अंधेरा तेरा मैंने ले लिया।
मेरा उजला सितारा तेरे नाम किया।
तो गातो, तेव्हा त्याच्यावर अनेक जण जीव ओवाळून टाकतात… काही टोकाची टीकाही करतात, काही थोडे त्याचे गाण्यातले म्हणणे उमजून घेतात. त्यातील आणखी काही थोडे त्या समजेशी रुजुवात घालतात. तोच असं नाही, इतरही काही चित्रपट पार्श्वगायक-पार्श्वगायिकांबाबत असंच होतं, असंच होत आलेलं आहे. श्रोता आणि रसिक श्रोता यात जो बर्याच पायर्यांचा फरक असतो, त्यातून हे होत असावं. पार्श्वगायक-पार्श्वगायिकांच्या बाजूनंही श्रोत्यांच्या बाबतीत असंच होत असावं.
काही जण श्रोते ऐकतायेत म्हणून इतकं गात राहतात की, त्यात श्रोते आपल्याला ऐकायचे बंद झाले आहेत, हेही अशा पार्श्वगायक-पार्श्वगायिकांना अनेकदा उमजत नाही. काही थोडे वरच्या इयत्तेतले. ते श्रोता रसिक श्रोत्याच्या इयत्तेत का जात नाही, याचा त्रास करून घेऊन स्वत:ला सारखं सिद्ध करण्यासाठी गात राहतात. फारच थोडे आपल्या गाण्यातून, त्याच्या निर्मितीप्रक्रियेतून आलेल्या उमजेशी रुजुवात घालतात आणि थांबतात. अरिजित सिंग थांबला… पार्श्वगायन करणार नाही, असं म्हणाला.
आजूबाजूच्या कोलाहलाचा अंधार मी कधीच पिऊन टाकला, त्यातून माझ्या नेणिवेत उगवलेला सर्जनतारा मी तुमच्या ओंजळीत स्वाधीन करतो आणि मी निरोप घेतो. ‘ऐ दिल है मुश्किल’ असं थेट उद्गारून नाही; पण मनातल्या मनात गुणगुणून अरिजित सिंग वयाच्या अडतिसाव्या वर्षी- ज्या वयात अनेकांची चित्रपट पार्श्वगायनाची कारकीर्द सुरूही होऊ शकत नाही, त्या वेळी- निवृत्त झाला.
अरिजित सिंगनं पार्श्वगायनातून अचानक घेतलेली निवृत्ती त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी, म्हणून तिची चर्चा.
अरिजित सिंगचं म्हणणं असंच की, हा निर्णय काही मी अचानक आज वाटलं आणि घेऊन टाकला, असं नाही झालेलं. त्यासाठी एकच काही तरी कारण घडलं, असंही नाही. ‘‘कारणं अनेक आहेत, मला हे बर्याच काळापासून करायचं होतं. अखेर मी ते करण्याचं धाडस गोळा केलं, इतकंच.’’ – इति अरिजित. यावर गोंधळात पडून पुढचा साहजिक प्रश्न, ‘पण, असं कसं?’ त्यावर त्याचं म्हणणं हे : ‘‘एक कारण तर अगदी साधं आहे.
मला पटकन कंटाळा येतो (एकच एक गोष्ट खूप काळ करत राहण्याचा). म्हणून मग मी रंगमंचावर गाताना, मीच गायलेल्या गाण्यांची वाद्यवृंद रचना बदलून गातो. तर असं आहे. मला कंटाळाच येतो (तेच तेच करण्याचा)…’’ हे सांगताना, त्याच श्वासात अरिजित पुढं म्हणतो, ‘‘मला जगण्यासाठी आता आणखी वेगळ्या प्रकारची संगीतनिर्मिती करायची आहे.’’ त्याचं हे वाक्य चाहत्यांसाठी – किंवा खरे तर रसिक चाहत्यांसाठी आश्वासक, काळजात घुसणारं. तो संगीतापासून दूर चाललेला नाही, तो फक्त पार्श्वगायन थांबवतो आहे…
अरिजित सिंग हा हिंदी चित्रपट संगीतातील अलीकडचा फिनॉमिनन. तसे या आधीही घडून गेले, पण त्या घटितांत आणि अरिजित सिंग या घटितात जो फरक आहे, तो मुख्यत्वे काळाचा. तो समजून घेण्याचा प्रयत्न हाच कदाचित अरिजित सिंगची पार्श्वगायनातील निवृत्ती समजून घेणं. एखादा कारागीर कलाकृती घडवताना हातातील साधन-साहित्याला तासून, तावून, सुलाखून त्याला कलाकृतीचा आकार देतो, तसा ज्या गायकानं आपला गळा अक्षरश: संपूर्ण तोडून नव्यानं ‘तयार’ केला, त्यानं हे सगळं ज्यासाठी केलं, त्याला जेमतेम दशका-दीड दशकाभरातच सोडचिठ्ठी द्यावी, असं काय घडलं असावं? छळणार्या प्रश्नांतील हा पहिला, शेवटचा आणि मूलभूतही.
