भारतीय वडील आणि ब्रिटिश आई यांची भारतात जन्मलेली लेक ॲन आम्हाला भेटली तेव्हा दिसायची क्वीन मदरसारखी.ॲन म्हणजे जीवनरसाने भरपूर, काही ना काही अर्थपूर्ण करण्यासाठी उत्साही, बौद्धिक आव्हानं आवडणारी ज्येष्ठ मैत्रीण होती. येणारा प्रत्येक दिवस कारणी लागला पाहिजे हा तिनं स्वत:साठी बनवलेला नियम! तिच्याजवळ ठिकठिकाणच्या मजेदार आठवणींचा खजिना होता…
कॅन्सरशी दोन लढाया आणि इतर दोन-तीन गंभीर शस्त्रक्रियांना मागे टाकून वय वर्षे फक्त ९४ असताना, आजवर मनात सांभाळून ठेवलेल्या आयुष्यातल्या प्रिय प्रवासाची कहाणी एका देखण्या पुस्तकाद्वारे लोकांना सांगू पाहणं म्हणजे ‘ट्रुथ ईज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ सारखं हे आपण अनुभवतो कधी कधी. आयुष्याचं ्क्रिरप्ट प्रयत्नपूर्वक वाहतं ठेवणार्या आपल्या आजच्या कहाणीची नायिका ॲन मुकर्जी! मागल्याच रविवारी प्रवासप्रेमी ॲन परलोकाच्या यात्रेवर निघून गेली.
आमची ॲनशी भेट झाली वीस वर्षांपूर्वी. आम्ही नव्याने नैनितालमधल्या शीतला / छतौला खेड्यात मुलांसाठी लायब्ररी सुरू करायचं ठरवलं होतं. त्या भागात ॲन मुकर्जी हे एक प्रतिष्ठित नाव होतं! शेजारच्याच सतखोलमध्ये राहायची म्हणून सल्ल्यासाठी तिच्याकडे गेलो. भल्या थोरल्या वीपिंग विलोच्या सावलीत खुच्र्या टाकल्या होत्या. तिचा सुप्रसिद्ध लेमन केक (यानंतर असे कितीतरी केक आमच्या रसनेला तृप्त करणार होते!) आणि चहावर चर्चा झाली. खेड्यात लायब्ररी आणि ॲक्टिव्हिटी सेंटरची कल्पना तिला फारच आवडली आणि मैत्रीला सुरुवात झाली. भारतीय वडील आणि ब्रिटिश आई यांची भारतात जन्मलेली लेक ॲन आम्हाला भेटली तेव्हा दिसायची क्वीन मदरसारखी. गौर वर्ण, आडवा बांधा, स्ट्रॉ हॅट, सैल पाश्चात्त्य कपडे, वॉकिंग स्टीक आणि वागणं-बोलणं त्याच ॲक्सेंटमध्ये. संपन्न जीवनशैली. घरात सुसज्ज लायब्ररी, फिल्म्स, संगीत, आरामखुर्ची आणि फायर प्लेस. सात-आठ लोकांचा स्टाफ दिमतीला, सुंदर राखलेलं घर.
मदतनीसांना फार छान तयार केल्याने सुग्रास स्वयंपाक, दरवेळी वेगवेगळ्या पद्धतीचा. आमच्यालेखी सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बुद्धीला चालना देणारं संभाषण अनेक दिशांनी जाणारं. ॲन जागरूकपणे जगातील घडामोडींवर लक्ष ठेवून असे. नवीन येणारी पुस्तके, कलाक्षेत्रांतल्या घडामोडी तिला माहीत असत. इतरांप्रमाणे तिच्याही दिल्लीला दर दोन-तीन महिन्यांनी चकरा व्हायच्या तेव्हा काय काय करायचं याने कॅलेंडर भरलेलं असायचं. तात्पर्य हे की, व्याधी येत आणि जात, पण ॲन म्हणजे जीवनरसाने भरपूर, काही ना काही अर्थपूर्ण करण्यासाठी उत्साही, बौद्धिक आव्हानं आवडणारी ज्येष्ठ मैत्रीण होती. येणारा प्रत्येक दिवस कारणी लागला पाहिजे हा तिनं स्वत:साठी बनवलेला नियम! तिच्याजवळ ठिकठिकाणच्या मजेदार आठवणींचा खजिना होता. आमचं खेड्यातलं जीवन मुलांनी आणि त्यांच्या जीवनांशी संबंधित घडामोडींनी व्यापलेलं होतं, कधीकधी मोठ्यांची कंपनी फार हवीशी वाटे तेव्हा आम्ही ॲनकडे जायचो, तीही आमच्याकडे येई. ॲन वर्षातून एकदा-दोनदा घरासमोरच्या विस्तीर्ण हिरवळीवर पार्टी देत असे, अगदी जेन ऑस्टेनच्या कादंबर्यांची आठवण करून देणारी!
ॲनच्या कहाणीचा पूर्वार्ध म्हणजे बिहारमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि धाकट्या दोघी मुली (ॲन आणि तिची छोटी बहीण) लंडनला परतल्या. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं असल्यानं ती भारतातच राहणार होती. ॲननं लंडनमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि ती बहिणीकडे भारतात परतली. तिला भारत हेच तिचं घर वाटत असल्याचं उघडच होतं. कॉलेज शिक्षणानंतर ती जाहिरात क्षेत्रात गेली, भाषेवर प्रभुत्व/ प्रेम आणि कल्पकता होतीच. तिथे आयुष्याचा जोडीदार मिळाला, नाव झालं, कमाईही व्यवस्थित. पहिलं लग्न तुटलं. दुसरं लग्न आंतरराष्ट्रीय पत्रकार दिलीप मुकर्जी यांच्याशी केलं. त्यांच्याबरोबर व्यवसायानिमित्त परदेशात भ्रमंती आणि मनात साठलेली सांस्कृतिक समृद्धी. ॲनची दोन्ही मुलं परदेशात आहेत. ती त्यांना भेटून येत असे, पण घर म्हणजे भारतच. थट्टेतही कोणी ब्रिटिश किंवा फिरंगी म्हटलं तर भयंकर राग येई तिला!
तिचं चारी दिशांनी बागेने वेढलेलं अतिशय सुंदर बैठं घर. फुलबाग ॲनने प्लॅन केलेली, प्रत्येक फुलझाडाची अथपासून इतिपर्यंत माहिती तिला असायची. तिनं थोडं दूर पाण्याचा भूमिगत स्रोत असलेला एक जमिनीचा तुकडा घेऊन नर्सरी सुरू केली होती. गावात फुलझाडांची संख्या वाढवण्यातही तिचं मोठं योगदान असावं. मी एकदोनदा तिच्याकडून आवडलेली फुलझाडं घेतली तर त्यांच्याबरोबर तिनं दोन फुलस्केप नोट्स पाठवल्या होत्या. प्रत्येक झाडाचं बोलीभाषेतील नाव, बोटॅनिकल नाव, त्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल माहितीच्या कॅप्सूल्स. पण पहाडातल्या सर्वसामान्य गावकर्यांसारखी माझ्याकडेही पाण्याची चणचण असे, म्हणून अशी राजसी बाग पुढे आवाक्याबाहेर ठरली. गाव आणि गावकर्यांमध्ये मिसळून जाणार्या माझ्या अस्सल खेडवळ घराच्या बागेत, घरची परिस्थिती ओळखून कमी पाण्यात गुजारा करणार्या स्थानिक वृक्ष-वल्लींची संख्या वाढली.
ॲननं आसपासच्या खेड्यांसाठी खूप काही केलं. तिला एकदा सरकारी शाळेत कुठल्याशा समारंभाला बोलावलं होतं तेव्हा वर्गांच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या दिसल्या. दिवस हिवाळ्याचे होते. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात हिवाळ्यात कमालीची थंडी, कधीमधी होणारा हिमवर्षाव म्हणून थंडगार वार्यांपासून मुलांचा बचाव करणं गरजेचं होतं. बरीच शहरी, संपन्न कुटुंबं होती, पण हे कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. ॲननं लगेचच खिडक्यांना नवीन तावदानं लावून शाळा आणि पालकांच्या दुआ घेतल्या. वृत्ती मात्र ‘नेकी कर कुए में डाल’ अशी. हेच वैशिष्ट्य होतं तिच्या मदतशील स्वभावाचं, गावांत क्वचितच कोणी असावा ज्याच्यासाठी तिनं काही न काही केलं नाही. मग त्या ‘चिराग’ आणि ‘आरोही’सारख्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत कार्यरत असरकारी संस्था असोत, की वेगवेगळी माणसं… खेड्यांमध्ये अर्थपूर्ण काही घडवून आणायला ॲनचं योगदान असे. ॲन आणि तिच्या समविचारी चिरागच्या संस्थापकांच्या पत्नी लक्ष्मी लाल या दोघी चिरागनं सुरू केलेल्या ‘किलमोरा’ या अल्पशिक्षित महिलांच्या कमाईसाठी आरंभलेल्या लघु उद्योगात गरम कपडे, लोकरीची खेळणी, शाली, विणून विकण्याच्या प्रकल्पात मार्गदर्शनाचं काम दक्षतेनं करत असत. दर बुधवारच्या दुपारी या शुभ्र केस व कांतीच्या, पाश्चात्त्य पेहराव्यातल्या, संपन्न परिवारातल्या आणि वयानं ऐंशीच्या उत्तरार्धातल्या दोघी आंग्लभाषी मैत्रिणी नियमितपणे येत व दुकानामागच्या अंगणात विणकर महिलांमध्ये बसून काम वाटून देत. त्यांना सौंदर्यपूर्ण रंगसंगती व डिझाइन्स समजावत. त्यांच्यामुळे गावातील अनेक महिला घरबसल्या विणणं शिकून कमावू लागल्या, हे मोठंच काम झालं होतं. किलमोरात कौशल्य, गुणवत्ता आणि सौंदर्यपूर्णतेची पायाभरणी करून तयार वस्तूंना राष्ट्रीय स्तरावर एक ब्रँड स्थापित करण्याचं श्रेय, बर्याच अंशी या दोघींना! लदाखमध्येही तिच्या इंग्लिश मैत्रिणीच्या सांगण्यावरून ‘स्पिती’ आणि ‘कुलू’ मधून तिथे भरपूर होणार्या जर्दाळूच्या बियातल्या बदामाची आणि जंगली लसुणाची परदेशी निर्यात तिने गाववाल्यांना सुरू करायला मदत केली. त्यामुळे दोन लदाखी गावांत लघुउद्योग सुरू झालाच आणि त्यात कमाई होऊ लागल्यानं महिलांचं आसपासच्या जंगलातून झाडं तोडून लाकूडफाटा बनवणं कमी झालं, अनेक झाडं वाचली.
फेब्रुवारी/ मार्च हा पहाडातला लालभडक र्होडोडेंड्रॉन्सच्या बहरण्याचा मोसम. हिरव्या गार घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर पहाडांच्या खडकातून वर फुटत जाणारे शिडशिडीत, मध्यम उंचीचे, पण भरभरून डवरणारे वृक्ष! एकदा ॲनला खबर लागली की शीतला-मुक्तेश्वर वळणदार रस्त्यावर पसरलेल्या सुंदर जंगलात जो र्होडोडेंड्रॉन्सचा पट्टा होता तो बहरलाय. ॲननं आम्हाला तिच्याबरोबर गाडीनं र्होडोडेंड्रॉन्स बघायला बोलावून घेतलं. पण ती बातमी चुकीची निघाली, तो बहर अजून सुरू नव्हता झाला. ॲनची निराशा झाली- जास्त आमच्यासाठी. पण आम्हाला काही तेवढं वाईट नव्हतं वाटलं, ॲन दुखणारे गुडघे सांभाळत काठी घेऊन तो सृष्टीचा वार्षिक सोहळा पाहायला खडकाळ जंगलात हिंडत होती म्हणून खूप कौतुक वाटत होतं. और र्होडोडेंड्रॉन्स की बेकदर नासमझीपर गुस्सा भी आ रहा था.
