प्रवीण दशरथ बांदेकर
‘काळे खादला हा अवघा आकार। उत्पत्तिसंहारघडामोडी।।’

कसलासा एक संदर्भ शोधण्यासाठी गाथा घेऊन बसलो होतो. अचानक तुकोबांचा हा अभंग दृष्टीस पडला. डोक्यातले विचार आपसूकच या अभंगाच्या अनुषंगाने वळते झाले. अनेकदा असं होतं. आपण काहीतरी वेगळ्या कामात, वेगळ्या विचारांत असतो. अचानकच त्याला कलाटणी मिळावी असं भलतंच काहीतरी समोर येतं. आपल्या मनाला अधिक गुंतवणारं. आपण नकळतच पहिलं विसरून जातो. समोर आलेल्या नव्या विचारात हरवून जातो. असंही होतं, की आधीच्या विचारांत हेही मिसळून जातात; तिसरं नवंच काही त्यातून घडत जातं. म्हणजे एकच एक बीजमूळ वा शाश्वत म्हणता येईल असंही काही नसतं. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, पुढचं नवं, आणखीन नवं असं सतत निर्माण होत असतं. निसर्गनियमच आहे हा. आपल्या हजारो, लाखो वर्षांच्या आजवरच्या जगण्यातले सगळे चढउतार पोटात रिचवणारा अखंड वाहता काळ या सगळ्याला साक्ष असतो. बाकी कुणाला यातलं आधलं वा नंतरचं काय कळत असतं?

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

त्या- त्या कालखंडात वा एखाद्याच्या आयुष्यात महत्त्वाच्या वाटलेल्या कैक गोष्टी अविनाशी काळाच्या ओघात कशा दुय्यम होऊन जातात हेही आपण कायमच अनुभवत आलो आहोत. तरीही आपण कित्येकदा विचित्र का वागत असतो? निव्वळ कुठल्यातरी अतक्र्य योगायोगाने आपल्या वाटय़ाला आलेल्या काळाच्या छोटय़ाशा तुकडय़ात आपल्या हातात आलेली एखादी गोष्ट जणू काही कायमस्वरूपी आपल्यासाठीच निर्माण झालेली आहे असं आपल्याला का वाटत असतं? किती भलभलत्या गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात! आपलं आयुष्य, आपली मुलंबाळं, पुढच्या सात पिढय़ांसाठी काही साठवून ठेवणं.. किती काय काय.. गोष्टी कशा बघता बघता निर्थक, हास्यास्पद होऊन जातात आपल्याला कळतही नाही.

मध्यंतरी माळ्यावरच्या ट्रंकेत काहीतरी हुडकताना जुन्या, काळवंडलेल्या कागदपत्रांचा एक गठ्ठा हाती आला. त्यात मुंबईकर काकांनी आजोबांना पाठवलेली काही पत्रं होती. बरीचशी जमिनीच्या एका तुकडय़ाच्या संदर्भात होती. गोव्याच्या सीमेलगत असलेल्या घरापाठच्या डोंगरात आमची ती दीड-दोन एकर जमीन होती. त्यात काही काजूची वगैरे झाडंही होती. पण दोन्ही चुलते नि माझे वडीलही नोकरीनिमित्त गावापासून लांब असल्याने आणि आजोबांच्या स्वभावाचा फायदा घेऊन भावकीतलेच काही लोक त्या जमिनी हडप करू बघत होते. गावी असलेल्या आजोबांनी थोडं लक्ष घालून जमिनी कशा राखल्या जातील ते पाहावं, त्यासाठी हवं तर आपण कोर्टात केस घालू या- असं काहीबाही त्या पत्रांतून चुलत्यांनी कळवलेलं होतं. पण आजोबा पडले तुकोबांचे वारसदार. त्यांनी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, की असं असं होतंय म्हणूनही कुठे वाच्यता केली नाही. आजोबांचं म्हणणं होतं, ‘तुम्ही सगळे आपापल्या जागी नोकरीधंद्यात स्थिरावला आहात, तर काय करायचा आहे तो तुकडा मिळवून? जे कुणी तो लाटायला बघतायत तेही कुणी परके थोडेच आहेत? आपल्याच रक्ताची ती माणसं आहेत. घेऊ दे त्यांना तो घ्यायचाय तर. आपलं काय अडणार आहे त्यापासून?’ चुलते गावी आले की या गोष्टींवरून घरात आजोबांशी नि बाहेर त्या भावकीतल्या लोकांशी जोरदार भांडणं व्हायची. शिवीगाळ व्हायची. पुढे कोकणी लोकांच्या लौकिकाला जागून त्या किरकोळ डोंगराळ जागेसाठी कोर्टकचेऱ्याही वर्षांनुवर्षे सुरू राहिल्या. त्यात पैशांची नासाडी नि मन:स्तापाशिवाय फारसं काही हाती लागलं नाही. पण हे कुणी कुणाला सांगायचं? ते ऐकायला तरी आता कोण हयात राहिलं आहे? माणसं भांडतात, एकमेकांची डोकी फोडतात, मरून जातात. इतिहास उकरून काढताना वाटतं, इतकं काय होतं त्या गोष्टीत? का या लोकांनी इतका अट्टहास केला? कशासाठी आपल्याच माणसांशी आयुष्यभराचं वैर घेतलं? आजोबा म्हणत होते तशी आपणहून देऊन टाकली असती जमीन- तर किती भरलेलं राहिलं असतं सगळंच. आपापसातले संबंधही दुरावले नसते. माणसं जोडलेली राहिली असती.

