प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

गेल्या शतकात महाराष्ट्रात विधात्याने अनेक कलाकार निर्माण केले. त्यांनी केवळ कलेची सेवा केली नाही, तर अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली. अशांपैकी आपल्या सामर्थ्यवान कुंचल्याने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून सोडणारे एक मनस्वी चित्रकार म्हणजे रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगांवकर! मुळगांवकर हे नाव त्यांच्या मनमोहक चित्रांच्या खाली नेटकेपणे लिहिलेले पाहायला मिळे. त्यामुळे महाराष्ट्रात घरोघरी त्यांचे नाव झाले. त्या काळात मुळगांवकर आणि दलाल या दोघा समकालीन चित्रकारांची नावे सर्वश्रुत होती. त्यातही मुळगांवकरांची चित्रे सर्वत्र पाहायला मिळत. त्यामुळे मुळगांवकर हे नाव व त्यांची विलोभनीय चित्रे शाळकरी मुलांनाही माहीत होती. 

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण

मुळगांवकरांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१८ रोजी गोव्यातील अस्नोडा या गावी एका चित्रकाराच्या कुटुंबात झाला. वडील शंकरराव हे नामांकित चित्रकार होते. ज्येष्ठ बंधूही त्याच व्यवसायातले. त्यामुळे रघुवीरमध्ये हा वारसा आला नसता तर नवलच! छोटा रघुवीर वडिलांकडून चित्रकलेचे धडे घेत होता, तसेच त्यांच्या शेजारी बुजुर्ग चित्रकार त्रिंदाद राहत असत. तेथेही त्याचे सतत निरीक्षण चालू असे. पण चित्रकाराचा पेशा पत्करल्याने लागलेल्या आर्थिक झळांमुळे शंकररावांना वाटे की, रघुवीरने चांगले शिक्षण घेऊन कोठेतरी नोकरी करावी व चांगला पैसा मिळवावा. पण त्रिंदादनी रघुवीरचे कलागुण ओळखले होते. त्यांनी शंकररावांना समजावले, ‘रघुवीरमधील कला त्याला स्वस्थ बसवणार नाही. तिच्यामुळेच या मुलाचा उत्कर्ष होणार आहे. त्याला त्या वाटेनेच जाऊ द्या.’ त्यानंतर मुळगांवकर मुंबईला आले. येथे आल्यावर त्याकाळचे ख्यातनाम चित्रकार एस. एम. पंडित यांच्याकडे काही काळ ते राहिले. कारण त्यांना पंडितजींची चित्र काढण्याची, रंगलेपनाची पद्धत अनुभवायची होती. पण पंडित चित्रे काढताना सहसा कोणाला दाखवीत नसत. त्यांच्या स्टुडिओमध्ये सर्व चित्रकार भिंतीकडे तोंड करून काम करीत व पंडितजींचे टेबल मागे असे. त्यामुळे पंडितांना सर्वाची कामे पाहता येत, पण त्यांचे काम मात्र कोणाला दिसत नसे. आणि मुळगांवकरांना तेच तर पाहायचे होते. त्यावर त्यांनी एक तोडगा काढला. त्यांनी पंडितजींचे चरित्र लिहायला घेतले. काही पाने लिहिल्यावर त्यांनी ती पंडितांना दाखवली व आपले टेबल पंडितांच्या शेजारी ठेवण्याची परवानगी मागितली; ज्यायोगे काम करता करता चरित्रासाठी त्यांची माहिती घेता येईल. अशा रीतीने त्यांना पंडितांना काम करताना पाहण्याची संधी मिळाली.

