प्रवीण दशरथ बांदेकर
आरडाओरडा. किंकाळ्या. रेटारेटी. गोंधळाच्या या पार्श्वभूमीवर अचानकच गर्दीतली एक स्त्री हातातलं मूल जिवाच्या आकांताने कुंपणापलीकडे फेकते. किंचाळणारं ते मूल जमिनीवर पडता पडता तिथला एक पोलीस शिपाई कसाबसा झेलतो. कुंपणापलीकडून ती बाई आभाळाकडे हात उंचावत विनवते आहे, ‘काहीही कर, पण त्याला वाचव. माझं काही खरं नाही, पण माझं हे मूल तरी मरू देऊ नकोस..’

पाठोपाठ मग अशा अनेक जणी. कुंपणापलीकडे फेकली जाणारी अनेक मुलं. वैतागलेले पोलीस आता बायकांवर खेकसतायत. झेलली न गेलेली कित्येक मुलं खाली पडतायत. जमिनीवर आपटतायत. जीवघेणा आकांत करतायत. काही सगळं संपून मुकाट झालीयत. निपचित पडलीयत.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर
mamata banerjee injured viral photo two unrelated incidents are being shared as proof of mamata banerjee faking her recent head injury
ममता बॅनर्जींच्या कपाळावर झालेली ‘ती’ जखम खोटी? समोर आली फोटोंमागची खरी बाजू

प्रचंड कोलाहल माजला आहे सर्वत्र. बायका-मुलांच्या आक्रोशानं सगळा आसमंत भरून गेला आहे. जिवाच्या भयानं घरदार सोडून पळत सुटलेली माणसं भेदरून गेली आहेत. कुठे जातील ती? काय करतील? कशी जगतील? त्यांच्याइतकेच आपणही अस्वस्थ झालो आहोत.

ही कुठल्या थरारक सिनेमातली दृश्यं नाहीत. कथा-कादंबऱ्यांतली वर्णनंही नाहीत. याच काळात आपल्या आजूबाजूला घडत असलेलं हे वास्तव आहे. समाजमाध्यमांतून जगभर फैलावत गेलेलं हे वर्तमान चित्रित केलेले असे कितीतरी व्हिडीओज् गेल्या काही दिवसांपासून आपल्यापर्यंत पोचले आहेत. विलक्षण कासावीस होतोय आपण हे सारं पाहताना. श्वास रोखून एकेक दृश्य आपण पाहत असतो. ध्यानीमनी नसताना अचानक मुलाला फेकल्याचं पाहताना आपल्या काळजाचे ठोके चुकतात. जमिनीवर आपटण्याआधी त्याला झेललं गेल्याचं पाहताना आपल्याला हायसं वाटतं. त्या बायका-मुलांचा आक्रोश आपल्याही डोळ्यांत पाणी आणतो. फेकली जाणारी ती मुलं, त्यांचं आपटणं, धोपटणं, आरडाओरडा पाहताना आपण सून्न होऊन जातो. विलक्षण शरम वाटत राहते आपल्याला आपल्या माणूसपणाची.

असे असंख्य प्रसंग आपल्यापर्यंत पोचतायत. क्षुल्लक कारणांसाठी माणसांना गोळ्या घालून ठार मारलं जात आहे. कधी अंगभर बुरखा न पांघरल्याने, तर कधी हक्काच्या पुरुषाला सोबत न घेता घराबाहेर पडल्याने. बाईने पुरुषी सत्तेच्या विरोधात चुकूनमाकूनही असं यत्किंचितसं स्वातंत्र्य घेऊ पाहिलं तरी धर्म बुडू शकतो. धर्म वाचवायचा तर प्रायश्चित्तही भोगलंच पाहिजे. धर्मापेक्षा मोठं काहीच नसतं. ना राष्ट्र, ना कुठला नागरिक.. हेच वारंवार ठसवलं जातंय सगळ्या दृश्यांतून.