पण मुद्दा तोही नाहीये. पुढे त्या जमिनींचं काय झालं? भावकीतल्या ज्या कुणी त्या जमिनी तलाठी वगैरे मंडळींना हाताशी धरून आपल्या नावावर लावून घेतल्या होत्या, त्या जमिनी गेल्या काही वर्षांत मायनिंग कंपन्यांनी दहशत नि गुंडगिरीच्या मार्गानी अक्षरश: कवडीमोलाच्या किमतीनं विकत घेतल्या. पुढे मायनिंग सुरू झालं नि डोंगराच्या पायथ्याशी असलेली यांची वडिलोपार्जित घरं हादरू लागली. आता तर पावसाळ्यात नवाच धोका समोर येऊ लागलाय. झाडं तोडून उघडेबोडके झालेले, पोखरले गेलेले डोंगर आता दर पावसाळ्यात खचू लागले आहेत. जरा पाऊस वाढला की बघता बघता मातीचे ढिगारे कोसळू लागतात. चिखलामातीचं पाणी घरांत शिरू लागतं. दर पावसाळ्यात मनात भीती घोंगावू लागते : आता कधीही हा पोकळ डोंगर खाली येईल; आपल्याला आपल्या घरादारांसकट, जनावरांसकट पोटात घेईल.

अशा वेळी मनात येतं- खरंच, काय मिळवलं या आधल्या पिढय़ांनी एकमेकांची डोकी फोडून, रक्ताच्या नात्यामधले संबंध बिघडवून? आपल्या या अविचारी, नतद्रष्ट वारसदारांच्या याच भविष्यासाठी हा अट्टहास केला होता का त्यांनी? त्यापेक्षा मग या सगळ्या व्यवहारात कायम उदासीन राहू पाहणारे आमचे आजोबाच शहाणे म्हणायचे. त्यांना हे काळाचं करणीकरतुत आधीच दिसलं होतं. ज्या गोष्टीसाठी क्षुल्लक स्वार्थ उरीपोटी कवटाळून आपलीच माणसं तोडायची, माणुसकी हरवून बसायची, त्या गोष्टीचं भविष्य काय आहे; ज्यांच्यासाठी हे करायचं ती माणसंही पुढे काय दिवे लावणार आहेत, कशी आपल्याच अस्तित्वाच्या मुळावर येणार आहेत, नसत्या हव्यासापायी कसं सगळंच संपवून बसणार आहेत, हे त्यांच्या तुकोबानेच त्यांना दाखवून दिलं होतं. गोष्टीतल्या त्या वाल्या कोळ्याला कसं वाटत असतं- आपण इतक्या लोकांना लुटतोय, इतकी माणसं जीवानिशी मारतोय.. हे सगळं आपण आपल्या बायकामुलांसाठीच तर करतोय! पण कसचं काय? ‘माझ्या पापात भागीदार व्हायला कोण कोण तयार आहेत?’ म्हणून विचारल्यावर सगळ्यांनीच हात वर केले.. ‘तुझं तू बघ काय ते!’ ‘जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी’ असं तुकोबा म्हणतात ते उगाच नाही. पण वाल्या कोळ्यासारखं समजा आपणही विचारलं आपल्या पुढच्या पिढय़ांना.. तर काय उत्तर मिळेल? काय हाती येईल? दोन पिढय़ांमागच्या आमच्या पूर्वजांची साधी नावंही माहीत नसणारे आम्ही- आम्हाला काय देणंघेणं आहे त्यांनी काय केलं नि कशी ही सगळी क्षेत्रं राखली याच्याशी? हे कळत असतानाही आपण माझं.. माझं करत मिळेल ते ओरबाडण्याचा आयुष्यभर प्रयत्न करत असतो. आपलं पोट भरून वाहत असलं तरी पुढच्या न पाहिलेल्या सात-सात पिढय़ांसाठी बेगमी करून ठेवत असतो.. याला काय म्हणायचं?

