अरतें ना परतें.. : एका फुरेगाम्याचं स्वगत

खरं तर आपल्याला आपल्या सगळ्या कृती-विकृतींसह समजून घेऊ शकतील अशी चार-दोनच माणसं असतात आपल्यापाशी.

प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com

आपल्या वाटय़ाचा काळ आता संपत आला आहे, ही जाणीव अलीकडे वारंवार होते. काहीतरी वाचत असताना अचानक मनात येतं, कदाचित हे शेवटचं पुस्तक ठरू शकतं आपण वाचलेलं. लिहिता लिहिता मध्येच थबकायला होतं. हे शेवटचंच तर ठरणार नाहीये ना, हा विचार लिहिता हात अडवतो. विद्यार्थ्यांसमोर बोलताना, आवडीचे मासे खाताना, मित्रांशी गप्पा मारताना, रात्री झोपताना प्रत्येक वेळी हे असं सगळं करायला उद्याचा दिवस उजाडलेला असेल ना आपल्यासाठी, असंच काहीतरी मनात असतं. असा विचार करणं नकारात्मक आहे हेही कळत असतं. पण अरते परते वाढत चाललेलं अनिश्चिततेचं, संभ्रमाचं आणि भयाचं वातावरण टाळता येत नाही. त्यामुळेही कदाचित ही दु:स्वप्नं सतावत असतील. रात्री-अपरात्री दचकवून जागं करत असतील.

हे असं वाटणं केवळ आपल्या व्यक्तिगत जगण्या-मरण्याशीच नव्हे, तर आपल्या सामाजिक अस्तित्वाशीदेखील जोडलेलं आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. मृत्यूच्या वार्ता चहू दिशांनी सतत कानी येत असतात. काही वेळापूर्वीच आपल्याशी फोनवर बोललेला मित्र गेल्याचं अचानक कळतं. कसलाही हासभास नसताना माणसं निघून जातात. गेलेल्यालाही कळत नाही की मागे उरलेल्यांनाही : असं कसं झालं हे? असा कसा निघून जाऊ शकतो कुणी? अशीच एखाद्या दिवशी आपलीही वार्ता येईल. धक्का बसून आपण हळहळतो, तसे बाकीचेही आपल्यासाठी काही दिवस हळहळतील. यापरते त्यात आता वेगळं काही उरलेलं नाहीये.

पण या अशा मृत्यूंपेक्षाही धक्कादायक मला दुसरीच गोष्ट वाटते आहे. आपलं सामाजिक अस्तित्व, आपली वैचारिक ओळख, संवेदनशील असणं हळूहळू धूसर होत चाललं आहे. आपण एक तर्कशुद्ध, विवेकी, विज्ञाननिष्ठ विचार करू शकणारा माणूस म्हणून मरत चाललो आहोत, हे जास्त भयंकर आहे. हजारो पिढय़ा खर्ची घालून मिळवलेली सर्वाधिक सुसंस्कृत नि बुद्धिमान प्राणी ही आपली ओळख डोळ्यांदेखत पुसली जाऊ लागणं क्लेशदायक आहे. आपल्या या मरणाविषयीही आजकाल फारसं काही कुणाला वाटेनासं झालं आहे. उलट, असं मरण जेवढं जास्तीत जास्त लवकर येईल तितकं बरं, असंच जणू अनेकांना वाटू लागलं आहे. अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या एखाद्या म्हाताऱ्या जीवामुळे घरातील सगळ्या माणसांची अडचण व्हावी, तो जेवढय़ा लवकर जाईल तेवढं बरं, असं वाटत राहावं, तसं काहीसं हे झालं आहे. त्यामुळेच की काय, अनेकांनी आपल्या या सामाजिक अस्तित्वाची तिरडी बांधायची तयारीही करून ठेवली आहे. काहीजण हे अस्तित्व जास्तीत जास्त लवकर नामशेष होऊन जावं म्हणूनही सातत्याने प्रयत्न करत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे अशा सामाजिक बुद्धिवादी विचारांविषयी आस्था असलेल्यांनाच या ना त्या प्रकारे खच्चीकरण करत राहणं. कधी त्यांना ‘फुरेगामी’, ‘फेक्युलर’ किंवा अशाच काहीबाही आचरट संबोधनांनी हिणवणं, कधी वैचारिक दहशतवादी म्हणून लेबल लावणं, कधी देवाधर्माची चेष्टा करणारे, समाजाच्या भावना दुखावणारे समाजाचे वादी, दुष्मन वा नास्तिक, पाखंडी म्हणून त्यांची प्रतिमा लोकांसमोर आणणं- अशा अनेक गोष्टी. खरं तर पुरोगामी म्हणजे नेहमी पुढे जाणारे. सत्याच्या सूर्याच्या प्रकाशात वाटचाल करणारे. पुढे जाणं म्हणजे प्रगती करणं. अज्ञानाचा काळोख ओलांडून उजेडाच्या दिशेने पाऊल टाकणं. आजवर आपण हेच तर करत आलो आहोत ना? पण समाजाला पुढे घेऊन जाणारेच आजकाल आम्हाला आमचे शत्रू वाटू लागले आहेत. आम्हाला पुन्हा मागे जायचं आहे. ज्या अंधारातून आम्ही आलो तो अंधारच आम्हाला जास्त प्रिय वाटतो आहे. पुढे दिसणाऱ्या सूर्याचे तेज आमच्या अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना सहन होईनासे झाले आहे. त्यामुळे पुढे जाण्याची आस बाळगणारे सगळेच या जगातून लवकरात लवकर नष्ट होऊन जावेत यादृष्टीने आम्ही पावलं टाकायला सुरुवातही केली आहे.

