मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

मॅजेस्टिक प्रकाशनाचे संस्थापक केशवराव कोठावळे यांची जन्मशताब्दी २१ मे रोजी सुरू झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी प्रकाशन संस्था नावारूपाला आणली. त्याचबरोबर मॅजेस्टिक गप्पा, ‘ललित’ मासिक, ग्रंथप्रदर्शने आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत त्यांनी आपल्या सर्जनशीलतेचाही प्रत्यय दिला..

Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

आयुष्यात असं काहीतरी करायचं की त्याने आपल्याबरोबरच इतरांनाही त्यात सहभागी होता येईल, हे केशवराव कोठावळेंच्या आयुष्याचं सूत्र असावं. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर येत, मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करत त्यांनी एक स्वतंत्र संस्थान उभारलं. साहित्यविषयक जाणिवा रूंदावणारे प्रकाशक म्हणून त्यांनी मिळवलेला लौकिक हे त्यांचे कष्टसाध्य यश होतं. माणसांची अप्रतिम पारख असणाऱ्या केशवरावांना त्यांचं मन ओळखण्याची कला अवगत होती. त्यामुळे त्यांचे लेखक त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक असत. लेखक-प्रकाशक असा व्यावसायिक संबंधांचा लवलेशही त्या नात्यात दिसत नसे. व्यावहारिक पातळीवर केशवराव कोठावळे एक उत्तम प्रकाशक आहेत असा निर्वाळा लेखक सातत्याने देत. परंतु केशवरावांना व्यवहारापेक्षा माणुसकीची आस अधिक होती. आपल्या पुण्यातील बंगल्यामधील हॉलना जयवंत दळवी आणि गो. नी. दांडेकर यांचे नाव देण्याची त्यांची कल्पना त्यांच्या अभिजाततेची ओळख देणारी. याच बंगल्यात मे महिन्यातील पहिले पंधरा दिवस ‘मॅजेस्टिक गप्पा’ हा अभिनव साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची त्यांची कल्पना केवळ अभिनवच नव्हती, तर साहित्य व्यवहाराला चालना देणारी होती.

पायजमा आणि नेहरू शर्ट, त्यावर जाड काडय़ांचा चष्मा ही त्यांची लौकिक ओळख. गप्पा मारायला लागले की मग त्यांची ओळख बदलत जाई. समाजभान असणारा, साहित्याविषयी कमालीची आपुलकी असणारा, वाचकांना नेमकं काय आवडेल याची पूर्ण जाणीव असणारा आणि केवळ व्यावसायिक गणिताच्या पलीकडे जाऊन नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देणारा प्रकाशक अशी ही ओळख हळूहळू दृढ होत जाई.

कॉलेजच्या काळातच पत्रकारितेत वावरायला लागलो होतो. साहजिकच तेव्हा केशवरावांच्या जवळ जाता यावे म्हणून धडपड सुरू झाली. सुरुवातीला गच्चीवरील मॅजेस्टिक गप्पा ऐकायला आणि कव्हर करायला जायचो, तेव्हा त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रदर्शनात सगळी पुस्तकं एकत्र पाहायला मिळायची. सगळ्या प्रकाशकांची जुनी, दुर्मीळ पुस्तकं तिथंच वाचणाऱ्याला कधीच आडकाठी नसे. वरच्या गच्चीवरील कार्यक्रम गर्दीने भरून गेला तर या पुस्तकांच्या दालनात पुस्तकं वाचत तो ऐकायची सोयही केलेली असायची. पण केशवरावांच्या घरातही तेवढीच मजा असायची. सगळे लेखक आधी तिथं जमायचे. चहा, सरबत अशी सरबराई झाल्याशिवाय ते कार्यक्रमाला जायचे नाहीत. फक्त मॅजेस्टिकचेच लेखक नव्हे, तर सगळे लेखक तिथे अगदी मनमुराद गप्पा मारत बसायचे. ‘कवि तो दिसतो कसा आननी?’ अशी भावना असणाऱ्या प्रत्येकाला त्या घरात प्रवेश हवा असायचा. पत्रकार असल्याने हळूहळू तिथं प्रवेश मिळाला. ऐंशीच्या दशकातही केशवराव या गप्पांचे वृत्त सर्व वर्तमानपत्रांकडे पोहोचवण्याची व्यवस्था करायचे. एकदा अचानक ते काम करणारा कुणी गैरहजर राहिल्याने ते काम मी आपणहूनच अंगावर घेतले. त्यानंतर केशवरावांच्या घरात आपोआप मुक्त प्रवेशाचा व्हिसा मिळाला.

