विद्या डेंगळे
काही म्हणा, पण आमच्या राणीसाहेब तशा वेगळ्याच. त्या कितीही संतापल्या तरी त्यांचं मन मोठं आहे. एकदा मी बंड केलं होतं. थोडा विरंगुळा हवा म्हटलं होतं आणि त्यांनी ते मान्यही केलं. पण त्याचा फायदा त्या खवल्या मांजराला झाला. आमचा करमणुकीचा कार्यक्रम ऐन रंगात आला असताना त्याने त्याची सोंड आमच्या वारुळात घालून आमच्या बर्याच मुंग्यांना शोषून घेऊन खलास केलं होतं. अजूनही आम्ही ते विसरलो नाही. पण आमच्या राणीसाहेब अशा संकटांमुळे कधी खचल्या नाहीत. पुन्हा नव्या जोमाने अंडी उबवू लागल्या. उरलेलं सैन्य, थोड्याफार कामकरी मुंग्या, थोडा उरलेला अन्नाचा साठा याच्या जोरावर त्यांनी पुन्हा साम्राज्य उभारायचा निर्धार केला.
‘मी केलेल्या बंडामुळेच आम्हाला अशा संकटातून जावं लागलं याची खंत माझ्या मनात होती. पण एक दिवस राणीसाहेब माझ्या जवळ येऊन म्हणाल्या, ‘‘विसर ते आता आणि लाग कामाला. संकटं येतच असतात, पण त्यावर मात करायला शिकायला पाहिजे. सर्व कामकरी मुंग्याना बरोबर घे आणि त्या गोदामातून ती १० किलो साखर कशी आणता येईल ते बघ.’’ मघाशी असलेले राणीसाहेबांचे थोडे प्रेमळ डोळे आता खूप मोठे झाले. ॲन्टेना हलू लागल्या.
मला ‘काम हेच आपल्या जीवनाचे ध्येय’ हा आमचा सुविचार आठवला आणि मीही मनाची मरगळ फेकून देऊन कामाला लागले. माझ्या एका हाकेसरशी उरल्या सुरल्या सर्व कामकरी मुंग्या साखर आणण्यासाठी रांगेत निघाल्या. गोडाऊनमध्ये साखरेची पोतीच पोती होती. सर्व मुंग्यांनी मिळून पोती नेणं सोपं काम नव्हतं. पण आम्ही ती पोती कुरतडून फाडली आणि साखरेचे कण रांगेतून वारुळाकडे निघाले. काम खूप दिवस चालणार होतं. मी राणीसाहेबांना संदेश पाठवला, ‘‘अजून बर्याच कामकरी मुंग्या लागतील.’’ त्यांचा उलट संदेश आला, अंडी उबवून तयार आहेत. सैन्य लगेच पाठवते.’’
मुंग्या आल्याबरोबर त्या खवल्या मांजराच्या नाकावर टिच्चून आम्ही पोतंच ओढून न्यायचं ठरवलं. एकदा का एखादी गोष्ट करायची असं ठरवलं की आम्ही रात्रंदिवस काम करत राहतो.
आम्ही महत्त्वाकांक्षी असलो, कामसू असलो तरी ते पोतं ओढून नेणे जरा जास्तच महत्त्वाकांक्षी होतं. शेवटी पोती फोडूनच साखर वारुळात नेऊन टाकली. १० किलो साखर न्यायला तब्बल १० दिवस लागले. दिवस-रात्र काम केलं. काही मुंग्या कामाने थकून स्वर्गवासी झाल्या.
राणीसाहेबांना त्याचं अतोनात दु:ख झालं. पण त्यांच्यावर साम्राज्याची जबाबदारी होती आणि ती पार पाडणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते. १० किलो साखर बघून त्या खूश झाल्या. म्हणाल्या, ‘‘बोला, काय करू तुमच्यासाठी?’’
आम्ही आपापसात कुजबुजून म्हणालो, ‘‘ राणीसाहेब, नृत्य करावंसं वाटतंय. नृत्यातून ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेचा उपयोग उरलेली सर्व साखर आणायला होईल.’’
बस. राणीसाहेब खूश झाल्या. त्यांनी आज्ञा सोडली,’’ सांगा ड्रम वाजवणार्या सुतार मुंग्यांना, एरवी आवाज करता ना, तर वाजवा तुमचे ड्रम.’’
