प्रसाद मिरासदार prasad.mirasdar@storytel.com

मराठी विनोदावरील व्याख्याने आणि कथाकथनाच्या कार्यक्रमांतून सर्वसामान्यांना आनंद वाटत हिंडण्याची प्रेरणा हीच द. मा. मिरासदार यांची जीवनशक्ती होती. हा आनंदाचा शोध त्यांनी ग्रामीण जीवनातील दारिद्य््राात आणि त्यातून निर्माण झालेल्या माणसांच्या वर्तनातील विसंगतीत शोधला. त्यांचा विनोद हास्य निर्माण करणारा असला तरी दुखावणारा वा बोचरा नव्हता. त्यांच्या अनेक कथा वाचताना हसता हसता अंतर्मुख करतात आणि मनात कारुण्यही निर्माण करतात.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनातील तसेच मराठी मध्यमवर्गातील अनेक कथांना आपल्या मिश्कील आणि मार्मिक लेखनशैलीने समृद्ध करून मराठी साहित्याच्या दालनात मानाचे स्थान  मिळवणारे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार म्हणजेच आमचे दादाकाका! घरात ज्येष्ठ बंधू असल्याने सारे त्यांना ‘दादा’ म्हणायचे आणि ते आमचे काका असल्याने अर्थातच ते आम्हा सर्व चुलत भावंडांचे ‘दादाकाका’ झाले.

दादाकाकांबद्दलची माझी पहिली ठळक आठवण आहे ती अर्थात पंढरपूरच्या दिवाळीची! सर्व मिरासदार कुटुंबीयांनी दिवाळी पंढरपूरला एकत्र साजरी करायची, हा सहाही भावंडांचा अलिखित नियम होता. लहानपणी आम्ही सर्व भावंडे दादाकाका पुण्याहून कधी येतात याची आवर्जून वाट पाहत असायचो. दादाकाका आले की आम्ही सारे ‘दादाकाका आले, दादाकाका आले’ म्हणून उडय़ा मारत घरात सगळ्यांना सांगत असू. ते आले की एक वेगळाच आनंद आणि उत्साह त्यांच्यासोबत वाडय़ात प्रवेश करत असे. केवळ वाडय़ातच नव्हे, तर गल्लीतून गावातही तो पोहोचे. दादाकाकांची मित्रमंडळी, गावातले मान्यवर लोक जमायला लागत. गप्पांच्या मैफिली होत. खास तेलमर्दन करण्यासाठी माणूस बोलावून दिवाळीचे पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान, फराळ, फटाके, याबरोबरच मोठय़ांसमोर मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही होत. कुणी गोष्ट सांगे, तर कुणी कविता वाचे. कुणी गाणे म्हणून दाखवी, तर कधी सगळे मिळून नाटक बसवून खास प्रयोग सादर केला जाई. आजी, भाऊ (आजोबा), काका-काकू यांचे कौतुक तर मिळेच; पण दादाकाकांची कौतुकाची थाप एक वेगळाच आनंद देत असे. दुपारी चहा झाला की दादाकाका दिवाळी अंकात छापून आलेली त्यांची कथा वाचून दाखवत. दादाकाका गोष्ट वाचत असताना एकदम तल्लीन होऊन साभिनय वाचत आहेत आणि सारे मिरासदार कुटुंबीय मनापासून हसत दाद देताहेत, एकामागोमाग एक हास्याच्या लाटा फुटताहेत आणि त्या लाटांबरोबर मनातल्या साऱ्या चिंता, काळज्या आणि कटकटी काही काळासाठी का होईना, विरून जात आहेत.. हे दृश्य खूप लहानपणापासून माझ्या मनावर कोरले गेले आहे. सर्वानी एकत्र दिवाळी साजरी करण्याची आणि दिवाळी अंकात छापून आलेल्या कथा, लेख वाचून दाखवण्याची ही परंपरा करोनाच्या आधी- म्हणजे अगदी दोनएक वर्षांपूर्वीपर्यंत चालू होती.

दादाकाकांचा गोष्टीवेल्हाळपणा आणि त्यातून निर्माण होणारा आनंद फक्त आमच्या कुटुंबापुरताच मर्यादित नव्हता. ते कुठेही गेले तरी हाच अनुभव येत असे. सार्वजनिक जीवनात वावरताना, विविध संस्था आणि संघटनांमध्ये काम करताना त्यांचा वावर तितकाच सहज, साधा आणि आनंदी असे. कोणत्याही समारंभात दादाकाका आले की त्यांच्याभोवती माणसांचा गराडा चुंबकासारखा आकर्षिला जाई आणि मग ते जिथे बसले असतील तिथून हास्याच्या लकेरी ऐकू येऊ लागत. सार्वजनिक जीवनातल्या आणि  कौटुंबिक जीवनातल्या दादाकाकांच्या वर्तनात मी कधीही काहीही फरक पाहिला नाही. अतिशय पारदर्शी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. 

मला त्यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांत आणि अगदी अमेरिकेतही जाण्याचा योग आला. सगळ्याच ठिकाणी आनंद, उत्साह व चैतन्याच्या मैफिलीसोबत आपण फिरतो आहोत असेच वाटत असे. त्यांच्याबरोबरचा प्रवास म्हणजे त्या, त्या प्रदेशातील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत केलेली गप्पांची अखंड मैफल असायची. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम केले होते. त्या प्रत्येक गावातील माणसे, तेथील खाद्यपदार्थ त्यांना माहिती असायचे. गावात द. मा. मिरासदारांचा कथाकथनाचा कार्यक्रम आहे हे कळले की सर्व चाहते मंडळी न बोलावताच गोळा व्हायची. या लोकांमध्ये सर्व पक्षांचे, सर्व विचारसरणीचे, सर्व वयोगटाचे तसेच सर्व आर्थिक स्तरांतले लोक असायचे. एरव्ही कधीही एकत्र न येणारा हा विविधरंगी माणसांचा मेळा दादाकाकांच्या भोवती जमा झालेला आहे आणि सगळे लोक आपापले मतभेद विसरून एकमेकांना टाळ्या देत, विनोद करत गप्पांचा आनंद लुटत आहेत हे दृश्य अनेक गावांतून मी पाहिलेले आहे. डोंबिवली, औरंगाबाद किंवा ते स्वत: अध्यक्ष झालेले परळी वैजनाथचे साहित्य संमेलन असो किंवा अमेरिकेतील सॅन होजे येथे भरलेले साहित्य संमेलन असो; त्यांची गप्पांची ही मैफल कुठेच चुकली नाही. अशा सर्व विचारसरणींच्या माणसांना आपल्या दिलखुलास, हसतमुख स्वभावाने बांधून ठेवणाऱ्या अजातशत्रू दादाकाकांचे स्मृतिचित्र मनावर कायमचे कोरले गेले आहे.

ग्रामीण विनोदी कथालेखक म्हणून त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले गेले असले तरी त्यांनी अनेक गंभीर कथाही लिहिल्या. तसेच अनेक राजकीय लेखही लिहिले. ‘सरमिसळ’ या पुस्तकात हे लेख वाचायला मिळतात. राजकीय आणि सामाजिक वातावरणाबद्दल माहिती घेणे, त्यावर टीकाटिप्पणी करणे हे त्यांच्या आवडीचे विषय होते. पण राजकारण हा कधीच त्यांचा स्वभाव नव्हता. जे मिळेल त्यात समाधान मानून आनंदी राहण्याची एक तटस्थ वृत्ती त्यांच्यात उपजतच होती.

दादाकाकांच्या कथांतून आलेले पंढरपूर हे गाव, तिथली माणसे आणि तिथल्या रात्रीच्या फळीवरच्या गप्पा हे त्यांचे आतून वाटणाऱ्या ओढीचे विषय होते. दरवर्षी हुरडय़ाच्या काळात पंढरपूरला गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. हुरडा तयार झाला हे कळले की सारे मिरासदार कुटुंबीय एकत्रित बस ठरवून त्यांच्या मोठय़ा बहिणीच्या- म्हणजे ताईआत्यांच्या शेतावर हुरडा खायला जायचे, हे ठरलेलेच असे. तिथे शेतावर झाडाच्या सावलीखाली सर्व मिरासदारांनी- म्हणजे जवळजवळ तीस-चाळीस जणांनी बसायचे आणि हुरडा खाणे, उसाचा रस पिणे, पिठलं, भाकरी आणि शेंगदाण्याच्या चटणीचे फर्मास जेवण करणे ही दादाकाकांच्या जीवनातील आनंदाची परिसीमा होती. हा आनंद त्यांनी लहानपणापासून वयाच्या नव्वदीपर्यंत पुरेपूर घेतला. जीवनाकडून इतक्या साध्या-सोप्या अपेक्षा असणाऱ्या दादाकाकांचे आयुष्य सुखात आणि समाधानात गेले यात नवल नाही.  

 याचा अर्थ सर्वाना प्रपंचात येणाऱ्या समस्या त्यांना नव्हत्या असे नाही. घरातला मोठा भाऊ म्हणून असणारी कर्तव्ये, तसेच दोन्ही मुलींची शिक्षणे, लग्ने आदी कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी चालणारे राजकारण आदी समस्यांना त्यांनी हसतमुखाने तोंड दिले. अभाविपच्या माध्यमातून अनेक विद्यार्थाना त्यांनी मदतही केली, परंतु कधी त्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. मिरासदार म्हणजे समाधान असे समीकरण व्हावे, इतके ते आतून समाधानी होते.

ग. दि. माडगूळकरांच्या प्रेरणेतून कथाकथन हा कलाप्रकार द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी महाराष्ट्रात रुजवला आणि लोकप्रिय केला. पण त्यात सर्वात जास्त रमले ते दादाकाकाच. महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात  हजारो कथाकथनाचे कार्यक्रम त्यांनी केले. पुढे पुढे तर ते एकटेच कथाकथनाचे कार्यक्रम करायचे. त्यांना गोष्टी सांगायला मनापासून आवडायचे. आम्हा लहान मुलांना गोष्ट सांगण्यापासून मोठमोठय़ा समारंभांत कथाकथन करताना ते सारख्याच उत्साहाने रंगून जायचे. त्यांचे ‘विनोदाचे आख्यान’ ही मराठी विनोदी साहित्यकारांवरील व्याख्यानमाला ऐकणे ही एक आनंदपर्वणीच होती. त्यांचे आवडते कथालेखक चिं. वि. जोशी आणि आचार्य अत्रे यांच्यावर बोलताना त्यांची वाणी विशेष खुलून यायची. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आम्ही गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांची ‘विनोदाचे आख्यान’ ही व्याख्यानमाला ठेवली होती. त्यावेळी इतकी गर्दी झाली, की शेवटच्या दिवशीचा सत्काराचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात आयोजित करावा लागला. कार्यक्रम सुरू झाला आणि नेमका जोरात पाऊस आला. प्रेक्षकांत जमलेल्या सर्व चाहत्यांनी मिळून संपूर्ण रंगमंच पाठीमागच्या हॉलमध्ये वळवला आणि भर पावसात चिंब भिजत सभागृहात दाटीवाटीने उभे राहून बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दादाकाकांचा सत्कार केला गेला आणि त्यांच्या विनोदाच्या सरींमध्ये चिंब भिजत तो अविस्मरणीय क्षण साजरा झाला. पावसाच्या धारांत भिजत उभे राहून जराही विचलित न होता सगळे त्यांचे भाषण ऐकत होते. आपल्या आवडत्या साहित्यिकाला दिलेली ही विलक्षण दाद माझ्या मन:पटलावरून कधीही पुसली जाणार नाही. 

मराठी विनोदावरील व्याख्याने आणि कथाकथनाच्या कार्यक्रमांतून सर्वसामान्यांना आनंद वाटत हिंडण्याची प्रेरणा हीच त्यांची जीवनशक्ती होती.  दैनंदिन प्रपंचात रोजच्या समस्यांना आणि त्यातील दु:खाला तोंड देत असताना सर्वसामान्य माणसाच्या मनात आपल्या विनोदी कथांनी चार आनंदाचे क्षण देता आले तरी आपले लेखन सार्थकी लागले असे त्यांना वाटत असे. हा आनंदाचा शोध त्यांनी ग्रामीण जीवनातील दारिद्य््राात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तिथल्या माणसांच्या वर्तनातील विसंगतीत शोधला. त्यांचा विनोद हास्य निर्माण करणारा असला तरी दुखावणारा किंवा बोचरा नव्हता. त्यांच्या अनेक कथा वाचताना हसता हसता अंतर्मुख करतात आणि मनात कारुण्यही निर्माण करतात. ‘कलेसाठी कला की रंजनासाठी कला’ हा वाद चालू असताना मानवी जीवनात मनोरंजनालाही फार मोठे स्थान आहे आणि मनोरंजनातूनही कलात्मक उंची गाठता येते अशी ठाम भूमिका घेऊन दादाकाकांनी आपली साहित्यरचना केली. त्यांच्या सर्वच कथांमध्ये याचा प्रत्यय येतो.

असं म्हणतात की, तुमचे जीवन म्हणजे तुमचे नातेसंबंध असतात. तुमच्या जीवनात येणाऱ्या व्यक्ती, तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटना, विविध प्रसंगांत तुम्ही देत असलेल्या प्रतिक्रियांतून तुमचे नातेसंबंध तयार होतात, आणि जे नाते तुम्ही जगता, तेच तुमचे जीवन असते. दादाकाकांबाबत बोलायचे तर त्यांच्याशी असणाऱ्या नातेसंबंधाचा खूप मोठा प्रभाव माझ्या जीवनावरही पडला. ‘मिरासदार’ या आडनावाला त्यांच्या साहित्यकर्तृत्वाने ओळख मिळाली. त्यांच्यामुळेच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात वावरता आले. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, वसंत बापट, नारायण सुर्वे यांच्यासारख्या अनेक मान्यवर साहित्यिकांचा सहवास लाभला. त्यांच्या  साहित्यिक, सामाजिक, राजकीय गप्पागोष्टी निव्वळ ऐकण्यातून आसपासच्या परिस्थितीचे नकळत आकलन होत गेले. समाजात घडणाऱ्या घटनांकडे, त्यातील विसंगतीकडे पाहण्याचा एक मिश्कील दृष्टिकोन तयार होत गेला. दादाकाकांचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची साधी राहणी. एवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळूनही निवृत्त होईपर्यंत घरून रोज गरवारे महाविद्यालयात शांतपणे सायकल चालवत जाणारे दादाकाका, फक्त माझ्याच नव्हे, तर मिरासदार कुटुंबीयांतील सर्वाच्या उपक्रमांना, समारंभांना आवर्जून उपस्थित राहून प्रेरणा देणारे व कौतुक करणारे दादाकाका, कोणत्याही समस्यांत समतोल विचार मांडून योग्य ते मार्गदर्शन करणारे आणि नेहमीच आम्हा सर्वाना आधार वाटणारे दादाकाका अशी कितीतरी वर्णने त्यांच्या स्मृती जागवताना मनात येतात. तरीही दादाकाकांच्या जीवनाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर ‘साधी राहणी आणि आनंदी विचारसरणी’ असे करता येईल. त्यांच्या सहवासात वावरताना कळत-नकळत या साध्या राहणीचे आणि आनंदी राहण्याचे संस्कार माझ्यावरही थोडय़ाफार प्रमाणात होत गेले. हा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल!