प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com

‘मध्यान् रातीला शंख वाजविला

गोविंद गोपाळ जागृत झाला

जागृत होऊनि पाणीयासी गेला

पाण्याचा विटाळ माशांनी केला..

कशी करू देवा आता लिंगाची पूजा

मातला कली मी भोगिते सजा..’

तुम्ही अर्धवट झोपेत असता. अचानक गाण्याचे असे काहीतरी शब्द कानावर येतात. दुर्लक्ष करून झोपी जाण्याचा प्रयत्न केला तरी त्या शब्दांमधलं अनाम काहीतरी तुम्हाला त्यांच्याकडे खेचून नेतं. तुमची झोप उडवतात ते शब्द. पाठलाग करतात. छळत राहतात. नकळतच तुम्ही ते गाणं लक्ष देऊन ऐकू लागता. काय असतं इतकं त्या तुम्हाला आपल्या आत ओढून घेणाऱ्या शब्दांत? का अस्वस्थ होता तुम्ही त्या गाण्यामुळे?

पारंपरिक सणाउत्सवांच्या निमित्ताने गावातल्या स्त्रिया एकत्र येतात. तेव्हा फुगडय़ा खेळताना, फेर धरल्यावर अशी गाणी गायली जातात. या गाण्यांमध्ये गंभीरपणे सांगितलेलं काही असू शकतं असं आपल्या मनात क्वचितच येतं. आधी अनेकदा ऐकलेलं हे गाणं यावेळी ऐकताना मात्र त्याला काही वेगळा अर्थ असावा असं वाटू लागलेलं. कुठल्याही चांगल्या कवितेत अर्थाच्या अनेक छटा सामावलेल्या असतात तशा त्या यात आहेत असं वाटत होतं. विशेषत: ते मनात थेटपणे रुतलेलं धृवपद- ‘कशी करू देवा आता लिंगाची पूजा, मातला कली मी भोगिते सजा.’ अस्वस्थ करणारं असं काहीतरी नक्की होतं त्या ओळींमध्ये सामावलेलं. काय असावं ते? 

अचानक आठवतं- थोरली आकाआत्या म्हणत असे हे गाणं. नदीकाठी राखण्याचा आंबा होता भलाथोरला. त्याच्यासमोरच्या मोकळ्या जागी वनदेवीचा धालोत्सव साजरा करायच्या बायका. खास बायकांचाच असलेला हा लोकविधी. सुफलीकरणाशी जोडलेला. पारंपरिक गाणी, फुगडय़ा, नाच, देवीचं लग्न, वऱ्हाडी मंडळींचे रुसवेफुगवे, उणीदुणी, भांडणं, गाऱ्हाणी असं सगळं असतं त्यात. हे सारं डोळ्यांत साठवत आंब्याबुडी पाय तिडून आकाआत्या उभी असायची. तिला त्या रिंगणात प्रवेश करायला रूढी-परंपरेनं मनाई केलेली. रिंगणाच्या आत फक्त सवाष्ण बायका नि कुमारिका. त्या फेर धरून फुगडय़ा घालू लागल्या की ही आंब्याखालूनच आपली गाणी म्हणायला सुरू करायची. आकाआत्याला अनेक गाणी पाठ होती. गोल गोल फिरत लयीत नाचणाऱ्या बाकीच्या बायका तिच्यामागून ते गाणं म्हणायच्या. पुन्हा पुन्हा धृवपदासारख्या त्यातल्या ओळी कानांवर आदळत राहायच्या : ‘कशी करू देवा आता लिंगाची पूजा? मातला कली मी भोगिते सजा..’

कुठला कली मातला होता? त्याची कसली सजा भोगत होती आकाआत्या?

