रघुनंदन गोखले

बुद्धिबळाचा योग्य वापर केला तर संपूर्ण आयुष्य सुसह्य करता येतं. अनेक व्यसनांवर बुद्धिबळाचं वेड मात करू शकतं. काही चित्रपटांमधून असं दाखवण्यात आलं होतं की, बुद्धिबळ हा खेळ वाट चुकलेल्या व्यक्तींना योग्य प्रकारे मार्गावर आणू शकतो. उगाच नाही चित्रपट/ नाटक/ ऑपेरा यांना समाजमनाचा आरसा मानला जातं! आता आपण दोन चित्रपट आणि एका देशाची जिद्द यांच्या कहाण्यांतून बुद्धिबळ कसं आयुष्य सुखद करू शकतं याची झलक बघू.

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

प्रथम आपण बघू २०१३ साली प्रकाशित झालेला अमेरिकन चित्रपट Life of a King’. युजीन ब्राऊन नावाच्या एका कैद्याची ही मनाला भिडणारी कथा आहे. तुरुंगात असताना युजीनला एक कैदी भेटतो. तुरुंगात चोरून आणण्यात येणाऱ्या सिगारेटसाठी ‘चेस मॅन’ नावानं ओळखला जाणारा हा कैदी जुगार खेळत असतो; पण हा जुगार पत्त्यांनी खेळला जात नसतो, तर चक्क बुद्धिबळाच्या डावावर चालतो. चेस मॅन आणि युजीनची चांगली मैत्री होते. युजीनची सुटकेची वेळ येते त्या वेळी चेस मॅन त्याला बुद्धिबळातील राजा भेट देतो आणि म्हणतो, ‘‘या राजाची नीट काळजी घे. मग सगळं नीट होईल.’’

तुरुंगातून बाहेर आलेल्या युजीनची मुलगी त्याला झिडकारते, तर मुलगा तुरुंगात असतो! त्याला तिथल्या शाळेत रखवालदार म्हणून नोकरी मिळते. त्याचा पूर्वीचा मदतनीस असलेला पीटर आता युजीनचा धंदा चालवत असतो. पीटर युजीनला पुन्हा वाईट मार्गाला आणण्याचा प्रयत्न करतो, पण युजीन त्याला दाद देत नाही आणि आपण आता सुधारलो आहोत, असे सांगतो. युजीनला आता शाळेतील मुलांना शिक्षा म्हणून कोंडून ठेवायच्या जागेचा पहारेकरी म्हणून बढती मिळते. इथेच येणाऱ्या मुलांशी पैज लावून पत्ते खेळणं आणि जिंकल्यावर शिक्षा म्हणून त्यांनी बुद्धिबळ शिकायचं अशा प्रकारे युजीन त्यांना बुद्धिबळाची गोडी लावतो. एकीकडे मादक पदार्थाची विक्री आणि दुसरीकडे बुद्धिबळाची गोडी यामुळे मुलांमध्ये तणाव निर्माण होतो, पण अखेर बुद्धिबळाचा विजय होतो असा हा चित्रपट आहे.

अमेरिकेत काळय़ा लोकांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे पोटा-पाण्यासाठी या लोकांना गुन्हेगारीचा आश्रय घ्यावा लागतो. आजूबाजूला सर्वत्र गुन्हेगारी वातावरण असल्यामुळे मध्येच एखादा बुद्धिबळाचा क्लब असेल तर वाळवंटातील ‘ओयासिस’च! लोकांना विरंगुळा आणि तेवढा वेळ गुन्हेगारीपासून दूर राहण्याचं साधन.

गेल्या वर्षी चेन्नई येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड झालं त्या वेळी आलेल्या युगांडाच्या संघात फिओना मुटेसी असेल अशी एक भाबडी आशा अनेक बुद्धिबळप्रेमी आणि पत्रकार यांच्या मनात होती; परंतु या युगांडातील बुद्धिबळाच्या राणीनं बुद्धिबळाला आता रामराम ठोकला आहे. ती अमेरिकेत शिक्षण घेते आहे. Queen of Katwe या अप्रतिम चित्रपटामुळे फिओनाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. बुद्धिबळ हीच मुख्य संकल्पना असलेल्या या चित्रपटामुळे अनेक आफ्रिकन बुद्धिबळाकडे आकृष्ट झाले आणि यामुळे एका काटवे येथील कंपाल गावच्या घाणेरडय़ा वस्तीत राहणाऱ्या फिओनाचं विश्व बदलून गेलं. अनेक अमेरिकन संस्था तिच्या मदतीला धावून आल्या. तिच्या शिष्यवृत्तीची सोय केली गेली.

फिओना मुटेसी ही अतिशय गरीब कुटुंबात राहणारी मुलगी. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेलं आणि आईला इतर भावंडांचा सांभाळ करण्याची मदत करताना तिला शाळेत जायला वेळ नाही आणि पैसेही नाहीत. मक्याचे दाणे विकून जे काही पैसे मिळतात त्यावर उपजीविका चाललेली! अशा वेळी तिला भेटतो रॉबर्ट आणि तो तिचं जीवन बदलून जातं! हा रॉबर्ट मिशनरी संस्थेतर्फे मुलांना फुटबॉल आणि बुद्धिबळ शिकवत असे. त्या विचित्र आकारांच्या मोहऱ्यांकडे १० वर्षांची फिओना आकृष्ट होते आणि बुद्धिबळ शिकायला सुरुवात करते. थोडय़ाच दिवसांत फिओना त्या भागातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखली जाऊ लागते.