सुतार मुंग्यांनीही मनावर घेऊन एरवीच्या खरखराटा ऐवाजी ड्रमचा नाद निर्माण केला. ड्रमच्या नादाबरोबर सर्व कामकरी मुंग्या मागच्या पायांवर उभ्या राहिल्या. पुढच्या पायांनी एकमेकींना धरून ड्रमच्या तालावर नाचू लागल्या. क्षणार्धात लाखो मुंग्यांनी फेर धरला. आमची शिस्त नृत्यातही दिसत होती. राणीसाहेबांना मध्यभागी ठेवून त्यांच्याभोवती अनेक वर्तुळं करत, ॲन्टेना उजव्या-डाव्या बाजूला करत सर्व मुंग्या नृत्यात हरखून गेल्या. या वेळेस मात्र राणीसाहेबांनी खबरदारी घेऊन सैनिक मुंग्यांना खवल्या मांजरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. नृत्य करणार्या मुंग्यांना नृत्याचा कैफ चढला होता. पण संकंटाशिवाय जीवन कसलं!
धरतीवर धोधो पाऊस सुरू झाला. पूर आला असावा. हां हां म्हणता वारुळात पाणी शिरू लागलं. सर्व बोळातून पाणी वाहू लागलं. त्याबरोबर आमची अंडी, मेलेली झुरळं, फुलपाखरं, गांडूळ आणि इतके कष्ट करून आणलेली साखर, सर्वकाही वाहून जाऊ लागलं.
प्रसंगावधान राखून वाहता वाहता राणीसाहेबांना वेटोळं करून डोक्यावर उचलून धरलं. काही झालं तरी राणीसाहेबांना वाचवणं आमचं कर्तव्यच होतं. राणीसाहेबांचा संदेश पानवाहू मुंग्याना गेला. पानवाहू मुंग्या ताबडतोब कामाला लागल्या आणि त्यांनी पानांचा बोटीसारखा वापर करून त्यावर सर्व वाहत जाणार्या मुंग्याना चढवलं.
आमच्या बोटी एका अजस्र झाडाच्या मुळ्या- ज्या पाण्यापर्यंत पोचल्या होत्या, त्यात जाऊन अडकल्या म्हणून वाचलो. पटापट वाचलेल्या सगळ्या मुंग्या राणीसाहेबांच्या मागून झाडाच्या खोडावर चढल्या. आणि अचानक राणीसाहेबांना पंख फुटले. त्यांनी स्वत:ला आमच्या कड्यातून सोडवून घेतले आणि त्या उडाल्या. थोड्या वेळाने पाऊस थांबला. पाणीही ओसरलं.
आमची वारुळं उद्ध्वस्त झाली होती. सगळ्या मुंग्या इकडेतिकडे विखुरल्या होत्या आणि राणीसाहेबांचा संदेश आला. संदेशाप्रमाणे शिल्लक राहिलेल्या वारुळापर्यंत घाबरतच पोचलो.
पाहतो तर काय! राणीसाहेब मुकुट चढवून वारुळात उच्चस्थानी बसल्या होत्या. ‘‘शाब्बास! आजचे तुमचे नृत्यातील कौशल्य पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. आणि त्याहीपेक्षा आलेल्या संकटाला तुम्ही ज्या पद्धतीने सामोरे गेलात ते पाहून माझी छाती अभिमानाने भरून आली आहे. पण म्हणून हुरळून जाऊ नका. लागा कामाला. करा सुरुवात नव्याने वारूळ बांधायला.’’
‘‘आज्ञा राणीसाहेब!’’ असे म्हणत मी मोठ्याने आरोळी ठोकली.
‘‘होशियार! म्हणा, ‘‘राणीसाहेबांचा जयजयकार! काम हेच आपले ध्येय!’’
‘‘कदम कदम बढाये जा, खुशिके गीत गाये जा!’’ सगळ्या मुंग्या गात गात वेगवेगळ्या रांगेत अन्नाच्या शोधात निघाल्या. वास्तुशिल्पी (गवंडी) मुंग्या नवे वारूळ बांधण्यात दंग झाल्या.
vidyadengle@gmail.com
