scorecardresearch

अरतें ना परतें.. : तुझ्या माघारी मी

गावातल्या विठोबाच्या देवळात वर्षभर काही ना काही सुरू असायचं.

अरतें ना परतें.. : तुझ्या माघारी मी

प्रवीण दशरथ बांदेकर

गावातल्या विठोबाच्या देवळात वर्षभर काही ना काही सुरू असायचं. कधी पोथ्यापुराणांचं वा गाथा- ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांचं वाचन, तर कधी एकादशी वा तशाच काही विशेष प्रसंगांच्या निमित्तानं कीर्तनं, भजनं, दहिकाले, दशावतारी नाटकं, धालोत्सव हेही होतंच. पोथी वाचणारे गुरुजी मधे मधे आपलं निरूपण ऐकवायचे. अशाच एका वाचनामध्ये त्यांनी रामायणाच्या प्रारंभीचा एक प्रसंग वाचून त्यावर आपलं भाष्य केलं होतं. क्रौंच पक्ष्यांची जोडी नदीकाठी प्रणयक्रीडा करत असताना अचानक एक पारधी बाण सोडतो. त्या जोडीतला एक पक्षी त्या बाणाची शिकार होतो. तडफडत प्राण सोडतो. रक्तबंबाळ झालेल्या आपल्या जोडीदाराची प्राणांतिक तडफड बघताना दुसऱ्याचं नुसतं आक्रंदन सुरू असतं. काही वेळातच तो दुसरा मागे उरलेला पक्षीही आपला प्राण सोडतो. हे दृश्य पाहत असताना अस्वस्थ झालेल्या वाल्मिकीला रामायण ‘दिसू’ लागलं होतं.

 तेव्हा हे असं काही ऐकत असताना वाल्मिकीचाच काय, आमचाही जीव अगदी कसनुसा होऊन जात असे. डोळ्यांच्या कडाही ओलावत असत. मनात यायचं, जोडीदाराच्या विरहामुळे व्याकूळ होऊन प्राणत्याग करणारा तो दुसरा पक्षी नर असेल की मादी? नवऱ्यावर जीवापाड प्रेम असलेल्या बायकांनी नवऱ्याच्या माघारी प्राणत्याग केल्याचं ऐकलं होतं. गोष्टीच्या पुस्तकांमध्येही तसं वाचलं होतं. त्यामुळे पारध्याच्या बाणाला बळी पडला तो नर पक्षी असावा नि त्याच्या विरहदु:खाने व्याकूळ होऊन प्राण सोडलेली मादी असावी असंच काहीसं डोक्यात गच्च बसलेलं. कितीही दु:ख झालं तरी पुरुष असं काही करायचा नाही असं वाटायचं. याचं कारण लहानपणापासूनच आसपासच्या सामाजिक वातावरणानं मनात ठसवलेली पुरुषाची विशिष्ट प्रतिमा. बाईच्या तुलनेत काहीसा कणखर, रूक्ष आणि कोरडा वाटणारा पुरुष. समाजानंही त्याला विशेष मुभा दिलेली. त्यामुळे जोडीदार गेला म्हणजे आता आपलं सगळं संपलं, आपण एकटे पडलो, समाजाच्या दृष्टीने काहीतरी भयंकर गोष्ट घडली आयुष्यात, जगण्याचं काही प्रयोजनच उरलं नाही असं समजण्याचं काहीच कारण नव्हतं. पत्नी अकाली गेल्यानंतर दुसरं, तिसरं लग्न केल्याची उदाहरणं अगदी आमच्या गावात, नात्यात आणि कुटुंबातही होती. बाईनं असं काही केल्याचं मात्र आसपास दिसत नव्हतं. उलट, बारा-तेराव्या वर्षी बालविधवा होऊन माहेरी येऊन राहिलेल्या नि उरलेलं आयुष्य भावांच्या पोराबाळांची हगणीमुतणी काढण्यात, भावजयांच्या संसारात धुणीभांडी करत आश्रितासारखं घालवलेल्या बाया तर अगदी घरातही होत्या. साहजिकच हे कळत होतं की, पुरुषाला काही कारणाने आपला जोडीदार गमवावा लागला तरी तो काही फारसं दु:ख वाटून घेत नाही, तो नव्याने संसार थाटतो. नव्या जोडीदाराच्या साथीने आधीचं सगळं विसरून जगरहाटीला सामोरा जातो. सामाजिक व कौटुंबिक जीवनात जबाबदाऱ्या अंगावर घेऊन वावरताना आधलं जगणं विसरून नव्या नातेसंबंधांत, नव्या आयुष्यात समरस होतो. ज्या समाजव्यवस्थेने त्याच्यासाठी तशी सोय करून ठेवली आहे त्याच व्यवस्थेने बाईला मात्र ती मुभा दिलेली नाही. जोडीदार अकाली जाऊ दे किंवा संसारसुख पूर्णपणे उपभोगून उत्तरायुष्यात जाऊ दे, बाईच्या वाटय़ाला दु:खात खितपत पडणं, रूढी-परंपरांचे जाच भोगत राहणं, आत्मसन्मानाला ठेच पोचवणारे उघड वा छुपे अपमानास्पद प्रसंग नजरेआड करत जगत राहणं, हेच आजही बव्हंशी आहे. कुटुंबातले सण-उत्सव, पारंपरिक कार्यक्रम असोत की सार्वजनिक जीवनातला तिचा सहभाग असो, तिला तिच्या जोडीदाराविना जगण्याचा विसर पडू नये, त्याची तिला सतत जाणीव होत राहावी याची भरभक्कम तरतूद केलेली दिसेल.