हे ही वाचा >> कलास्वाद: प्रभातचा ‘संत तुकाराम’

मुळगांवकरांनी जरी चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नव्हते तरी त्यांना ती ईश्वरी देणगी होती. कोणाकडेच ते चित्रकला शिकले नाहीत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या चित्राला पोर्तुगीज सरकारचे बक्षीस मिळाले होते. मुंबईला ते गिरगावातील भटवाडीत स्थायिक झाले. तेथे त्यांना कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, जयहिंद प्रकाशन, ग. पां. परचुरे आदी प्रकाशकांच्या पुस्तकांच्या वेष्टन संकल्पनांची कामे मिळू लागली. तेव्हाच्या लेखकांची नावेही मोठी होती व त्यासाठी चित्रकारही तेवढय़ाच ताकदीचा लागत असे. त्यामुळे मुळगांवकरांच्या चित्रांचा बराच बोलबाला होऊ लागला. अल्पावधीत ते एक प्रथितयश चित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. तो काळ मासिके, पुस्तके, दिवाळी अंक आणि कॅलेंडरचा सुवर्णकाळ होता. मुळगांवकरांनी आपल्या कुंचल्याद्वारे ही नियतकालिके सजवली, नटवली. आतील कथांनाही त्यांची आशयपूर्ण चित्रे असत. कधी लाइन, तर कधी हाफटोन, तर कधी अलंकारिक अशा विविधतेने शृंगारलेली मुळगांवकरांची चित्रे म्हणजे उत्कट सौंदर्याचा आविष्कार असे. तसेच कॅलेंडरसाठीही त्यांनी बरीच चित्रे काढली. विशेषत: देवदेवता हा विषय मुळगांवकरांनीच हाताळावा! पूर्वी राजा रवि वर्माने पौराणिक चित्रे घरोघरी पोहोचवली. ज्या जमान्यात विष्णुपंत पागनीस हे ‘संत तुकाराम’, शाहू मोडक म्हणजे ‘कृष्ण’, महिपाल म्हणजे ‘राम’ या अर्थाने लोक त्या देवांच्या रूपाकडे पाहत, त्या काळात मुळगांवकरांनी या सर्व देवदेवतांना चेहरे दिले. आज कलेचे शास्त्र खूप पुढे गेले आहे. आपल्या उत्पादनावर आधारित कल्पना लढवून कॅलेंडर बनविली जातात. पण त्या काळात उत्पादन कोणतेही असो; त्याच्या नावाची पट्टी खाली असे. पण वर मुळगांवकरांचे नयनमनोहर चित्र असे, जे नंतर कोणाच्याही घरी भिंतीवर गेलेले असे. त्या काळात बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा व त्यांचे कथानायक धनंजय-छोटू, झुंजार-विजया, काळा पहाड, सुदर्शन खूपच लोकप्रिय झाले होते. मुळगांवकरांनी या सर्व कथानायकांना चेहरे देऊन त्यांना अमर केले. 

मुळगांवकरांच्या चित्रांमध्ये सौंदर्य खच्चून भरलेले असे. त्यांची पौराणिक, ऐतिहासिक चित्रे महाराष्ट्राला मोहवून टाकत. स्त्रीसौंदर्य रेखाटावे तर मुळगांवकरांनीच! स्त्रीचे आरक्त गाल, तिचा कमनीय बांधा, चेहऱ्यावरील मार्दव, तिच्यासोबत पानाफुलांनी बहरलेला निसर्ग, सभोवार बागडणारी हरणे, हंस, कबुतरे.. अशा प्रकारे त्यांची शृंगारप्रधान चित्रे अश्लिलतेपासून कित्येक कोस दूर होती. डौलदार मोहक आकृत्या, त्याला साजेशी मोहक रंगसंगती, चेहऱ्यावरील भावाविष्कार आणि त्यावर त्यांचा खास असा मुळगांवकरी साजशंृगार यांनी त्यांची चित्रे ओतप्रोत असत. कोणालाही आपली पत्नी मुळगांवकरांच्या चित्रातील तरुणीप्रमाणे, तर मातेला आपले मूल हे मुळगांवकरांच्या चित्राप्रमाणेच हवे असे. एवढा प्रचंड पगडा बसला होता मुळगांवकरांच्या चित्रांचा जनमानसावर! त्यांची कृष्णधवल बोधचित्रे तर पराकोटीचा उच्चांक गाठणारी होती. मग ती प्रसंग दर्शवणारी रंगाच्या वॉशने केलेली असोत, काळ्या शाईमध्ये लाइनने केलेली असोत किंवा अलंकारिक अशा सिल्हौटमधील संपूर्ण काळ्या रंगाने केलेली असोत; त्यावरील एखादा छोटासा हायलाईट त्यातील गोडवा दर्शविण्यासाठी पुरेसा होता. सुमारे पाच हजारांवर चित्रनिर्मिती करणारे मुळगांवकर ‘स्प्रे’ हे माध्यम मोठय़ा कुशलतेने वापरीत. त्यांच्या कामाचा वेगही प्रचंड होता. त्यांची चित्रे केवळ संख्येने विपुल नसून त्यांचा दर्जा आणि मोहकता यामुळे महाराष्ट्रातील घरोघरी त्यांनी ती पोहोचविली. अजूनही अनेकांच्या देवघरात त्यांची चित्रे आढळतात. शास्त्रशुद्ध शिक्षण नसल्याने त्यांचा अ‍ॅनाटॉमीचा अभ्यास झाला नव्हता, पण ती कसर त्यांनी आपल्या रंगलेपनातून आणि चित्रसौंदर्यामधून पुरेपूर भरून काढली. त्यांच्या रेखाटनामध्ये अथवा रंगलेपनात करकरीतपणा कधीच जाणवला नाही. माणसाच्या मनाला प्रसन्न करून सोडणारे सौंदर्य, मनाला ताजेपणा देणारी प्रफुल्लता व भक्तिभावाने मान झुकावी अशी देवदेवतांच्या प्रतिमेतील वास्तवता त्यांच्या चित्रांत ओतप्रोत भरून वाहत असे. काळा रंग मुळगांवकर वापरीत, तसा कोणालाच कधी वापरता आला नाही. त्यांच्या रंगीत चित्रांइतकीच त्यांची कृष्णधवल चित्रेही सौंदर्याचा परिपाक होती. त्यामुळेच चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमलचे कला-दिग्दर्शक म्हणून घेतले. पुढे मुळगांवकरांनी त्यांच्या अनेक चित्रपटांची पोस्टर्स रेखाटली आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. खरे तर व्ही. शांताराम यांना ते आपला आदर्श मानत. त्यामुळेच जेव्हा त्यांनी स्वत:चा ‘मुळगांवकर आर्ट स्टुडिओ’ सुरू केला, तेव्हा त्याचे उद्घाटन त्यांनी शांतारामबापूंच्या हस्ते केले होते.

ग. का. रायकरांचा ‘श्री दीपलक्ष्मी’ तसेच नलिनी मुळगांवकरांचा ‘रत्नप्रभा’ या दिवाळी अंकांमध्ये मुळगांवकरांनी चित्रमालिका सुरू केल्या. थोडय़ाच काळात स्वत: संपादित केलेल्या ‘रत्नदीप’ दिवाळी अंकामध्ये त्यांच्या खास पौराणिक, ऐतिहासिक चित्रमालिका प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांचे विषय काव्यमय असायचे. मग ती मेनका असो, मस्तानी असो, मीलनोत्सुक रती असो वा देवयानी असो. सौंदर्याने मुसमुसलेल्या या नायिका पाहताना रसिक खचितच एका वेगळ्या विश्वात जात. त्यांची मुद्रित झालेली चित्रे आजही कित्येकांनी कापून सांभाळून ठेवली आहेत. तसेच त्यांची  देवादिकांची चित्रे फ्रेम करून देवघरांत पूजेला लावली आहेत. खास चित्रकलेला वाहिलेल्या या अंकाने आपला वाङ्मयीन दर्जाही राखला होता. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, अ. वा. वर्टी, वि. आ. बुवा, ग. दि. माडगूळकर, ना. धों. ताम्हणकर अशा शैलीदार लेखकांचे लेखन या अंकाला लाभले होते. शिवाय हंस, वसंत, महाराष्ट्र, माधुरी, माणिक यांसहित कैक नावाजलेल्या मासिकांची मुखपृष्ठे त्यांनी आविष्कृत केली. कित्येक नव्या संपादकांना त्यांनी विनामूल्य चित्रे दिली. मात्र, छपाई उत्कृष्ट हवी, हा त्यांचा आग्रह असे. कित्येकदा ते स्वत:च त्याचे पैसे देत. पण याची जाहिरात त्यांनी कधीच केली नाही.

हे ही वाचा >> कलास्वाद : एका कलंदर ‘भास्करा’ची शोकांतिका

या वाङ्मयीन प्रवासात ग. का. रायकर, अनंत अंतरकर, जयंतराव साळगांवकर, बाबुराव अर्नाळकर यांच्याशी त्यांचे विशेष सख्य जमले. मुळगांवकरांनी स्वत:च्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त लावली होती. ती जशी कलेच्या बाबतीत होती, तशीच त्यांच्या दैनंदिन जीवनातही होती. त्यांचा पोशाख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खुलून दिसत असे. डोळ्यावर सोनेरी काडय़ांचा चष्मा, स्वच्छ सफेद धोतर, कोट, लांबसडक बोटांत पकडलेला ब्रश या सर्व गोष्टी त्यांच्यातील असाधारण कलाकाराचे दर्शन घडवीत असत. त्यांच्या घरचा काचेचा टीपॉयही पॅलेटच्या आकाराचा होता. काम करताना शेजारच्या ग्रामोफोनवर लता-रफींच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका लावून त्यांचे काम सुरू असे.  मधल्या काळात त्यांनी वाळकेश्वरला मोठा फ्लॅट घेतला. पण त्या एकाकी जीवनात त्यांच्याकडून चित्रसंपदा निर्माण होऊ शकली नाही. पत्नीच्या सान्निध्यातच त्यांची चित्रसंपदा फुलत असे. त्यामुळे ते पुन्हा गिरगांवातील जागेत राहायला आले.

मुळगांवकरांनी वैभव मिळवले. प्रसिद्धीच्या कळसावर ते पोहोचले होते. जगद्गुरू शंकराचार्यानी त्यांना ‘चित्र सार्वभौम’ ही पदवी प्रदान केली होती. बेभान होऊन रंगांच्या मैफिलीत रंगलेल्या या चित्रकलेच्या सार्वभौम सम्राटाला कर्करोगाने ग्रासले. औषधोपचारांनी प्रकृतीत सुधारणा होत होती, पण अनपेक्षितपणे नियतीने डाव साधला. कलाविश्वात मग्न असतानाच अचानक ३० मार्च १९७६ रोजी वयाच्या केवळ ५८ व्या वर्षी मुळगांवकर हे जग सोडून गेले. 

अशा या मनस्वी कलावंताच्या चित्रांचे प्रदर्शन घडवून आताच्या पिढीला त्यांची कलासंपदा दाखवावी, या हेतूने मी सर्वत्र त्यांच्या चित्रांचा शोध घेत होतो. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अमेरिकेला त्यांच्या मुलीकडे गेल्याचे कळले. आणि अचानक मला नशिबाने ती संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या जागेची देखरेख करणारे इडुरकर नावाचे गृहस्थ मला भेटले. त्यांच्याकरवी मी मुळगांवकरांची कन्या भावना पै यांच्याशी अमेरिकेत संपर्क साधून त्यांच्या मुंबईतील घरी असलेली सुमारे १५० मूळ चित्रे मिळवून त्यांचे प्रदर्शन सर ज. जी. उपयोजित कलासंस्थेत भरवले. या प्रदर्शनाला शेकडो रसिकांनी भेट दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुळगांवकरांचे घनिष्ठ मित्र जयंतराव साळगांवकर यांच्या हस्ते केले होते. त्या दिवशी साळगांवकरांनी त्या चित्रमय कालखंडात नेऊन मुळगांवकरांच्या अनेक स्मृती जाग्या केल्या. त्यापैकी त्यांनी सांगितलेली एक आठवण.. मुळगांवकरांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानात त्यांच्या पार्थिवाचे दहन होत होते. अचानक एक रंगीबेरंगी पक्षी तेथे आला. वास्तविक असा पक्षी त्या काळात कधीही कोणाच्याही पाहण्यात आला नव्हता. मात्र, हा अनोखा पक्षी त्या ठिकाणी येताच एकच क्षण तेथे बसला अन् त्याने आकाशात भरारी घेतली. जणू मुळगांवकरांचा आत्माच त्या रंगीत पक्ष्याच्या रूपाने आसमंतात विलीन झाला..

rajapost@gmail.com