प्रा. विजय तापस
हिंदू धर्मव्यवस्थेतलं ‘शंकराचार्य’ हे सर्वोच्च पद असतं का? तसं ते आहे की नाही हे जाणून घेण्याएवढीही उत्सुकता माझ्यात आणि भोवतालच्या हिंदूंमध्ये मला कधी जाणवली नाही. तसं ते सर्वोच्च पद असेलही एखाद् वेळेस. (नक्की कळत नाही, कारण सामान्य हिंदूंचा शंकराचार्याशी संबंध आलाय/ येतो/ यावा असं कधीच काही घडत नाही, हे एक जसं कारण; तसंच कोणा शंकराचार्यानी कधी आपली भगवी महिरप सोडून अवघड काळात किंवा अवसेपुनवेला रयतेत रस घेतला आहे असंही कधी दृष्टीस आलेलं नाही.) पण तो काथ्याकूट आता नको. इथे मुद्दा असा की, पारंपरिक दृष्टीने पाहता देशातल्या एका शंकराचार्यानी ‘नाटक’ लिहावं म्हणजेच खरं तर महापाप नाही का? नाटकासारख्या एका ‘ताज्य’ आणि ‘उठवळ’ म्हणवल्या गेलेल्या कलाप्रकारात त्यांनी लक्ष घालावं, त्यात रस घ्यावा आणि प्रत्यक्षात स्वत: नाटक लिहावं म्हणजे तर पापाचा कळसच मानायला हवा. असलं पाप करण्याचं धाडस एखादे शंकराचार्य करतात तेव्हा नाटकावर प्रेम करणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य हिंदूंना आनंद झाल्याशिवाय कसा राहील?
धारवाडातल्या कुर्तकोटी गावात जन्माला आलेल्या लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील यांनी नाटक लिहिण्याचं महापाप केलं आणि ते ग्रंथरूपात प्रकाशित करून मराठी जनांच्या हाती ठेवलं त्याला आता ९२ वर्ष झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नाटकाचं शीर्षक आहे ‘गंगासंमति अथवा करणमान्यता’! लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील हे करवीर-संकेश्वर पीठाचे ‘शंकराचार्य’ झाल्यानंतर त्यांनी १९३० मध्ये ‘गंगासंमति अथवा करणमान्यता’ हे नाटक साकारलं. शंकराचार्य केवळ नाटक लिहूनच थांबले नाहीत, तर ते नाटक प्रयोगरूपात यावं यासाठीही त्यांनी जंग जंग प्रयत्न केले. गंमत म्हणजे प्रयोगाचे सर्व हक्क त्यांनी चक्क मठाकडे राखून ठेवले. मठाने नाटकाची उठाठेव करण्याची ही बहुधा एकमेव घटना असावी. नाटक प्रयोगांकित व्हावं यासाठी नाटककाराला मन:पूत आग्रह करण्यात सवाई गंधर्व आणि हिराबाई बडोदेकर हे स्थानी कंठसंगीतातले आदर्श गुंतले होते यातच नाटकाचं मोल लक्षात येण्यासारखं आहे. हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी ‘बालमोहन नाटक मंडळी’, ‘आनंद संगीत मंडळी’ आणि ‘नूतन संगीत विद्यालय नाटक मंडळी’ यांच्यात स्पर्धा लागली होती हेही विलक्षण म्हणता येईल. थोडक्यात काय, तर अत्यंत कुशाग्र आणि उच्चकोटीची बुद्धिमत्ता, अपूर्व प्रतिभाशक्ती, बहुभाषाप्रवीणत्व संपादन केलेल्या आणि अमेरिकन विद्यापीठाची पीएच. डी. पदवी मिळवलेल्या कुर्तकोटींनी करणाची आवश्यकता समाजापुढे मांडण्यासाठी नाटक या लोकमाध्यमाचा स्वीकार करण्यात स्वत:च्या आणि धर्माच्या फसव्या प्रतिष्ठेचा बाऊ केला नाही, हे महत्त्वाचं! त्यांच्या नाटक लिहिण्यानं नाटकाचीच प्रतिष्ठा वाढली, हे मात्र खरं! काय आहे बाबा ‘गंगासंमति अथवा हिंदूकरणमान्यता’ हा प्रकार? एका वाक्यात सांगायचं तर विविध कारणांनी हिंदू धर्माचा त्याग केलेल्या किंवा अन्य धर्मानी अत्याचार करून वा प्रलोभने दाखवून बाटवलेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेणं, त्यांचं हिंदूकरण घडवून आणणं- आजच्या परिभाषेनुसार ‘घरवापसी’ हा या नाटकाचा मुख्य विषय आहे. हा विषय मांडण्यासाठी शंकराचार्यानी इतिहासातल्या एका हिंदू-मुसलमान विवाहाची गोष्ट निवडली आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about book written by dr kurtakoti shankaracharya zws
First published on: 12-06-2022 at 00:03 IST