कधीपासून सुरुवात झाली असावी या सगळ्याची? आपल्या सुसंस्कृत सामाजिक जगण्याचा आपल्याच हाताने गळा घोटण्याची ही अवदसा आपल्याला का आठवली असावी? आणि नेमके कोण जबाबदार आहेत या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीला? स्वत:च्याच आजवरच्या जगण्याच्या अनुषंगाने शोध घ्यायचं म्हटलं तर काही सापडेल का? हे सगळंच इतकं गुंतागुंतीचं आहे की, एकास एक पद्धतीनं हे काळे आणि हे पांढरे असं म्हणून उत्तरं देता येणार नाहीत. पुरोगाम्यांनी परंपरापूजक सनातन्यांकडे बोट दाखवावं आणि सनातन्यांनी फुरेगाम्यांवर निशाणा साधावा, इतकं साधं-सरळ आहे का हे? आपल्यापैकी प्रत्येक जण या ना त्या प्रकारे जबाबदार आहे या परिस्थितीला, हे नाकारून कसं चालेल? म्हणूनच स्वत:शी प्रामाणिक राहत माझ्यापुरतं या प्रश्नाच्या किमान अवतीभवती तरी जाता येतंय का, हे पाहण्याचा प्रयत्न करावासा वाटतोय.

कोकणातल्या बहुतेक घरांत असतं तसं माझ्याही गावातलं आणि घरातलं वातावरण. नेमकेपणानं सांगायचं तर बऱ्यापैकी पारंपरिक आणि रूढीग्रस्त. काही काही बाबतीत तर अगदी सनातनी म्हणता येईल असं. स्त्रियांवर रूढींची बंधनं. कपडय़ा-कुंकवापासून वेणीफणीपर्यंत आणि मासिकधर्मापासून क्रियाकर्मापर्यंत. जन्म, लग्न, मृत्यू आणि वेगवेगळे धार्मिक प्रसंग यांच्याशी जोडलेली असंख्य कर्मकांडं. बारक्यासारक्या बाबतीतही खटकत राहणारा कर्मठपणा. सत्तरच्या दशकात जन्माला आलेल्या माझ्यासारख्याला आज पन्नासेक वर्षांनंतरही यात फार काही फरक पडलाय असं म्हणता यायचं नाही, इतकी स्थितिशीलता इथल्या जगण्याला व्यापून राहिलेली. विरोधाभास असा की, एकीकडे यच्चयावत सगळ्या आधुनिक गोष्टींचा दैनंदिन जगण्यात समावेश करतानाही आपल्या या परंपरावादी असण्यात काही विसंगत आहे असं मात्र कुणालाच वाटत नाही.