मला माहीत होतं, हे खरं तर निव्वळ एक परंपरेनं चालत आलेलं स्त्रीगीत होतं. कितीएक वर्षांपूर्वी कुणीतरी कदाचित अशाच एखाद्या लोकोत्सवाच्या निमित्तानं हे गाणं रचलं असावं. अशा लोकगीतांचा कर्ता आपल्याला ठाऊक नसतो. कुण्या एकाचीच ही रचना आहे, की समूहाने गाता गाता अनेकींनी आपापले शब्द त्यात जोडले आहेत, हेही माहीत नसतं. किती पिढय़ांपासून फुगडीचं हे गाणं या मुलखात म्हटलं जात असेल. काळाच्या ओघात किती शब्द बदलले असतील, किती गळून पडले असतील, नवे घुसडले गेले असतील.. आज काहीच सांगता यायचं नाही.

आणि तरीही त्याचा संबंध मी आकाआत्याशी, तिला भोगाव्या लागलेल्या दु:खाशी का लावू पाहत होतो? 

कळू लागल्यापासून मी आकाआत्याला आमच्या गावच्या घरी पाहत आलो होतो. लहानपणी वाटायचं, ते तिचंच घर. आम्हीच आपले अधेमधे पाहुण्यासारखे गणपती, होळीसारख्या सणासुदीला, उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिच्या घरी जात असतो. त्या घराची ओळखच मुळात ‘गोमटय़ा आकाचा घर’ अशीच होती. गावी जायचो तेव्हा गावातले सगळे मला ‘गोमटय़ा आकाचो भाचो’ म्हणूनच ओळखायचे. पुढे हळूहळू कळत गेलं- ती आपल्या वडिलांची थोरली बहीण. वाडवडलांच्या या घरी येऊन राहिलेली. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे अगदी लहानपणी- बारा-तेराव्या वर्षीच लग्न होऊन ती सासरी गेलेली. पण लग्नानंतर दोन-तीन वर्षांतच नवरा गेला. पुरात वाहून जाणारं वासरू धरायला म्हणून गेला तो गेलाच! आकाआत्या कायमसाठी माहेरी परतली. वडिलोपार्जित घर सांभाळत अखेपर्यंत इथंच राहिली. आजी गेली तेव्हाही ती याच घरात होती. आजोबांनी विरक्ती येऊन घरसंसाराकडे पाठ फिरवली होती. तेव्हापासून मग ही थोरली बहीणच पाठच्या भावंडांची आई नि वडीलही बनलेली. त्यांना लहानाचं मोठं करणं, स्वत:च्या पायांवर उभं राहायला सक्षम बनवणं, सगळ्यांची लग्नंकरय, बाळंतपणं, भाचरं सांभाळणं- सगळं तिनं निगुतीनं केलं. घरची शेतीवाडी, नारळी-पोफळीच्या बागायती, आजोबांनी पाळलेल्या म्हशी, बाजारहाट.. आणि पुढे भावंडं कर्तीसवरती होऊन नोकरीधंद्यासाठी किंवा लग्नकार्ये होऊन घरापासून दूर मुलखांत गेल्यावर त्या एवढय़ा मोठय़ा वाडय़ासारख्या घराची वास्तपुस्त करत एकटीनं वावरणं, हेही तिनं हिमतीनं निभावून नेलं.

हे इतकं सगळं करताना कधी तिला आपल्या हक्काच्या स्वत:च्या संसाराचे, मुलाबाळांचे विचार मनात आले नसतील का? लग्न म्हणजे काय, ते धडपणे कळायचंही वय नव्हतं तेव्हा लग्न झालं होतं तिचं. कळेपर्यंत ती माघारीही आली होती. संसाराची कसली स्वप्नं बघितली असतील तिनं? नवऱ्याचा चेहरा तरी आठवत असेल का? वाढत्या वयात शरीरधर्माचं काय केलं असेल तिने? कसं निभावून नेलं असेल अवघ्या आयुष्याला नैतिकतेच्या काटेरी पायवाटेवरून तोल सावरत चालताना? विचार करताना नेहमीच ऐलपैल पसरलेला काळोख आणि त्या काळोखातूनच वाहत्या नदीच्या पाण्याचा माग काढत त्याच एका आंधळ्या भरोशावर अज्ञाताच्या वाटेने निघालेली कुणीतरी नजरेसमोर येत राहते. हे एक प्रकारे स्वत:च्याच कैक शतकांच्या अन्यायाची, शेकडो पिढय़ांच्या पापांची कबुली द्यावी तसं मला वाटत राहतं.