पंडित नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांचं सासर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यतल्या निवती या गावी आहे. त्यांचे पती रणजीत सीताराम पंडित यांचं हे मूळ गाव. तिथं आजही त्या पंडितांचं वडिलोपार्जित घर, जमीनजुमला वगैरे आहे. लग्नानंतर एक-दोनदा त्या नवऱ्यासोबत या गावी येऊन गेल्या होत्या. विजयालक्ष्मी पंडितांनी लिहिलेल्या एका आठवणीनुसार, त्यांच्या नवऱ्याच्या अकाली निधनानंतर त्यांच्या सासरच्या मंडळींनी नवऱ्याच्या मृत्यूसाठी अप्रत्यक्षपणे त्यांनाच जबाबदार धरलं होतं. सासरच्यांच्या मते, विजयालक्ष्मीबाईंच्या नशिबी विधवा होणं असल्याने पंडित कुटुंबाला आपला मुलगा गमवावा लागला होता. विधवा होणं, पंडितांच्या घराण्याचा वंश पुढे चालवणारा मुलगा नसणं (त्यांना दोन्ही मुलीच होत्या.) अशी कारणं पुढे करून कुटुंबीयांनी त्यांना संबंधच तोडून टाकायला भाग पाडलं. त्यांना घराच्या नि प्रॉपर्टीच्या हिश्शात सहभागी करून घ्यायलाही नकार दिला. खरं तर पंडित नेहरूंची बहीण एवढीच काही विजयालक्ष्मीबाईंची ओळख नव्हती. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेली आणि पुढे स्वतंत्र भारताच्या राजकारणात महत्त्वाच्या पदांवर काम केलेली एक कर्तृत्ववान स्त्री म्हणूनही त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं होतं. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला होता. पण एखाद्या स्त्रीने सामाजिक जीवनात कितीही कर्तबगारी गाजवली, पुरुषांच्या बरोबरीने नावलौकिक प्राप्त केला तरी आमचा समाज तिचं स्त्री असणं, विधवा असणं, पुत्रहीन असणं विसरू शकत नाही, हे कुणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारं सामाजिक वास्तव आहे. पत्नीच्या माघारी किंवा पत्नी, घरसंसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या वगैरंेकडे सोयीस्करपणे पाठ फिरवून एखाद्या पुरुषाने सामाजिक वा राजकीय कर्तृत्व दाखवून दिलं तर मात्र ती याच समाजात विशेष उल्लेखनीय गोष्ट ठरू शकते, ही विसंगतीही लक्षात घेण्यासारखी आहे. 

