दासू वैद्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
। दृष्टांत : एक।
एका शहरातील ताजी घटना. एका कॉलनीतील एक मध्यमवर्गीय गृहस्थ रात्रीचं जेवण झाल्यावर शतपावलीसाठी घराबाहेर पडतो. रात्रीची साडेआठ-नऊची वेळ. दहा-पंधरा मिनिटे पाय मोकळे करून घरी परतण्याचा शिरस्ता. कॉलनीसमोरच्या रस्त्यावर दोन-तीन मुलं गप्पा मारत उभी. गृहस्थ त्या मुलांच्या शेजारून जातायत. एक मुलगा त्यांना हटकतो, ‘ओ ऽऽऽ य अंकल’ गृहस्थ थांबतात, ‘‘काय रे बाबा?’’
दुसरा मुलगा अधिकारवाणीनं,‘‘जरा हॉटस्पॉट द्या बरं’’ गृहस्थाला आश्चर्य वाटतं,‘‘ का ऽऽऽ य? हॉटस्पॉट? कसं शक्यए? मी वॉकिंग करतोय.’’
तिसरा मुलगा फिल्मी स्टाईलमध्ये, ‘‘देव बोले तो देने का… जादा बात नहीं मंगताए’’ गृहस्थ दुर्लक्ष करून पुढं चालू लागतात. क्षणात एक मुलगा मागून येतो. शांतपणे पोटात सुरा खुपसतो. गृहस्थ रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळतात. मुलं पळून जातात. पार्श्वभूमीवर वाहनांचे आवाज. कुठंही साखरेचा कण पडला तरी दाही दिशांतून मुंग्या गोळा व्हाव्यात तसे प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेसोबत शूटिंग करणारे मोबाइलवाले हजर होतातच. शिकार करून आणलेल्या प्राण्याची गुहेत सगळ्यांना वाटणी व्हावी तसेच हे चित्रित दृश्य समाजमाध्यमांवर सर्वांसाठी कर्तव्य भावनेने वाटले जाते. शतपावलीला निघालेले गृहस्थ अनंताच्या प्रवासाला निघून जातात. यथावकाश ती तीन मुलं पोलिसांच्या हाती लागतात. त्या तिघांपैकी एक जण एकोणीस वर्षांचा तर दोघे अठरा वर्षांखालील असतात. ‘हॉटस्पॉट’ निमित्ताने घडलेली घटना सफळ संपूर्ण.
हेही वाचा >>> : ‘इरू’ समजून घेण्यासाठी…
। दृष्टांत : दोन।
एम. ए. द्वितीय वर्षाचा वर्ग. करोनापासून विद्यार्थ्यांची संख्या रोडावलीय. तरी पंधरा-सोळा विद्यार्थी वर्गात आहेत. सर शिकवतायत. अर्धा तास संपत आलेला. तेवढ्यात दारात पावलं वाजतात. सगळ्या वर्गाचं लक्ष दारात. एक विद्यार्थी दारात उभा. कपडे चुरगळलेले. डोळे तांबारलेले. केस अस्ताव्यस्त. खंगल्यासारखा आवाज- ‘‘सर, आत येऊ का?’’ सर अनिच्छेने परवानगी देतात. विद्यार्थी वर्गात येऊन बसतो, पण त्याचं लक्ष वर्गात नाहीए. डोळ्यांत झोप आहे. रोज सकाळी अकरा वाजताचा तास. रोज तोच विद्यार्थी. तोच उशीर. तेच तांबारलेले डोळे. जणू रोजचीच घटना. कदाचित हा विद्यार्थी रात्रपाळीत एखाद्या हॉटेलात किंवा कंपनीत काम करत असावा. असं काम करून शिकणारेही होतकरू विद्यार्थी असतात. शेवटी सरांनी न राहवून त्या लाल डोळेवाल्याच्या मित्रांकडे चौकशी केली तेव्हा सगळा उलगडा झाला. तसा तो चांगला अभ्यासू विद्यार्थी. खुर्द-बुद्रुक गावाहून विद्यापीठात शिकायला आलेला. वडील अल्पभूधारक. प्रसंगी दुसऱ्याकडे मजुरीला जाणारे. आता प्रवेशप्रक्रियाच ‘ऑनलाइन’ झालेली. मग मोबाइल तर हवाच. जिल्हा परिषद शाळा, सरकारी दवाखाना आणि बी.एस.एन.