scorecardresearch

अभिजात : फ्रान्स्वा जिलो : शंभरी पार केल्यानंतर..

या आठवडय़ात फ्रान्स्वा १०१ वर्षांची झाली! पालोमा आणि ऑरेलिया या तिच्या दोघी मुली तिची देखभाल करत असतात.

अभिजात : फ्रान्स्वा जिलो : शंभरी पार केल्यानंतर..
french artist francoise gilot

अरुंधती देवस्थळे

ख्रिस्टीजसारख्या भारी-भक्कम कला लिलावात भाग घेणारा आर्ट डीलर मित्र आणि त्याची क्यूरेटर बायको यांच्या मैत्रीचा फायदा मला अचानकच मिळाला- फ्रान्स्वा जिलोला भेटायची संधी! तेव्हा ती नव्वदीच्या घरात होती. मला प्रदर्शनांत लावलेली तिची काही चित्रं प्रसन्न रंगयोजना, रेषेवरली पकड आणि शैलीतल्या वैविध्यामुळे आवडली होती; तेवढंच आवडलं होतं तिचं अतिशय शांत, सहज डौलानं प्रदर्शनात वावरणं. सुंदर चेहरा, चेहऱ्यावर वयाच्या खुणा फक्त त्वचेमुळे जाणवणाऱ्या. सडसडीत देहयष्टीमुळे तिचं वय आहे त्यापेक्षा वीसेक वर्ष लहानच वाटत होतं. तिने पॅरिस आणि न्यू यॉर्कमध्ये दोन्ही ठिकाणी ठेवलेल्या स्टुडिओजमागची कारणं उमगली. तिचं देखण्या शैलीतलं काम बघितल्यानंतर हेही कळणार होतं की, ती दोन्ही शहरात राहते आणि चित्रं काढल्याशिवाय एकही दिवस जाऊ देत नाही. तोवर अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं तिचं ‘लाईफ विथ पिकासो’ (१९६४) हे प्रचंड गाजलेलं खळबळजनक पुस्तक एवढीच अप्रत्यक्ष ओळख. म्हणून तिला भेटून संवादाची संधी मिळतेय तर कोण सोडणार? हे पुस्तक इतक्या निर्भीडपणे लिहिणं हे एक धाडसाचंच काम होतं. त्यामुळे तिच्यावर पिकासोने कोर्ट केसेस केल्या होत्या आणि कलाव्यवसायात खरी-खोटी बदनामी करून तिला कला क्षेत्रांतून उखडून टाकायचे प्रयत्न केले होते, हेही सर्वश्रुत होतंच. भेटल्यावर ती प्रांजळ वाटली, चलाख किंवा कांगावाखोर वाटली नाही, अर्थात हे माझं वैयक्तिक मत.    

पिकासो आणि त्याची एक दशक बायको, त्याच्या दोन मुलांची आई असलेल्या फ्रान्स्वा यांच्या संबंधांबद्दल अपरिचित असणाऱ्यांसाठी पुस्तकातून कळतं की त्यांचं लग्न झालं तेव्हा फ्रान्स्वा एकवीस वर्षांची होती आणि तिला भेटला तेव्हा तो फक्त पाब्लो नव्हता, खूप आधी प्रसिद्धीच्या वलयात स्थिरावलेला ‘पिकासो’ झालेला होता. साठीत प्रवेशलेला. दोघांमध्ये ४० वर्षांचं अंतर. आयुष्यभर कुठल्या न कुठल्या वादविवादांत अडकलेला असामान्य चित्र-शिल्पकार पिकासो हे एक वादळी व्यक्तिमत्त्व होतं- पूर्णपणे आत्मकेंद्री, कलेला वाहिलेलं, गर्विष्ठ आणि सामाजिक संकेत झुगारून लावणारं. आयुष्यात अनेक स्त्रिया येऊनही ‘‘बायका फक्त दोन प्रकारच्या असतात, एक पायपुसण्यालायक आणि दुसऱ्या देवीसारख्या!’’ यांसारखी बेलगाम मतं बोलून दाखवणाऱ्या पिकासोबरोबरचं कुठल्याही स्त्रीचं सहजीवन कशा तऱ्हेचं असणार हे स्पष्टच आहे. पण फ्रान्स्वा वेगळी होती, मला कधी कोणी स्त्री सोडून जाणं शक्यच नाही, या त्याच्या ठाम समजाला तिने शांत, करारीपणे हादरा दिला. क्लॉद आणि पालोमाला घेऊन तिनं घर सोडलं. हा धक्का चवताळलेल्या पिकासोला आयुष्यभर पचवता आला नाही.