कॉलेजच्या दिवसांत कधीतरी यशवंतराव चव्हाणांविषयीचं एक पुस्तक वाचेपर्यंत माझ्या मनात साधारणत: ही अशीच कल्पना ठाम होती. म्हणजे पुरुष हे काहीसे निगरगट्ट, कर्तव्यकठोर आणि भावनाहीन असल्याने जोडीदाराच्या जाण्यानंतरही रोजच्या जगण्यात फारसे भावनिक तरंग उठू न देता आधीच्याइतक्याच कणखरपणे आपल्या जगण्यात व्यग्र राहिलेले असतात. इतकी वर्षे आपल्याला साथ केलेली आपली प्रिय पत्नी अध्र्या वाटेवर साथ सोडून गेली आहे याचं दु:ख ते आपण अंगीकारलेल्या कामांमध्ये लक्ष गुंतवून, स्वीकारलेल्या कौटुंबिक वा सामाजिक जबाबदाऱ्या निभावताना नजरेआड करू शकतात. तसं करताना मनाला आलेलं म्लान सहजपणे बाजूला टाकू शकतात असं मला वाटत होतं. मात्र, यशवंतरावांच्या पत्नी वेणूताई गेल्यानंतर ते किती एकाकी झाले होते, किती परावलंबी बनले होते, देहातील चैतन्यच हरवल्याप्रमाणे निष्क्रिय बनले होते, एक प्रकारची उदासीनता त्यांच्या सगळ्या उर्वरित जगण्याला कशी व्यापून राहिली होती, हे वाचताना या समजुतीला बऱ्यापैकी तडा गेला होता. वेणूताई गेल्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यातल्या दिवसांविषयी वाचताना वाईट तर वाटलं होतंच, पण सार्वजनिक जीवनात समाजाचं कणखर नेतृत्व केलेल्या त्यांच्यासारख्या कर्तबगार पुरुषाच्या बाबतीत असं काही व्हावं याचं नवलही वाटलं होतं. खरं तर यामागे अनेक भावनिक आणि त्या दोघांच्या व्यक्तिगत जगण्याशी जोडलेली अनेक कारणं असू शकत होती. बाहेरून त्यांच्याविषयी असं जाणून घेताना आपल्याला ती कळतीलच असं नाही. प्रा. मधू दंडवतेही त्यांच्या राजकीय, सामाजिक जीवनात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या- प्रमिलाताईंच्या निधनानंतर किती एकटेपण अनुभवत होते हेही पाहिलं होतं. वि. स. खांडेकर व मेघ:श्याम शिरोडकर या जोडीने सुरू केलेल्या ‘वैनतेय’ या नियतकालिकाचे पन्नासहून अधिक वर्षे संपादन केलेल्या सावंतवाडीतल्या जयानंद मठकरांच्या पत्नीचं निधन झाल्यावर त्यांचंही असंच एकाकी होत जाणं, सार्वजनिक व कौटुंबिक व्यवहारांपासून अलिप्त होत जाणं मी पाहिलं, तेव्हा काही गोष्टी नव्याने जाणवत गेल्या.

मला असं वाटतं की, परस्परांवरचं निस्सीम प्रेम तर असतंच; पण असे अनेक पुरुष रोजच्या जगण्यातल्या अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठीही त्यांच्या सहचारिणीवर अवलंबून असतात. कदाचित लहानपणी आईवर अवलंबून असलेले काही लोक नंतरच्या आयुष्यात बायकोवर अवलंबून राहत असावेत. शेवटी ती आधी गेली तर ते पूर्णपणे परावलंबी होतात, कोलमडून पडतात असंही असू शकतं. अर्थसंकल्पातील आकडेवारी तोंडपाठ असलेल्या दंडवतेंना घरातलं अर्थकारण माहीत नव्हतं. यशवंतरावांना घरात कुठल्या खोलीत कुठची वस्तू आहे माहीत नव्हतं. थोरामोठय़ांचं कशाला, आपल्यापैकी अनेकांना रोजचे कपडे, रुमाल, टॉवेल, नाश्ता, चहापाणी, जेवण, औषधं अशा कित्येक बारक्यासारक्या गोष्टींसाठी बायकोचीच सवय झालेली असते. घरातलं स्वयंपाकपाणीच नव्हे, तर पैपाहुणे, कुळाचार, सणवार, मुलांची शिक्षणं, लग्नं, कौटुंबिक नातेव्यवहार, उपासतापास, देवधर्म अशा असंख्य ‘घरगुती व्यावहारिक’ गोष्टी बायकाच सांभाळत असतात. हयातभर या गोष्टींविषयी अनभिज्ञ असलेल्या पुरुषाची तिच्या माघारी मग या गोष्टी करताना भंबेरी उडते. चिडचिड होऊ लागते. त्याला स्वत:ला या गोष्टी जमत नाहीत, नि सुनेने वा लेकीने केलेल्या मनासारख्या वाटत नाहीत. पदोपदी जोडीदारासाठी त्याचं अडत राहतं. प्रत्येक गोष्टीत तिचा स्पर्श, तिचा आवाज, तिच्या आठवणी त्याला जाणवत राहतात. माया, प्रेम, भांडण, हेवेदावे सगळ्यासहित तिचं हक्काचं त्याच्यासाठी असणं आता उरलेलं नाही, ही जाणीव त्याला सैरभैर बनवते. त्याचं अस्तित्व कणाकणानं संपवत जाते. 

आपल्या जोडीदारामुळे आपल्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली याची जाणीव असलेलेही काही स्त्री-पुरुष असतात. जोडीदारासोबत जगलेला सहजीवनातील प्रत्येक क्षण त्यांचं आयुष्य समृद्ध करून गेलेला असतो. अशा जोडीदाराचं आपल्या आयुष्यात येणं जितकं अनपेक्षित होतं, तसंच काही वेळा त्यांचं आकस्मिकपणे निघून जाणंही धक्कादायक असतं त्यांच्यासाठी. जोडीदाराच्या जाण्यामुळे त्यांचं विव्हल होऊन जाणं आपल्यालाही कासावीस करतं. कॉम्रेड भारत पाटणकरांची फेसबुकवरची एक भावनिक पोस्ट वाचताना माझंही असंच झालं. ‘सुटला सखीचा हात, आता स्वत:त सामावलेल्या सखीशी हितगुज करायचं..’ पाटणकरांनी लिहिलेले हे शब्द वाचताना काही क्षण गलबलल्यासारखं झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या सखीचं- त्यांची जीवनसाथी असलेल्या विदुषी डॉ. गेल ऑम्वेट यांचं निधन झालं. या दोघांचं सहजीवन हा खरं तर अनेकांच्या कुतूहलाचा विषय. आपल्या प्रेमाखातर अमेरिकेसारखा संपन्न देश कायमसाठी सोडून भारतातल्या सर्वार्थाने अभावग्रस्त अशा खेडय़ात येऊन राहिलेल्या, तिथलं कार्यकर्त्यांचं जाडंभरडं आयुष्य मनापासून स्वीकारलेल्या आपल्या या प्रिय सखीविषयीच्या असंख्य आठवणी कॉम्रेड पाटणकरांनी कवितेच्या माध्यमातून लिहिल्या आहेत. नुकतंच या कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं. पण ते पाहण्याआधीच डॉ. पाटणकरांची ‘सखी’ मात्र दूरच्या प्रवासाला निघून गेली होती. जिच्यामुळे आपल्यातील पुरुषाला खरंखुरं स्त्रीत्व समजून घेता आलं, ते आपल्याही व्यक्तित्वात भिनवता आलं, ती आपल्या आयुष्याची जोडीदार निघून गेल्यावर पाटणकरांच्या मनाची अवस्था काय झाली असावी हे समजून घेणं फारसं अवघड नव्हतं. पुढच्या काही दिवसांत जयंत पवार या लेखकमित्राच्या अकाली जाण्यानंतर त्याच्या पत्नीनं- संध्याताईने लिहिलेले शब्दही असेच अस्वस्थ करणारे होते. जयंतचं जाणं मराठी रंगभूमी, पत्रकारिता, कथा आणि सांस्कृतिक व्यवहाराविषयी आस्था असलेल्या प्रत्येकालाच चटका लावणारं होतं. पण जयंत आणि त्याची सहचारिणी यांच्यातील भावबंधाविषयी माहिती असलेल्यांसाठी ते अधिकच विषण्ण करणारं होतं. कविवर्य महानोरदादांच्या पत्नी निवर्तल्यावर त्यांचीही अवस्था ‘झाडाला सोडून वेल गेली’ अशीच झाली होती. आ. ह. साळुंखे, सुरेश द्वादशीवार, भंवरलाल जैन अशा अनेकांनी अध्र्या प्रवासात साथ सोडून गेलेल्या आपल्या जोडीदाराविषयी खूप आस्थेवाईकपणे लिहिलं आहे. लोकरामायणातल्या गोष्टीत मुलांना जन्म देऊन सीता नाहीशी होते.. भूमीमध्ये परत जाते. सीतेच्या मागे आता आपलं काही जगण्याचं प्रयोजन उरलं नाहीये, या विचाराने दु:खी झालेला राम लक्ष्मणाला मुलांना जंगलात नेऊन सोडायला सांगतो आणि आपण संन्यस्त वृत्ती धारण करून वनात निघून जातो. विचार करताना हेही भारतीय मानसिकतेला जवळ जाणारं वाटत राहतं.

