डॉ. चैतन्य कुंटे

आदिम कालापासून सर्जन, पोषणाची देवता म्हणून स्त्रीतत्त्वाचे पूजन विविध देवतांच्या रूपात होत आले आहे. जगभरातील धर्मपरंपरांत विविध स्त्रीदेवता आहेत. सुमेरियन इनान्ना, इजिप्शियन नीथ, ग्रीक अर्टेमिस, अ‍ॅफ्रोडाइट, अथेना, नऊ म्युझेस देवता, ज्यू परंपरेतील एल शाद्दाई, एल रखामिम, अशिमा, ख्रिश्चन परंपरेतील मेरी, सोफिया, पर्शियन अनाहिता, आशी, इस्लामपूर्व अरेबी परंपरेतील मक्केची ग्रामदेवता मनात, अल-लात व अल-उझ्झा अशा असंख्य देवता पुजल्या गेल्या आहेत.

भारतात स्त्रीदेवतांचे पुष्कळच वैविध्य आहे. आणि शक्तीची उपासना करणारा शाक्त हा एक प्रमुख पंथ आहे. परंतु संस्कृतीच्या विकासक्रमात समाज जसा अधिकाधिक पुरुषप्रधान होत गेला, तसे स्त्रीपूजनाचे स्वरूपही बदलत गेले. शक्तीचे स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकत शिव वा विष्णूची शक्ती म्हणून तिला दुय्यम स्थान दिले गेले. शाक्त पंथ हा कधी शैवांनी, तर कधी वैष्णवांनी एक प्रकारे ‘हायजॅक’ केला! मात्र, अनेक प्रांतांत आजही शाक्त पंथाचे अस्तित्व ठळक आहे.

स्त्रीदेवतेची कुमारी, मातृका, शारदा, लक्ष्मी, काली ही सौम्य व उग्र अशी रूपे भारतात प्रचलित आहेत. लोकपरंपरांत मरीआई, मनसा, सीतलापासून लज्जागौरीपर्यंत विविध स्त्रीदेवता आहेत. उषस्, पृथ्वी, अदिती, वाणी, इ. वैदिक देवता, बौद्ध परंपरेतील तारा, वर्जयोगिनी, हारिती, स्ग्रोल-मा, डाकिनी, पाल्डेन ल्हामो आणि जैन परंपरेत पद्मावती, शासनदेवी अशा देवता आहेतच. गंगा, नर्मदा अशा नद्या, साती आसरा ही जलदेवता याही पुजल्या जातात. योगमार्गात कुंडलिनी व योगमाया या देवता मानल्या आहेत. वैष्णव परंपरेतील राधा, तुलसी, वारकरी संप्रदायातील रखुमाईचे स्थान सर्वाना विदित आहेच.

महाराष्ट्रात सटवाई, जखाई, यमाई, यल्लम्मा रेणुका, गाववेशीबाहेरची चिंध्यादेवी, अनेक ग्रामरक्षक देवता अशी स्त्रीरूपे लोकधर्मात आहेत. तुळजाभवानी, महालक्ष्मी, माहुरगडाची अंबा, सप्तश्रृंगी या कुलदेवता सर्वपरिचित आहेत. आधुनिक काळात रामकृष्ण परमहंसांच्या पंथातील मा शारदा, योगी अरविंदांच्या पंथातील मदर, तसेच कलावतीदेवी, माता निर्मलादेवी, आनंदमयी मा, अम्मा अमृतानंदमयी इ. धार्मिक उपदेशक स्त्रियांचेही विशिष्ट स्थान आहे. शक्तीपूजेचा हा नकाशा लक्षात घेतल्यानंतर आजच्या लेखात शाक्तपंथीय धर्मसंगीताविषयी थोडे जाणून घेऊ.