काही वर्षांमागे आकाआत्या गेली तेव्हा गावी गेलो होतो. इतकी वर्ष त्या भल्याथोरल्या घरात ती एकटीच भुतासारखी वावरत असायची. मनात येईल त्या खोलीत ती झोपू-उठू शकली असती. पण ती नेहमीच पाठीमागच्या पडवीला लागून असलेल्या एका काळोख्या खोलीत वावरायची. तिची एक खूप जुनी, गंजलेली पत्र्याची पेटी तिथं होती. तिथंच दांडीवर तिची काही जुनेरं, बोंदरं वाळत घातलेली दिसायची. कोपऱ्यात लाकडी बाकडय़ावर गुंडाळून ठेवलेल्या, तिनंच शिवलेल्या गोधडय़ा, पासोडय़ा. बस्स! हा एवढाच म्हटलं तर तिचा स्वत:चा संसार. तेवढय़ासह तिनं स्वत:ला त्या खोलीपुरतं मर्यादित करून घेतलं होतं.

आत्या या खोलीत वावरत होती खरी; पण मुळात ती खोली वेगळ्याच कारणासाठी वापरली जायची. खेडय़ातल्या कुळवाडय़ांच्या घरात वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्या असतात, तशा त्या आमच्याही घरात होत्या. त्यांच्या वापरावरूनच त्यांना नावं पडलेली होती. सगळ्यात बाहेरची लोटय़ाजवळची देवाची ओवरी. माजघराला लागून समोरासमोरच्या दोन  निजपाच्या ओवऱ्या. बाजूची एक नारळाची नि दुसरी भाताची किंवा धान्याची ओवरी. आतली रांधपाची ओवरी. पाठीमागे न्हाणीघर आणि पडवीला लागून ‘भायली’ खोली. त्या काळात नि आजही अनेक घरांतून खेडय़ात स्त्रियांचा मासिकधर्म एखाद्या कर्मकांडाप्रमाणे पाळला जातो. ही खोली त्यासाठी राखून ठेवलेली.

मे महिन्याच्या सुट्टीत लहानपणी एकदा लपाछपीचे डाव रंगले होते. लपण्यासाठी मी त्या भायल्या खोलीत शिरलो. खेळाच्या नादात असल्यामुळे असेल किंवा तिथल्या काळोखामुळे असेल, तिथं कोपऱ्यात मुटकुळी करून झोपलेली आकाआत्या मला दिसली नव्हती. मी तिला अडखळून खाली पडलो आणि घाबरून किंचाळलो. मी असा अचानक येऊन आदळल्याने आत्याही दचकली होती. पण तिनं  सावरून घेत म्हटलं, ‘माका आपडलंस मरे, पुतां! आता व्हयते कपडे काढून दी माज्याकडे आणि न्हानयेत जाव्न दोन तांबये टकलेर वतून घे.’ मी तिच्या हातून स्वत:ला सोडवून घेत बाहेर पळू लागल्यावर ती हसत हसत म्हणाली, ‘व्होड्लों झालंस? माजी पण लाज दिसाक लागली की काय रे तुका..?’

