रघुनंदन गोखले

आक्रमक डावांचे संकलन असलेल्या दोन पुस्तकांची प्रचंड प्रमाणात विक्री झाली आहे. ‘The Mammoth Book of World’’ s Greatest Chess Games’ आणि ‘Modern Chess Brilliancies’! या दोन्ही पुस्तकांमध्ये सर्वाधिक डाव कोणाचे असतील, असा प्रश्न तुम्ही एखाद्या कसलेल्या बुद्धिबळपटूला विचारला, तर तो ‘हा काय प्रश्न आहे का’ या अर्थी तुमच्याकडे बघेल आणि लगेच उत्तर देईल – मिखाईल ताल! लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय इतिहास शिकवणारे प्रख्यात लेखक व्लाडिस्लाव झुबॉक म्हणतात, ‘‘तालचा प्रत्येक डाव हा एखाद्या सुंदर कवितेसारखा दुर्मीळ आणि अनमोल आहे.’’

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

माजी जगज्जेत्या मिखाईल ताल याने आपल्या आयुष्यात अनेक आक्रमक डाव खेळले. त्याला एखादी कल्पना सुचली, की तिला धारदार स्वरूपात पेश करून तो डाव जिंकत असे- भले ती कल्पना थोडीफार चुकीची असे ना का! रात्रभर जागून त्या हल्ल्यातील दोष शोधून काढून प्रतिस्पर्धी सकाळी तालला भेटला आणि तालचा हल्ला कसा चुकीचा होता असे त्याला सांगू लागला की, ताल त्याला स्वत:चे आवडते वाक्य सांगून गप्प करीत असे – ‘‘बुद्धिबळाच्या पटावर दोन प्रकारचा बळी दिला जातो.. एक- अचूक आणि दुसरा- माझा.’’

मिखाईल ताल हा पटावरचा जादूगार होता आणि त्याला लोक काय म्हणतील याची पर्वा नव्हती. त्याच्या चाहत्यांना त्याचा बिनधास्त खेळ खूप आवडत असे आणि ताल खेळत असलेल्या स्पर्धाना गर्दीपण होत असे. ताल गमत्या माणूस होता. आजारपण सतत मागे लागलेले आणि अधूनमधून इस्पितळात दाखल व्हावे लागेल हे गृहित धरून त्यानुरूप आयुष्य जगणारा ताल खूप लोकप्रिय होता. आपल्या प्रतिस्पर्ध्याना मान देणारा ताल कोणतीही लपवाछपवी करत नसे. त्याचे खोटे खोटे हल्ले व्हिक्टर कोर्चनॉयच्या खंबीर बचावाविरुद्ध चालत नसत. त्यामुळे त्या दोघांच्या सामन्याआधी पत्रकारांनी त्याला विचारलं, ‘‘तुमच्या दोघांमध्ये अनेक लढती झाल्या असतील. त्यामध्ये तुमचा हार-जीत रेकॉर्ड काय आहे?’’

सिगारेट ओढता ओढता ताल म्हणाला,

‘‘५ – ५ !’’ पत्रकारांना वाटलं की, दोघेही ५-५ वेळा जिंकले आहेत, पण त्या वेळी ताल मिश्कीलपणे म्हणाला, ‘‘एक मिनिट थांबा. ५-५ म्हणजे व्हिक्टर ५ वेळा जिंकला आणि मी ५ वेळा बरोबरी केली.’’ आपण एकही डाव जिंकलो नाही अशी जगज्जेतेपदाच्या निवड सामन्याआधी जाहीर कबुली देणारा निरागस ताल उगाच सर्वात लोकप्रिय जगज्जेता मानला जात नाही.

ताल एक चांगला लेखकही होता आणि त्याचे स्तंभ रशियन मासिकांत प्रसिद्ध होते. बॉबी फिशर अमेरिकन अजिंक्यपद स्पर्धा ११ पैकी ११ गुण घेऊन जिंकला (आणि लॅरी इव्हान्स दुसरा आला होता ८.५ गुणांसह). त्या वेळी तालनं लिहिलं होतं- अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या लॅरी इव्हान्सचं अभिनंदन! आणि प्रदर्शनीय सामना जिंकणाऱ्या बॉबीचंही! एक पाय सतत इस्पितळात असतानाही ताल स्वत:च्या तब्येतीविषयी बेपर्वा होता. वेदनाशामक मॉर्फीन काम करू शकत नसल्यामुळे दारूचा वापर तो वेदना विसरण्यासाठी करत असे आणि धूम्रपानाचं तर त्याला वेडच होतं म्हणा ना! झेक ग्रँडमास्टर व्लास्तिमीर हॉर्टनं एक प्रसंग सांगितला आहे. मॉस्कोमधील १९६३ सालच्या स्पर्धेदरम्यान हॉर्टचा सामना होता तालविरुद्ध! आधी ताल आला उशिरा आणि आला त्या वेळी त्याचे हात कापत होते. साधी सिगारेटही पेटवता येत नव्हती. अशा वेळी काही रशियन खेळाडूंनी तालला बाथरूममध्ये नेऊन गार पाण्यानं अंघोळ घातली. थोडीफार शुद्ध आलेल्या तालला आपण सहज हरवू असे मनात मांडे खाणाऱ्या हॉर्टला डाव बरोबरीत सोडवताना नाकीनऊ आले होते.