आता रॉबर्टला वाटतं की, कंपालमध्ये खेळून या मुलीची प्रतिभा फुकट जाते आहे. सर्वाचा विरोध पत्करून तो फिओना आणि इतर मुलांना राष्ट्रीय स्तरावरील आंतरशालेय स्पर्धेत उतरवतो. त्या उच्चभ्रू वातावरणात फिओना आणि तिचे सवंगडी गांगरून जातात, पण अखेर फिओनाची प्रतिभा सर्वोत्तम ठरते. यापुढचा सिनेमा नेहमीच्या वळणानं जातो. अनेक चढउतार सहन करून अखेर फिओनाला आपल्या कुटुंबासाठी चांगलं घर मिळतं. या चित्रपटाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक आफ्रिकन मुली बुद्धिबळ खेळू लागल्या.

हे सर्व चित्रपटांत अतिशयोक्तीही असू शकते; परंतु एक देश असा आहे की, जिथे बुद्धिबळामुळे तेथील तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप कमी झालं आहे. त्या देशाचं नाव आहे तुर्कस्थान! मी १५ वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये हालकीडिकी या गावात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी माझ्या शिष्यांबरोबर गेलो असताना तिथे एका परिसंवादाला जाण्याची संधी मिळाली. बुद्धिबळ या खेळाचं विपणन (मार्केटिंग) कसं करावं यावर विविध क्षेत्रांतील व्यक्तींची भाषणं झाली; परंतु मला भावलं ते तुर्कस्थानी बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष गुलकीज तुलाय यांचं भाषण! त्यांनी पॉवरपॉइंटच्या साहाय्यानं तुर्कस्थानमध्ये बुद्धिबळानं कशी क्रांती घडवून आणली आहे याचं छान विवेचन केलं होतं.

गुलकीज तुलाय यांनी सांगितले की, १९९५ साली तुर्की संघटना अगदीच मोडकळीस आलेली होती. जेमतेम हजार खेळाडू आणि १०-१५ प्रशिक्षक असणारी ही संघटना कशी सुधारायची याचा विचार करत असताना त्यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांना क्रीडा मंत्रालयाकडून फार कमी पैसे मिळत असत. संघटनेनं सरळ शिक्षण मंत्रालय गाठलं आणि मंत्री महोदयांना सांगितलं की, बुद्धिबळ या खेळामुळे विद्यार्थ्यांचा खूप फायदा होतो. आम्हाला बुद्धिबळ हा खेळ मुलांच्या मानसिक प्रगतीसाठी वापरायचा आहे. त्याचप्रमाणे आम्ही देशाच्या गुन्हेगारीचा आकडा कमी करून दाखवू. सरकारं म्हटलं की ती इथूनतिथून सारखीच! कोणत्याही चांगल्या कामाला अडथळा आणण्यासाठी त्यांना फार विचार करून कारणं शोधावी लागत नाहीत. तुर्कस्थानचे शिक्षणमंत्री म्हणाले, ‘‘तुम्ही क्रीडा मंत्रालयाशी संलग्न आहात; त्यांच्याकडे मागा.’’ आता आली का पंचाईत! गुलकीज तुलाय क्रीडामंत्र्यांना म्हणाले, ‘‘बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांना फायदा होतो, व्यसनासक्ती कमी होते. तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्हाला शिक्षण मंत्रालयातून पैसे द्या.’’ हो-नाही करता करता त्यांना थोडे फार पैसे मिळाले. झाले! तुर्कस्थानच्या बुद्धिबळ संघटनेनं इस्तंबूलच्या ज्या ज्या भागात गुन्हेगारी जास्त प्रमाणात होती, त्या त्या भागात बुद्धिबळाचे क्लब उघडले. प्रवेश शुल्क शून्य – मात्र खेळणाऱ्यांना स्पर्धेत भरपूर बक्षिसं! हळूहळू संध्याकाळी तरुणांची गर्दी वाढू लागली आणि संध्याकाळ म्हणजे तीच वेळ ज्या वेळी साधारणपणे बेकार तरुण किंवा कामावरून परत आलेले तरुण दारू, मादक पदार्थ यांचं सेवन करतात.

तुर्की बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष गुलकीज तुलाय म्हणतात, ‘‘प्रत्येक शिक्षण मंत्रालयाकडे शिल्लक राहिलेला निधी असतो. हा निधी जर बुद्धिबळाकडे शिक्षण मंत्रालयाच्या योजनांमार्फत वळवता आला तर बुद्धिबळाला खरोखर सोन्याचे दिवस येतील.’’ क्रीडा मंत्रालयात बुद्धिबळाला कोणी वाली नसतो. युरोपमध्ये फुटबॉल सगळे पैसे खातो, तर आपल्याकडे जेथे वजनदार व्यक्ती अध्यक्ष असेल त्या खेळाला जास्त पैसे मिळतात.