चिमूटभर स्वार्थापायी माणसं कशी माणुसकी विसरतात हे पदोपदी आजूबाजूला दिसत असतं. अर्थात आपणही काही फार वेगळे, धुतल्या तांदळासारखे नसतो. आपणही त्याच मातीपासून बनलेलो असतो. आपले अहंकार, आपले समज, गैरसमज, स्वार्थ मनाचा थोडासा मोठेपणा दाखवून आपल्याला बाजूला का टाकता येत नाहीत? माझी काहीच चूक नसताना मी का नमतं घेऊ, या अहंमुळेच जिवाभावाची माणसं दुरावत जातात. नाती तुटतात. मैत्रीपूर्ण स्नेहबंध बघता बघता मातीमोल होऊन जातात. काही काळाने क्वचित आपल्याला आपला तो मूर्खपणा जाणवूनही येतो. पण तोवर बऱ्याचदा उशीर झालेला असतो. काळ काही आपल्याला उपरती होईल, आपण पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी, चुका सुधारण्यासाठी हात पुढे करायला जाऊ म्हणून आपल्यासाठी थांबून राहिलेला नसतो. तोवर माणसं खूप दूर निघून गेलेली असतात. अनेकदा तर अनंताच्या प्रवासालाही निघून गेलेली असू शकतात. अशा वेळी मग हळहळत बसण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरलेलं नसतं. लहानपणी नाही का, एवढय़ा तेवढय़ा कारणावरून भावंडांशी किंवा दोस्तांशी गट्टी फू करत असायचो आपण. तेव्हा ‘अट्टी गट्टी कायमची सुट्टी, बारा वर्षे बोलू नको, तोंड माझं तू बघू नको’ असं काहीतरी रागारागाने आपण म्हणत असू, ते आठवतंय. बारा वर्षे तोंडही न बघण्याचं कारण काय, तर त्या दोस्तानं आपला पेन्सिलीचा तुकडा हरवलेला असे, किंवा बहिणीनं आपल्याला न देताच चिंचेचं बेटूक एकटीनंच खाल्लेलं असे. या पोरकटपणाचं आता हसू येत असलं तरी आज वय वाढल्यावरही आपल्या या वृत्तीत फरक पडलाय असं मात्र बिलकूल वाटत नाहीये. फार फार तर एकमेकांकडून करत असलेल्या अपेक्षांचं स्वरूप बदललं असेल.. आपला अहं अधिकच टोकदार झाला असेल.. बाकी सगळं तेच आणि तसंच.

अलीकडेच मी गेल्या शतकभराचा आपला महाराष्ट्रीय लोकांचा काळ सामाजिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून समजून घेण्याच्या दृष्टीने काही मान्यवरांची आत्मचरित्रं, पत्रव्यवहार वगैरे वाचत होतो. त्यात समाजसुधारक होते, राजकीय नेते होते, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, उद्योजक असे वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगार लोक होते. बरीचशी आत्मचरित्रे आपल्या चुकांचं समर्थन करण्यासाठी लिहिलेली नि प्रांजळपणाचा अभाव असलेली असतात, हा भाग सोडून देऊ. पण त्यातही एक गोष्ट मला ठळकपणे जाणवत राहिली होती. ती गोष्ट त्या मोठय़ा लोकांच्याच बाबतीत नव्हे, तर तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीतही दिसून येते. ती म्हणजे- काळाच्या ओघात अत्यंत क्षुल्लक सिद्ध होणारे हेच आपले हेवेदावे, क्षुद्र अहंकार, किरकोळ गोष्टींसाठीचे स्वार्थ आणि त्यातून कायमसाठी दुखावली गेलेली माणसं! ही दुखावलेली माणसं मग अनेकदा तुमच्यावर डूख धरून तुमच्याबरोबरच तुम्ही समाजासाठी करत असलेल्या कामातही आडकाठी निर्माण करतात; सगळ्यांचंच कायमस्वरूपी नुकसान करतात. क्वचित ती आपल्यापासून दुरावलेली माणसंही तेवढय़ाच तोलामोलाची असू शकतात. त्यांच्यासोबतीनं आपण आपलं काम पुढे नेलं असतं तर अधिक भरीव आणि समृद्ध काही निर्माण होऊ शकलं असतं. पण दोघांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे ती शक्यता संपून गेलेली असते. नंतरच्या आयुष्यात दखलपात्र म्हणावं असं ना आपल्या हातून काही काम होत, ना त्या आपल्या साथीदाराच्या हातून. नुकसान दोघांचंही. त्याहीपेक्षा आपल्या समाजाचंही! आपण म्हणतो, हा दुहीचा शापच आहे आपल्या लोकांना. पण इतिहासात वाचून, समजून घेऊनही आपण पुन्हा पुन्हा तसेच का वागत राहतो, याला उत्तर देता येत नाही. आम्ही मागील पानावरूनच पुढे चालत राहिलेले असतो. कधी आपल्याआधी घरातल्यांनी डाळिंबाचे दाणे खाल्ले म्हणून शीघ्रकोपानं वंशनिर्मितीची शक्यताच कायमसाठी खुडून टाकणारी लेखिका भेटते, तर कधी आपली ज्येष्ठता डावलून अमक्या तमक्या कनिष्ठाला पद दिलं म्हणून डोक्यात राख घालून आपलं संशोधन नष्ट करून टाकणारा कुणी तपस्वी अभ्यासक!  अशा कित्येकांनी एवढय़ा तेवढय़ा क्षुल्लक कारणावरून स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं किती नुकसान केलं आहे हे पाहताना विलक्षण हळहळ वाटत राहते. एकीकडे त्यांचं हे असं वागणं पोरकट आणि हास्यास्पद वाटत असतं; ही इतकी विद्वान, प्रतिभावान, विवेकी माणसं अशी का वागली असावीत असंही मनात येत राहतं, तर दुसरीकडे या त्यांच्या वागण्याचे काळाच्या ओघात पुढे अनुभवाला आलेले गंभीर परिणाम पाहून अस्वस्थही वाटत राहतं.

माणसं अशी स्वतंत्र बेटासारखी, स्वयंभू असल्यासारखी का वागत असावीत? आपापल्या अहंकाराचे दिवे जाळून त्याच्या धगीनं आसपासच्या आपल्याच माणसांना चटके देताना असा कोणता आनंद मिळत असेल त्यांना? परिचयाच्या एका बाईनं परवा नवऱ्याला नि मुलाला महामारीची लागण झाली म्हणून भावंडांना मदतीसाठी बोलावलेलं. तर सगळ्यांनी तिची कोंडी करत म्हटलं, ‘दोन वर्षांपूर्वी वडील गेले तेव्हा त्यांच्या स्थावर-जंगम इस्टेटीत आपल्यालाही वाटा हवा म्हणून तूच भांडली होतीस ना? भावांवर खटले भरले होतेस ना? मग आता कुठच्या तोंडानं आम्हाला विचारतेयस?’ आणि या महामारीत तिचा मुलगा गेल्यावरही त्यांचं बोलणं असंच होतं- ‘घेऊन बस आता उरावर. याच पोरासाठी इस्टेट मागून घेतली होतीस ना? आता कुणाला देणार आहेस?’

माणसांमध्ये इतकी टोकाची असंवेदनशीलता, पराकोटीचं क्रौर्य कुठून येत असावं? कितीही आटापिटा केला, डोकी फोडली तरी सगळं इथंच ठेवून जाणार आहोत आपण- हे आजोबांसारख्या गेल्या शतकातल्या एखाद्या अडाणी शेतकऱ्याला कळलं होतं, ते आमच्यासारख्या काळावर स्वार होऊन आधुनिकतेचे पंख लावून जगू पाहणाऱ्यांना कळत नाहीये, हेच खरं.

samwadpravin@gmail.com