आता आपण मिखाईल तालच्या बुद्धिबळ प्रवासाची माहिती घेऊ.

१९३६ साली जन्मलेल्या तालला वयाच्या तेराव्या वर्षी रत्नपारखी प्रशिक्षक अलेक्झांडर कोब्लेन्झनं शिकवायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन वर्षांत त्यानं लॅटव्हियाचं अजिंक्यपद जिंकताना आपल्या प्रशिक्षकालाही मागे टाकलं. लॅटव्हिया विश्वविद्यालयातून पदवी मिळवताना प्रबंधाचा विषय निवडला होता – इल्फ आणि पेट्रोव्ह या जोडगोळीचे व्याजोक्तीपूर्ण (विनोदी) वाङ्मय. एकीकडे शाळेत शिक्षक म्हणून काम करताना ताल बुद्धिबळात झपाटय़ाने प्रगती करत होता.

१९५६ च्या सोव्हियत अजिंक्यपदाच्या स्पर्धेत ताल पाचवा आला, पण खेळाडू आणि प्रेक्षक यांचा लाडका बनला. वर्तमानपत्रात लिहिणारे वार्ताहर मात्र लिहीत होते की, हा तरुण गरज नसताना धोके पत्करतो! तालची निवड स्टॉकहोमला होणाऱ्या जागतिक विद्यार्थी अजिंक्यपद सामन्यासाठी सोव्हियत संघात झाली. तेथेही तालच्या अभूतपूर्व आक्रमक खेळामुळे तो लोकप्रिय झाला. एका विद्युतगती सामन्यात तर झुकस्ता नावाच्या खेळाडूला पराभूत करताना तालनं एकापाठोपाठ एक मोहऱ्यांचे बळी देऊन बघणाऱ्या प्रेक्षकांना वेड लावलं. ताल एकही डाव न गमावता विद्यार्थी सांघिक जागतिक स्पर्धा तीन वर्षे खेळला आणि त्यानं तिन्ही वर्षे आपल्या संघाला सुवर्णपदकं मिळवून दिली.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी हा नवयुवक सोव्हियत संघराज्याचा सर्वात लहान विजेता बनला, त्या वेळी त्याचे बहुतेक सर्व प्रतिस्पर्धी ग्रँडमास्टर होते. त्यामुळे जागतिक संघटनेनं मिखाईल तालला खास सभा घेऊन ग्रँडमास्टर किताब बहाल केला. तालनं सोव्हियत संघराज्याचं अजिंक्यपद लागोपाठ दोन वेळा जिंकून तो जागतिक अजिंक्यपदाच्या निवड स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्या वेळी जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरवण्यासाठी ८ जणांमध्ये एक स्पर्धा होत असे. त्यामध्ये प्रत्येक जण दुसऱ्याशी ४ डाव खेळत असे. अशा २८ फेऱ्यांच्या मोठय़ा स्पर्धेत प्रत्येक डाव जिंकण्यासाठी त्वेषानं खेळणारा ताल लवकर दमून जाईल अशी सगळय़ांची अपेक्षा होती; पण त्यानं सुरुवातीलाच जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राखली.

या स्पर्धेदरम्यान एक गंमत झाली. तालच्या भेदक नजरेमुळे आपल्या खेळावर परिणाम होतो असं वाटून पाल बेन्को हा हंगेरियन/ अमेरिकन ग्रँडमास्टर एका फेरीत  गॉगल लावून आला. ताल इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेदरम्यान आपला गमत्या स्वभाव गमावून बसला नव्हता. त्यानं प्रेक्षकांतून एकाचा गॉगल मागवून घेतला आणि तोच गॉगल घालून त्यानं बेन्कोचा धुव्वा उडवला.

शिस्तप्रिय बोटिवनीक हा त्या वेळी जगज्जेता होता. तरुण तालला बोटिवनीक आपली जागा दाखवून देईल याची जुन्या लोकांना खात्रीच होती; परंतु बोटिवनीक-ताल सामन्यात बोटिवनीकला तालनं आपल्या कल्पनांच्या भरारीनं केलेल्या हल्ल्यांनी पार बावचळून टाकलं. आतापर्यंत डेविड ब्रॉनस्टाईन सोडला तर असा बेदरकार खेळणारा प्रतिस्पर्धी बोटिवनीकला भेटला नव्हता. अखेर तालनं बाजी मारली आणि जगाला २३ वर्षांचा सर्वात लहान जगज्जेता मिळाला.