महाराष्ट्रातील शाक्तपंथीय संगीत म्हणून आराध्याची गाणी, जोगवा, देवीच्या आरत्या आपल्याला माहीत असतात. मराठी शाक्तसंगीतात प्रामुख्याने लोकसंगीताची गुणवैशिष्टय़े दिसतात. संबळ, तुणतुणे वाजवत घातलेल्या गोंधळात देवीला आवाहन करतात. गोंधळाची ही परंपरा नक्कीच हजारेक वर्षे जुनी आहे. ११व्या शतकात चालुक्य राजा दुसरा सोमेश्वराच्या ‘मानसोल्लासा’त ‘गौंडली’ नृत्याचा उल्लेख आहे. मंगळवारी आणि शुक्रवारी, चैत्री पौर्णिमेला आणि विशेषत: नवरात्रात संबळ वाजवून देवीची गाणी म्हणणारे भराडी, आराधी, तसेच पोतराज, चौंडके वाजवत देवीमाहात्म्य गाणारे जोगते हे लोकउपासक शाक्तसंगीताचा सशक्त आविष्कार करतात. संत एकनाथांचे ‘अनादी निर्गुण प्रकटली भवानी, आईचा जोगवा मागेन’ हे जोगवागीत, ‘बया दार उघड’ हे भारुडगीत सर्वज्ञात आहे. मुळचा गुजरातेतला, नवरात्रीच्या वेळी नाचला, गायला जाणारा गरबाही गेल्या काही दशकांत महाराष्ट्राने आपलासा केला आहे. वाचकहो, या परिचित शाक्तसंगीतापेक्षा निराळ्या, काहीशा अपरिचित आविष्कारांकडे तुमचे लक्ष आज वळवायचे ठरवले आहे.

काली तथा श्यामाची आराधना करणाऱ्या वंगीय शाक्तपंथातील ‘श्यामासंगीत’ हे बंगाली संगीत संस्कृतीचे एक खास अंग आहे. शाक्तांमधील एरवीचा तंत्रमार्ग, त्यातील विधी यांपासून मोकळे होत पदगायनातून शक्तीची आराधना करण्याचा सुकर मार्ग श्यामागीतीने रुजवला. श्यामासंगीतातील पदावलीत  दुर्गास्तुती, उमासंगीत, आगमनीगीत, विजयागीत असे गीतप्रकार आहेत. उमा दरवर्षी आपल्या माहेरी येते असे मानतात व या प्रसंगाचे वर्णन करणारी ‘आगमनी गीते’ अत्यंत भावपूर्ण आहेत. कोणत्याही सर्वसामान्य माहेरवासिनीचे मुग्ध भाव त्यात व्यक्त होतात. कधी ही माहेरवाशीण प्रौढा पार्वती असते, तर कधी मुग्धा गौरी, मध्या अपर्णा. बालिकेच्या स्वरूपातील गौरीची गीते वात्सल्यभावाने ओतप्रोत आहेत, तर काही गीतांत युवतीच्या मनातील हळवे भाव आहेत. दुर्गापूजेच्या अखेरीस ‘विजयागीते’ गातात. त्यात ही माहेरी आलेली पार्वती पुन्हा सासरी- म्हणजे शिवाकडे जाते असे वर्णन असते. माहेरच्या वियोगाचे हृदयद्रावक वर्णन असल्याने विजयागीते गाताना बायकांचा कंठ दाटून येतो.

१३व्या शतकापासून बंगाल प्रांतात शाक्त पंथाने जोर धरला आणि अनेक ठिकाणी शाक्तपीठे निर्माण झाली. त्यातून प्रेरित होऊन भक्तकवींनी कालीस्तुतीची पदे रचली. ‘कवीकंकण’ मुकुंदराम याचे १५८९ मधील ‘चंडी’ हे महाकाव्य अनेकांना प्रेरक ठरले. रामप्रसाद सेन (१७२३-१७७५) यांनी रचलेल्या पदांना मोठीच जनप्रियता लाभली. रामप्रसाद स्वत: पदांना स्वरबद्ध करत. त्यांच्या गीतांत लोकगीतापासून ध्रुपदपर्यंत अनेक सांगीतिक वळणे आहेत. ललित, बिभास, जौनपुरी, बिहाग, छायानट, जंगला, सिंधुरा, मालकंस, मल्लार, इ. प्रचलित रागांसह ललितखमाज, पिलूबहार, सोहनीबहार, गौरीगांधार, इ. अप्रचलित मिश्ररागही आहेत. अल्पावधीत अक्षरश: खेडोपाडी ही ‘रामप्रसादी गीते’ लहानथोरांच्या तोंडी खेळू लागली. राजा कृष्णचंद्र राय (१७१०-१७८३) या संगीतप्रेमी जमीनदाराने रामप्रसादांना आश्रय देऊन ‘कवीरंजन’ उपाधी दिली.

