प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

काही प्राध्यापक आपल्या कायमच्या लक्षात राहतात ते त्यांच्या विद्वत्तेमुळे, काही त्यांच्या विक्षिप्तपणामुळे, तर काही त्यांच्या स्वभावामुळे. पण आम्हाला लाभलेले एक गुरुवर्य असे होते, ज्यांच्यात बरेच गुण होते. वामनमूर्ती असले तरी जग आपल्या पायाखाली नमवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे. काहीसे कोपिष्ट, पण  तितकेच प्रेमळ. आम्ही तृतीय वर्षांत असताना ते आमच्या वाटय़ाला आले. तत्पूर्वी जे. जे.मध्ये ते नेहमी दिसत. त्यांच्या लेक्चरविषयी आम्ही ज्येष्ठ विद्यार्थ्यांकडून ऐकत असू. त्यांच्या शिस्तीबद्दलही बरेच ऐकून होतो. त्यांचे नाव होते डॉ. गजानन मंगेश रेगे. हे नाव कानावर पडल्यावर विशेष बोध होणार नाही, पण तेच ‘बंडू रेगे’ म्हटले की जाहिरात क्षेत्रातील तमाम लोक एका सुरात म्हणतील, ‘अरे! हे आपले गट्टू रेगे!’ रेगे जेव्हा स्कूल ऑफ आर्टमध्ये विद्यार्थी होते, त्या काळात कलाकार उच्चविद्याविभूषित असणे दुर्मीळ असे. रेग्यांनी उपयोजित कला- शिक्षण घेतलेच; शिवाय तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांत त्यांनी बी. ए. केले. समाजशास्त्राची एम. ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर ते लंडनला गेले. तेथील ‘कॉलेज फॉर डिस्ट्रिब्युटिव्ह ट्रेड्स’ या संस्थेतून त्यांनी जाहिरातीचे उच्च शिक्षण घेतले आणि तेथील ‘रिचर्ड्स वूड अ‍ॅण्ड पार्टनर्स’ या जाहिरात संस्थेमध्ये मार्केटिंगचे कामही केले. हा अनुभव गाठीशी बांधून भारतात परतताच त्यांनी ‘एशियन पेंट्स’चे प्रसिद्धी प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप
controversy between vice chancellor and student union
कुलगुरू-विद्यार्थी संघटनांमध्ये वादाचे निखारे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला छावणीचे स्वरूप

हेही वाचा >>> कलास्वाद : रंगानंदात रंगलेली कलावंत

एशियन पेंट्सची अनेक उत्पादने होती. त्या काळात कंपनीला स्वत:चे नाव बाजारात प्रस्थापित करायचे होते. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी करायची यासाठी संकल्पन धोरण ठरवण्याची जबाबदारी रेग्यांवर आली होती. ही कल्पना कशी फुलवावी, आपल्या वेगळेपणाचे दृश्यांकन कसे करावे याकरता स्वत:चे असे वैशिष्टय़ दिसले पाहिजे, या विचारांतून सुरुवात झाली अन् यातूनच साकारल्या एका खटय़ाळ मुलाच्या कारवाया! या खटय़ाळ मुलाला चेहरा दिला व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी. हा खटय़ाळ मुलगा एशियन पेंटचा बोधचिन्ह बनला. पुढे या मुलाच्या खोडय़ा बऱ्याच वाढल्या. हातात रंग आणि ब्रश घेऊन तो दिसेल तो पृष्ठभाग रंगवू लागला. यातून आरामखुर्चीत झोपलेल्या आजोबांचे टक्कलही सुटले नाही! आणि यातूनच त्यांचे घोषवाक्य ठरले : ‘एनी सर्फेस नीड पेंट, नीड्स एशियन पेंट्स!’ मात्र, या जाहिराती लोकांपर्यंत नीट पोचतील की नाहीत, याबद्दल कंपनी साशंक होती. त्यासाठी रेग्यांनी एक शक्कल लढविली. या मुलाचे नामकरण करण्याची स्पर्धा त्यांनी जाहीर केली. त्यासाठी २५० रुपयांचे बक्षीस ठेवले. एशियन पेंट्समध्ये या मुलाचे नाव सुचवणाऱ्या पत्रांचा वर्षांव सुरू झाला. त्यामुळे मुदत वाढवून बक्षिसाची रक्कमही ५०० रुपये करण्यात आली. तो काळ होता १९५९-६०चा! शेवटी ४७ हजार पत्रांमधून निवड समितीने ‘गट्टू’ हे नाव स्वीकारले. रेळे व आरस या दोघांनी ‘गट्टू’ हेच नाव सुचवल्यामुळे बक्षीस विभागून देण्यात आले. तेव्हापासून जाहिरात वर्तुळात रेग्यांनाही ‘गट्टू’ असे संबोधण्यात येऊ लागले. रेगे यांनी ‘विचार प्रसारण व समाजकल्याण’ हा प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली व ते ‘डॉ. रेगे’ झाले.

