अरुंधती देवस्थळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅमस्टरडॅमच्या त्या तीन वर्षांत एकदा हेन्री मातीसचा (१८६९-१९५४) अभूतपूर्व रेट्रोस्पेक्टिव्ह ‘दि ओअ‍ॅसिस ऑफ मातीस’ स्टाड म्युझिअममध्ये लागला होता, हे आमचं अहोभाग्य! आजवरच्या त्यांच्या आणि विविध माध्यमांतून त्यांच्यावरल्या कामाचं हे सर्वात मोठं प्रदर्शन फ्रान्समध्ये परतण्याआधी इथून अनेक खंडांत हिंडणार होतं. प्रदर्शनात परत हिंडताना एक जाणवलं, काही कलाकारांचा माणूस म्हणून पोत चित्रांबाहेर त्यांच्या लिहिण्या-बोलण्यातूनही उलगडत जातो. मातीसची अनेक पारदर्शी अवतरणं प्रदर्शनात भेटत गेली, मी ती डायरीत टिपत राहिले. मागाहून वाचल्यावर त्यांचंदेखील एक कोलाज मनात तयार झालं. मातीस कलाकार म्हणून उंच होतेच; पण त्यांच्या मनाचं उमदेपण- त्यांच्या प्राणप्रिय बागेइतकंच- संपर्कात येणाऱ्यांना प्रफुल्लित करणारं असावं. अगदी पिकासोसारख्या आक्रस्ताळेपणे भांडणाऱ्या किंवा मॉन्द्रीआनसारख्या मितभाषी मित्रांनासुद्धा असं वाटायला लागलं! 

बाहेरच मातीसच्या स्टुडिओत दोन भिंतींवर लावलेल्या ‘पॅराकिट अँड द मरमेड’( १९५२) या अमूर्त म्युरलचा भव्य फलक लावलेला. हे इन्स्टॉलेशन (साधारण ११  २४ फूट) म्हणजे वासंतिक रंगांचा जल्लोष, पक्षी आणि मधे निळी जलपरी. कॅन्सरच्या मोठय़ा शस्त्रक्रियेनंतर मातीसना व्हीलचेअरशी बांधून टाकलं होतं. त्यामुळे त्यांनी कलाकृती तयार करायला गूएश शैली स्वीकारली. यात त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची व मदतनीसांची मदत घ्यावी लागे. गूएश म्हणजे कागदावर ते काढून देत तो आकार ते सांगतील त्या रंगांत अपारदर्शी पिगमेंटने (पाणी आणि डिंकाचे मिश्रण वापरून) रंगवून घ्यायचा आणि स्टुडिओच्या भिंतींवरच्या कॅनव्हासवर नेमका तो सांगतील तिथे चिकटवायचा. अनेकदा जागा बदलत हा मास्टरपीस तयार झाला! मातीसना बागेत आता पूर्वीसारखं जाता येत नसे. दुरावलेला ताहितीचा किनारा, प्रवाळांचे खडक आणि जलपऱ्यांच्या संदर्भाची मनात असोशी. त्यातून जन्मलेली ही कलाकृती त्यांना समुद्रस्नानाचा आनंद देणारी.. र्सीअलिस्टिक संवेदनशीलतेतून आलेली. शेजारी लावलेल्या त्यांच्या फोटोखाली त्यांचं एक सुंदर वाक्य होतं : ‘I have always tried to hide my efforts and wished my works to have the joyousness of springtime, which never lets anyone suspect the labours it has cost me…l