पुढे रामप्रसादी गीतांच्या प्रभावाने कमलकांत भट्टाचार्य (१७७२-१८२१), रसिकचंद्र राय (१८२०-१८९३), राम बसू, दिवाण मोशाय तथा रघुनाथ राय, भुवन राय, नीलकंठ मुखोपाध्याय, इ. अनेक कवी श्यामागीते रचू लागले. बंगाली टप्पा गायनाचे एक प्रवर्तक कालीदास चट्टोपाध्याय म्हणजेच काली मिर्झा (१७५०-१८२०) यांनी टप्पा अंगाची श्यामागीते रचली. त्याने प्रभावित होऊन कमलकांत भट्टाचार्य यांनीही टप्पा प्रकारची श्यामागीते रचली. शाक्तपदावलीत ख्यालसदृश रचनांचे श्रेय रघुनाथ राय यांना दिले जाते. त्यांनी ख्याल शैलीत, पण चार तुक असलेल्या ‘ओलार’ नामक प्रकारात श्यामागीते रचली. रामशंकर भट्टाचार्य (१७८१-१८५३) हे विष्णुपूर परंपरेतील ध्रुपद गायक. त्यांनी ध्रुपद अंगाची श्यामागीते केली. कृष्णचंद्र राय यांचे पुत्र शिवचंद्र, शंभुचंद्र व नरचंद्र यांनीही श्यामागीते रचली. राजा नंदकुमार राय, राजा हरेंद्रनारायण, बर्धमानचे राजा महताब चंद्र, पाथुरीया घाटचे ज्योतिंद्रमोहन ठाकूर अशा बंगालमधील जमीनदार राजांच्या आश्रयामुळे श्यामागीती बंगालच्या धर्मसंगीताचा अविभाज्य भाग बनली. या पृष्ठभूमीवर नंतरच्या काळात रवींद्रनाथ ठाकुरांनीही श्यामागीते रचली यात आश्चर्य ते काय! १८२८ साली राजा राममोहन राय यांनी निर्गुणतत्त्वाची उपासना करणारी ब्राह्मो समाजी चळवळ सुरू केल्यावर भद्रलोकांत श्यामासंगीताला ओहोटी लागली. परंतु १९व्या शतकाच्या मध्यात रामकृष्ण परमहंस या महान कालीभक्तामुळे श्यामासंगीताला पुन्हा संजीवन मिळाले. त्यांच्या प्रभावळीतील स्वामी विवेकानंद, गिरीशचंद्र घोष यांनी श्यामागीते रचली. विशेष म्हणजे मुस्लीम असूनही काझी नझरुल इस्लाम यांनी अत्यंत भावपूर्ण आणि सांगीतिकदृष्टय़ा समृद्ध अशा श्यामागीतांच्या रचना केल्या.  या गीतांत काली व भक्त यांचे माता-बालक अशा रूपात आवाहक, भावपूर्ण वर्णन असते. बालकाने आईस केलेली विनवणी, मातृस्तुती अशा आशयाच्या या गीतांना मातृप्रार्थनेचे स्वरूपही मिळाले. पुढे ब्रिटिशकाळात तर याच मातृगानाचे रूपांतर देशगानात झाले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘वंदे मातरम्’ या प्रेरक मंत्र  ठरलेल्या गीताच्या मागे श्यामागीतीची ही दीर्घ परंपरा आहे!

बंगाली वैष्णव कीर्तनातील संगीताची अभिजातता, बाऊलपंथी गीतांतील लोकसंगीताचा फक्कडपणा  इथपासून आधुनिक काळातील रवींद्रसंगीतासारखे नागर संस्कारित संगीत, पाश्चात्त्य संगीत व चित्रपट संगीतातून लोकप्रिय झालेल्या वाद्यमेलाधारित संगीताचा साचा अशी स्थित्यंतरे पचवत, कालानुरूप वळणे घेत श्यामासंगीत बदलत गेले. १९४०च्या दशकापासून दुर्गापूजेच्या मोसमात श्यामागीतांच्या नवनव्या रचनांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित होऊ लागल्या. या नव्या गीतांची उत्सुकता वंगसमाजात आजही असते. बंगालच्या लोकप्रिय गायकांनी आणि लता मंगेशकर, आशा भोसले यांनीही गायलेली ही गीते बंगालमधील जनप्रिय संगीताचे अभिन्न अंग आहेत.