डॉ. रेगे हे एक अजब रसायन होते. त्यांचे इंग्रजी जितके प्रभावी होते, तितकेच मराठीदेखील रसपूर्ण होते. त्यात त्यांना लाभलेली तल्लख स्मरणशक्ती. तिच्या जोरावर ते जे. जे.मध्ये अभ्यागत व्याख्याते म्हणून ‘जाहिरातकला आणि कल्पना’ हा विषय शिकवत. कोणतेही संदर्भ हाती नसताना कैक व्यावसायिक उदाहरणे देत त्यांचे व्याख्यान होत असे. रेग्यांकडे व्यावसायिक क्षेत्राचा गाढा अनुभव होता. ‘जाहिरातकला’ शिकवणारा या क्षेत्राशी निगडित असावा लागतो. तेव्हा रेगे हे एकमेव अशी व्यक्ती होते. काळा कोट, बो, हातात ‘कूल’ सिगरेट, दुसऱ्या हातात आपला प्रबंध अशा थाटात त्यांची बुटकी मूर्ती वर्गात शिरे. सर्व विद्यार्थी स्तब्ध होत. पण एकदा का लेक्चर  देणे सुरू झाले की विद्यार्थी त्यात मग्न होत. ते जेव्हा मराठीत व्याख्यान देत, तेव्हा त्यात चुकूनही इंग्रजी शब्द येत नसे. रेगे जाहिरात क्षेत्राशी निगडित असल्याने तेथील घडामोडींवर त्यांचे सतत लक्ष असे. त्यामुळे उदाहरणे देताना ते नेहमी ताज्या घटनांचा संदर्भ देत. त्यांच्यामुळेच आम्हाला कळू लागले की, जाहिराती बनवताना ग्राहकाचं मानसशास्त्र कसं अभ्यासावं लागतं, उत्पादनाचा दर्जा कसा राखावा लागतो आणि एखादा ब्रॅण्ड कसा तयार करावा लागतो!

हेही वाचा >>> कलास्वाद : प्रतिभावंत शिल्पी

त्यांना सर्वच विषयांचे अफाट ज्ञान होते. त्यामुळे काव्य, शास्त्र, नाटय़, कला, साहित्य, व्यापार या क्षेत्रांतील नामवंतांशी त्यांची जवळीक होती. जे.जे.मध्ये दामू केंकरे सरांसोबत या मंडळींच्या मैफली जमायच्या. रेगे यांना वाक्यागणिक शाब्दिक कोटय़ा करण्याचा नाद होता. ते अशी गुगली टाकीत की समोरच्याला आपली विकेट कधी गेली याचा पत्ताही लागत नसे. मध्येच त्यांना वाटले की, आपण कायद्याचा अभ्यास करावा. मग त्यांनी अभ्यास करून प्रथम वर्षांची परीक्षा दिली. त्यात त्यांनी उत्तम गुणही मिळवले. पण ते त्यांनी अर्धवट सोडले. आपली विद्वत्ता दाखवण्याची संधी ते सोडत नसत.

मी जेव्हा जे.जे.मध्ये अध्यापक म्हणून आलो तेव्हा रेगे सरांशी माझी जवळीक झाली. रेगे सर एका ठिकाणी कधीच रमले नाहीत. सतत नोकऱ्या बदलणे हा त्यांचा छंद होता. जे. जे.मध्ये अभ्यागत व्याख्याते म्हणून जरी ते येत असले तरी जे.जे.तच पूर्णवेळ असल्याप्रमाणे ते वावरत. पण एका चाकोरीत काम करणे हा त्यांचा पिंडच नव्हता. मात्र, येथून माझे अन् रेगे सरांचे घनिष्ठ असे घरगुती संबंध जडले. दादरला रुईया कॉलेजजवळील ‘दत्त सदन’ ही इमारत त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची होती. अनेकदा मी तेथे जात असे. रेग्यांचा आवडता छंद म्हणजे स्वयंपाक करणे. विशेषत: मांसाहारी. स्वत: बनवून दुसऱ्यांना खाऊ घालण्यात त्यांना  समाधान मिळत असे.

विनोद हा रेग्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. शाब्दिक कोटय़ा तर ते सतत करीत. वर्गात व्याख्यान देताना गंभीर चेहरा ठेवून ते एखादा विनोद असा काही पेरत, की वर्गातील मरगळ दूर होऊन हास्याच्या स्फोटाने वर्ग दणाणून जाई. भारतात ‘जाहिरात कला आणि कल्पना’ या विषयावर कोणीही पुस्तक लिहिले नव्हते. पाठय़पुस्तकही नव्हतेच. डॉ. रेगेंनी ही गरज ओळखली. अपार परिश्रम घेऊन त्यांनी ‘अ‍ॅडव्हर्टायिझग आर्ट अ‍ॅण्ड आयडीयाज्’ हे पुस्तक लिहिले. पुढे त्याचीच मराठी आवृत्ती ‘जाहिरात कला आणि कल्पना’ या नावाने प्रसिद्ध केली. आज देशभरात हे पुस्तक सर्व कला महाविद्यालयांतून पाठय़पुस्तक म्हणून वापरले जाते. त्यांचा खरा िपड शिक्षकाचा होता. विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण असावेत यासाठी त्यांची धडपड सुरू असे.

प्रा. दामू केंकरे यांच्या खटपटीने गोव्याला कला महाविद्यालय सुरू झाले. पुढे शिक्षणतज्ज्ञ म्हणून रेग्यांचे या महाविद्यालयाशी घनिष्ठ संबंध आले. तेथील अभ्यासक्रम आखणे, परीक्षा पद्धती ठरवणे, प्रबंध तयार करून घेणे या सर्व गोष्टी रेग्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायच्या. त्यासाठी आमच्या गोव्याच्या अनेक वाऱ्या व्हायच्या. एकदा असेच समविचारी कलावंत गप्पा मारत बसलेले असताना सर्वानी रेग्यांना एखादे नाटक लिहा अशी गळ घातली. रेग्यांनी हे आव्हान स्वीकारले व ‘दिसतं तसं नसतं’ हे फार्सिकल नाटक त्यांनी लिहिले. साहित्य संघात त्याचे प्रयोगही झाले. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना घुसली की ती सत्यात आणण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करीत. मध्यंतरी त्यांनी कोलकात्याच्या बाटिक चपलांचा उद्योग केला. काही दिवसांनी तो गुंडाळून रंगीत माशांची पैदास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते गोरेगावला राहायचे. एकदा त्यांनी मला ते पाहायला बोलावले. घरी जातो तो काय? संपूर्ण घरभर काचेची रंगीत पाण्याने भरलेली असंख्य अ‍ॅक्वेरियम्स. त्यांत मनमोहक, रंगीबेरंगी, चिमुकले मासे इकडून तिकडे फिरत होते.