आता तुर्कस्थानात कोणती बुद्धिबळ क्रांती घडली ते बघू या! हळूहळू बुद्धिबळ खेळल्यामुळे प्रसिद्धी मिळते, बक्षिसे मिळतात आणि परदेशवारीही मिळण्याची शक्यता असते म्हटल्यावर अचानक बुद्धिबळ शिकण्यासाठी गर्दी होऊ लागली आणि तुर्की संघटनेला प्रशिक्षक तयार करण्यासाठी कार्यशाळा उघडाव्या लागल्या. मोठय़ा प्रमाणावर बेकार तरुणांना बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून रोजगार मिळू लागला. जेमतेम हजार खेळाडू असलेल्या संघटनेनं जी झेप घेतली ती आज तुर्की बुद्धिबळ संघटनेकडे ८ लाख नोंदणीकृत खेळाडू आणि ८००० तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत आणि तुर्कस्थानची लोकसंख्या आहे ८.५ कोटी! म्हणजे दर १०० व्यक्तींमध्ये सरासरी एक व्यक्ती बुद्धिबळ स्पर्धा खेळते. जर आपण फक्त तरुण आणि बालक वर्गाचा विचार केला तर किती तुर्की लोक बुद्धिबळ खेळतात याचा विचार करा.

ज्या संस्थेकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तरुण मुले/ मुली आकृष्ट होतात तिकडे जाहिरातदार संघटनांचं लक्ष नाही गेलं तरच नवल! अनेक जाहिरातदार स्पर्धा प्रायोजित करण्यासाठी पुढे येऊ लागले आणि गुलकीज तुलाय म्हणाले की, त्यांच्याकडे स्पर्धा प्रायोजकांची वेटिंग लिस्ट होती.

पुढचं पाऊल म्हणजे तुर्कस्तानने आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. या स्पर्धामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संपर्कात तुर्की खेळाडू येऊ लागले आणि त्यांचा खेळ उंचावू लागला. २०१२ साली त्यांना त्यांचा पहिला विश्वविजेता मिळाला. अथेन्स येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेत अग्रमानांकित डिंग लिरेन आणि नुकत्याच संपलेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीमधील डिंगचा साहाय्यक रिचर्ड रॅपोर्ट यांना मागे टाकून अलेक्झांडर इपॅटॉव यानं तुर्कस्थानसाठी पहिलं सुवर्णपदक मिळवलं.

तुर्की बुद्धिबळ संघटनेच्या लक्षात आलं की, त्यांनी त्यांच्या भाषेत बुद्धिबळाचं मासिक काढलं तर त्यांच्या खेळाडूंना परकीय भाषा शिकायची गरज नाही. म्हणून त्यांनी ‘सतरंज सेवेर’ (मराठीत अर्थ – बुद्धिबळप्रेमी) या नावाचं मासिक काढलं.

जाहिरातदार तर होतेच आणि त्यामुळे त्यांना तुर्की आणि परदेशी उच्च दर्जाच्या लेखकांची कमी नव्हतीच. तुर्की बुद्धिबळ संघटनेची पुढील महत्त्वाकांक्षी योजना आहे की, एक वर्तमानपत्र काढायचं- ज्यामध्ये तब्बल चार पानं रोज बुद्धिबळाला वाहिलेली असतील. बघू या त्यांना किती यश मिळतं ते!

तुर्की बुद्धिबळ संघटनेनं जागतिक संघटनेला खुली ऑफर दिली होती की, ज्या ज्या जागतिक स्पर्धा घेण्यासाठी कोणीही देश पुढे येणार नाहीत, त्या तुर्कस्थान घेईल. गेल्या भूकंपामुळे आणि देशाच्या राजकीय भूमिकेमुळे तुर्की बुद्धिबळ संघटनेला फटका बसला आहे. तरीही तेथे फुटबॉल खालोखाल अजूनही बुद्धिबळाला मानाचं स्थान आहे हे खरं! तुर्की सरकारनंही खुल्या दिलानं मान्य केलं आहे की, त्यांच्या तरुणांमधील गुन्हेगारी आता कमी झाली आहे!

अमेरिकेत शाळांच्या बाहेर विद्यार्थ्यांसाठी मेटल डिटेक्टर लावायची गरज निर्माण झाली आहे. हिंसाचारापासून लहान विद्यार्थीही सुटलेले नाहीत. सारखे गुन्हेगारीवरील चित्रपट आणि मालिका बघून मनात येणाऱ्या हिंसक विचारांना पटावरील मारामारीकडे वळवून छोटय़ांना चांगलं भावी आयुष्य जगता येईल असं अमेरिकन शिक्षणतज्ज्ञांना वाटू लागलं आहे. बुद्धिबळाचा ते कसा वापर करून घेतात आणि कसे यशस्वी होतात याकडे आपण लक्ष ठेवू या. gokhale.chess@gmail.com