एल. एकसाथ मरणपंथाला लागलेले. (लावलेले?) बीएसएनएलचे फोन लागत नाहीत. मग या गब्रूनं दुनिया मुठीत घेण्यासाठीचं कार्ड घेतलं. कुठल्या जन्माची पुण्याई माहीत नाही. या कार्डसोबत रोज दोन जीबी डेटा मोफत मिळाला. (यापेक्षा काय वेगळे चांगले दिवस असतील.) दिवस जायचा गडबड-गोंधळात. रात्र उघडायची स्वर्गाचं महाद्वार. रोज रात्री दोन जीबीचा अद्भुत परीस घेऊन हा पठ्ठ्या अवघ्या विश्वाचा संचार करू लागला. रील्स, सिनेमे पाहण्यापासून सुरू झालेला प्रवास अनावृत देहांत अडखळला. पाय घसरण्याचं वयच ते. पोर्नोग्राफीमुळं जगण्याची कॅलिग्राफी लडखडली. रोजचं जागरण, सैरभैर झालेलं मन. मस्तकातून पुस्तक हद्दपार झालं. भोवताल वितळून गेला. आभासी दुनियेत बहकलेलं मन वास्तवात रमेना. स्क्रीनवरचंच सगळं खरं बाकी भोवताल धूसर होत गेलाय. उगवणारा दिवस म्हणजे फक्त दोन जीबी डेटा. दोन जीबी डेटाची कवचकुंडले धारण करून फिरणारे असे कित्येक गब्रू विसरतायत,
‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो’ असं वामनदादा कर्डकांच्या शब्दांत ललकारणं. उलट अतिसारामुळे मलूल झालेल्या आवाजात कळवळून विचारतायत,
‘सांगा मनाचा ओटा, आमचा ‘डेटा’ कुठं हाय हो’
हेही वाचा >>> आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
। दृष्टांत : तीन।
गावातच पाणी घुसलंय तर आपलं घर थोडंच तरंगणार आहे. म्हणजे आपणही ‘डेटाळलेले’ आहोतच. घटना वर्षभरापूर्वीची असेल. बीड जिल्ह्यात अंबाजोगाईच्या जवळ शेतात आमच्या घराण्याचा एक देव आहे. पूर्वापार तिथे जाण्याचा रिवाज आहे. झाडीत लपलेला देव. खळखळ वाहणारी नदी. आमराई, चिंचेचं बन. निसर्गरम्य ठिकाण. लहानपणी तर बैलगाडीनं जावं लागायचं. आता बरा रस्ता झालाय. चकचकीत टोलधारी रस्त्यापासून पंधरा-वीस कि.मी.चा प्रवास. आमचे पूर्वज कुठलेच रस्ते नव्हते तेव्हा कसे पोहचले असतील? पण पोहचले. त्या पोहचण्याचीच परंपरा निर्माण झाली. पायी, बैलगाडीने, मोटरसायकलवर, चारचाकीने अनेकदा प्रवास केलेला रस्ता. गाडी चालवताना मला अचानक शंका येते- बहुधा रस्ता चुकलाय. मी गडबडतो. शेजारी बसलेली लेक शांतपणे गूगल मॅप लावते. मंजूळ आवाजात बाई मार्गदर्शन करायला लागते. खुर्द-बुद्रुक गावातलं कुलदैवत आमचं आणि त्याचा पत्ता अमेरिकेत बसलेली मड्डम सांगतेय. ‘दोनशे मीटर पुढे जा मग डावीकडे वळा. मग सहाशे मीटर सरळ जाऊन उजवीकडे वळा. तुम्ही तुमच्या ईप्सित ठिकाणी पोहचाल.’ मला गंमत वाटतेय. आमच्या कुलदैवताचा पत्ता ही बाई किती तपशिलाने सांगतेय. (अर्थात त्यांनी लावलेल्या शोधाचे फक्त लाभार्थी होण्याचं आपण ठरवलेलंच आहे. बाकी शोध लावायला, संशोधन करायला आम्हाला वेळ कुठाय? व्हाट्स अॅपवर गुड मॉर्निंग, गुड नाइट करण्यातच आपण किती व्यग्र असतो.) या कौतुकाला छेद देणारा एक विचार मनात आला. गूगल मॅप सोबतीला आहे म्हणून तर मी नेहमीचा रस्ता विसरलो नसेल? या गूगलच्या भरोशावरच आपण असेच राहात गेलो तर भविष्यात मेमरीची पुरती वाट लागू शकते. अनेक शतकांच्या रियाजाने आपण स्मरणशक्ती मिळवली आहे. स्मरणशक्तीच विस्मृत झाली तर? याआधी वापरणं बंद केलं म्हणून आपली शेपूट गळून पडलेली आहेच.