पण अशा संस्कारांतून येऊनही माझ्या पिढीतल्या अनेकांची जगाकडे मोकळेपणानं बघण्याइतपत नजर स्वच्छ होत गेली ती पुस्तकं, संपर्कात आलेली अनुभवसंपन्न, अभ्यासू माणसं आणि सामाजिक चळवळींतल्या सहभागामुळे. साधारणत: नव्वदच्या दशकापर्यंत शाळा, महाविद्यालये, वाचनालये, काही सेवाभावी संस्था ही अशा वैचारिक संस्कारांची केंद्रं होती. पुढे आयुष्यभर पुरणाऱ्या अनुभवांची शिदोरी आणि विचारांची बैठक पक्की करणाऱ्या कितीतरी गोष्टी इथंच भेटत होत्या. कधी व्यासंगी, बुद्धिमान प्राध्यापकांच्या रूपात, कधी पुस्तकांच्या स्वरूपात, तर कधी शाळा-महाविद्यालयांना जोडून घेत केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळींच्या माध्यमांतून. माझ्याबाबतीत तरी हे असंच झालं होतं. माझ्या महाविद्यालयीन दिवसांत दक्षिण कोकणात समाजवादी विचारांचं बऱ्यापैकी प्राबल्य होतं. साने गुरुजींपासून ते पुढे बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते किंवा अप्पासाहेब पटवर्धन, ना. ग. गोरे, जयानंद मठकर, ज्ञानेश देऊलकर, बबन डिसुझा अशा समाजवादी विचारधारा पुढे घेऊन जाणाऱ्या कितीतरी समर्पित वृत्तीच्या मंडळींचा मोठाच संपन्न वारसा या भूमीला लाभला होता. राजकारणापेक्षाही समाजकारणात, समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचून लोकशाही मूल्यांची रुजवण करण्यात त्यांना जास्त रस होता. यांतल्या अनेकांच्या वैचारिक सहवासाबरोबरच या विचारसरणीशी संबंधित राष्ट्र सेवादल, छात्रभारती, दस्तानायक शिबिरं अशा संस्था किंवा उपक्रमांशी मी जोडला गेलो होतो.  राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा घटकांशी संबंधित गोष्टींची चिकित्सा करणारी विचारप्रवर्तक व्याख्यानं, चर्चा, वादविवाद आणि या दिवसांत कॉलेजच्या लायब्ररीत दिवसचे दिवस बसून वाचलेली जगभरातल्या लेखकांची असंख्य पुस्तकं अशा काही गोष्टींमुळे आपसूकच आसपासच्या जगण्याचं आणि जगण्यातल्या विसंगतींचंही भान येत गेलं. बदललेल्या वैचारिक जाणिवांमुळे घरातल्या त्या पारंपरिक गोष्टींतलं फोलपणही जाणवू लागलं. हळूहळू त्या गोष्टींविषयीची नाराजी व्यक्त करण्यावरून, त्या गोष्टी करायला नकार दिल्यामुळे घरच्यांशी चकमकी उडणं सुरू झालं. उदाहरणच द्यायचं तर एकदा गावातला आमच्या भावकीतला कुणीतरी म्हातारा वारल्याने सुतक होतं. नेमकं तेव्हाच मी कुठल्यातरी कार्यक्रमासाठी मुंबईला जायचं होतं म्हणून नवीन शर्ट खरेदी केलेला. तर सुतकाच्या दिवसांत नवं वस्त्र घरात आणलं म्हणून बाबांनी तणतणायला सुरुवात केली. वैतागून तेव्हा मी तो नवाकोरा शर्ट एका भिकाऱ्याला देऊन टाकला होता. कितीतरी किरकोळ गोष्टींवरून असे सततचे संघर्ष. अशावेळी मग आपण एका बाजूला आणि घरचे सगळे दुसरीकडे असं चित्र निर्माण व्हायचं. जे घरात, तेच गावातही. तिथंही यापेक्षा वेगळी काही परिस्थिती नव्हती. गावातल्या कुणालाच आपले विचार पटत नाहीत, आपल्या माघारी आपल्याला अतिशहाणा, माणूसघाणा, पुस्तकी पंडित वगैरे म्हणून कुचेष्टा केली जातेय, हेही मनोमन खच्चीकरण करणारंच होतं. आपल्याच माणसांशी जुळवून घेताना आपली दमछाक होतेय, हे अशातून सतत जाणवत राहायचं. कुटुंबासोबत, गावातल्यांसोबत वावरायचं तर त्यांना दुखावून चालणार नाही, पण मनाविरुद्ध न पटणाऱ्या गोष्टी करत राहायच्या तर आपलीही काहीशी गोची होतेय असं वाटून भयंकर अस्वस्थता यायची. अनेकदा घराशी, कुटुंबाशी, गावातल्या मित्रांशी, नातेवाईकांशी अगदी तुटून जावं इतके टोकाचे वादविवाद झाले. त्यातून काही जण कायमचे दुखावले गेले, फटकून वागू लागले, तर काही जणांनी माझ्याविषयी भलभलते गैरसमज करून घेतले. हे असं माझ्या बाबतीत घडलं असं मी म्हणत असलो तरी माझ्यासारख्या अनेकांच्या बाबतीतही असं घडत होतं. काही वेळा असंही व्हायचं की, हे लोक आता सुधारणेच्या पलीकडे गेले आहेत, यांच्याशी आपलं काही जुळायचं नाही असं वाटून सगळ्यांकडे पाठ फिरवून काही जणांनी आपलं स्वतंत्रपणे जगणं सुरू केलेलं. गाव, घर, कुटुंब, सगळे पाश, सगळी मुळं तोडून टाकून आपल्याला पटतील त्या विचारांची पाठराखण करीत जगत राहिलेले कितीतरी मित्र माझ्या आजूबाजूला दिसत होते. जगाला सुधारताना घराला सुधारता आलं नाही याची खंत करणंही विसरून गेलेले.