मग गप्पांच्या कार्यक्रमाशिवायही त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारता येऊ लागल्या. माझ्या वडिलांच्या वयाच्या केशवरावांनी वयातलं अंतर कधी दाखवलंही नाही आणि जाणवूही दिलं नाही. एकदा सहज गेलो तर त्यांनी एका पुस्तकाच्या कव्हरची दोन-तीन डिझाईन्स दाखवली. म्हणाले, ‘कोणतं आवडतंय?’ पुस्तक होतं विठ्ठल प्रभूंचं ‘निरामय कामजीवन’! पोरसवदा वयातल्या मला त्यातलं काहीच कळत नव्हतं. तेव्हा मी हिय्या करून म्हटलं, ‘केशवराव मला काय कळतंय त्यातलं?’ तरी त्यांनी आग्रह धरला. मी एक कव्हर निवडलं. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी हाच प्रश्न विचारला असणार याची खात्रीच होती. तेच कव्हर पुस्तकावर आलं. नंतर कधीतरी केशवरावांनी लक्षात ठेवून मला त्याची आठवणही करून दिली. माणसांना ओळखून त्यांना जवळ करण्याचं आणि निरपेक्ष मैत्रीबंध सांभाळण्याचं त्यांचं हे कसब निरामय होतं.

मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमाला मराठी साहित्यातले प्रकाशकही आवर्जून येत. पाठीमागच्या गल्लीतील मधुकाका कुलकर्णी असोत की आणखी कुणी.. हे सगळे व्यवसायात एकमेकांचे स्पर्धक असले तरी केशवरावांसाठी मित्र असत. साहित्य व्यवहाराला अशी चालना देण्याची ही कल्पना केशवरावांमुळेच आकाराला आली. ते कल्पक होते, जिद्दी होते आणि तेवढेच आत्ममग्नही. ‘ललित’ मासिक ही त्याची आणखी एक खूण. केवळ साहित्य व्यवहाराला वाहिलेलं ‘सत्यकथा’ तेव्हा सुप्रतिष्ठित झालेलं असतानाही केशवरावांनी ‘ललित’ सुरू केलं. त्यातल्या ठणठणपाळनं तर अखिल मराठी साहित्यविश्वात अक्षरश: धमाल उडवून दिली. जयवंत दळवींची खुशखुशीत शैली आणि वसंत सरवटेंची तेवढीच कलात्मक रेखाचित्रं यामुळे ‘ललित’ची वाट पाहणं हे मोठं मौजेचं असे. अलीकडच्या काळात प्रकाशन संस्थांनी सुरू केलेल्या गृहपत्रिकेपेक्षा ‘ललित’चं वेगळेपण ठाशीव असे. आपल्याला साहित्यातलं काय कळतं असं कुणाला वाटू शकेल, अशी भीती मनातल्या मनात वाटणाऱ्या केशवरावांनी ‘ललित’मुळे ती कायमची काढून टाकली.

