पं. नीलाद्री कुमार

पं. शिवकुमार शर्मा हे इतके मोठे कलावंत होते की त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या संतूरमधून ते व्यक्त करू शकायचे. त्यांनी वाद्यातून निघणाऱ्या स्वरांची स्वतंत्र भाषा निर्माण केली, रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. संगीत म्हणजे काय? तर एक प्रकारचा संवाद! ते वाद्यातून, स्वरांतून रसिकांशी संवाद साधायचे. पं. शिवकुमारांचं  आगळेपण अधोरेखित करणारा लेख..

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी माझा संबंध स्वरांमधूनच आला. मी त्यांना संगीताच्या माध्यमातूनच ओळखतो. त्यांच्याविषयी मी जे काही ऐकलं ते माझ्या वडिलांकडून. माझा त्यांचा संबंध हा त्यांच्या संगीतातूनच निर्माण झाला आणि तो माझ्यासाठी एक अपूर्व असा ठेवा बनला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, त्यांच्या संगीतातील योगदानाविषयी माझ्यासारख्या लहान कलावंताने काय बोलावं? कारण शिवजी हे माझ्या वडिलांच्या- पं. कार्तिक कुमार यांच्या वयाचे होते. माझ्या त्यांच्या फार भेटीही झाल्या असंही नाही, पण त्यांचं संगीत मात्र माझ्यात सतत खोलवर झिरपत राहिलं. शिवजी कुठून आले, त्यांची जीवनकहाणी हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचे काम तर जगासमोरच आहे. पण एक कलावंत म्हणून मला काय वाटतं, ते सांगणं माझ्यासाठी महत्त्वाचं!

जगात फारच थोडे कलावंत झाले, ज्यांनी एखाद्या वाद्याचा दर्जा, स्थान, त्याविषयीचं प्रेम आणि आदर एकाच आयुष्यात निर्माण केला. आपल्याकडे वीणा, सरोद, सतार अशी वाद्यं पुराणांशी जोडलेली आहेत. सरस्वतीदेवीच्या हातात वीणा असते. श्रीकृष्णाच्या हाती बासरी असते. शंकराच्या हाती डमरू असतो. तालाशी संबंधित वाद्यं डमरूपासून निर्माण झाली असं मानलं जातं. पुराणांनंतर येतो तो इतिहास. त्यामुळे आता सतार हे वाद्य ज्या अवस्थेला पोहोचलं आहे त्यासाठी कित्येक पिढय़ा लागल्या. सतारद्वारे संगीत सजविण्यासाठी कित्येक लोकांनी अफाट योगदान दिलेलं आहे. आज सतार, सरोद यांसारख्या वाद्यांबरोबर संगीतही उत्क्रांत झालं आहे. कारण ही उत्क्रांती केवळ वाद्यांचीच नाही, तर त्यातून वाजणाऱ्या संगीताचीही आहे. त्यासाठी कित्येक पिढय़ा जाव्या लागल्या. त्याकरता मोठमोठय़ा कलावंतांची सर्जनशीलता पणाला लागली आहे. पण एक वाद्य आणि त्यातून निर्माण होणारं संगीत एकाच पिढीत उत्क्रांत झाल्याचं उदाहरण फारच दुर्मीळ. त्यामुळे पं. शिवकुमार शर्मा यांचं संतूर या वाद्यासाठीचं हे सर्वात मोठं योगदान आहे असं मला वाटतं. आपली लोकसंस्कृती आणि लोकपरंपरांमध्ये अनेक वाद्यं आहेत. पूर्व बंगालमध्ये अशी अनेक लोकवाद्यं आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही वेगवेगळी वाद्यं आहेत. दक्षिण भारतातील वाद्यं आणखीनच वेगळी आहेत. या लोकवाद्यांचीही उत्क्रांती होतच असते. म्हणजे एखाद्या वाद्यात एक तार असते, मग त्याच्या दोन, चार, सहा तारा होत जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर सतारीचं देता येईल. अमीर खुस्रो यांना सतारीच्या निर्मितीचं श्रेय दिलं जातं. ते पर्शियन कवी होते. त्यांनी तीन तारांचं एक वाद्य तयार केलं होतं. पर्शियन भाषेत तीन या संख्येला ‘सेह’ म्हणतात. म्हणून त्याचं नाव झालं ‘सेहतार’! आता या वाद्यात वीस तारा आहेत. त्यामुळे अमीर खुस्रो यांच्यापासून आताच्या पिढीपर्यंत सतार या वाद्यात अनेक बदल होत गेले आणि ते वाद्य म्हणून चांगलंच उत्क्रांत झालं. या वाद्याच्या उत्क्रांतीबरोबर संगीतही उत्क्रांत होत गेलं.

संतूर या वाद्यात किती तारा असतात, मला नाही माहीत. पण आता संतूरची जशी रचना आहे तशी ती पूर्वीच्या काळी नसेलही कदाचित. कारण इराणी संतूर म्हणून एक वाद्य आहे, त्याचा आकार आणि तारांची रचनाही वेगळी आहे. पर्शिया, ग्रीस या प्रदेशांत ते वाजवलं जातं. पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला जगभरात पोहोचवलंच, पण त्यातून वाजणाऱ्या संगीताला त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांच्या मनावर ठसवलं, तसं कोणा कलाकारानं करणं हे अपवादानंच घडलं असेल. मुद्दा केवळ एखाद्या वाद्याचं महत्त्व निर्माण करण्यापुरताच सीमित नाही, तर शिवजी हे इतके मोठे कलावंत होते की त्यांच्या मनातल्या भावना त्या वाद्यातून ते व्यक्त करू शकायचे. त्यांनी त्या वाद्यातून निघणाऱ्या स्वरांची स्वतंत्र भाषा निर्माण केली, रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. शेवटी संगीत म्हणजे काय? तर एक प्रकारे संवादच! ते वाद्यातून, स्वरांतून संवादच साधायचे. त्यांच्या संगीताचा परिणाम मी अनुभवला आहे. त्यामुळे एखाद्या वाद्याचं संगीतात स्थान निर्माण करण्यासाठी काही पिढय़ा जाव्या लागतात. पण शिवजींसारख्या कलाकारानं एका आयुष्यात ते साध्य केलं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण संगीताच्या उत्क्रांतीचा दोनशे-तीनशे वर्षांचा इतिहास आहे. तबल्याचाच इतिहास पाहा. पण संतूरची जडणघडण आणि त्यातून झालेला परिणाम या एकाच माणसामुळे झाला आहे.

माझा शिवजींचा व्यक्तिगत संबंध फारच कमी आला. पण  त्यांचं संगीत मी रसिक म्हणून खूप वेळा ऐकलं. मला असं वाटतं, की पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी जोडीनं निर्माण केलेलं संगीत फार मोलाचं आहे. या दोघांनी मिळून संगीताला वेगळं परिमाण दिलं. वेगळं परिमाण म्हणजे काय, हे कदाचित शब्दांत व्यक्त नाही करता येणार; पण वाजवून दाखवता येऊ शकेल. म्हणजे एखाद्या निधन झालेल्या महान व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर हल्ली ‘एंड ऑफ द इरा’ असं म्हटलं जातं. पण तसं म्हणताना आधी ‘इरा’ म्हणजे काय, हे समजून घ्यावं लागेल. तसंच परिमाणाच्या बाबतीत आहे. शिवजी आणि झाकीरजी जवळपास साठच्या दशकापासून एकत्र वादन करत होते. म्हणजे जवळपास पन्नास वर्ष त्यांनी वाद्यवादनाला वेगळं परिमाण मिळवून दिलं. हे परिमाण केवळ वादनापुरतं मर्यादित नाही, तर त्यात दृष्टिकोण आहे. आता नव्या पिढीनं या परिमाणाकडे पाहून आणखी काय वेगळं करता येईल हे पाहायला हवं. 

शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत यांत जमीनअस्मानाचा फरक आहे. म्हणजे संगीताला भिडणं, गुणवत्ता आणि संगीतरचना.. सगळंच वेगळं आहे. शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत या दोन्ही गोष्टी यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या अशा व्यक्ती फार म्हणजे फारच थोडय़ा आहेत. इतकंच कशाला, दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करणारे कलावंतही अगदी थोडकेच आहेत. त्यातही प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट; पण दोन्ही गोष्टींत यशस्वी होणं ही फारच मोठी गोष्ट आहे. शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत अशा दोन्ही क्षेत्रांत तितकंच उत्तम काम करता येऊ शकतं, हे शिवजी-हरीजी यांनी दाखवून दिलं. त्यांनी चित्रपटांसाठी दिलेलं संगीत अतिशय लोकप्रिय झालं. म्हणूनच त्यांची गुणवत्ता, त्यांचं महत्त्व अधिकच वाढतं. शास्त्रीय संगीतात असे अनेक कलाकार झाले, ज्यांचा चित्रपट संगीताशी कधी संबंधच आलेला नाही. तसंच चित्रपट संगीतातही असे अनेक महान कलावंत होऊन गेले, पण पडद्यामागे राहिल्यानं त्यांचं नावही कुणाला माहीत नाही. त्यांनी कधी मंचावर लोकांसमोर वाजवलं नाही की ते गायलेही नाहीत. त्यामुळे दोन्ही गोष्टी यशस्वीरीत्या केलेले असे कलाकार दुर्मीळात दुर्मीळ आहेत.

पं. रविशंकर यांनी १९७४ मध्ये एक ‘वल्र्ड टूर’ केली होती. त्यात पंधरा-वीस भारतीय कलाकार होते. पं. शिवकुमार शर्मा, माझे वडील, डॉ. एल. सुब्रमण्यम असे मोठमोठे कलाकार होते. तो दौरा तीन-चार महिन्यांचा होता. माझ्या वडिलांकडून मी त्या दौऱ्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. आज आपण विमानातून प्रवास करताना साध्या वर्गातून.. फार तर बिझनेस क्लासमधून किंवा खूप श्रीमंती असेल तर फस्र्ट क्लासमधून जातो. पण त्या दौऱ्यासाठीच्या खास विमानातल्या दीडशे-दोनशे खुर्च्या काढून केवळ चाळीस विशेष खुर्च्या तयार करून घेण्यात आल्या होत्या. त्या विमानाच्या मागच्या पंखावर ‘ओम’ रंगवून घेतला होता. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता, की त्या कलाकारांनी काय अनुभव घेतला असेल! त्या प्रवासात कलाकारांसोबत त्यांचं वाद्य नसे. ते फक्त प्रवास करायचे. त्यांची वाद्यं थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायची आणि ते कार्यक्रम सादर करायचे. कार्यक्रम संपल्यावर पुढच्या ठिकाणी वाद्यं पोहोचायची. त्यावेळचे कार्यक्रम मोठमोठय़ा स्टेडियममध्ये होत असत. वीस-पंचवीस हजार प्रेक्षक कार्यक्रमाला हजेरी लावायचे. असा राजेशाही दौरा त्यावेळच्या कलाकारांना पं. रविशंकर यांच्याबरोबर अनुभवता आला. माझ्यासारख्या तरुण कलाकारांसाठी असा दौरा हे केवळ स्वप्नच होय. त्या दौऱ्याची छायाचित्रं पाहून त्यावेळी काय घडलं असेल याची निव्वळ कल्पनाच करता येऊ शकते. शिवजींबाबतची एक गोष्ट मला अतिशय प्रेरणादायी वाटते. ती अशी, की सुरुवातीच्या काळात शिवजींना खूप टीका सहन करावी लागली होती. ‘संतूर या वाद्यातून संगीत वाजू शकत नाही’ वगैरे. पण ही टीका सहन करून, अनेक अडथळ्यांना तोंड देत शिवजी अशा एका शिखरावर पोहोचले, की ते माणूस नाही राहिले, तर योगी, महात्मा झाले. प्रत्येक माणसाला अडचणींना तोंड द्यावं लागतंच. अडचणी येणं हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण अडचणींना सामोरं जाऊन शिखरावर एखादाच पोहोचतो. त्याला योगी म्हटलं जातं आणि त्याच्या वाटचालीला तपस्या म्हटलं जातं. त्या अडचणी अडचणी राहत नाहीत, तर इतरांसाठी त्या प्रेरणा बनतात. शिवजी त्या शिखरावर पोहोचले आणि योगी झाले, देवस्वरूप झाले.