महाराष्ट्रापासून आंध्र, कर्नाटक भागात रेणुका, यल्लम्मा, आसाममध्ये कामाख्या, केरळात मुक्ताम्बिका, कन्याकुमारी, तमिळनाडमध्ये चिक्कम्मा, दोड्डम्मा, त्रिपुरसुंदरी, भद्रकाली, इ. देवतांची रूपे असून प्रांतोप्रांती विविध शाक्तोत्सव होतात. त्यामुळे भारतभरात लोकसंगीताचे नाना साज लेऊन शाक्तसंगीत आविष्कृत होते. 

असाच एक आविष्कार म्हणजे तुसू. मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, बिहार, आसाम, बंगाल, ओडिशा या मोठय़ा भागात गावागावांत पौषात मकरसंक्रांतीपासून तुसू उत्सव असतो. या उत्सवास दोन संदर्भ आहेत. पहिला आहे नव्या पिकाचा. काही लोकभाषांत तुसू म्हणजे भाताची लोंबी. दुसरा संदर्भ आहे कुमारिकेचा. या मागे एक रोचक आख्यायिका आहे. बुलंदशहरचा कुरमी क्षत्रिय राजा बीरबल याची देखणी मुलगी होती तुस्मिनी- म्हणजेच तुसू. हिच्या सौंदर्याच्या ख्यातीने म्हणे दिल्लीपतीने हिला आपली सून करायचे ठरवले. हे अमान्य असलेला बीरबल तुसूसह जंगलात, संथाल लोकांच्या वसतीत जाऊन लपला. मात्र मुघल सेना माग काढत तिथेही आली, तेव्हा तुसूने नदीत उडी घेऊन शीलरक्षण केले! हा दिवस होता मकरसंक्रांतीचा. त्यामुळे तुसूच्या स्मृत्यर्थ कुरमी क्षत्रिय, संथालसह अनेक आदिवासी जनसमूह तुसूचा, ‘कुमारीचा उत्सव’ म्हणून साजरा करू लागले.

या उत्सवाच्या वेळी स्त्रिया तुसू नावाची फुले गोळा करतात, भात व शेणाचे दोन लाडू (तुसूच्या आईवडिलांचे प्रतिक) बनवतात, घर-आंगण लिंपतात, सजवतात. तेव्हा फार मोहक स्त्रीगीते गायली जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी स्त्रिया गाणी गात कलशयात्रा काढतात. तुसूदेवीची सुशोभित प्रतिमा बनवून ‘तुसूघरा’त तिची प्रतिष्ठापना करून आरती होते. संध्याकाळी बायका ‘संध्याकाळ झाली, तुसू आता घरी परतून ये’ अशा आशयाची गाणी गातात. रात्री तुसूचे लोकनाटय़ झाल्यावर स्त्रीपुरुष ढोल, झांझ वाजवत, नाचत रात्र जागवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पंचक्रोशीतील सर्व वस्त्यांमधील तुसूमूर्ती एकत्र आणून त्यांची मिरवणूक काढतात. तेव्हा वाजंत्री वाजते. मग सभोवतीच्या गावांतील तुसूमूर्ती या मैदानावर मंडपांत एकत्र आणून त्यांचे प्रदर्शन होते. सायंकाळी तुसूमूर्तीचे विसर्जन करतात तेव्हा तुसूला निरोप देण्याची भावपूर्ण गाणी बायका गातात. शाक्त धर्मसंगीताचे अशा लोकसंगीताच्या बाजाचे अनेक आविष्कार भारतभर आपल्याला आढळतात. 