उच्चभ्रू अप्पर मॅनहॅटनवरच्या अपार्टमेंटमध्ये फ्रान्स्वाचा स्टुडिओ आणि घर आहे. प्रवेशताच दिसतात दोन कॅनव्हास- पेंटरला हवे तसे, कोनात मांडून ठेवलेले. आजूबाजूला भिंतींवर सगळी फ्रान्स्वाची चित्रं, माध्यम : ऑइल ऑन कॅनव्हास / अ‍ॅक्रॅलिक ऑन पेपर. त्यातली दोन पिकासोची आठवण करून देणाऱ्या शैलीची. कोन आणि आकारांचं संतुलन, स्पष्ट धारदार रेषा, नजरेत भरणारी रंगसंगती आणि टपोऱ्या डोळय़ांचे तिच्यासारखेच चेहरे पाहून, ते काम पिकासोची आठवण करून देणारं वाटतं आणि नाहीही. उलगडा नंतर होतोच, ती फ्रान्स्वाने काढलेली सेल्फ पोट्र्रेटस आहेत. ‘‘मला माझ्या चित्रांची सोबत सगळय़ांत जास्त आवडते.’’ ती आपणहूनच सांगते. ‘‘१९७० मध्ये अमेरिकेत आले. इथे माझ्या चित्रांना फारच चांगला प्रतिसाद मिळाला. मोमा (म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्ट) आणि मेट (म्युझिअम ऑफ मेट्रोपॉलिटन आर्ट) मध्ये चित्रं निवडली गेली, त्यामुळे आत्मविश्वास वाढला. पिंट्रमेकिंगसाठी अ‍ॅक्वाटिंट आणि लिथोग्राफी शिकून घेतल्याने फायदा झाला. पिकासोबरोबरच्या नात्यात याहून वेगळा शेवट अशक्यच होता. त्याच्याइतकीच मलाही माझी कला प्रिय होती, मला ती जगायची होती आणि त्यासाठी मार्गात येणारं प्रत्येक आव्हान मला मंजूर होतं. मी फार चिवटवृत्तीची आहे. ‘‘मी ‘विपिंग वूमन’ नाही होऊ शकत.’’ ती खुल्या स्मिताआड सहज बोलून जाते. संदर्भ ओळखून माझं हसणं पाहून तिला बरं वाटतं. ‘विपिंग वूमन’ हे पिकासोचं एक गाजलेलं चित्र, त्याच्या डोरा मार या आधीच्या चित्रकार बायकोचं. डोराने पिकासोपायी आपल्या व्यावसायिक जीवनाची वाट लावून घेतली! फ्रान्स्वाने दुसरं लग्न फ्रेंच अभिनेता लूक सीमोनशी केलं होतं आणि तिसरं पोलिओची लस शोधून काढणाऱ्या डॉ. जोनास साल्क यांच्याशी. हे लग्न २५ वर्ष टिकलं- साल्कच्या मरणापर्यंत.

 ‘‘मी केम्ब्रिजची पदवीधर, त्यानंतर दोन वर्ष कायदाही शिकले- त्यातले ज्ञान नंतर आयुष्यात कामी आलं.. ’’ ती मधेच  सांगते. फ्रान्स्वाने अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये फाईन आर्ट शिकवलं आहे. तिनं विख्यात गुगनहाइम म्युझिअमच्या नाटकांसाठी नेपथ्य आणि वेशभूषा डिझाइन केली आहे. हे ऐकून तिचं म्हणणं पटतं की पिकासो तिच्या आयुष्यातला एक कालखंड होता. त्यातून बाहेर पडल्यावर, विशेषत: अमेरिकेत आल्यावर सर्जनाला आवश्यक मन:शांती आणि मुक्त भावनेने तिचं स्वत:चं कलाजीवन पुन्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी आलं. चित्रांना मिळालेल्या प्रतिसादाने नव्या सुरुवातीला पोषक ठरणारा आत्मविश्वास मिळाला आणि आयुष्याच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं.

तिचं दुसरं पुस्तक ‘मातीस अ‍ॅण्ड पिकासो’ मी वाचलेलं नव्हतं. पण त्याबद्दल ऐकीव माहितीवरून सहजच प्रश्न विचारला- ‘‘मागे  वळून बघता मातीस किंवा पिकासोंचा कलाकार म्हणून तुमच्यावर काही प्रभाव पडला असं वाटतं?’’ तिचं उत्तर-  ‘‘पिकासोचा नाही, कारण त्यांना काही कोणाला शिकवायचं नसे. मला ते फक्त स्वत:च्या संदर्भात बघत. असेलच काही तर माहीत नाही. चित्रातल्या अनेकांना माझ्या चित्रातल्या चेहऱ्यांवर त्यांचे डिस्टोर्टेड नाक, डोळे दिसतात.. असेलही कदाचित. पण हो, मातीसकडून मी हे हसरे, संपृक्त रंग घेतले. पण ते माझाही भाग असावेत. मातीस आणि पिकासोची मैत्री नमुनेदारच होती. पाब्लोला त्यांच्याशी कलेच्या तत्त्वज्ञानाविषयी भांडायला आवडायचं. त्यांच्या वयातला फरक पाहता मातीस समजूतदार भूमिका घेत. माझ्या मातीसवरच्या पुस्तकांत त्यांनी मला लिहिलेली पत्रंही आहेत, जरूर वाच.’’ ती पिकासोबद्दल रोकठोक बोलतेय, पहिल्या पुस्तकात जाणवणारा कडवटपणा ओसरलाय आणि तिला हवं ते तिनं मिळवलंय हे वागण्यातूनही जाणवलं. शगाल, जोकॉमेत्ती, मातीस आणि ब्राकसारखे पिकासोच्या कलाकार मित्रांचे उल्लेख वेगवेगळय़ा संदर्भात सोदाहरण येतात की फ्रान्स्वाच्या स्मरणशक्तीला दाद द्यावीशी वाटते. 

‘‘तुमच्यात साम्य काय होतं?’’ या प्रश्नाच्या उत्तरात ती बरंच काही  सांगते, पण त्यात मुलांचा उल्लेख टाळते. तिच्या पुस्तकानंतर त्यांच्या निष्पाप मुलांशी पिकासोने संबंध तोडले होते, याची जखम मात्र भरून न येणारीच असावी.  ‘‘आम्ही दोघं मॉडेल किंवा दृश्य समोर ठेवून पेंट करत नसू. ‘फिगरेटिव्ह रिअ‍ॅलिजम’ ही दोघांच्या अनेक चित्रांची शैली. शिवाय आम्ही दोघंही नाझी आक्रमणाने पोळलेले होतो, प्राणपणाने त्याचा विरोध करत राहिलो, पिकासो तर स्पॅनिश सिव्हिल वॉरमध्ये शांतीसाठी मदत करत होता. विश्वभरात दुमदुमलेल्या ‘गर्निका’ने एक चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं, हे दाखवूनच दिलं.’’ आसपासची कॅनव्हासेस पाहून मनात येतं, हिची कला निसर्गाच्या चित्रणावर आधारित नाही. त्यापेक्षा ती माणसं, वस्तू, आकार आणि स्पेस यांचं परस्परांशी असलेलं नातं रंग आणि बोल्ड, स्पष्ट रेषांतून उलगडून दाखवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित आहे.               

फ्रान्स्वाची चित्रं पाहता एक लक्षात येतं, तिची शैली अमुक एक अशी म्हणता येत नाही. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट्स गर्द गहिऱ्या रंगांची, काही मिनीमलीस्टिक शैलीतली, काही मिश्र क्यूबिझम, तर काही स्टील लाइफमधली. तिला स्वत:ला कलेबरोबर नवनवीन प्रयोग करायला आवडत असावं हे स्पष्टच आहे. ‘‘मी भारतात आले होते दोनदा खूप स्केचेस केली,’’ असंही ती सांगते. मला ती पाहायची खूप इच्छा होते, पण विनंती करण्याचा धीर का कोणास ठाऊक पण होत नाही. भेटीच्या अखेरी लक्षात राहते ती तिची जिद्द, तिचं स्वत:च्या कलेवर आणि अस्तित्वावर असलेलं प्रेम. ‘‘माझ्याशिवाय तुझं अस्तित्व ते काय? तुझं कसलं आलंय वास्तव?’’ असं म्हणणाऱ्या पिकासोला तिनं तिच्या कामाने चोख, परिपक्व उत्तर दिलं आहे. काही चित्रांवर सही वेगळीच असल्याचं पाहून मी त्याबद्दल सहज प्रश्न विचारला, उत्तरात ती म्हणते, ‘‘मी पेन्टिंग विक्रीसाठी म्हणून नाही करत, स्वत:साठी करते. चित्र आधी आणि सही मागाहून, कधी-कधी सही अस्थानी वाटते. मग मी सही बदलते, कधी करतसुद्धा नाही. मला माहीत असतं ना की हे माझं चित्र आहे, तेवढं पुरेसं असतं..’’ लाल रंग तिचा आवडता, तो तिला शोभूनही दिसतो.                

या आठवडय़ात फ्रान्स्वा १०१ वर्षांची झाली! पालोमा आणि ऑरेलिया या तिच्या दोघी मुली तिची देखभाल करत असतात. पेन्टिंग मंदावलंय, पण संपलेलं नाही. तिचं ‘अबाऊट वीमेन’ हे अमेरिकन लेखिका लिसा अ‍ॅल्थरबरोबर लिहीलेलं पुस्तक म्हणजे व्यावसायिक स्त्रियांच्या अनुभवांचं गाठोडं, ते वयाच्या ९५ व्या वर्षी बाहेर आलं. तिच्या शंभरीच्या वाढदिवसाला दोन्ही लेकींनी मोठाच समारंभ न्यू यॉर्कमध्ये आयोजित केला होता. तिची निवडक चित्रं प्रदर्शनांत मांडून विक्रीला ठेवली होती. मिळालेल्या सन्मानामध्ये फ्रेंच सरकारच्या ‘शेवालीए द ला लेजाँ द ऑनर’ या बहुमानाचाही समावेश आहे. तिची मुलगी पालोमा म्हणते तसं, ‘‘प्रेमिका, बायको, पेंटर आणि लेखक.. माझ्या आईला सगळंच व्हायचं होतं आणि ते तिने करूनही दाखवलं, सगळी आव्हानं पेलताना स्वत:चं भावनिक विश्वच नव्हे तर स्वत्व, माणूसपण आणि विनोदबुद्धी शाबूत ठेवून!’’

arundhati.deosthale@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 01:07 IST

संबंधित बातम्या