डॉ  मृदुला दाढे जोशी

गायक आणि निष्णात गिटारवादक भूपेंद्र सिंग यांचं नुकतंच निधन झालं. एक वैशिष्टय़पूर्ण गायक म्हणून त्यांच्या हिन्दी चित्रपटगीतांचा हा आस्वादक मागोवा..

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

एक आवाज असा.. की ऐकताना काळीज जड व्हावं. हुंदका दाटून यावा, पण बाहेर फुटू नये.. पावलंही जड व्हावीत. मनात कसले कसले कढ कुठली तरी चिरंतन दु:खं घेऊन उमटावेत. त्या जुन्या, विस्मृतीत गेलेल्या, आतडय़ातून आलेल्या प्रेमळ हाका घालून  कुणीतरी बोलवावं आणि तो बोलावणारा आवाज हाच असावा असं मनानं आपल्याला सांगावं. त्या आवाजात काहीही ऐकताना त्यातल्या मुरक्या, चढउतार याकडे लक्ष न जाता आसमंतात फक्त तो आवाजच व्यापून उरावा.  आपण त्या स्वरांत बुडालेलो असताना एखादा शब्द असा काही यावा की मनाच्या आभाळात लख्ख वीज चमकून जावी. अशा वेळी डोळे ऐकतात का आपलं? ऐकायचंच नसतं त्यांनी. त्या आवाजाला हीच दाद असते. तो आवाज येतोच मुळी सुगंधी जखमा करायला! ते होणारे दंश सुखाने ल्यावेत कारण त्यात रक्तातल्या जपलेल्या भावनांचा गौरव असतो. त्या आवाजानंच एकदा सांगितलं, वार होताना त्या वेदनेची जाणीवच गोठलेली असते. हळूहळू ती जखम ‘जाणवायला’ लागते. ‘जख्म दिखते नहीं अभी लेकीन, ठंडे होने पे दर्द निकलेगा!’  असं याच आवाजानं सावध केलेलं असतं आपल्याला! 

भूपेंद्र सिंग.. सर्वार्थानं हा आवाज ‘अकेला’ होता. अतिशय खास. ना  त्यात कसला पवित्रा, ना कसला आवेश, ना  कुरघोडी, ना भावबंबाळ  गहिवर, ना डोक्यात जाणारा अनुनय! अनेक आवाज आजूबाजूला बहरत होते, उच्चासनावर विराजमान होते. तरीही हा आवाज रसिकांनी मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपला. कारण तिथंच त्याची खास जागा होती. हृदयाच्या अंतरंगात काय बोचतंय ते या आवाजाला कळत असावं, म्हणून अनेक रहस्यं या आवाजालाच सांगितली गेली. त्या आवाजानंसुद्धा हा विश्वास कायम जपला. काय म्हणावं या आवाजाला? कुठल्या चौकटीत बसवावं? पहाडी नव्हे, चंचल नव्हे, अगदी मिट्ठासही नव्हे, तर पराकोटीचा भारदस्त, खानदानी आणि परिपक्व आवाज. गांभीर्य किती सुरेल आणि मधुर असू शकतं हे भूपीजींनी दाखवलं. हा आवाज घनगंभीर तर खराच, पण म्हणून बोजड नव्हता. त्यात नाजूक हरकतीही स्वच्छ ऐकू येतात. ‘आज बिछडे हैं कल का डर भी नहीं ’ म्हणताना ‘आज’ शब्दावरची मुरकी  किती सहज येऊन गेली. त्यात दुरावण्याचा धक्का होता, पण त्याहीपेक्षा सल फार खोल होता. ‘तेरे आंचल का साया चुराके जीना है जीना’ ही ओळ आसपासच्या सुंदर श्रुती घेत अतिशय सहजतेने खाली ओघळली. तिथे हा खर्ज, भारदस्तपणा आड आला नाही. साधारणत: आपल्याकडे खर्जयुक्त आवाज आपण एक कप्प्यात टाकतो. हेमंतकुमारांचा आवाजही खर्जाचा होता, पण भूपीजी आणि हेमंतदा यांच्या आवाजात खूप फरक आहे. सागराच्या तळाचे  मोतीच, पण वेगळय़ा आकाराचे, वेगळय़ा तेजाचे.. त्यांच्या खर्जाची जातकुळी वेगळी होती. हेमंतदांचा खर्ज रोमान्सकडे झुकणारा होता तर भूपीजींचा दर्दभरा- प्रणयातही काहीसा दुखावलेला होता. क्वचित त्यातला मिश्किल भाव बाहेर काढायला लावला तो पंचमनेच- ‘हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए’  गायला लावून. त्यात ‘लहरा के’वर काय सुरेख जागा आहे. त्यात खरंच पदर ओढून खोडी काढल्याचा भास आहे. ‘बादलों से काट काट कर’ मध्येही खेळकर रोमान्स आहे. पण भूपीजींचा एकूण कल स्वरांच्या खोलीचं गांभीर्य आवाजातून व्यक्त करण्याचाच होता.   

मदन मोहनजींच्या ‘होके मजबूर मुझे’पासून सुरू झालेली भूपीजींची कारकीर्द सत्तरच्या दशकात जास्त बहरली. संगीतकारांना भूपी आठवत ते थोडय़ा धाडसी गाण्यांसाठी. या गाण्यात कसरत नसे, पण भावही ढोबळ नसे.  गुलजारांसारख्या कवीचे शब्द, त्यातून ध्वनित होणारे अर्थ, अमूर्त छटा  व्यक्त करण्याचं आव्हान भूपींच्या गळय़ावर सोपवून संगीतकार मोकळे होत. स्वत:च्या या अनुपम आवाजाची या गाण्यांवर भूपीजींनी अक्षरश: नाममुद्रा उमटवली.  त्यांच्या वाटय़ाला जी गाणी आली, त्यात अतिशय उच्च दर्जाची शायरी आहे आणि संगीतकारांनी त्या शायरीवर अनवट जागा बेतून ती गाणी आणखी बिकट करून ठेवलेली आहेत. अशावेळी हा एक आवाज हे सगळं लीलया पेलून दाखवत होता. 

किती गाणी आठवावीत? 

‘दिल ढूंढता है’ म्हणजे एक विलक्षण छळणारं प्रकरण आहे. त्या आवाजातून आयुष्याचा केवढा मोठा पल्ला उलगडावा? दोघांनी झेललेला थरार आठवणीत राहिलेला असतो फक्त. मग भूपीजींचा आवाजही थबकत येतो. ‘पहला दिल’चा पंचम अंतराळातून आल्यासारखा! स्वत:शी पुटपुटल्यासारखे, अडखळत येणारे शब्द.. आणि ‘दामन के साये’वर आतापर्यंत नसलेला कोमल धैवत चर्रकन कापत जातो! जे गमावलं ते सगळं हा धैवत सांगून जातो. काही स्वर हे अक्षरश: रडवण्यासाठीच येतात. ‘करोगे याद तो’मध्ये ‘करोगे’ याच शब्दात शुद्ध कोमल गंधार लागोपाठ घेणं खय्यामना सुचलं आणि ते या  गळय़ातून असं काही उमटलं की ‘करोगे याद तो’ या तीन शब्दांना तीस शब्दांचं वजन प्राप्त झालं. तालाच्या मात्रांना भरून टाकणारा हा आवाज, तीन मात्रांचा हा मुखडा व्यापून टाकतो, पुन्हा पुन्हा आठवत राहतो. ‘गुजरतेऽऽऽ वक्त की’मध्ये ‘ते’ हे अक्षर लांबवल्यानं तो मोठा काळ डोळय़ापुढे आला. ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता’ म्हणताना किती समजूत आहे त्या आवाजात!

‘ये ऐसी आग है जिसमें धुँवा नहीं मिलता!’ यातला ‘धुँवा’ कसा उच्चारलाय ते नीट ऐकायचं. निदा फाजली शेवटी एक कटू सत्य सांगतात. या जगात प्रेम आहे, पण ते तुम्हाला हव्या त्याच व्यक्तीकडून मिळेल या भ्रमात राहू नका! ‘जहाँ उम्मीद हो इसकी वहाँ नहीं मिलता!’ हे गाताना कमालीची समजूत काढलीय! का लिहितात, का गातात असं?

त्यांच्यातला गिटारिस्ट आणि गायक ही दोन्ही रूपं किती पूरक होती!  गिटारच्या कॉर्डसवर जितकी हुकमत तितकीच गळय़ातल्या स्वरांवर!  आवाजातल्या श्रुतीसुद्धा त्या कॉर्डसमध्ये मिसळल्या  होत्या. भूपीजींचं कुठलंही गाणं घेतलं तरी त्यात स्वरांची सुंदर आस सांभाळलेली दिसते. एखाद्या वत्सल पित्यानं आपल्या लहानग्यांवर चादर पांघरावी तसे या आवाजाच्या उबेत ते स्वर सुखावले असतील, असं वाटतं.

‘एक अकेला इस शहर में’ म्हणजे तर एक आक्रोश, जो अमोल पालेकरांच्या पोरक्या डोळय़ांतून जितका हलवून गेला, तेवढय़ाच तीव्रतेनं  भूपींच्या आवाजातून मूर्तिमंत वैफल्य सांगून गेला.  ‘एक’ हा शब्दही एकटा, खचत जाणारा. अंगातलं त्राण गेलेला तो. त्याचा आवाज आत  रुतल्यासारखाच येणार. पण घुसमटलेला माणूसही अस झालं की टाहो फोडतो तसा भूपीजींचा  आवाज टिपेला जातो तो ‘दिन खाली खाली बर्तन  है’ म्हणताना! ‘इन सूनी अंधेरी आँखों में आँसू की जगह आता है धुँवा’ हे फक्त भूपीजींनीच म्हणावं. कारण ‘धुँवा’ शब्द खरोखर ती काजळी घेऊनच उमटतो. नैराश्याची खाई यापेक्षा खोल असू शकत नाही.

अनवट काही सुचलं की जयदेवना भूपीच आठवत. आता ‘सिगरेट’ हा शब्द गाण्यात असेल असं चुकूनही वाटलं नव्हतं, पण ‘जिंदगी सिगरेट का धुँवा’मध्ये भूपी इतक्या सहजतेने गाऊन गेले की, त्या शब्दाचे कोपरे टोचलेच नाहीत कानाला.

‘एक ही ख्वाब कई बार देखा है मैंने’ म्हणजे खास भूपी स्टाईल ‘बोलगाणं’! असं गाणं बांधणारा पंचम जितका अवलिया तितकेच भूपी.. गाण्यातून बोलण्यात  शिरणं, बोलताना सहजपणे हसणं आणि गाताना अवघड जागाही घेऊन मोकळं  होणं! धर्मेद्रच्या मूडमध्ये हा आवाज इतका विरघळला.. की याहून वेगळी भावना त्याक्षणी असूच शकत नाही हेच जाणवतं. फक्त गिटार आणि भूपीजी यांना खेळायला दिलेलं अंगण आहे हे. ‘गुनगुनाती हुई निकली है नहाके जब भी, अपने भीगे हुए बालों से  ट- प- क- ता पानी’ म्हणताना या शब्दाची अक्षरं, थेंब टपटपल्यासारखी सुटी करून उच्चारायचं कसं सुचलं असेल? आणि ते ‘छिटक देती है तू टिकू की बच्ची’ तर कसलं गोड आहे. आजूबाजूला असलेली तिची नाजूक चाहूल आणि तिचं ते वावरणं खुळावल्यासारखा बघणारा, तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला तो.. त्याचा तो स्वप्नील रोमान्स भूपीजी आवाजातून उभा करतात. किती जीव ओतून गायलेत भूपी! कमालीचं नैसर्गिक आहे त्यांचं गाणं, बोलणं, हसणं, थबकणं..

 विलक्षण सहजता, प्रसन्नता गाण्यात कशी असावी याचं भूपीजी हे उत्तम उदाहरण. एक तर त्या भरीवपणामुळे दोनच ओळी ते गायले आणि फक्त ध्रुवपदात डोकावले तरी त्यांनी पूर्ण अंतरा गायल्याचाच भास होतो. ‘दिल ढूँढता है’ मध्ये केवळ ध्रुवपद गायले आहेत, पण लताबाईंच्या प्रपाताला हा कडा रोखून धरतो. मनुष्याचा स्वभाव त्याच्या गाण्याच्या शैलीत दिसतो. डुएट गाताना हे प्रकर्षांनं जाणवतं, मग ते अनुराधा पौडवालजींबरोबरचं ‘जिंदगी जिंदगी मेरे घर आना’ वा ‘मन कहे मै झूमू’ असो, आशाबाईंबरोबरचं ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ किंवा साक्षात लताबाईंबरोबरचं ‘थोडीसी जमी’, ‘नाम गुम जाएगा’ असो. ‘जिंदगी जिंदगी मेरे घर आना’चा कॅनव्हास किती मोठा. सुदर्शन फाकरी फार वेगळय़ा टोनचं काव्य लिहून गेले. दुरावलेल्या जोडप्याचं हे गाणं. या एका गाण्यात किती स्थित्यंतरं आहेत! घरात एका लहानशा परीचं आगमन होणार आहे हे सांगताना भूपींचा आवाज कसा  बदलतो हे ऐकण्यासारखं आहे. लताबाईंबरोबर गाताना स्वत:ची शैली सांभाळणं कठीण होतं, पण ते त्यांनी सहज केल्याचं जाणवतं. लताबाईंची शैली शब्दांना ठहराव देत, त्या स्वरावकशाचा पूर्ण अनुभव घेणारी, तर भूपीजी तोच शब्द सहजपणे लवकर संपवूनही टाकतात. ‘वक्त के सितम कम हसीं नहीं’मध्ये लताबाईंचा तालाच्या मात्रेचा कण न कण व्यापणारा स्वरांचा ठहराव आणि ‘उम्र तो नहीं एक रात थी’मधला भूपीजींनी वापरलेला कमी अवकाश विचार करायला लावणारा आहे.            

‘थोडी सी जमीं थोडम आसमां’ हे डुएट वाटतं तेवढं सोपं नाही. एक तर लताबाईंचा तळपता आवाज गाण्याला संपूर्णत: व्यापून टाकताना मुळात स्वत:चं अस्तित्व टिकवणं हेच जिथे अवघड; तिथे गाण्यात कलाकुसर करण्याची किती धूसर शक्यता असेल! पण इथं भूपी एक चमत्कार करतातच. एकाच गाण्यात प्रियकराचा आवाज आणि वत्सल पित्याचा आवाज वेगळा लावू शकले ते. ‘रात कट जाएगी तो कैसे दिन बिताएंगे’ म्हणतानाचा अनुरक्त रोमॅँटिक आवाज, ‘बाजरे के सिट्टों  जैसे बेटे हो जवान’ गाताना वेगळा ऐकू येतो. तिथं ताडमाड वाढलेल्या पोरांना मिठी मारणारा बापच दिसायला लागतो. टचकन पाणीच येतं डोळय़ात. हे असं काहीतरी ऐकवून  गुलजार, पंचम, लताबाई, भूपी एक जन्मभर पुरणारी देखणी अस्वस्थता  देऊन जातात. हा असा वत्सल पिता ‘बीती ना बिताई’मध्येही त्या आईवेगळय़ा गाणाऱ्या पिल्लाला मायेनं गोंजारताना दिसला होता. ‘भीगी हुई अँखियोनें’ शब्दावरचा शुद्ध आणि तीव्र मध्यम आवाजात इतकी हळवी श्रुती घेऊन आला की त्या स्वरांच्या अस्तित्वाचंच सार्थक झालं.

भूपीजी आज आपल्यात नाहीत. पण हा वियोग इतका सहज नाही स्वीकारता येत. त्यांचंच गाणं आठवतं. ‘आज बिछडे हैं, कल का डर भी नहीं, जिंदगी इतनी मुख्तसर भी नहीं!’  नाही आम्हाला इतक्या सहजतेनं तुम्हाला निरोप देता येत! इतकं सोपं नाही हे. ‘वक्त की शाख तोडनेवालों, टूटी शाखों पे फल नहीं आते! ’ काळाच्या घावानं  या आवाजाची शाखा इथं तुटलीच की! असा आवाज पुन्हा उमलेल का? आम्ही वरकरणी आमच्या आयुष्यात पुन्हा रममाण होऊ, पण तुमच्या आवाजानं काळजाला जखमा दिल्या आणि त्याला गोंजारलंसुद्धा, हेच आठवत राहू.. हे अश्रू पुसून कामाला लागू.. पण त्या आसवांच्या खुणा गालावर राहतील, कारण तेच आमच्या संवेदनेचं अभिमानास्पद चिन्ह असेल.

‘कच्ची मिट्टी है दिल भी, इन्सान भी, देखने में ही सख्त लगता है

आँसू पोंछे तो आसुओं के निशान खुश्क होने मे वक्त लगता है! ’

अलविदा भूपीजी!

mrudulasjoshi@gmail.com