हे ही वाचा : अभिजात: व्हर्साय : राजवैभवाचा हिरवा शिरपेच

हे ही वाचा : अभिजात : कानागावाची अजस्र लाट आणि होकुसाई

मातीसचा जन्म फ्रान्समध्ये- बेल्जिअन सीमारेषेजवळच्या खेडय़ातला. वडील धान्याचे व्यापारी. आई कलावृत्तीची. ती रंगकामाची साधनं आणि पोर्सेलीनवर चित्रं काढून विकायची. १९ व्या वर्षी मातीस खूप आजारी पडल्याने मन रमवायला तिने त्याला तैलरंग आणून दिले. मातीसला अचानक सूर गवसल्यासारखं झालं. व्यवहारी वडिलांसाठी त्याने वकिलीचं शिक्षण घेतलं खरं; पण लवकरच ते सोडून, त्यांचा प्रखर विरोध पत्करून तो पॅरिस आर्ट अकादमीत दाखल झाला. पॅरिसमधील जीवन शहरी गुंतागुंतीचं. बाहेरून येणाऱ्या कलाकारांना प्रतिकूलतेतून वाट काढण्याला पर्याय नव्हता. त्यातूनच शिकत मातीस कला क्षेत्रातल्या पारंपरिक संयमित अभिजाततेसमोर नैसर्गिक झळाळी नि:संकोचपणे मिरवणारे रसरशीत रंग, नृत्यमग्न नग्न आकृती, आकाशी झेप घेणारे पक्षी किंवा ताहितीतलं ‘वॅनिला स्काय’ जगाला देऊ करणार होते. मातीसच्या शैलीत अलंकरणाची (डेकोरेटिव्ह) आवड दिसते- जिला त्या काळात नाकं मुरडली जात. पॉल सिनॅक वापरत ते बोल्ड रंगांचं पॅलेट पाहून आणि त्यांच्याशी संवादातून प्राथमिक आणि पूरक रंगांच्या शेजारी शेजारी योजनेचा चित्रं उठावदार बनण्यासाठी वापर त्यांच्या मनात रुजला होता. यातूनच त्यांची पहचान बनणार होती. सुरुवातीच्या काळात अनेकांप्रमाणे मातीसनेही काही ‘स्टील लाईफ’ केली, पण त्यात त्यांचं वेगळेपण असे. कधी वस्तूंना दिलेले आकार, तर कधी नजरेत भरणारी पार्श्वभूमी. ‘‘झाडाचं चित्रं काढत असाल तर तुम्हाला त्यात शिरून हळूहळू वाढत जाणं शिकायला पाहिजे,’’ असं ते म्हणत. 

लग्नानंतर मातीस आणि अमेली मधुचंद्राला लंडनला गेले, कारण त्यांना लंडनच्या नॅशनल गॅलरीत जे. एम. डब्ल्यू. टर्नरची चित्रं पाहायची होती. त्यांना टर्नरमध्ये स्वत:चा समानधर्मी सापडला आणि त्याच्या चित्रांतल्या प्रकाशाच्या प्रेमाने त्यांना भारावून टाकलं. प्रकाश आणि पाण्याच्या परस्परांशी असलेल्या सुंदर नात्याच्या त्यांच्या चित्रांची सुरुवात याच काळातली. तिथून हे नवदाम्पत्य कॉर्सिकाला गेलं आणि मातीसच्या चित्रांत भूमध्य सागराच्या विविध किनाऱ्यांवरून दिसणारा प्रकाश कायमचा राहायला आला आणि त्याच्याबरोबर इम्प्रेशनिस्टिक सूचकतेवर प्रसन्न, गडद रंगांचे फटकारे मारणारी फौव मूव्हमेन्टही.. जिला उच्च अभिरुचीच्या कलावर्तुळात ‘जंगली पशू’ म्हणून हिणवलं जात असे. मित्र झालेल्या मॉरिस द व्लामिंकचं काम- विशेषत: शुद्ध रंगांचा प्रसन्न वापर पाहून मातीस इतके झपाटून गेले होते की त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती. वाट सापडली होती आणि ती हमरस्ता होईपर्यंत थांबण्याची त्यांना गरज वाटत नव्हती.   