हे अनुभव आता कुण्या एकाच देशापुरते मर्यादित राहिलेत असंही नाही. जगभरात अनेक ठिकाणी हे सुरू आहे. धर्म-संस्कृतीच्या नावाखाली माणसांचे होणारे छळ, माजवली जाणारी दहशत, भेदरलेल्या माणसांचं निर्वासित होणं, हे इतिहासात सतत घडत आलं आहे. मागे वळून पाहताना प्रत्येक वेळी जाणवत राहतं, माणसं आपल्यासारख्याच इतर माणसांशीही किती क्रूरपणे वागत असतात. आपणच निर्माण केलेल्या रूढी-परंपरांच्या, नीतिनियमांच्या नावाखाली किती निर्दयपणे त्यांना जिवानिशी संपवतात. काळ बदलला, माणसं आधुनिक जगण्याशी जोडली गेली, सभ्य-सुसंस्कृत झाली, आचार-विचारांमध्ये फरक पडला, तरीही माणसाच्या मनातला सैतान अजूनही त्याच पूर्वापार जोशात कुदत राहिला आहे.

हे पाहत असताना, याविषयी विचार करताना मला माझे पूर्वज आठवतात. त्यांच्या मानसिक नि शारीरिक छळाच्या इतिहासात वाचलेल्या हकिकती आठवतात. पंधराव्या शतकाच्या अखेरीस कधीतरी माझे पूर्वज आपली प्रिय गोमंतक भूमी सोडून, देवधर्म गुंडाळून घेऊन परागंदा झाले होते. जिथे कुठे मुळं रुजवणं शक्य झालं तिथे तिथे विखुरले गेले होते. बरेचसे या प्रदीर्घ यातनामय प्रवासात नष्टही होऊन गेले होते. त्यांची नामोनिशाणीही कुठे उरली नाही. काहींनी नाइलाजानं धर्म बदलला, स्वत:ला बदलवलं आणि आपली घरंदारं, शेती-बागायती सांभाळत ते गोव्यातच टिकून राहिले. काही आसपासच्या डोंगर-रानांत लपून राहिले, झगडत राहिले, कसेबसे तगून राहिले. काहींनी गावं सोडून, घरंदारं टाकून कोल्हापूर, बेळगाव, कारवार, सावंतवाडी अशा सीमेवरच्या भागांतून आश्रय घेतला. परिस्थितीच्या रेटय़ासमोर दबून नाव-गाव, जातपात, कूळ, देव सगळं सोडून वेगळ्या नव्या ओळखीसह शिल्लक राहिले. इतिहासाची ही पाळंमुळं खणून काढताना अनेकदा हाती फक्त माती नि दगडधोंडेच येण्याची शक्यता असते. कधी आपल्या डोळ्यांदेखतच इतिहासाला कशी कलाटणी मिळते तेही आपण पाहत असतो. भलभलत्या गर्व आणि अस्मितांचे झेंडे वाहत आत्मघोषात हरवून गेलेल्या आम्हाला या गोष्टीशी काही देणंघेणंही नसतं. अनेकदा इतिहास दडपला गेलाय, भलताच काहीतरी समोर आणला गेलाय हे कळूनही आपण उदासीन असतो. गोव्याच्या इतिहासाबाबतही काहीसं असंच झालं आहे. कशाचंच काही वाटू नये अशा एका विचित्र काळात आपण जगत आहोत हेच जास्त खरं आहे.

पंधराव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीजांनी गोव्यावर ताबा मिळवला. पोर्तुगीज राजाने तेव्हा  आपल्या ताब्यातील सगळ्या वसाहतींचा धर्म एकच असला पाहिजे असं फर्मावलं होतं. साहजिकच गोव्यातही त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. जेत्यांच्या हाती असलेल्या साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या आयुधांचा वापर करून माणसांना धर्म बदलणं भाग पाडलं जाऊ लागलं. धर्म बदलला की संस्कृतीही बदलणं आलंच. धर्म आणि संस्कृती म्हटलं की त्यात सगळ्याच गोष्टी आल्या. थोडक्यात, तुम्ही तुमचं सगळं अस्तित्व विसरून जावं, तुमचा याच जन्मात वेगळ्या रूपात पुनर्जन्म व्हावा अशीच पोर्तुगीज राजाची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी तुम्हाला तुमचा सगळा भूतकाळ, इतिहास, परंपरा, देव, धर्म, संस्कृती सगळं विसरून जायचं होतं.