चित्रपट क्षेत्रातील अनिश्चितता, गटबाजी, प्रसंगी हाडवैर, सतत ‘दिसत’ राहण्याचा, टिकून राहण्याचा ताण अशी नानाविध कारणं उत्तरादाखल मनात उगवतात. ती साहजिक नाहीत, असं नाही; पण ती अरिजित सिंगची निवृत्ती उमजून घेण्यास पुरेशी नाहीत. आणि तसाही अरिजित अगदी आता आतापर्यंत चित्रपटांत भरपूर गात होता, गायला आहे. त्यामुळे पार्श्वगायनाचं काम मिळत नव्हतं, नाहीये असंही काही नाही. मग ही फक्त आणखी प्रसिद्धी मिळविण्यासाठी, कला जगतात दबदबा निर्माण करण्यासाठी, आपण किती वेगळे वगैरे आहोत, असं दाखविण्यासाठी किंवा अन्य एखाद्या वा अनेक कारणांसाठी केलेली क्लृप्ती आहे का? भविष्यातलं सांगता येत नाही; पण अरिजितचा इतिहास तरी तसं सांगत नाही. मग काय करावं? तर याकडे एक निमित्त म्हणून पाहावं, त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे, कलाकाररूपानं स्वत:ला शोधण्याच्या प्रवासाकडे जरा निरखून बघण्याचं.
हे असं करायचं, तर त्या कलाकाराचाही नीट शोध घ्यावा लागतो. सध्याच्या उपलब्ध साधनांनुसार तो गूगल नावाच्या गुहेत शिरून घेता येतो. त्यात माहितीचं अपुरेपण नाही, पण त्या माहितीच्या विश्लेषणात उणेपण राहू शकतं. एखादं एआय साधन तेही दूर करू शकतं; पण अरिजित सिंग हा फिनॉमिनन समजून घेताना, त्यापेक्षा त्याचं गाणं आणि बोलणं ऐकून हे विश्लेषण करणं अधिक मानवी – त्यात आकलनाच्या मानवी मर्यादा राहतील, असं गृहीत धरूनही.
गूगल शोधात लक्षात येतं की, अरिजित सिंगचे म्हणून असे काही अगदी वैयक्तिक डिजिटल ठसे फार नाहीत. जे आहेत, ते त्याच्यावर इतर कुणी तरी लिहिल्यानंतर छापून आलेले तुकडे किंवा त्याच्या चमूनं त्याच्या कार्यक्रमांबाबत केलेली प्रसिद्धी. या सगळ्यात तो गाण्याच्या एका कार्यक्रमासाठी १६ कोटी रुपये घेतो, त्याच्या कार्यक्रमाची पुढची तिकिटं लाखांत असतात वगैरे तपशीलही. सगळं त्याच्या वतीनं, त्याचं फारसं काहीच नाही. मग मुलाखतीच उरतात त्यातल्या त्यात त्याचं बोलणं ऐकण्यासाठी, म्हणणं वाचण्यासाठी. ते तुकडे आपल्या मनाच्या शोभादर्शकातून कसे दिसतात, एवढीच विश्लेषणाची कसोटी.
हे तुकडे अगदी थोडक्यात बघा कसे आहेत!
‘इन्स्टाग्रामवर माझ्या नावावर असं काही नाही. आमचं (आमच्या संगीत चमूचं) एक प्रोफाइल आहे. कुणाच्या तरी मोबाइलवर ते मी पाहतो. आम्ही अनेक चॅनेलना सबस्क्राइब केलं आहे. गाण्यांच्या चित्रफिती तयार करण्यासाठीचा हा आमचा संदर्भस्रोत आहे. त्यात नवीन काय होतंय हे पाहत राहतो. नवीन शिकत राहणं चांगलं असतं.’
‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ नाकारायचं काहीच कारण नाही. त्याचा उत्तम वापर करणं शिकायला हवं. किती तरी मोठा डेटा आहे, ते साधन आहे. ‘एआय’ हे एखादी वृत्ती तयार करण्यासारखं. म्हणजे त्याचा धोका असेलच. पण म्हणूनच चांगल्या लोकांनी ते शिकून घेतलं पाहिजे…’’
‘‘अरिजित सिंग रियाझ कसा करतो?’’… ‘‘मी शिकत असताना, सकाळी चांगली तालीम झाली, तरी माझे गुरुजी सांगायचे, आता संध्याकाळी येऊन परत हाच षड्ज लाव. हे कठीण. दिवसभराच्या धबडग्यात तो विसरू नये म्हणून कसरत सुरू राहायची. दारावरची घंटाही माझ्या संदर्भ षड्जाच्या पट्टीत कोणत्या स्वरात वाजते, हे ऐकू यायचं. पण, तेच आहे ना. त्यात राहावं लागतं सतत…’’
काही तुकडे व्यावहारिक, उत्तरेही तितकीच व्यावसायिक. संगीत निर्मिती कंपन्यांबाबत तो म्हणतो, ‘‘त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत. कारण, कलाकार प्रत्येक वेळी व्यवसायाचं गणित समजून घेऊ शकत नाही. पण ते जर कलाकारांवर अवलंबून आहेत आणि त्या सगळ्यांना असं वाटलं की, काही गोष्टी न्याय्य नाहीत, तर त्यांनीही विचार करायला नको का?’’
चित्रपट निर्मात्यांबाबत अरिजितला म्हणायचं आहे, ‘‘निर्मात्यांनी काही बाबतींत स्पष्टता ठेवावी. एक तर काम करून घ्या आणि योग्य पैसे द्या किंवा काम देऊच नका. काम जास्त आणि पैसे कमी, हे सूत्र अंतिम वाटाघाटींत स्वत:च्या सांसारिक जबाबदार्यांसाठी कलाकाराला तडजोड करून स्वीकारावं लागतं, असं कसं?
ज्यांना कलेचं वेड आहे, ते एखाद्या कामात पूर्णपणे झोकून देऊन काम करतात; कारण त्यांना कलेसाठी ते करावंसं वाटतं. ते केल्यानंतर समजा लक्षात आलं की, एवढं काम करून त्या तुलनेत पैसे मिळालेले नाहीत, तेव्हा त्याच्यातला कलाकार मरत असतो, त्याचं काय?…’’
अरिजित सिंगचा शोध असा वेगवेगळ्या नागमोडी वळणांवर प्रवास करत राहतो. त्यात त्याला भविष्यात सुरू करायची असलेली संगीत शाळा, ‘तत्त्वमसि’ ही सामाजिक काम करणारी स्वयंसेवी संस्था असेही तुकडे मिळतात. या सगळ्याच्या विश्लेषणात लक्षात येतं की, अरिजित सिंग हे ज्या काळाचं अपत्य आहे, त्यातली व्यावहारिकताही त्याला कळते आणि संगीतात झालेल्या बदलांचीही त्याला नीट व्याख्या करता येते, पण कलाकार म्हणून निरंजन मनानं फक्त गात राहण्याच्या सुखाच्या शोधातही तो असतो. ते सुकर नाही, किंबहुना बर्याचदा अडखळतच होत असतं.
जागतिकीकरणानंतरच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात आलेला गोंगाट अरिजितच्याही गाण्यांत आहेच. पण तरी त्यात त्याला त्याची अभिव्यक्ती शोधावीशी वाटते आणि तो त्याच्या परीनं ते वेड जपत राहतो, हे महत्त्वाचं. अन्यथा, स्वत:च्याच गाण्यांच्या वाद्यवृंद संयोजनाची चिरफाड करून, त्यात पुन्हा नव्या ध्वनीच्या शक्यता शोधण्याची आणि त्याचे प्रयोग रंगमंचावर करत राहण्याची व्यावहारिक जोखीम स्वीकारायची वृत्ती पुन:पुन्हा उचंबळून वर आली नसती.
मेलडी किंवा माधुर्याचा काळ जगण्यातच फार नाही, त्यामुळे अभिव्यक्तीतही साउंड किंवा ध्वनीच वरचढ असणार, हे तो ज्या काळात काम करतो आहे, त्याचं संवेदन आहे. याचा अर्थ त्याला पूर्वसुरींचं योगदान वगैरे मान्य नाही असं नाही, तर काळाच्या पुढे जाण्यासाठी मागे किती अडकायचं, याचं भान आवश्यक असल्याची ती जाणीव आहे. म्हणूनच त्याचा ‘ऑटोट्युन’ला विरोध नसतो, तर उत्तम ध्वनीची असोशी असते. पण मग याच ध्वनीच्या अतिरेकानंतर निर्माण होणार्या कोलाहलानं त्याला नकोसंही केलं असेल का? ठोस सांगता येत नसलं, तरी त्याच्या शोधातील काही तुकडे काही उलगड्यांपर्यंत पोहोचवतात.