हेही वाचा >>> कलास्वाद : तेजोमय प्रभा : बी. प्रभा

सगळ्या कला महाविद्यालयांमधून त्यांचे पुस्तक अभ्यासासाठी वापरले जात असल्याने अनेक कला-विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क होता. कोलकात्याचा ‘स्टेट्समन’ हे त्यांचे कोडी सोडवण्याचे आवडते वृत्तपत्र. रेग्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. अगदी कर्सिव्ह पद्धतीत ते लिहीत. आम्ही परीक्षेचे पेपर लिहिण्यास विद्यापीठात बसत असू त्यावेळी पेपरची भाषा आणि लिखाण हे डॉ. रेगे इतके सुंदररीत्या करीत की एकदा प्रा. साठय़े म्हणाले, ‘बंडय़ा, हे तू कॅलिग्राफिक पेनने लिहिशील तर सुंदर कॅलिग्राफी करशील.’ संध्याकाळी कॉलेजमध्ये परतल्यावर मला घेऊन ते कॉलेजसमोरील ‘हिमालया’ या स्टोअरमध्ये गेले आणि त्यांनी कॅलिग्राफिक पेनचा सेट विकत घेतला आणि खरोखरीच त्यांनी उत्कृष्ट अशी कॅलिग्राफी करण्यास सुरुवात केली.

रेगे सरांची मला नेहमी मदत होत असे. त्यांच्यासाठी मी काही कामेही केली. त्यांच्या पुस्तकासाठी लेआऊट केला. त्यांच्या टायपोलॉगसाठी काम केले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवतीर्थावरील प्रदर्शनामध्ये त्यांचा सहभाग होता. एखाद्या प्रोजेक्टवर कसा विचार करायचा, हे ते सांगत. माझ्या नागपूर येथील वास्तव्यात वेळ फुकट न घालवता त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगून त्यांनी मला ‘सिम्बोलॉजी’ या विषयावर एक प्रोजेक्ट करायला लावला. त्याचा मला खूप उपयोग झाला. सिम्बॉल कसा सादर करावा हे ते अभ्यासपूर्वक सांगत. यानिमित्ताने माझा या विषयाचा सखोल अभ्यास झाला.

विद्यार्थ्यांचे शोधनिबंध वाचणे हा त्यांचा आवडीचा विषय. कोणी मुलाने पूर्वीचा एखाद्याचा प्रबंध वापरला असेल तर त्यांच्या ते तात्काळ लक्षात येत असे. आमची परीक्षेच्या ‘व्हायवा’ची तयारी पूर्ण झाली होती. इतक्यात रेगे सर आले. हातात एक पिशवी. ते त्या दिवशी मला थकलेले जाणवले. मी त्यांच्यासाठी आरामखुर्ची मागवली व त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. संध्याकाळी आम्ही दोघे चर्चगेटला निघालो. मी त्यावेळी बोरीवलीला राहायला गेलो होतो. स्टेशनवरून त्यांनी आपले ‘स्टेट्समन’चे अंक घेतले. मला म्हणाले, ‘राजा, मी ट्रेनमध्ये उभा राहू शकणार नाही.’ मी त्यांना म्हटले, ‘सर, मी आत जाऊन जागा पकडतो. तुम्ही सावकाश या!’ आम्ही जागा पकडून बसलो. काही वेळातच ते पूर्ववत झाले. परत नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या. शुक्रवारची संध्याकाळ होती ती. शनिवार-रविवार सुट्टी. सोमवारपासून परीक्षा सुरू. ‘सोमवारी वेळेवर ये रे..’ असे सांगून गोरेगावला ते उतरून गेले. आणि रविवारी आमचे मित्र राजा शेटगे सकाळीच माझ्या घरी आले आणि म्हणाले, ‘रेगे सर गेले!’ क्षणभर मी सुन्नच झालो. त्यांच्या पत्नीला आम्ही भेटलो तेव्हा कळले की, डॉक्टरांनी त्यांना चार-पाच दिवसांपूर्वीच तपासून इस्पितळात दाखल होण्यास सांगितले होते. पण रेग्यांचे वैद्यकीय ज्ञान आडवे आले. गॅसमुळेच आपल्या छातीत त्रास होत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. नेहमीप्रमाणे डायजिनच्या गोळ्या चघळल्या. पण शनिवारी जेव्हा खूपच त्रास होऊ लागला तेव्हा मात्र त्यांनी पत्नीला आपल्याला इस्पितळात दाखल करण्यास सांगितले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता..

rajapost@gmail.com