हा कालखंड गोव्याच्या इतिहासात ‘इन्क्विझिशनचा- धर्मसमीक्षणाचा काळ’ म्हणून ओळखला जातो. धर्म बदलावा म्हणून दबाव टाकण्यासाठी वेगवेगळ्या आरोपांखाली माणसांना अडकवलं जात होतं. धर्म बदलायची तयारी दाखवली तर शिक्षेत सूट; अन्यथा किरकोळ गुन्ह्यसाठीही मृत्युदंडासारखी शिक्षा ठोठावली जात असे. कधी जातीपातीच्या, दारिद्य््रााच्या खाईत खितपत पडलेल्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं आणि आर्थिक उन्नतीचं आमिष दाखवून गळाला लावलं जात होतं. तर कधी एखाद्याला पद्धतशीरपणे कायद्याच्या कचाटय़ात अडकवून फसवलं जात होतं. पण कुणी जबरदस्तीने वा परिस्थितीवश होऊन धर्मातर केलं तरी इतक्या पिढय़ान् पिढय़ांपासून त्याच्या रक्तात रुतलेल्या संस्कृतीने व्यापलेली त्याची मानसिकता थोडीच बदलता येत होती? माणसं मारूनमुटकून धर्म बदलून दुसऱ्या धर्मात गेली तरी मनाने आधीच्याच धर्मात राहिलेली असायची. आदल्या चालीरीती, परंपरा, सवयी अशा एकाएकी सोडता येतात का? त्यामुळे मग कितीही निक्षून बजावलेलं असलं तरी मूळच्या धर्माप्रमाणे आचरण कळत-नकळतपणे घडत होतं. यासाठीच धर्मसमीक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. डोळ्यांत तेल घालून ती मंडळी हे पाहत असायची. कुणाच्या दारी तुळशी वृंदावन दिसलं, कुणाच्या घरातून घंटानाद ऐकू आला, आरतीचे वा प्रार्थनेच्या भजनांचे सूर आले, कुण्या बाईने कपाळावर कुंकू लावलं, पायात जोडवी घातली की त्यांना करकचून बांधून, मारत, झोडत, फरफटत ओढत धर्मसमीक्षण सभेसमोर आणलं जायचं. गुन्ह्यची सुनावणी व्हायची. गुन्ह्यच्या स्वरूपाप्रमाणे भयंकर शिक्षांना सामोरं जावं लागायचं. मुख्य शिक्षा असायची हातपाय तोडण्याची. डोळे उखडून टाकण्याची. किंवा जिवानिशी मारून टाकण्याची. ज्या हाताने घंटा वाजवली, ज्या हातांत सौभाग्यलेणं म्हणवल्या जाणाऱ्या हिरव्या बांगडय़ा घातल्याचं आढळून आलं, ते हात कापून टाकले जायचे. ज्या बोटांनी कपाळावर कुंकू लावलं, पोथ्यांची पानं उलटली, ती बोटं कातरली जायची- तोडून टाकली जायची. या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी ‘हातकातरा खांब’ उपयोगात आणला जात होता.

आज पाच-सहाशे वर्षांनंतरही तो हातकातरा खांब तिथे आहे. त्या काळ्या दिवसांच्या असंख्य रक्तरंजित आठवणींना साक्ष असलेला.. त्यामध्ये सहभाग असलेला. गोव्याच्या या देखण्या भूमीनं पोर्तुगीज राजवटीत सोसलेल्या जीवघेण्या अत्याचारांचा इतिहास पोटात रिचवून तो उभा आहे. ओल्ड गोव्याच्या सुप्रसिद्ध सेंट झेवियर चर्चच्या मागे, पणजीहून नव्या हायवेने ओल्ड गोव्याकडे येताना गांधीजींच्या पुतळ्याआधीच्या चौकात हा स्तंभ दिसेल. गोव्यातल्या इन्क्विझिशन कालखंडाचा इतिहास नाकारू पाहणाऱ्यांच्या मते, पोर्तुगीज राजवटीत गुन्हेगारांना शिक्षा द्यायची ती केवळ एक जागा होती. त्याचा संबंध धर्मातरितांच्या छळाशी जोडणं चुकीचं आहे. गुन्हेगारांना शिक्षा द्यायची जागा- हे तरी मान्य केलं गेलं हेही कमी नाहीये. पण मग प्रश्न येतो की, असे कोणते गुन्हेगार होते ते? कुठची माणसं? काय गंभीर गुन्हे केले होते त्यांनी? या प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांच्यापाशी नाहीत. सुशेगाद आणि सोबित गोयच्या इतिहासाच्या पोटातली अशी किती गुपितं कायमची दडपली गेली असतील, कसं कळावं?