गायक म्हणून नाही, तर व्यक्ती म्हणून अरिजित सिंग कसा आहे, या प्रश्नाच्या उत्तरात एका मुलाखतीत तो म्हटला आहे, ‘‘आपलं नाव हा एक बोध असतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी. आधी मला माझ्या नावाशी जवळीक वाटायची, पण जसजसे ते लोकप्रिय झाले, तेव्हा ते केवळ माझं नाव राहिलं नाही, तो एक दृष्टिकोन बनला.
प्रत्येक जण त्याच्या त्याच्या दृष्टीने त्या नावाचा विचार करतो… आता मी कोण, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर अवघड आहे. एक तर या ‘मी’चं अतिशय छोटं जग असतं, त्याच्या त्याच्या पुरतं. त्यात राहायचं ठरवलं, तर ते छान आहे. ते सोडलं, तर त्या ‘मी’चा विस्तार होतो. मुळात ‘मी’ जो काही असतो, ते कदाचित एक मिश्रण असतं काही डेटा आणि आठवणींचं. मी जसा झोपतो, चालतो, किंवा ज्या काही गोष्टी करतो त्या सवयींचा मिळून ‘मी’ असतो. या ‘मी’शी, माझ्या नावाशी माझी जवळीक संपायला लागली, तेव्हा मी माझा नव्यानं शोध घ्यायला सुरुवात केली…’’
आता त्याच्या पार्श्वगायनातून निवृत्तीच्या घोषणेत तो काय म्हणतो पाहा, ‘‘नमस्कार, सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. श्रोते म्हणून इतकी वर्षं तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलंत, त्यासाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत. मी आता पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवे काम न करण्याचे ठरवले असल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. मी हे सोडतो आहे. हा प्रवास खूपच विस्मयकारक होता.’’ अरिजित सिंग त्याचे रंगमंचीय कार्यक्रम करत राहणार आहे आणि पार्श्वगायन सोडताना त्याला आनंद होत आहे, असंही तो म्हणतो आहे. त्यामुळे आता रंगमंचीय कार्यक्रमांत त्यानं आतापर्यंत जे पार्श्वगायन केलं, ते तो ऐकवेल आणि श्रोत्यांची मनं रिझवेलही, पण तो आता त्यात नवीन काय करतो आहे, त्याचीही उत्सुकता असेल. कारण, स्वत:चा नव्यानं शोध घेण्याची त्याची प्रक्रिया गाण्यांतूनच अभिव्यक्त होईल.
हा नव्या पिढीचा गायक बोलताना गाण्याला फक्त चाल म्हणत नाही किंवा तेवढ्यापुरतं त्या गाण्याला बांधूनही ठेवत नाही. तो संगीतनिर्मिती अशी संज्ञा वापरतो, त्याच्या प्रक्रियेबद्दल बोलतो, त्यात काम करत राहतो आणि कदाचित ते जगतोही. अरिजित सिंगनं पार्श्वगायन थांबवणं यामुळे चित्रपटसृष्टीचा काही तोटा वगैरे होत नसतो. भरभरून गुणवत्ता असलेले अनेक नवे गायक संधीसाठी रांगेत उभे आहेत आणि तसंही आता पार्श्वगायन हे फक्त नायक-नायिकेच्या तोंडची कथा-व्यथा, संवादापुरतं राहिलेलं नाही, तर ते कथेचं, कधी ती पुढे नेण्याचं किंवा कधी एखाद्या प्रसंगांपुरतचं पार्श्वगायन अधिक झालं आहे, जवळपास पार्श्वसंगीतासारखं.
ध्वनी उमटत आहेत, ते पार्श्वभूमीवर, जसे आपल्याही जगण्याच्या पार्श्वभूमीवर सदैव उमटत आहेत यंत्रे, गाड्या, बांधकामे यांच्या आवाजांपासून सण-उत्सवांत वाजणार्या ध्वनिवर्धकांपर्यंत. त्यात एखादा पार्श्व आवाज स्वत:हून कमी होऊन म्हणत असेल की, मी आता यापासून विलग होतो, स्वत:ला शोधतो, त्याचा प्रवास मला जो जाणवेल, तो माझ्या कार्यक्रमांतून व्यक्त करतो, तर ठीकच आहे. षड्ज पकडून सगळ्यांनीच राज्य करण्यापेक्षा एखादा त्या षड्जानजीकचा कोमल निषाद किंवा कोमल रिषभ झाला, तर असं ‘नॉइज कॅन्सलेशन’ कलाकाराच्या आणि आपल्या जगण्यातही हवंच.
कुणी सांगावं, मेलडीवर वरचढ ठरणारा साउंड सतत पार्श्वभूमीवर वाजत राहणार्या या कोलाहलकाळात अरिजित सिंगला आणि आपल्याला आपापले आवाज शोधताही येतील.
siddharth.kelkar@expressindia.com