आता विचार करताना वाटतंय, हीदेखील आपली एक प्रकारची आत्मवंचनाच नव्हती का? किंवा एक प्रकारचा तुच्छतावादही? माझ्या माणसांशी माझी वैचारिक नाळ जुळत नाही, त्यांच्याशी जोडून घेणं मला मूर्खपणाचं वाटतंय म्हणून मी त्यांच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले होते. त्याऐवजी आपल्या बौद्धिक, वैचारिक उंचीचा अहंकार बाजूला सारून आपणच दोन पायऱ्या खाली उतरून यावं, त्यांची मानसिकता समजून घ्यावी, भावनिक गरज ओळखून आधार द्यावा, त्यांच्यासाठी काही वस्तुनिष्ठ पर्याय निर्माण करावेत असं कधी का वाटलं नाही? देव, धर्म, सणवार ही त्या सर्वसामान्य कष्टकरी माणसांची भावनिक गरज असते. त्यापासून आपण त्यांना रोखणार असू तर त्यांची ती गरज भागेल, त्यांना देवाधर्माची गरज भासणार नाही असं दुसरं काहीतरी आपण त्यांच्यासाठी निर्माण करायला हवं होतं. अर्थात हे इतकं सोपं नसतं हे आपल्याला कळत असतंच. पण मग त्याऐवजी त्यांच्यासोबत वावरून त्यांच्या धार्मिक प्रतीकांचा, सणांचा, परंपरांचा उपयोग करून हळूहळू वैचारिक परिवर्तन घडवून आणणे तर नक्कीच शक्य होते. महात्मा गांधींसारख्या माणसाने जे ओळखले ते या गांधींचे अनुयायी म्हणवणाऱ्यांना का जमले नाही, हा प्रश्न उरतोच.