पर्यटक म्हणून गोव्यात गेल्यावर ओल्ड गोव्यातलं सेंट झेवियरचं भव्यदिव्य चर्च आणि आसपासचा देखणा परिसर पाहणं हा गोवादर्शन टूरमधला एक अपरिहार्य भाग असतो. तिथला गाईड आपल्याला सेंट झेवियरची महती सांगतो. सुमारे ५०० वर्षांपासून प्रिझव्‍‌र्ह करून ठेवलेल्या नि दरवर्षी तीन डिसेंबरला दर्शनासाठी काचपेटीतून बाहेर काढण्यात येणाऱ्या त्याच्या डेड बॉडीविषयी सांगतो. त्यादरम्यान तिथं भरणाऱ्या दहा दिवसांच्या होडल्या फेस्ताविषयी आणि त्याला हजेरी लावणाऱ्या जगभरच्या पर्यटकांविषयीही उत्साहाने ऐकवतो. एखादा इतिहासाचं थोडंफार ज्ञान असलेला गोमंतकातील स्थानिकांच्या मौखिक सांगोवांगीच्या गोष्टींशी सरमिसळ करून आणखीनही काही ऐकवू शकतो. त्यातून आपल्याला कळतं की, या संत झेवियरमुळे तेव्हा गोव्यावरचं एक मोठं संकट टळलं होतं. पोर्तुगीज गोव्यातील देवळं फोडत होते, बाटवाबाटवी करत होते, तेव्हा त्यांचा बीमोड करण्याच्या हेतूने गोव्यावर चाल करून जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना तेव्हा सीमेवरच्या बांदा की पेडणे गावातून अचानक तातडीने माघारी फिरावं लागलं होतं. इकडे स्वराज्यावर काहीतरी तसंच संकट आल्याचं कळल्याने महाराजांना गोव्याची ही मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. पण त्यामुळे गोवा मराठय़ांच्या विनाशापासून वाचला, हे त्या संतामुळे झालं, असंच लोकांना सांगण्यात येऊ लागलं. आपसूकच लोकांच्या मनात त्याची प्रतिमा चमत्कार घडवून आणलेल्या संतमहात्म्याची होऊन गेली असावी असंही म्हटलं जातं.

हे घडून आलं असतं तर गोव्याचा विनाश झाला असता की तिथल्या लोकांची जुलमी पोर्तुगीजांपासून सुटका झाली असती, याविषयी आपण फक्त तर्कच करू शकतो. पण तूर्तास ते बाजूला ठेवू या. इथं आलेल्या पर्यटकांना सेंट झेवियरचा महिमा सांगणारा कुठलाही गाईड त्या चर्चशेजारच्या हातकातऱ्या खांबाविषयी मात्र काहीही सांगत नाही. कुणी विचारलं तरी त्याला त्याविषयी काही  ठाऊक असेलच असं नाही. खरं तर ‘हातकातरा’ या संबोधनामध्येच तो जीवघेणा काळाकुट्ट  इतिहास दडलेला आहे. पोर्तुगीज राजाने धर्मसमीक्षणाची जबाबदारी ज्या मोजक्या लोकांवर सोपवली होती, त्यांपैकी एक संत झेवियरही होता. त्याच्याच नावाने प्रसिद्ध असलेल्या चर्चमागे हा हात तोडण्याचा स्तंभ असावा हा काही निव्वळ योगायोगाचा भाग म्हणता यायचा नाही.