क्रॉसवर्ड्स सोडवणं हा आम्हा दोघींचा छंद. ॲन सुडोकूही सोडवत असे. तिनं ऑस्ट्रेलियामधून येताना तिथल्या ‘डेली टेलिग्राफ’नं प्रकाशित केलेल्या दोन क्रिप्टिक क्रॉसवर्ड्सची पुस्तकं आणली होती. तिला त्यांचा फॉन्ट लहान वाटायचा म्हणून तिनं ती ‘वत्सा, तुजप्रत कल्याण असो’ सारखं काहीसं राणीच्या भाषेत म्हणत मला बहाल केली. मी नाचतच घरी आले. पण एकेक कोडं असलं कठीण, अक्षरश: कुवतीची मापं काढणारं! त्यानं डोक्याला चालना देण्यापेक्षा माझं लज्जाहरणच मनावर घेतल्याचं स्पष्ट होतं. दुसरं पुस्तक कोरं करकरीत कपाटात उभं आहे. झाल्या मेल्टडाऊनचा पुरावा!
खेड्यातील घराशी ॲनचं घट्ट मैत्र, पण गेली काही वर्षं तब्बेतीमुळे तिला दिल्लीत राहणं भाग झालं होतं! तिच्या जिवाची तगमग अगदी समजण्यासारखी. वाढत्या वयात सुसज्ज हॉस्पिटल्स जवळपास असणं एक गरज होऊन बसतं. स्वत:पेक्षा प्रियजनांसाठी. तरीही परिस्थितीसमोर ॲननं हार मानली नव्हती आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे ‘ऑन अ हाय’ ही तिच्या निसर्गसुंदर लेह -लडाखच्या प्रेमप्रकरणाची पानं तिनं लिहून काढली- जी तिनं या तिच्या ९५ व्या वर्षी छापून सुंदरपणे वाचकांसमोर मांडली. हेच या लेखाचं मूळ निमित्त! एखाद्या निसर्गसंपन्न ठिकाणाशी तिथल्या विराट, अतुलनीय लँडस्केपशी आणि नितांत सुंदर वातावरणाशी दिलो-जान से मोहब्बत होऊ शकते का? याचं नि:संदिग्ध उत्तर ‘होय’ आहे. ॲन लदाखला गेली साठीच्या मध्यावर आणि मग मोहून जातच राहिली, फिटनेस अडसर न बनू देता. तिथे मित्र जोडत, लोकांना काही न काही मदत करत. लाहौल, लेह, स्पिती म्हणजे प्रेमात आकंठ डुबवणारीच ठिकाणं! काळे, करडे, हिरवे, सोनेरी भुर्या रंगांनी भारून टाकणारे डोंगर, स्फटिक-सुंदर खळखळत्या नद्या, अमाप सौंदर्याचं धनी हिरवं, निळं, मोरपंखी रंगांचं पॅनगॉन्ग लेक, नुब्रा व्हॅली, नि:शब्द होऊनच अनुभवण्यासारखं. ठिकठिकाणच्या रंगीबेरंगी, पण घनगंभीर मोनॅस्टरीज, अधूनमधून सामोर्या येणार्या शुभ्रतम हिमनद्या… तिथल्या असीम शांततेला भंग करण्यालायक काहीही नसतं. हे सगळं आठवत, लदाखची पहाडी धुन तिथल्या वाद्यसंचासकट मनातल्या मनात आळवायची असेल तर आमच्या ॲनच्या पुस्तकात त्याचं सविस्तर नोटेशन मिळतंय बघा!
uarundhati.deosthale@gmail.com