‘दीपावली’ हे दीनानाथ दलाल यांनी सुरू केलेलं नियतकालिक ताब्यात घेऊन त्याचा दिवाळी अंक स्वत:च्या निगराणीखाली प्रसिद्ध करण्याची केशवरावांची हौस त्यांच्या साहित्यविषयक जाणिवांचं दर्शन घडवणारी होती. मॅजेस्टिक पुरस्कार, ललित शिफारस हे त्यांनी सुरू केलेले उपक्रम आपल्या प्रकाशनाला मोठं करण्यापेक्षा साहित्य व्यवहाराला चालना देणारे कसे होतील याची काळजी त्यांनी सातत्याने घेतली. स्वत:च्या पुस्तकाच्या दुकानात काऊंटरवर उभं राहून ते प्रत्येक वाचकाला निरखत राहत. त्याच्या आवडीनिवडी समजावून घेण्याची कला अवगत झाल्यामुळे वाचकांना काय आवडेल, हे समजून घेता घेताच त्यांना काय द्यायला हवं, याचाही विचार ते सतत करत असावेत. त्यामुळेच नवनवे लेखक शोधणे, त्यांच्या साहित्याचा कस तपासणे आणि मग त्याचं पुस्तकात रूपांतर करणे, हे त्यांचं गुणवैशिष्टय़. जयवंत दळवी, गो. नी. दांडेकर, मधु मंगेश कर्णिक, शं. ना. नवरे, श्री. ज. जोशी, बाळ सामंत, ह. मो. मराठे, अरुण साधू अशा कितीतरी लेखकांशी केशवरावांनी स्नेहबंध जोडले. त्यांच्या साहित्यिक कलाकृतींना साहित्यविश्वात मानाचे पान मिळवून दिले. लेखकांशी केवळ व्यावसायिक पातळीवरील संबंध ठेवण्यात केशवरावांना रस नसे. त्यापलीकडे जाऊन लेखकांच्या मनात शिरण्याची त्यांची इच्छा असे. लेखकांनाही हे समजत असल्याने हे नातं दुपेडी असे.

त्या काळात प्रकाशक पुस्तकं प्रसिद्ध करून विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत. केशवरावांनी त्याच्या पुढे जाऊन पुस्तकं वाचकांपर्यंत कशी पोहोचतील याचा ध्यास घेतला. त्यासाठी ग्रंथप्रदर्शनांचं आयोजन केलं. सवलती जाहीर केल्या. पुस्तकांना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाना क्लृप्त्या लढवल्या. प्रकाशक आणि विक्रेता असे दोन्ही अनुभव एकत्र करून त्यांनी ग्रंथप्रसाराला दिलेली चालना पुस्तकांच्या दुनियेत महत्त्वाची ठरली. दुकानात बसून पुस्तकं विकून कमिशनवर जगणं केशवरावांना शक्य होतं. पण त्याहीपलीकडे जाऊन आपला खडतर भूतकाळ विसरून, कुणालाही त्याचा मागही लागू नये यासाठी अपार कष्ट करत, आयुष्याला सज्जनतेच्या उंबरठय़ावर आणणं हे मोठं अवघड काम केशवरावांनी करून दाखवलं. सर्जनाच्या कैवल्याच्या चांदण्यात स्वत:ला झोकून देत केशवरावांनी आपलं आयुष्य अधिक समृद्ध करता करता मराठी साहित्य-संस्कृतीविश्वात एक नाममुद्रा उमटवली. हे कार्य सहज लक्षात यावं इतकं मोठं आणि वैशिष्टय़पूर्ण. त्यांच्या चेहऱ्यावर यातला लवलेशही दिसता कामा नये याची काळजी त्यांनी सतत घेतली. आयुष्यात काय करायचं, हे ठरवून साध्य होतंच असं नाही. पण केशवरावांच्या आयुष्यात मात्र असं घडलं. त्यांना जे हवं होतं ते त्यांना साध्य करता आलं. मॅजेस्टिकची ही अभिजात परंपरा त्याच दर्जानं पुढे नेत राहणं हे त्यामुळेच अतिशय अवघड काम. त्यांच्या पुढच्या पिढीतील अशोक कोठावळे यांनीही ते करून दाखवलं आहे. त्यामुळेच मराठी साहित्याच्या इतिहासात केशवरावांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन अधिक ठळकपणे होणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे.