अरुंधती देवस्थळे
आपल्याकडे अमृता, साहिर आणि इमरोज असा प्रेमत्रिकोण वगैरे फार गैरसमजुती आहेत. त्यांच्या आयुष्यात इमरोज आणि साहिर एकत्र कधीच नव्हते. इमरोजशी दोस्तीनंतर प्रेमात पडल्या तेव्हा साहिरबरोबरचं एकतर्फी प्रेम मावळलं होतं. इमरोजचं समजूतदार, परिपक्व प्रेम साहिरच्या आत्मकेंद्रीपणावर उतारा होतं, ते स्वभावत:च चिरस्थायी होतं…

कॉलेजजीवनात पारायणं केलेल्या अमृता प्रीतम यांच्या ‘अज्ज आख्खां वारिस शाह नूँ’, ‘मेरा पता’, ‘इक मुलाकात’सारख्या कविता आणि ‘जंगली बूटी’, ‘शाह दी कंजरी’ सारख्या मनात रुतून बसणार्‍या कथा त्यांच्या प्रेमात पडायला पुरेशा होत्या. एकीकडे उत्कट प्रेमावर विश्वास ठेवून, अडथळ्यांशी धीट नजर भिडवत व्यक्तिस्वातंत्र्याची बिकट वाट चालणार्‍या कविता… तर दुसरीकडे ‘हेनरी मिलर‘, ‘मार्टिन ल्यूथर’ किंवा ‘निकोस कझान्तझाकीस’ यांच्याशी बौद्धिक सौहार्द व्यक्त करणारं मुक्तकाव्य! माणसाला दृष्टी ही ब्रॉडर पिक्चर पाहण्यासाठीच असते हे शिकवणार्‍या अमृता प्रीतम… सरळ मनात उतरणार्‍या… त्यांच्यासारखं कोणी इतर नव्हतंच आसपास. इमरोज आणि अमृताजींबद्दल ऐकून होते. त्यांचं सहजीवन लिहीलं-बोललं गेलंय त्याहून वेगळं, सहज-सुंदर होतं, प्रत्येक संवादातून मोलाचं काही… मनोमन पटणारं मिळायचं! दिल्लीत आल्यावर ऐंशीच्या दशकांत प्रथम त्यांच्या घरी गेले तेव्हा जरा बिचकत गेले असले तरी सगळं अपेक्षित होतं तसंच वाटलं. आता मागे वळून त्याकाळाचा विचार करते तेव्हा अचानक लक्षात येतं की, एवढ्या मोठ्या लेखिकेच्या घरी आपल्याला पूर्वसूचनेशिवाय जायची, तिची पुस्तकं चाळायची/ नेण्याची मुभा सहज मिळाली होती, ही केवढी मोठी गोष्ट होती. त्या दोघांच्या आणि त्या घराच्या सहवासात जाणं म्हणजे शांत नदीकाठी जाऊन बसण्यासारखं वाटायचं.

दक्षिण दिल्लीतल्या हौज खास या तशा शांत असलेल्या भागात हे दोघे राहत. अंगणातल्या भरपूर हिरवाईने, लहानथोर वृक्षवल्लरींनी वेढलेलं, गारेगार वाटणारं दुमजली घर… प्रवेशाशी सुखावून बसलेला गणपती कोणीतरी प्रेमाने दिला असावा. तळमजल्यावर त्यांची मुलगी कंदला तिच्या कुटुंबासह राहायची. वरच्या मजल्यावर लहान चणीच्या अमृताजी. पाहताक्षणी लेखिका वाटणार्‍या आणि त्यांच्याहून थोडेसे उंच, शिडशिडीत कुर्ताधारी इमरोज… चित्रकारच दिसणारे. परिपक्व मित्रत्वात असते तशी शांतता घरात जाणवायची. उजवीकडे बैठक, डावीकडे स्वयंपाकघर- त्यातून मस्तपैकी चहा करून आणणं हे इमाजींचं आवडीचं काम! खरं तर त्या घरात टिपीकल समृद्धी किंवा ज्ञानपीठ विजेत्या थोर लेखिकेचं सन्मानांच्या स्मृतिचिन्हांनी नटलेलं असं काही जाणवलं नाही. सुरुचिपूर्ण सजावट, शांतरसाला असलेलं प्राधान्य… बोलता बोलता कदाचित माझ्या मनीची इच्छा जाणून अमृताजींनी त्यांच्या अभ्यासिकेत नेलं होतं. टेबललॅम्पला इमरोजने रंगवलेली केशरी, लाल लॅम्पशेड, त्यावर डार्क ब्राऊन रंगात अमृताजींच्या कवितेच्या दोन ओळी गुरुमुखीत लिहिलेल्या. हे दोघे पंजाबी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू लिहीत- वाचत म्हणून पुस्तकं बर्‍यापैकी लावून ठेवलेली. अमृताजींच्या पुस्तकांचं एक लांबरुंद शेल्फ वेगळ्या खोलीत. तिथे हुसेन साहेबांचं चित्रं : सुविख्यात घोडे. घरात एकही पुस्तकविहीन खोली नव्हती. इमरोजचा स्टुडिओ तसाच साधा, अमृताजींच्या आगामी पुस्तकाचं कव्हर कॅनव्हासवर. ती दोघं ‘नागमणी’ नावाचं पंजाबी साहित्य मासिक चालवत असत. शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीबरोबरच्या गर्मागर्मीमुळे ते कितपत चालत असे कोणास ठाऊक. ‘‘यातून आम्हाला जे म्हणायचं असतं ते आम्ही मांडू शकतो, सुजाण वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो, त्याला लोक प्रतिसाद देतात हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे,’’ असं या दोघांचं म्हणणं.