आईची नि आकाआत्याची काही वेळा बारक्यासारक्या गोष्टींवरनं भांडणं व्हायची. अशा वेळी आईकडून हमखास काही गोष्टींची अत्यंत निर्दयपणे उजळणी व्हायची. त्यातली एक मी कधीच विसरू शकत नाही अशी होती. मी वर्षां-सहा महिन्यांचा असताना एकदा आई घरात नव्हती. आजूबाजूला कुठेतरी गेली असावी. मी झोपेतून जागा झालेलो नि बहुधा भुकेनं व्याकूळ झाल्यामुळे असेल, जोरजोरात किंचाळत होतो. घरात आकाआत्या होती. माझं रडणं ऐकून ती धावत आली. मला उचलून घेतलं. बाबापुता करून मला चुचकारू लागली. इकडे तिकडे फिरवू लागली. तरीही माझं किंचाळून रडणं थांबेना. तेव्हा तिच्या काय मनात आलं कोण जाणे, आईसारखं तिनंही चटकन् मला आपल्या पदराआड घेत छातीशी लावलं. तेवढय़ातच घरात आलेल्या आईनं किंवा काकीनं कुणीतरी ते पाहिलं असावं. त्यामुळे कदाचित गहजबही उडाला असेल. खरं तर ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती. खेडय़ापाडय़ातल्या अनेक प्रौढ बायका मूल रडायचं थांबत नाही म्हटल्यावर बऱ्याचदा असं करतात. तसं करणारी बाई त्या मुलाची आईच असतेच असं नाही; ती कुणीही जवळच्या नात्यातली बाईही असू शकते. त्यात फारसं कुणाला वावगं वाटत नाही. मुलाला तात्पुरतं थारावण्याचा वा निव्वळ गमतीचाही भाग यात असू शकतो. पण का कोण जाणे, आमच्या घरातल्या बायकांनी मात्र नणंदेच्या या वागण्याचा काहीतरी गैर अर्थ लावला होता. पुढे आयुष्यभर तिला ते पुरलं. आकाआत्याशी भांडण झालं की आई अनेकदा तिला यावरून टोकायची. आत्या एकदम कानकोंडी होऊन जायची. तिचा आवाज लगेच खाली यायचा. आपला काहीतरी फार मोठा गुन्हा, काहीतरी फार मोठं पाप जगासमोर आलंय, आपण पार उघडीनागडी होऊन गेलोय अशा भावनेनं एकदम मुकी-मुकीच होऊन जायची ती. एरव्ही घरात, वावरात अगदी जाळवणदारणीच्या तोऱ्यात वावरणाऱ्या तिचं असं केविलवाणं होऊन जाणं बघताना माझ्या मनात विलक्षण कालवाकालव होत असे.

आत्या गेल्यावर तिच्या त्या खोलीत पाऊल टाकलं नि इतक्या वर्षांच्या काळोखात साचलेलं असं किती काय काय एकदम अंगावर आलं. काही क्षण मला गुदमरून गेल्यासारखं, जीवाची घुसमट झाल्यासारखं वाटत राहिलं. अस्वस्थता निपटत मी ती निजायची त्या जागी पाहत होतो. तिथल्या काळोख्या कोपऱ्यात मुंग्यांचं रिवण दिसत होतं. जरा बारकाईनं निरखल्यावर मुंग्यांनी पोखरलेल्या मातीचा बारकासा ढीगही दिसून आला तिथं. छोटंसं वारुळच जणू. मातृदेवतेचं. सातेरी माउलीचं.

होय, आकाआत्याही मला माझ्या कुटुंबाची वंशवेल जीवापाड जोपासून ती फुलवणाऱ्या, वाढवणाऱ्या रक्षक मातृदेवतेचंच प्रत्यक्षातलं रूप वाटतं. दक्षिण कोकणात नि गोव्यात सातेरी देवीची अनेक देवळं आहेत. या देवळांत सहसा देवीची मूर्ती आढळत नाही. मूर्तीऐवजी मोठंच्या मोठं दहा-वीस फुटांचं वारुळ असतं तिथे. ही एक प्रकारची मातृदेवताच. लोकसंस्कृतीचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी ‘लज्जागौरी’मध्ये याविषयी फार नेमकेपणानं लिहिलं आहे. वारुळ ही लैंगिकतेशी जोडलेली प्रतिमा लोकसंस्कृतीपासून आधुनिक साहित्यापर्यंत अनेक ठिकाणी आलेली आहे. शेताच्या बांधा-मेरांवर अनेकदा अशी छोटी-मोठी वारुळं उभी असतात. त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या बाकी कुठल्याही आदिबंधात्मक रूपापेक्षाही मला त्यांचं शेतीभातीशी संबंधित रक्षकदेवता म्हणून प्रचलित असलेलं रूपच अधिक भावतं. आकाआत्याचं तिच्या समग्र स्त्रीरूप अस्तित्वाचा, भावनिक, लैंगिक जाणिवांचा लोप करून आमच्या कुटुंबावर मायेची पाखर पसरून राहणंही सातेरी देवीपेक्षा वेगळं काही नक्कीच नव्हतं. आजीच्या मृत्यूनंतर कोवळ्या वयातल्या मुलांना, संसाराला टाकून आजोबा परागंदा झालेले. त्यावेळी आक्काआत्यानं धीरानं नि कष्टानं हा मोडका गाडा खांद्यावर घेतला नसता तर सगळीच धानाधिस्पट होऊन गेली असती आमच्या कुटुंबाची. घराची मेढी होऊन घर सावरणारी अशी एखादी कर्तीधर्ती भक्कम घरकारीण नसेल तर कुटुंबच्या कुटुंब कसं देशोधडीला लागतं तेही आपण अनेकदा आजूबाजूला पाहिलेलं असतं. आत्याचं पांढऱ्या कपाळानं माहेरी परतणं हे एका अर्थी आमच्या कुटुंबासाठी इष्टापत्तीच ठरली नव्हती काय? स्वत:चे सगळे भोग, वासना, स्वार्थ सगळं बाजूला सारून काय केलं नव्हतं या आदिमायेनं भावंडांच्या कुटुंबांसाठी?

एकदा पंढरपुरात गेली असताना आत्यानं नाथपंथीय गुरू घेतला होता. या नाथपंथीय तत्त्वज्ञानातलं एक विचारसूत्र असं सांगतं की, जीव कुठलाही असो, त्याला अज्ञानरूपी अंध:काराची असंख्य पटलं वेढून असतात. खूप प्रयत्नांनी आपण एक-एक पटल बाजूला करत गेलो तरी अंधार पूर्णपणे नष्ट कधीच होत नाही. बीजरूप अंधार कायमच उरतो. तोच अदिमल. आकाआत्याच्या अनुषंगाने माझ्याच मनाच्या तळघरातल्या अंधाराचा वेध घेताना हे जाणवत राहतं. कितीही पुटं बाजूला केली तरी या आदिमायेला जाणून घेताना अंधाराचंच बीजमूळ हाती येतं. आपल्या आत आत तळघरात आकाआत्यासारख्या आणखी असंख्य पूर्वजांची रूपं असू शकतात. मी आहे याचं कारण माझ्या आधी ते सगळे होते. मी मीच आहे आणि तरीही मीच आकाआत्याही आहे. मुंग्यांनी अंधाऱ्या कोपऱ्यात जमवलेल्या मृत्तिकेच्या कणाकणांत मला तिच्यासह माझ्यात सामावून गेलेल्या सगळ्यांची जाणीव होत राहते. ते मला सादवीत राहतात. जागवीत राहतात. कधीतरी मध्यान् रातीला त्यातलाच कुणीतरी शंख वाजवतो. नैसर्गिक भुकांना चाळवतो. माझ्या नेणिवेच्या तळघरातले असंख्य गोविंद-गोपाळ झोपेतून जागे होतात. कळवळून रडणाऱ्या मला छातीशी लावू पाहतात. पण माझे अहं, माझे स्वार्थ, माझे द्वेष, मत्सर, सूड.. असे माझ्या अस्तित्वाला वेढून असलेले असंख्य घटक त्या गोविंद-गोपाळांना माझ्या देहाचा चैतन्यउत्सव साजरा करण्यात, लिंगाची पूजा करण्यात विघ्नं आणतात. विटाळ निर्माण करतात. अवतीभवतीच्या अज्ञानाच्या अंधारातच माझे सगळे असणे सामावून गेलेले असताना मी स्वत:तून वेगळं होत स्वत:ला साजरं करण्याची खुळचट आस बाळगतो आहे हे कळून येतं. जगण्याच्या निर्थकतेची होणारी हीच ती जाणीव असावी का? आपल्या सगळ्या तृष्णा, इच्छा, वासना मनातच गाडल्या तरी एखाद्या निसटत्या क्षणी देहाचा शंख वाजताच जाग येणाऱ्या गोविंद-गोपाळांना थोपवू पाहणाऱ्या आकाआत्याला हे जाणवले असावे काय?