हातकातरा खांब ही त्या रक्तरंजित दिवसांची एक कटु आठवण आहे. धर्माध पोर्तुगीजांनी अशा किती लोकांचे हातपाय तोडले, किती जणांना जिवंत गाडले, किती मंदिरं उद्ध्वस्त केली, किती प्राचीन मूर्त्यां, शिलालेख फोडले, दुर्मीळ  ग्रंथसंपदा जाळली.. या कालखंडाचे असंख्य तपशील अ. का. प्रियोळकर, पांडुरंग पिसुर्लेकर, स. शं. देसाई अशा गोव्यातील अनेक अभ्यासक संशोधकांनी नोंदवले आहेत. पण हातकातऱ्या खांबासारखा या धर्माधाच्या इतिहासाचा एखादा मूक पुरावाही पुरेसा बोलका असतो. आपल्याला त्या काळात घेऊन जात अनेक गोष्टींविषयी तो सांगू शकतो. या धर्मसंकटातून जीव वाचवण्यासाठी आपल्या घरादारावर कायमचं तुळशीपत्र ठेवून, देव आणि पोथ्यापुराणं घेऊन देशोधडीला लागलेल्या आमच्या पूर्वजांपैकीही कुणाला तिथं हात गमवावे लागले असतील, कुणी सांगावं!

वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतरित झालेल्या जगभरातील लोकांविषयीची पुस्तकं वाचताना, चित्रपट बघताना माझे ते वाडवडील आठवत राहतात. गाव सोडून जाताना काय मनात आलं असेल त्यांच्या? बायका-मुलांना घेऊन लपतछपत, उन्हापावसातून, काळोखातून, डोंगररानांतून, दऱ्यांतून प्रवास करीत या संस्थानाच्या गावापर्यंत कसे येऊन पोचले असतील ते? वाटेत काय खाल्लं असेल? कुठे झोपले असतील? अंगावरचे कपडे शिल्लक उरले असतील का? काय काय झालं असेल? बाहेर पडताना किती माणसं होती असतील? किती पुरुष, किती स्त्रिया, किती मुलं? नव्या जागी स्थिरावेपर्यंत किती, कोण कोण उरले असतील? वाटेत किती संघर्ष करावा लागला असेल? असंख्य प्रश्न.. कधीही समाधानकारक उत्तरं न मिळणारे.

साधं एक घर बदलून दुसरीकडे जातानाही आपण किती अस्वस्थ होतो. तिथल्या जगण्याशी जोडलेल्या असंख्य गोष्टी आठवून किती गलबलून येतं आपल्याला. मला तर एक-दोन दिवस वास्तव्य केलेली हॉटेलची रूम सोडतानाही उदासवाणं वाटत असतं. वडिलांच्या नोकरीमुळे बदली झाली की आधीचं ते गाव, घर, शाळा, शेजारीपाजारी, मित्रमंडळी- सगळं सोडून नव्या ठिकाणी जाताना लहानपणी किती रडू यायचं. पण माणसं तर देश सोडून, आदल्या जगण्याच्या सगळ्या खाणाखुणा पुसून टाकून दुसरीकडे कशी काय जात असतील? नव्या जगण्याला कसं सामोरं जात असतील?

गोव्यात लोकप्रिय असलेलं एक पारंपरिक कोकणी लोकगीत आठवतंय. नदीपलीकडे जाऊ इच्छिणारी बाई होडीवाल्या तारयाला उद्देशून म्हणते-

‘हांव् तार्यां पल्तडी वयतां,

कामुल्र्या कामाक्वय्तां,

माका साय्बां वाट कळां नां,

माका साय्बां वाट दाखय रे..’

आमचे पूर्वज कधीकाळी नदीकाठच्या या गावात स्थिरावले तेव्हा सावंतवाडीच्या राजानं त्यांना लोकांना होडीतून तारून पलीकडे नेण्याचं काम दिलं होतं. एका अर्थी तेव्हा हे पूर्वजच लोकांना वाट दाखवत होते, तारून सुखरूप पैलतीरी पोचवत होते. आताही या अशा संभ्रमाच्या दिवसांत त्यांना साद घालून म्हणावंसं वाटतं, ‘हांव सायबां पल्तडी वयता, माकां सायबां वाट दाखय रे..’

samwadpravin@gmail.com