पहिल्याच भेटीत सहजतेने आपलंसं करणारी ती दोघं आणि त्यांचंच असू शकेल असं ते घर. प्रत्येक घराला त्याच्या मालकाचं असं कॅरेक्टर असतं हे वास्तुविशारद फ्रँक लॉइड राईटचं ठाम मत पटकन आठवून गेलं होतं. हे घर त्या दोघांनी मुद्दाम सजवलेलं असण्यापेक्षा, अनेक सुंदर गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकेक करत एकत्र आल्याने छानसं दिसू लागलं असावं. पुढच्या काही भेटींमध्ये फ्रँक लॉईड राईट, नेकचंद यांची चंदीगढमधली रॉक गार्डन, वृक्षमंडित मशोबरा, मंटोच्या कथा, फ्रिडा काहलो आणि गोयाची चित्रं, टॉल्स्टॉय, अमृताजींना मोठी मोठी पत्रं लिहिणारी कवयित्री सारा शगुफ्ता (एक पत्रं मला वाचायलाही मिळालं), हुसेन साहब अशी अनेक जिव्हाळ्याची स्थानं संवादात येऊ लागली. राजकीय, सामाजिक सजगता होतीच, पण कुठल्या विवादात पडायचं आणि कुठल्या नाही याचं तारतम्यही होतं. मतभिन्नता असणारच जीवनात, पण ती तात्विक पातळीवरची. म्हणून घरात नकारात्मक भावनांनासुद्धा एक स्तर आहे हे लक्षात आलं. एकदा असाच कोण्या साहित्यिकाने सौदेबाजीचा कडवट उल्लेख केला आणि अमृताजीही तट्कन काहीतरी बोलल्या. तेव्हा इमरोज अगदी शांतपणे म्हणाले होते, ‘‘माजा, इस तरह की बातों की घर में कोई जगह होनी चाहिए? ओछी बातें जहाँ होती हैं, वहीं रहे’’ पारा झर्रकन् खाली आला आणि अमृताजींनी उत्तरादाखल एका बोलक्या कवितेच्या काही ओळी त्यांच्या गेय शैलीत म्हणत संवादाची दिशा बदलली.

एकच विवाद मात्र अनेकांच्या समजेबाहेरचा. ‘जि़न्दगीनामा’ हे शीर्षक कृष्णा सोबती आणि अमृताजी दोघींनी आपापल्या पुस्तकांसाठी ठरवलेलं. त्या एका शब्दावर हक्क कोणाचा? हा शब्द कोणी प्रथम कॉइन केला यावर अटीतटीने दोघींमध्ये कोर्टकचेरी सुरू झाली. केस वर्षानुवर्षं चालली, खुशवंत सिंग, प्रभास जोशी, वसंत साठे प्रभुतींची मध्यस्ती दोघींनी नाकारली आणि शेवटी अमृताजी जिंकल्या. त्याने त्यांना खूप आनंद वगैरे नाही झाला, पण आपल्यावर आलेला शीर्षक चौर्याचा आरोप धुवून काढणं आवश्यक वाटलं होतं. प्रश्न प्रतिभेच्या प्रतिष्ठेचा होता! कृष्णाजींइतका संताप खरं तर अमृताजींना येत नसे, जे पटलं नाही ते मनाबाहेर करून टाकण्याचा त्यांचा स्वभाव (कदाचित इमरोजमुळेही) होता. त्यातही मजा म्हणजे दोघींना एकमेकीचं लिखाण आवडत असे, मनोमन त्या एकमेकींबद्दल आदर बाळगून असत.

अमृताजींबरोबर इमरोज सगळीकडे जात, परदेशात आमंत्रणं येत तेव्हाही दोघे बरोबर जात-येत. अतिशय संवेदनशील असून व्यवहारी असणारे इमरोज घराचे/ प्रवासाचे नियोजन व्यवस्थित करत. त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या तेव्हा ते त्यांना संसदेत सोडायला जात आणि सत्र संपेस्तोवर लायब्ररीत वाचत रहात किंवा आसपास प्रदर्शन बघ, म्युझिअममध्ये चक्कर टाक असं करत, पण फार वेळ दूर न जाता. ते दिवस सेलफोन्सच्या आधीचे, अमृताजींना थांबावं लागू नये म्हणून लवकर परत येत. ते म्हणायचे, ‘‘आम्ही एकमेकांना आयुष्यात उशिरा भेटलोय म्हणून आता शक्य तेवढं एकत्रच रहायचं ठरवलंय.’’ आपल्याकडे अमृता, साहिर आणि इमरोज असा प्रेमत्रिकोण वगैरे फार गैरसमजुती आहेत. त्यांच्या आयुष्यात इमरोज आणि साहिर एकत्र कधीच नव्हते. इमरोजशी दोस्तीनंतर प्रेमात पडल्या तेव्हा साहिरबरोबरचं एकतर्फी प्रेम मावळलं होतं.

इमरोजचं समजूतदार, परिपकव प्रेम साहिरच्या आत्मकेंद्रीपणावर उतारा होतं, ते स्वभावत:च चिरस्थायी होतं. प्रेमहीन लग्नबंधनात अडकलेली आणि साहिरच्या काल्पनिक प्रेमात पडलेली अमृता इमरोजला भेटली तेव्हा तिच्याच शब्दांत सांगायचं तर- ‘‘वाळवंटात चालता चालता, मला माझ्या वाट्याची सावली सापडली’’ त्यातून हे नातं वर्णन करू पाहणार्‍या सुंदर ओळी जन्मल्या : बाप वीर दोस्त ते खाविंद /किसी लफज दा नहीं कोई रिश्ता /जदों मैं तेनुं तक्केया /सारे अख्खर गूढे हो गये ( बाप, भाऊ मित्र, नवरा /कुठल्या शब्दात न मावणारं नातं /जेव्हा मी तुला पाहीलं /सगळी अक्षरं हरवून गेली). आजच्या भाषेत सांगायचं तर इमरोज वॉज लव्ह ऑफ हर लाईफ. नात्याचं पूर्णत्व एकमेकांव्यतिरिक्त प्रेम सोडा, मैत्रीचीसुद्धा गरज भासू देणारं नव्हतं. असंच कधीतरी इमरोज म्हणाले होते की दोघांनी कधीही प्रेम एकमेकांना बोलून दाखवलं नव्हतं, त्याची गरजच भासली नव्हती. एकत्र राहण्याचा निर्णयही निसर्गक्रमाइतकाच सहज. सुरुवातीला वाटायचं हे इतकं साधं, सरळ, सोपं कसं काय असेल? त्यातून ‘आम्ही अगदी नॉर्मल जोडपं आहोत’ हे इमरोजने २-३ वेळा बोलून दाखवलेलं. मला तर हे सहजीवन, रूढ चाकोरीशी काही देणंघेणं नसलेलं, आसपासच्या फक्त व्यवहारी पातळीवर टिकून राहिलेल्या खंडीभर नात्यांपेक्षा कमालीचं साधं, सच्चं वाटत होतं. खूप काही शिकवणारं…

साठ वर्षांपूर्वी, घरकामांची वाटणी -बिटणी न करता जेंडर स्टिरीओ टाईप्स नाकारून समोरची कामं करायला तयार असलेली ही जोडी. अमृताजी दाल -रोटी बनवायच्या तर इमरोज भाजी. त्या लिहीत असतील तर इमरोज जवळच्या बाजारातून तंदुरी रोट्या घेऊन येत, कधी खालूनही डबा यायचा, एखाद्या खास पदार्थाचा. ‘‘आम्ही दोघं क्रिएटिव्ह वृत्तीचे… रोजच लिहितो किंवा पेंट करतो असं नाही. पण मनात बहुधा तेच विचार असतात हे मात्र खरं. तासन् तास घालवून स्वयंपाक करणं आमच्या स्वभावात बसत नाही, म्हणून ते ओढून ताणून करायचं नाही. इतकं साधं सरळ आहे हे.’’ त्या दोघांमध्ये अगदी पहिल्यापासून माझं-तुझं काही नव्हतंच. कुठलंही विधान पॉलिसी मॅटरच्या सुरात जाहीर न करता, आपल्या मतांवर आणि जीवनशैलीवर शांतपणे ठाम राहून त्यांनी नाती सांभाळली. आधीच्या काळातला अवघडपणा संपल्यावर मुलं आणि नातवंडं त्यांची झालीच होती. अमृताचे आधीचे पती डॉ प्रीतम सिंग यांचीसुद्धा अखेरच्या दिवसांत, घरात आणून ठेवून या दोघांनी देखभाल केली होती, अगदी शेवटपर्यंत! त्यावर अमृताजींचं म्हणणं, ‘‘नवराबायको म्हणून नाही जमलं तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतोच ना?’’ यावर इमरोजचं सहमतीचं निखळ स्मितहास्य: यह भी कोई कहने की बात हुई?
‘जहाँ आज़ाद रूह की झलक पड़े, समझना वह मेरा घर है’ म्हणणारी, जगणारी अमृता माझ्या आयुष्यात असणं ही तिच्याच शब्दांत ‘सितारों की साजिश’असावी.

uarundhati.deosthale@gmail.com