मध्यंतरी माझ्या एका मित्राची आई वारली. मित्र पुरोगामी विचार परिवाराशी जोडलेला. अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांना तो म्हणाला, ‘मी काही तिचे ते दिवस, श्राद्ध वगैरे प्रकार करणार नाहीये. माझ्या तत्त्वात ते बसत नाही. मला हा सगळा मूर्खपणा वाटतो. निव्वळ आचरटपणा तुम्हा लोकांचा. मला त्यात ओढू नका.’ यावर साहजिकच गदारोळ. नातेवाईकांचं नाराज होणं. काही जणांनी मागचे कुठचे कुठचे हिशेब चुकवायसाठी भांडणही उकरून काढलं. वेगवेगळ्या पद्धतींनी त्याला दुषणं दिली. ‘समाजात राहायचं तर चारचौघांसारखं वागलं पाहिजे, वाडवडिलांनी घालून दिलेल्या रीतिभाती पाळल्या पाहिजेत, आपले पूर्वज काही इतके मूर्ख लोक नव्हते, आणि असाच वागत राहिलास तर तर उद्या तुझ्या मयताला चार लोकही येणार नाहीत खांदा द्यायला..’ असं बरंच काही त्याला ऐकवलं. तरीही तो आपल्याच म्हणण्यावर ठाम होता. शेवटी व्हायचं तेच झालं. हळूहळू त्याची माणसं त्याच्यापासून दुरावत गेली. कुणीही त्याची बाजू ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. कदाचित परंपरा नाकारून समाजाशी द्रोह करण्याची धमक बाकीच्यांत नव्हती म्हणून असेल, किंवा निव्वळ भीतीपोटी असेल. भीती सगळ्याच गोष्टींची. अशी काही क्रियाकर्मे केली नाहीत तर मेलेल्याला मोक्ष न मिळण्याची भीती, मोक्ष न मिळाल्यास त्या अतृप्त आत्म्याकडून आपल्या मुलाबाळांना काही त्रास होण्याची भीती, तशात मग घरात जरा कुठे काही विपरीत घडलं की त्यामुळेच घडलंय की काय याची भेडसावणारी शंका नि त्यातून निर्माण होणारी भीती; आणि मुख्य म्हणजे समाज काय म्हणेल, आपल्याला कळपातून वगळलं जाईल, याची भीती.. त्यापेक्षा जे काय कर्मकांड करायचं आहे ते मनाला पटो- न पटो, करून मोकळं व्हावं ही बहुतेकांची मानसिकता. खरं तर इथंही सामंजस्याने काही सुवर्णमध्य काढता आला असता. ‘आईच्या आठवणीखातर दुसऱ्या काही चांगल्या गोष्टी करणं माझ्या मनात आहेत. तसं करूनही तिच्या आत्म्याला समाधान लाभू शकतं असं मला वाटतं,’ वगैरे थोडं विश्वासात घेऊन मित्राला सांगता आलं असतं. अस्थी वगैरे तीर्थक्षेत्राला जाऊन पाण्यात विसर्जित करून प्रदूषण वाढवण्याऐवजी शेतातच एका जागी पुरून त्या ठिकाणी एखादं नारळासारखं झाड लावतो म्हटलं असतं तरी चाललं नसतं का? माणसं विरोध करतातच. पण थोडं त्यांच्या कलाने, थोडं आपल्या म्हणण्याप्रमाणे असं काही करत गेलो की हळूहळू त्यांनाही ते मान्य होऊ शकतं. काही प्रमाणात तरी बदल होत जातातच.