नियमाप्रमाणे बोटिवनीकला वर्षभरात तालला आव्हान देण्याची संधी मिळाली. डॉक्टर्सनी नको सांगितलं असतानाही तालनं सामना खेळण्याची तयारी केली आणि शेवटी व्हायचं तेच झालं. ताल १९६१ साली वर्षभरातच जगज्जेतेपद गमावून बसला. त्याचा मूत्रिपडाचा आजार जन्मभर त्याच्या पाचवीला ्रपुजला होता.

एखाद्या खेळाडूनं जगज्जेतेपद हरल्यावर आराम केला असता, पण तालच्या नसांतून रक्त नव्हे तर बुद्धिबळ वाहत असावं. कारण त्यानं पुढच्याच महिन्यात जर्मनीत होणाऱ्या युरोपिअन सांघिक स्पर्धा खेळणाऱ्या सोव्हियत संघात खेळण्याची तयारी केली. त्याहून कहर म्हणजे, लगेच स्लोवेनियात ब्लेड या गावी झालेल्या एका महत्त्वाच्या स्पर्धेत तालनं विजयी मालिका करून, ती स्पर्धा फॉर्ममध्ये असलेल्या फिशरहून १ गुण जास्त करून जिंकली; पण त्यानंतर तालला सतत शस्त्रक्रिया, इस्पितळ या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यामुळे त्याच्या खेळातलं सातत्य कमी झालं होतं. अखेर १९६९ साली त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करून त्याचं एक मूत्रिपड काढून टाकावं लागलं. त्या काळी ही खूप कठीण आणि जीवघेणी शस्त्रक्रिया मानली जात असे. आता ताल पुन्हा फॉर्मात आला होता. वेदनाशामकं काम करू शकत नसल्यामुळे दारू आणि सिगारेट याशिवाय न राहू शकणारा हा मनस्वी खेळाडू एक मूत्रिपड काढून टाकल्यावर एखाद्या नवयुवकाप्रमाणे एकावर एक स्पर्धा जिंकू लागला. जुलै १९७२ ते एप्रिल १९७३ या १० महिन्यांत ताल लागोपाठ ८६ डावांत अपराजित राहिला. हा त्या काळी एक विक्रमच होता. पुन्हा त्यानं ऑक्टोबर १९७३ ते ऑक्टोबर १९७४ या एका वर्षांत ९५ डाव एकही हार न पत्करता खेळले. तालचे हे विश्वविक्रम डिंग लिरेन आणि मग मॅग्नस कार्लसन यांनी नुकतेच मोडले.

हळूहळू तालचा खेळ प्रगल्भ होत होता. तरीही त्याच्या खेळात अधूनमधून जुना ताल डोकावत असेच. १९८८ साली फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रान्समधील कॅन या शहरात अनुभवी विरुद्ध तरुण अशा दोन गटांत एक प्रदर्शनीय सामना झाला होता. त्या वेळी नुकत्याच ग्रँडमास्टर झालेल्या तरुण आनंदला तालशी खेळण्याची संधी मिळाली आणि हल्ला-प्रतिहल्ला यांनी रंगलेल्या या सामन्यात आनंद विजयी झाला. नंतर त्या डावाचं विश्लेषण करताना आनंदनं न राहवून पटकन विचारलं, ‘‘माझी ही कल्पना तुमच्या लक्षात आली होती का?’’ त्या वेळी ताल मिश्कीलपणे म्हणाला, ‘‘तरुण मुला, माझ्या काळात मीपण थोडय़ा फार कल्पना वापरून खेळलेलो आहे.’’

तालच्या उजव्या हाताला व्यंग होतं. त्याच्या आजारपणांमुळे शरीर पोखरलं गेलं होतं. तरीही १९९२ साली मे महिन्यात स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत शेवटच्या डावात त्यानं नुकतीच विश्व ज्युनिअर स्पर्धा जिंकून आलेल्या अकोपियानला सहजी आणि खास ताल शैलीत हरवलं होतं. तोच त्याच्या देदीप्यमान कारकीर्दीचा अखेरचा डाव ठरला. अवघ्या महिन्याभरात मॉस्को येथील इस्पितळात ५६ व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली.

असा हा महान आणि अजातशत्रू बुद्धिबळाचा जादूगार आपल्या अविस्मरणीय डावांचा खजिना आपल्यासाठी मागे ठेवून गेला आहे. gokhale.chess@gmail.com