेसुरी होते. सुबीरचं बदललेलं वागणं, नकळत आलेला दुरावा आणि हरवलेला रोमान्स.. ही मैफल बिघडायला सुरुवात झालेली असते. त्याच्या वागण्यातल्या हलक्याशा बदलामुळेही व्यथित झालेली, हळवी, मनस्वी, दुखावलेली उमा आतून जाणून असते की सुबीर कशामुळे नाराज आहे. गाणं बंद करण्याचा तिचा निर्णय केव्हाच झालेला असतो. सुबीरकडून चंद्रूसारख्या जिगरी दोस्ताचा अपमान होतो. मानसिक स्वास्थ्य हरवलेला सुबीर मद्याच्या आहारी जायला लागतो. बदललेला सुबीर आतून जास्त एकाकी आहे. आणि हा दुरावा उमाला कसा सहन व्हावा?

‘पिया बिना पिया बिना बासिया बाजे ना..’ (लता मंगेशकर )

ही बासरी.. माझ्या अस्तित्वाचीच ही प्राणवेणू. कसे सूर निघावेत त्यातून? तुझ्या ओठांचा स्पर्श, हलकीशी प्रेमाची फुंकर पुरते तिला. त्याशिवाय मी म्हणजे एक फक्त काष्ठ! निर्जीव.. बेजान!

तू रुसलास तर संगीत रुसलं.. माझं सगळं असणंच निर्थक!

‘कभी जब मैं गाऊ लागे

मेरे मन का हर गीत झूटा!

ऐसे बिछडे मोसे रसिया!’

गाणं खरं-खोटं असतं? हो.. आपलं गाणं आपल्याला ‘पटलं’ पाहिजे. ‘गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे’ ना? गाण्यात इमान असतं, सर्वस्व असतं.. तेच हरवलं तर..?

संपूर्ण गाणं एक अतिशय हळवी व्यथा घेऊन एका संथ प्रवाहात वाहत राहतं. मंद्र पंचम ते मध्य पंचम या स्वरांवर लताबाईंचा आवाज मुक्त विहरत राहतो. मधल्या श्रुतीसुद्धा दिव्यत्वाचा स्पर्श घेऊन स्वत:ला धन्य समजल्या असतील.. ही मनातली बासरी आहे. ‘बासिया’ हा शब्द संपायच्या आतच ती गुंजन सुरू करते. ते शेवटचं अक्षर त्या बासरीत कधी सामावतं, ते समजतच नाही. ‘पिया ??बिना२२२’?? वरचा लताबाईंचा पंचम असा काही लागतो, की डोळे मिटून रक्तात तो पंचमाचा चंद्र पूर्णपणे विरघळू द्यावा. ‘पिया ऐसे रुठे’ ही ओळ पुन्हा येते तेव्हा लताबाई खालच्या मध्यमापर्यंत जाऊन येतात. तो मध्यम पाव क्षणच आहे; पण डोळ्यांत अनामिक आनंदाश्रू आणतो. हा मध्यम लावताना जया भादुरीनेही नकळत डोळे मिटलेत.. या गाण्यातली बासरी, व्हायोलिन्स, सगळी वाद्यंसुद्धा तोच मूक आक्रोश करतायत असं वाटतं. बासरी तर संपूर्ण गाण्यात तिची सखी होऊन वावरलीय तिला धीर देत. उमाचं गाणं ऐकताना विमनस्क बसलेला, आपल्याला नेमकं काय सलतंय, हेच समजू न शकलेला सुबीर दिसतो. सोपं नसतं जिवलग व्यक्तीचा राग करणंसुद्धा! सुबीरचा संघर्ष उमाशी नाही, स्वत:शी आहे! उमाशी फटकून वागणारा सुबीर त्याला स्वत:लाच अनोळखी आहे. ‘मुझे किसी की जरुरत नहीं..’ हे रागाच्या भरात सुबीर बोलून जातो आणि प्रचंड दुखावलेली उमा त्याला न सांगता गावी निघून जाते. हा तिचा स्वाभिमान! अनेक पत्रं लिहूनही सुबीर येत नाही. गरोदर असलेल्या उमाला हा धक्का सहन होत नाही. तिचा गर्भपात होतो. प्रचंड नैराश्याच्या खाईत उमा लोटली जाते. वडिलांनी छेडलेला तानपुरासुद्धा तिला सहन होत नाही. आयुष्यातून संगीत खूप लांब निघून गेलेलं असतं. मौसीनी मुंबईला येऊन कानउघाडणी केल्यावर शेवटचं समजावल्यावर उमाला सुबीर भेटायला जातो. उमाला बघून सुबीरला धक्का बसतो. निर्जीव डोळे, विझलेली नजर आणि कोरा चेहरा घेऊन उमा समोर उभी असते. भावना कोळपून गेलेली एक शिळाच. कुठून तरी तिचं दु:ख फुटून बाहेर यावं म्हणून केलेले सगळे प्रयत्न फोल ठरतात. सुबीरनं गाणं सोडून देणं उमाच्या जिव्हारी लागलेलं असतं. शेवटी ‘ज्या संगीतानं तुम्हाला एकत्र आणलं ते संगीतच पुन्हा उमामध्ये प्राण फुंकू शकतं..’ हे ब्रजेश्वरलाल निक्षून सांगतात.

‘तेरे मेरे मीलन की ये रैना..’

(किशोरकुमार-लता)

डबडबलेल्या डोळ्यांनी गाणारा सुबीर.. दोघांनी पाहिलेलं ते स्वप्न.. ठिकऱ्या झालेलं. दोघांचं अगदी आतलं, एकांतातलं ते गाणं..

‘तेरे मेरे मीलन की ये रैना..

नया कोई गुल खिलायेगी..

तभी तो चंचल है तेरे नैना..’

या मीलनाच्या रात्रीतून फुलणारा तो अंकुर. त्याच्या चाहुलीनं आत्ताच तुझे डोळे नाचरे झालेत. त्यात एक निराळी चमक आलीय! सुबीरनं गायला सुरुवात करता क्षणी उमाच्या डोळ्यांत निराळे भाव येतात. कुठेतरी त्या प्रेतवत कुडीला जीवनाचा स्पर्श होतो. चैतन्याची ठिणगी पडते. ते सुखाचे क्षण. एकमेकांवरचं विलक्षण प्रेम. बाळाच्या आगमनासाठी म्हटलेलं हे गाणं आठवतं आणि उमाचा बांध फुटतो. सगळे हरवलेले गोड क्षण. दोघांच्यातल्या नाजूक घटना.. सुखाची परमावधी असलेला काळ डोळ्यापुढून सर्रकन् चमकून जातो.. ओक्साबोक्शी रडणाऱ्या उमाला ब्रजेश्वरलाल पित्याच्या अधिकारानं गायला सांगतात.

उमा गाते..

‘नन्हासा गुल खिलेगा अंगना,

सूनी बैया सजेगी सजना..’

हे लहानसं फूल उमलेल आपल्या अंगणात. शोभून दिसेल माझ्या हातात, कडेवर!

‘जैसे खेले चंदा बादल में,

खेलेगा वो तेरे आंचल में!’

आपल्या अंगणात दुडुदुडु धावणारं ते बाळ कसं असेल? ढगात खेळणाऱ्या चंद्रबिंबासारखं तुझ्या पदरात खेळेल ते.

किशोरकुमार आणि लताबाई.. दोघांनी आवाजात कमालीचा संयम ठेवलाय. आत हुंदका दाबून आलेला आवाज आहे दोघांच्या गाण्यात. रूपक तालाचा पुन्हा वेगळा आविष्कार ऐकायला मिळतो.. ‘तेरी बिन्दिया’चा ‘रूपक’ नाचरा.. रोमँटिक.. तर ‘तेरे मेरे मीलन की’मधला रूपक काहीसा गंभीर. अमिताभ, जया यांचा अभिनय तर नैसर्गिक म्हणण्याच्याही पलीकडचा आहे. जया भादुरी तर डोळ्यांतूनही गाते. अमिताभच्या चेहऱ्यावर फक्त वेदना!

अखेर हे दोन दुरावलेले सूर एकत्र येतात.. त्याच संगीताच्या साक्षीनं. दोन मनस्वी कलाकार तितक्याच उत्कटपणे पुन्हा भेटतात. जणू तार षड्जाच्या दोन तारा पुन्हा जुळतात. ज्या नादब्रह्माची उपासना केली तेच दैवी स्वर त्यांना सावरतात.. वास्तवाचा स्वीकार करायला लावतात.. एकमेकांची उत्कट ओढ पुन्हा जागवतात. अशा असंख्य मदभऱ्या रात्रींचं आश्वासन मिळतं त्या स्वरांतून! खरं तर या क्षणाचे फक्त साक्षीदार व्हावं.. काहीही बोलू नये.. सांगू नये. आपल्यालाही क्षणभर पडद्यावरचं काही दिसेनासं होतं. आत हुंदका दाटून येतो. मान-अभिमानाच्या भिंती गळून पडलेल्या असतात आणि आसमंतात भरून राहिलेला असतो फक्त निखळ, स्वच्छ सूर! त्यांच्या स्वच्छ मनासारखाच!

(उत्तरार्ध)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan jaya bachchan famous bollywood movie song tere mere milan ki ye raina afsana likha rahi hun dd70

Next Story
लेखकाचा कट्टा : नेटके लिहिण्याचे बीज पेरताना…
ताज्या बातम्या