। द्राष्टांतिक।
जगताना प्राणवायूची नितांत आवश्यकता असते. प्राणवायूची कमतरता असेल तरी जीव गुदमरायला लागतो. आज तीच अवस्था डेटाची आहे. पुरेसा डेटा नसेल तर जगणं शून्य होऊन जातं. माणसं बेचैन होतात. गाजावाजा करीत थ्री जी, फोर जी, फाईव जीची आपण प्रतिष्ठापना केली. निश्चितच त्याचे फायदेही झाले, पण गूळ चांगला आहे म्हणून कितीही खायचा नसतो. एखाद्या माणसाला मारायचे असेल तर विषच द्यायची गरज नाही. अति गुळाच्या सेवनानेही माणूस मरू शकतो. एखादी सुविधा, एखादं तंत्रज्ञान वापरण्याचं काही ताळतंत्र हवं. हा विषय तसा चावून चावून चोथा झालेला आहे. अनेक जण अनेक पद्धतीनं चोथा झालेला हा विषय मांडत असतात. अगदी शालेय पातळीवरील वादविवाद स्पर्धेत ‘शाप की वरदान’ असा युक्तिवाद करून अनेकांनी चषक पटकावले आहेत. पण ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ असं घोषवाक्य भिंतीवर झळकवण्याएवढा छातीठोक विचार डेटाच्या उपद्रवाबद्दल अजून उजागर झालेला नाही. कारण ही डेटा भानगड आपल्या जगण्यात अपरिहार्यपणे खोल पसरलेली आहे. आपण सगळेच अपरिहार्यपणे लाभार्थी आहोत. शिवाय या डेटाने जगणं सुकर, सुलभ केलं आहे हे आधी मान्य करावंच लागतं. एखाद्याने ‘मी आंतरजालाच्या भानगडीत अडकणारच नाही.’ असा पण केला तर त्याची जागोजागी अडवणूक होईल. त्याचा श्वास बंद पडेल.