हे निव्वळ प्रेमापेक्षाही अधिकचं असं काहीतरी असतं असं मला नेहमी वाटतं. नवरा-बायको या व्यावहारिक नात्याच्या पलीकडचं हे असू शकतं. हे जे काही असतं त्याला शब्दांत पकडता येणं अवघड असतं. त्याला समाजाच्या मान्यतेची, त्यांच्या टीकाटिप्पणीची वा सहानुभूतीची काही गरज नसते. आयुष्यभर एकमेकांच्या अस्तित्वातच जणू ही दोन वरकरणी स्वतंत्र वाटणारी व्यक्तिमत्त्वं एकरूप होऊन गेलेली असतात. दोघांपैकी एकाचा देह या जगातून आधी निघून गेला तरी त्या एकजिनसी बनून गेलेल्या अस्तित्वाचा लोप होऊ शकत नाही. उरलेला देह त्या समृद्ध सहअस्तित्वाला जपत आपली नैमित्तिक कर्तव्ये निभावून नेत असतो. म्हणूनच संध्या नरे-पवार लिहितात, ‘तू आहेसच, आत आत खोल खोल, पेशी पेशी रक्त रक्त, रंध्र, रंध्र श्वास श्वास, निर्गुण निराकार, अखेरचा करार..’

वडिलांची आई गेली तेव्हा ते आणि सोबतची जुळी आत्या दोघं जेमतेम चार वर्षांची होती. पाठीमागे आणखीन एक दीडेक वर्षांची बहीण. आजी गेल्यापासून घरसंसारातून लक्ष उडून आजोबा तुकोबासारखे निरिच्छ झालेले. तशातच एकदा अचानक घरातून ते गायब झाले. कुणी सांगायचं, त्यांना पंढरपूरला पाहिलं, दाढी वगैरे वाढलेली, कमरेला एक काष्टी होती फक्त, बाकी उघडे. कुणी  सांगायचं, स्मशानवैराग्य आलंय, त्यांचा नाद सोडा. मग एके दिवशी ते घरापाठीमागच्या डोंगरात आल्याचं कळलं. सोबत राम आणि सीतेची मूर्ती घेऊन आले होते. राम-सीता होती की विठ्ठल-रुखमाई, कोण जाणे. काळवंडलेल्या, टवके उडालेल्या त्या मूर्ती होत्या. मुलांनी खूप विनवल्यावर ते एकदाचे घरी यायला राजी झाले. घरी आले; पण घरात पाय टाकण्याआधी दारातल्या नदीकडे गेले. पंचात गुंडाळलेल्या मूर्तीतली सीतेची मूर्ती पाण्यात विसर्जित केली. एकटा राम डोईवर मिरवत घरी आणून देव्हाऱ्यात मांडला. अजूनही तो राम की विठ्ठल- जो कुणी असेल तो आहे तिथं. जोडीदाराच्या माघारी गंध-फुलं अंगावर सोसत देवघरातल्या काळोखात एकाकी उभा आहे.

आधी वारा येतो आणि पाठोपाठ पाऊस येतो सोबत करायला. बघता बघता हळूहळू वारा निघून जातो. फक्त पाऊसच उरतो. अनेकदा असं होतं. वारा गेल्यानंतरचा पाऊस निव्वळ कर्तव्यभावनेनं पडत असतो का? तेव्हा पावसाचा सगळा जोम निघून गेलेला असतो की मलाच तसं वाटत असतं? कसं कळावं?

samwadpravin@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या