अनेक नवीन काही करू बघणाऱ्या कलाकारांच्या नशिबी येतात तसे उपहास आणि नकार मातीसच्याही वाटय़ाला आलेच. ‘लक्झरी, काम अँड प्लेझर’ हे त्यांचं सुरुवातीचं प्रसन्न रंगांची उधळण आणि प्रकाशाची जादू खेचून आणणारं चित्र (ऑइल ऑन कॅनव्हास, ३.२  ४ फूट) दिशा दाखवणारं ठरलं. ते किंवा मातीसचा मॅनिफेस्टो मानलं गेलेलं, रंगयोजनेवर त्याची हुकूमत दाखवणारं ‘रेड रूम’ (ऑइल ऑन कॅनव्हास- ६ ७ ७.२५ फूट) त्यांना ‘गावंढळ’ ठरवू पाहणाऱ्यांना चोख उत्तर होतं.

‘ब्लू न्यूड्स’ मालिका याच दरम्यानची! स्त्रीदेहाचा मातीसने मांडलेला मुक्त उत्सव. शृंगारिक असूनही त्यात बीभत्सतेचा अंशही नाही, ही किमया त्यांच्या मनाच्या गहराईची.  ‘ओडलीस्क विथ मॅग्नोलिया’ हे त्याच मादकतेचं एक उदाहरण. मातीस वेगवेगळ्या युरोपियन देशांतील कला आणि कलाकारांची म्युझियम्स पाहायला आवडीने प्रवास करत. इटली, स्पेन, रशिया आणि मोरोक्को त्यांना विशेष प्रिय. मातीसने रंगवलेलं ‘रेड स्टुडिओ’ हे प्रसिद्ध चित्र (ऑइल ऑन कॅनव्हास- साधारण  ६ ७ ७ फुट) म्हणजे पूर्ण लाल रंगात रंगवलेला स्टुडिओ. भिंतीवर सुंदर चित्रं, लाकडी चेस्ट ऑफ ड्रॉवर्स, शिल्पं, ईझल, लाडकी आरामखुर्ची.. साधा मोकळा कारभार.. महत्त्वाचं म्हणजे उभं घडय़ाळ, पण त्याचे काटे काढून टाकलेले.. कला वेळेपेक्षा महत्त्वाची !  

या प्रदर्शनात मातीसवरची फिल्मही पाहायला मिळाली. स्लो मोशनमध्ये काम करणारे प्रौढ मातीस पाहताना लक्षात येतं की एखादा छोटासा तपशील भरतानाही त्यांचा थबकलेला, अनुभवी ब्रश किती मागे-पुढे होतो, विचारात पडतो, बघत राहतो, रेंगाळतो आणि परत येतो.. हे अगदी सर्जनात बुडालेल्या सहज सुंदरतेने घडतं. आविर्भावात कधी कलाकाराची गुर्मी नाही. त्यात मनाची ऋजुताच  दिसते. चित्र पूर्ण झाल्यावर मात्र देहबोली बदलते. मनासारखं काही कॅनव्हासवर उतरल्याचा आत्मविश्वास नि:संदिग्ध भाषेत प्रवाहित होतो.

पिकासो आणि मातीस हेही एक अजब मैत्र होतं. कलेसंबंधित मुद्दय़ांवर कडाडून भांडणं आणि तेवढंच आदरमिश्रित प्रेम. पिकासो म्हणाले होते, ‘If I were not making the paintings I make, I would paint like Matisse’ आणि मातीसनेही स्वत: आणि पिकासोबद्दल अगदी हेच म्हटलं होतं.    

कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय विणकराचा असल्याने कापड आणि पोत यांची उत्कृष्ट जाण मातीसच्या रक्तातच असल्यासारखी. सुरुचीपूर्ण वेशभूषेची त्यांना आवड होती. कलाकारांत आढळणारी बेफिकिरी त्यांच्या आसपास नसे. सुंदर कलावस्तू खरेदी करून घरात आणण्याचं आणि त्यांच्या संगतीने जगण्याचं, स्वत:ला सुंदरतेने वेढून घेऊन चित्रं काढायचं त्यांना वेड होतं. लग्नानंतर वर्षभराने मातीस असेच सेझाँच्या उत्कृष्ट रंगसंगतीच्या, हिरव्या समांतर छटांच्या फटकाऱ्यांतून साकार झालेल्या ‘थ्री बेदर्स’च्या प्रेमात पडले. किंमत पाहिल्यावर ते हप्त्याने विकत घेण्यासाठी अमेलीने स्वत:हून तिची हिऱ्याची अंगठी विकली  होती. ‘माझ्या कलाजीवनात जेव्हा जेव्हा नैतिक कसोटीचे क्षण आले तेव्हा मला या चित्राने आधार दिला आहे,’ असं ते म्हणत. ४१ वर्ष त्यांचं लग्न टिकलं. पण नंतर अमेली घर सोडून गेली. दोघांनी कधी घटस्फोट घेतला नाही, पण एकमेकांवर बंधनंही लादली नाहीत. 