पण दोन्हीकडून टोकाची भूमिका घेतली जाते. प्रत्येकाला आपलीच बाजू तेवढी खरी, बाकीचे एक तर अतिशहाणे किंवा ठार अडाणी असं वाटत राहतं. एक खरं आहे की, काही वेळा आपण कितीही समंजसपणे वागलो तरी माणसं आपला हेका सोडायला तयार नसतात. खूप मन:स्ताप होतो अशा वेळी. चिडचिड होत राहते. आपण नेमकं काय करावं, कसं वागावं, हे कळेनासं होतं. मुळात आपली भारतीय मनोवृत्ती धर्म, अध्यात्म, परंपरा अशा गोष्टींशी इतकी घट्टपणे लगडलेली आहे, की काळ कितीही पुढे गेला, जगभरात कितीही सुधारणा झाल्या तरी त्या आधुनिकतेला हळद-कुंकू, फुलं वाहिल्याशिवाय आम्ही तोंडात घास घेणार नाही, हेच आजही सत्य आहे. अशा परिस्थितीत लोकभावनेची कदर करून पुढे कसं जाता येईल, हेच पाहावं लागेल ना? आपण देवळात जात नाही, देव मानत नाही, हे ठीक आहे; पण जे लाखो भाविक श्रद्धेनं एखादी गोष्ट पिढय़ान्पिढय़ांपासून करीत आहेत, त्याला विरोध का करावा? ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाहीं ऐसा मनीं अनुभववावा’ असं तुकोबांनीही सांगून ठेवलंच आहे. देव, धर्म, उपासना ही ज्याची मानसिक, भावनिक गरज आहे, त्याला त्यापासून दूर ठेवण्याऐवजी त्याला ती गरजच भासणार नाही अशी उच्चतम परिस्थिती निर्माण करता आली तर ते अधिक योग्य ठरू शकतं. कदाचित हेच आपलं चुकत गेलं असावं. माणसं आपल्यापासून दूर गेली, आपलं काही ऐकून घेण्याऐवजी आपल्यापासून फटकून वागू लागली, आपल्याविषयी गैरसमज करून घेत ‘पुरोगामी’ या शब्दालाही बिचकू लागली, यामागे हेही एक कारण असू शकतं. महाराष्ट्र हे अन्य काही राज्यांच्या तुलनेने अधिक पुरोगामी आहे, असं आपण म्हणत असतो. स्वातंत्र्याच्या आगेमागे आपल्याला लाभलेल्या समाजसुधारक नि विचारवंतांच्या परंपरेमुळे हे शक्य झालं असावं. पण आचार-विचारांनी पुरोगामी असलेल्यांनाही आपण पुरोगामी असल्याचं सांगण्यात आजकाल संकोच वाटू लागला आहे, हे नक्कीच चिंताजनक आहे. खरं तर आपण कुणीच प्रतिगामी नसतो. तसं म्हणवून घ्यायलाही कुणाला आवडणार नाही. पुढे जाण्याची, प्रगती करण्याची आस निसर्गत:च आपल्याला सगळ्यांना असते. विचारांच्या बाबतीत दांभिकपणा असलेले, दाखवेगिरी करणारे सगळीकडेच असतात. स्वत:ला निष्ठावान परंपरापूजक म्हणवणारे स्वयंघोषित संस्कृतिरक्षकही जगापासून चोरून काय उद्योग करतात, काय शेण खातात, कुठचं गोमूत्र पितात, हे सगळ्यांना ठाऊक असतं. तसे स्वत:ला लोकशाहीचे कैवारी मानणारे, उठसुठ फुले-शाहू-आंबेडकरांचा घोष करणारे आणि आपल्याच घरातल्या स्त्रियांवर अन्याय करणारे, सहकारी कर्मचाऱ्यांशी जातीय अहंकाराने वर्तन करणारे, चिमूटभर स्वार्थासाठी राजकीय कोलांटय़ा मारणारे दांभिक लोक पुरोगामी परिवारातही दिसतील. पण या अशा प्रवृत्तींमुळे सरसकट सगळ्यांना एकाच साच्यात बसवून आपल्या लोकशाहीचा पाया असलेल्या समाजवादी तत्त्वांनाच चेष्टेचं हिडीस रूप प्राप्त करून देणं आपल्याच वैचारिक दारिद्य्राचं लक्षण म्हणावं लागेल. दुर्दैवाने दिवसेंदिवस याच प्रकारचे वैचारिक दारिद्य्र आणि कमालीची असहिष्णुता, टोकाची असंवेदनशीलता अशा काही गोष्टींच्या आहारी जात आपण आपल्याच माणसांची मनं दुखावत आहोत, एकमेकांपासून मनानं दूर जात आहोत, हेही आपल्या लक्षात येत नाहीये. याच आपल्या बथ्थडपणाचा फायदा एखादी कर्मठ धार्मिक संघटना वा त्यांना पाठीशी घालणारी राजकीय मंडळी घेत असतील तर या दोषाचं खापर आपल्याच माथ्यावर फुटणार ना!  

खरं तर आपल्याला आपल्या सगळ्या कृती-विकृतींसह समजून घेऊ शकतील अशी चार-दोनच माणसं असतात आपल्यापाशी. पण तीही अशी आपल्या अहंकारापायी, अस्मितांपायी आपण गमावून बसतो आहोत. कुणी सांगावं, या आपल्या बेफिकीरपणामुळे उद्या आपली अवस्था दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्यांसारखी तर होणार नाही ना? प्रकाशाच्या वाटसरूंना ‘फुरेगामी’ म्हणून तुच्छतेनं हिणवताना आमचं रूपांतर हळूहळू काळोख्या प्राचीन गुहेतल्या दिवाभीत पशूत तर होऊन जाणार नाहीये ना? करोनासारख्या महामाऱ्या येतील नि जातील; पण आपल्याच अविवेकातून होऊ लागलेल्या आपल्या या सामाजिक अपमृत्यूचं आपण काय करणार आहोत?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arten na parte author praveen dashrath bandekar social cultural movements zws

Next Story
अनामिक बहर हा… :कधीं कधीं न बोलणार…
ताज्या बातम्या