बाळ नीट जेवत नाही म्हणून प्रथम आपण बाळासमोर मोबाइल ठेवला. हाच तो डेटा परिणामांचा पहिला मंगल संस्कार होय. हे व्यसन वाढतच जातं. मानवाची पिल्लं दुधासंगे बोर्नव्हिटा पिऊन धष्टपुष्ट होतात आणि मोबाइलमुळे समृद्ध होतात. या प्रगतीचा आलेख वाढतच जातो. शाळेत एकसाथ जन-गण-मन म्हणणारी पोरं धीटपणे समाजमाध्यमांवर येतात. फेसबुक, इन्स्टाग्रामवर लीलया मुशाफिरी करतात. मोबाइल उघडला की ब्रह्मांडाचं दर्शन होतं. घरातही मोबाइलमध्ये बुडालेलेच आई-वडील लेकरांना दिसतात. आजी-आजोबांचंही अध्यात्म मोबाइलमध्येच अवतरलंय. स्वाभाविक मग लेकरं ‘खानदानी मोबाइलवेडे’ बनतात. मोबाइल हा कुळाचार बनतोय. जवळपास प्रत्येकाला स्वतंत्र मोबाइल असतो. काम करणाऱ्यांना लॅपटॉप असतो. ‘आयटी’त काम करणाऱ्यांच्या मांडीवरून लॅपटॉपचं बाळ उतरायला तयारच नसतं. सर्वांसाठी घरात /कार्यालयात वायफाय लावलेलं असतं. किंवा काही वेळा स्वतंत्र डेटा नंदादीपासारखा जळत असतो. सार्वजनिक नळासारखे सार्वजनिक वायफाय झोनही तयार केले जातात. या ज्ञानपोया ओसंडून वाहत असतात. पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरमधून अन्नाची पाकिटं फेकली जातात तेव्हा गरजू लोक गर्दी करतात तशी या मोफत वायफाय झोनमध्ये भुकेल्या लोकांची गर्दी असते. टाळेबंदीत सर्व काही ठप्प झालं. शाळाही बंद झाल्या. मग ऑनलाइन शिक्षणाचा अध्याय सुरू झाला. मुलांच्या हातात अधिकृत मोबाइल आले. परीक्षाही ऑनलाइन झाल्या. ही दाटीमुटीची लाभदायी परीक्षा मुलांना आवडली. काही ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तर ‘कायम ऑनलाइनच परीक्षा घ्या’ अशी मागणी केली. या डेटामुळं कुठलीही कामं केव्हाही उरकता येतात. जगभर संचार करता येतो. खरं तर विज्ञान-तंत्रज्ञान हे विधायक आहे, तसं विघातकपण आहे. उद्या आपल्या स्वयंपाकघरातील तिखटा-मिठाचा डबाही गूगल शोधून देईल, पण गूगलवर किती अवलंबून राहायचं याचं तारतम्य असलं पाहिजे.
परिवर्तन आवश्यकच आहे. पण या डेटामुळे आपलं अवधान खंडित झालं. हृदयाच्या स्पंदनाशी स्क्रीनवरची दृश्यं जोडली गेली. श्वासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण स्क्रीनवर अवधान केंद्रित केलं. श्रवण, संभाषण, वाचन व लेखन ही पायाभूत कौशल्येही धोक्यात आली. माणसांचा प्रत्यक्ष संवाद धोक्यात आला. लोकसाहित्यात ज्याला ‘सोन्याचं पान’ संबोधलं गेलं ते पोस्टकार्ड आपल्या डोळ्यांसमोर गायब झालं. अर्थात तंत्रज्ञानाने क्षणात जगात कुठेही ‘मेसेज’ पाठवण्याची पर्यायी सोय करून दिलीय. पण स्वत:चा मेसेज तयार करण्याचाही कंटाळा येऊ लागला. मग दुसऱ्याचे उष्टे मेसेज (भावना, विचार) आपले म्हणून पाठवण्याची पद्धती निलाजरेपणाने रूढ झाली. स्वत:च्या दोन ओळी लिहिण्याचीही सर्जनशीलता धोक्यात आलीय. सोबतीला ईमोजी आले. चिन्हांनी/ चित्रांनी सुरू झालेली भाषा पुन्हा एकदा गुहेतल्या चित्रलिपीकडे जाऊ पाहतेय का? कुठलंही तंत्रज्ञान मानवी कल्याणासाठी निर्माण होतं. आपल्याला जादूई ‘डेटा’ प्रगतीसाठी, उन्नतीसाठीच मिळालाय. पण या डेटाच्या अतिरेकामुळं आपली हजारो वर्षांच्या रियाजाची कमाई म्हणजेच स्मरणशक्ती, संयम, एकाग्रता, विवेक धोक्यात येत असेल तर? आपण अघोरी नफ्याच्या मागे लागून तोट्याकडे तर जात नाही ना? dasoovaidya@gmail.com