पन्नाशीतल्या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला मिळालेला पुनर्जन्म सार्थकी लावण्याची त्यांना तळमळ होती. शरीरावर आलेल्या बंधनांच्या  मर्यादा स्वीकारून त्यांनी स्वत:साठी निवडलेलं कटआऊट्सच्या माध्यमाला कधी कधी पेंटिंग्सहून मोठं परिमाण होतं, शिल्पाची त्रिमितीयता आणि आकारांचा रेखीवपणा होता. गडद, प्रसन्न रंग कॅनव्हासच्या शुभ्रतेवर उठून दिसत आणि प्रकाशाने उजळलेल्या आंतरिक शांततेची अनुभूती पाहणाऱ्यापर्यंत पोहोचे. त्यांनी अशी दोनशेहून अधिक इन्स्टॉलेशन्स केली.

सत्तरीच्या दरम्यान मातीसच्या आयुष्यात एक दिलाशाची मंद झुळूक आली. त्यांच्या देखरेखीसाठी एक २१ वर्षांची नर्स जॅक्वेस मॉनिक बर्गोसी घरात आली. ती पुढे त्यांची मॉडेलही होती. दोघांमधलं मैत्र आयुष्यभर टिकलं. तिच्या आग्रहास्तव वेन्समधलं ‘कापेल दू रोझरी’हे एखाद्या कवितेतून उतरल्यासारखं अतिशय सुंदर, रंगीबेरंगी चॅपल बनवायला त्यांनी होकार दिला. हा मातीसच्या आयुष्यातला शेवटचा मोठा प्रकल्प! एका आर्किटेक्टच्या सहयोगाने त्यांनी याचं डिझाइन आणि उंच- लांबट खिडक्या, दारांवर, टाईल्सवर रंगीबेरंगी  नक्षीदार आकार बनवले होते. क्रेमलिनची आठवण करून देणाऱ्या या चर्चमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रकाश काचेवर पडल्यानं योजलेली प्रसन्न रंगसंगती वातावरण भारून टाकणारी होती. इथला रक्तवर्णी लाल आणि झळाळता निळा मातीसनी खूप चोखंदळपणाने हवा तसा निवडला आहे. हे चॅपल म्हणजे मानवानं धरतीला अर्पिलेलं एक सौंदर्यलेणं आहे!!

‘कामाने सगळी दुखणी बरी होतात..’ म्हणणारे थकल्या कुडीचे मातीस शेवटच्या दिवसापर्यंत कामात मग्न होते. आदल्याच दिवशी त्यांनी नुकत्याच न्हाऊन आलेल्या त्यांच्या सहचरीचं-, लिडीयाचं- तिला तशीच उभी राहायला सांगून सुंदरसं चित्र रेखाटलं होतं. आणि ‘बरं जमलंय’ असं ते स्वत:शी पुटपुटले होते. मातीस आता घराजवळच्या मोनॅस्ट्रीत चिरनिद्रेत आहेत. तिथून नाईसची खाडी त्यांना आवडायची तशी चमचमत वाहताना दिसते. ते जगातून गेल्यावर दुसऱ्याच दिवशी घरातून फक्त त्या चित्रासह लिडीयाही निघून गेली. कोणास ठाऊक कुठे? arundhati.deosthale@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about french artist henri matisse artworks by henri matisse zws
First published on: 26-06-2022 at 01:08 IST