भारतीय रागसंगीतही शक्तीगुणगान करण्यात मागे नाही. कर्नाटक संगीतातील त्रिमुर्तीपैकी श्यामाशास्त्री हे कामाक्षीभक्त. त्यांनी नवरात्रातील नवविध रूपांचे वर्णन करणाऱ्या कृती रचल्या- त्या ‘नवरत्नमाला’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याखेरीज त्यांच्या हिमाद्रीसुते (राग कल्याणी), कामाक्षी (राग भैरवी), शंकरी संकरू (राग सावेरी) या कृतीही गायकप्रिय आहेत. स्वाती तिरुनाल यांच्याही ‘नवरात्रकृती’ सुंदर आहेत. मुथ्थुस्वामी दीक्षितार यांच्याही कमलाम्बास्तुतीपर ‘नववर्ण कृती’ आणि ‘कंजदलायताक्षी’ (राग कमलमनोहारी) अशा रचना भक्तिभावाने गायल्या जातात.

‘कान्हा बिना गाना नही’ असे मानणाऱ्या हिंदुस्थानी संगीतात सर्वाधिक रचना कृष्णविषयक असल्या तरी दुर्गा, वीणावादिनी सरस्वतीचे वर्णन करणाऱ्याही बंदिशी आहेत. बैजू, तानसेनादिकांची देवीस्तुतीची ध्रुपदे आहेत. ख्याल शैलीतील देवी दुर्गे (सुखिया बिलावल), जयतु जय मालारानी (जयजयवंती), दुर्गे महारानी (बिहाग) अशा दुर्गावर्णनपर पारंपरिक बंदिशी फार डौलदार आहेत. साणंदचे महाराणा जयवंत सिंह वाघेला हे शाक्त महंत व गायकही. त्यांनी रचलेल्या आणि पं. मणिराम यांनी स्वरबद्ध केलेल्या श्रीकामेश्वरी (बिलासखानी तोडी), जय जय सिद्धी कराली (जयजयवंती), जय जय श्रीदुर्गे (दरबारी), जगदंब सुरनरमुनि सुमरंत (बसंत) या एकाहून एक सरस बंदिशी आहेत. त्यापैकी माता कालिका (अडाना) ही बंदिश पं. जसराजजींनी गाजवली. आधुनिक वाग्गेयकारांच्या काही मोहक रचना अशा- विद्यादानी दयानी (रातंजनकर), देहो मोहे धीर (कुमार गंधर्व), विहरति ब्रह्मनंदिनी (भावरंग), माता भवानी काली (प्रभा अत्रे), इ.

दुर्गा, सरस्वती, परमेश्वरी अशी देवीवाचक नावे असणारे अनेक राग आहेत, पण त्यांतील सर्वात भावस्पर्शी राग म्हणजे भैरवी! ‘भक्तिरस की खानी’ आलेली ही रागिणी बाराही स्वरांना सहज आपलेसे करते, म्हणून ‘भैरवी कही मनमानी’ असेही म्हटले आहे. जय शारदा भवानी भारती (ध्रुपद), भवानी दयानी (सादरा), सुंदर स्वरूप जाके (दादरा), मां भैरवी भवतारिणी (गवैयाना भजन) अशा भैरवीतील शक्तीस्तुतीच्या बंदिशी किती विलोभनीय आहेत!

तीन मुस्लिम रचनाकारांच्या उल्लेखाने आजचा शाक्तसंगीताचा आलेख पूर्ण करतो.

उदाहरण एक : द्वितीय इब्राहिम आदिलशाह या मुस्लिम राजाने सरस्वतीवर्णनाची अनेक सुंदर ध्रुपदे रचली.

उदाहरण दोन : भेंडीबाजार घराण्याच्या उ. अमान अली खाँ ‘अमर’ यांची ‘जय माता विलम तजत मांगन गुन देहो’ ही हंसध्वनी रागातील बंदिश  रागतालरचना, काव्य या सर्वच बाबतीत अजोड आहे.

उदाहरण तीन : मैहर घराण्याचे प्रवर्तक उ. अल्लाउद्दीन खाँ ‘बाबा’ हे कालीभक्त होते आणि बाबांना ‘माई सरस्वती शारदा’ ही भैरवीतील बंदिश अत्यंत प्रिय होती.

धार्मिक भेदभावाचे विसर्जन करण्याची शक्ती संगीतात असते याची अजून वेगळी साक्ष काय काढावी!

keshavchaitanya@gmail.com (लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे संगीताचे अध्यापक आहेत.)