प्रा. विजय तापस vijaytapas@gmail.com

हरहुन्नरीपणा म्हणजे काय, कार्यकर्तापण म्हणजे काय, किंवा ‘लष्करच्या भाकऱ्या भाजणं’ म्हणजे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं एका माणसाकडे बोट दाखवलं की मिळतात. किंबहुना, अशा प्रश्नांची उत्तरं देता यावीत यासाठीच अनंत हरी गद्रे यांचा जन्म झाला असावा. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकमेकांशी संबंध असलेल्या आणि नसलेल्याही गोष्टी इतक्या मोठय़ा प्रमाणावर केल्या, आणि त्या इतक्या दखलपात्र झाल्या की स्वाभाविकपणेच हरहुन्नरीपणा, कार्यकर्तापण आणि लष्करच्या भाकऱ्या भाजणं त्यांना सावचितपणे येऊन चिकटलं. यातलाच एक भाग म्हणजे त्यांचा सर्वागीण सामाजिक समतेचा कट्टर ध्यास! हा ध्यास, त्यापोटी केलेल्या असंख्य गोष्टी, ओढवून घेतलेली कर्जे आणि ही कर्जे फेडण्यासाठी पुन्हा नवे उद्योग करत राहणं यांत ते इतके रमले की त्यातून त्यांना ‘समतानंद’ ही पदवी प्राप्त झाली! यातला अंशत: विनोदाचा भाग वजा केला तरी तळाशी उरतं ते हेच निव्वळ सत्य की, प्रत्येक समाजाला ज्या वेडय़ा, टोकाचे उद्योग करणाऱ्या, जनसेवेची आसक्ती वा व्यसन असलेल्या माणसांची नितांत गरज असते तसे अनंत हरी गद्रे जन्मजातपणे  होते. ‘मनात आलेली प्रत्येक समाजहितैषी गोष्ट प्रत्यक्षात आणणं आणि त्यासाठी झोकून देणं यासाठीच मी माझा प्रत्येक श्वास जगेन..’ असा करारच बहुधा गद्रेंनी स्वत:शी केला असावा. ‘पॉवर हाऊस ऑफ इनोव्हेटिव्ह आयडियाज्’ म्हणजे गद्रे! ते नाटककार, नाटिकाकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक, जाहिरात लेखक, सामाजिक कार्यकर्ते, समाजचिंतक, उपक्रमधुरीण आणि बावनकशी अस्पृश्यता निर्मूलक होते. हा माणूस भन्नाट होता. स्वातंत्र्य- समता- बंधुता अस्तित्वात आणणं हा त्यांचा नीतिधर्म होता. ‘अहर्निश सेवा’ हे वेड  आणि माणुसकी हा वैचारिक पाया याच जन्मदत्त भांडवलावर गद्रे एक विलक्षण आयुष्य जगले. त्यांची प्रत्येक कृती याची साक्ष देते. राम गणेश गडकरी, श्री. म. माटे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, अच्युतराव कोल्हटकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, आचार्य अत्रे यांना अनंत हरी गद्रे आणि त्यांचं काम पसंत पडावं आणि या तेजस्वितांनी त्यांना ‘आपला माणूस’ म्हणावं हे विलक्षण नाही असं कोण म्हणेल?

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
ग्रामविकासाची कहाणी
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

गद्रे नाटकप्रेमी, कलाप्रेमी होते. नाटक हा एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे याची नेमकी जाणीव त्यांना होती. राजकारण-समाजकारण यांत अमाप रस असलेल्यांसाठी आणि त्याबद्दल बोलावंसं, ऐकावंसं वाटणाऱ्यांसाठी नाटकासारखं माध्यम नाही हे गद्रे यांनी आरपार ओळखलं होतं. त्यांनी नाटय़माध्यमात जे जे लेखन केलं त्यात हीच गोष्ट ठसठशीतपणे लक्षात येते. ‘अस्पृश्यता ही स्पृश्य सवर्णानीच पाडली असल्यामुळे त्याबद्दल प्रायश्चित्त घेऊन ती नष्ट करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे,’ हे विधान असो किंवा ‘ब्राह्मणांची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठा भंग्याला प्राप्त करून देणं म्हणजे अस्पृश्यता निवारण!’ हे विधान असो; याचेच पडसाद त्यांच्या नाटय़लेखनाचे सार झालेले दिसतात. सामाजिक आणि राजकीय बांधिलकी हे गद्रेंचं लक्ष्य होतं. त्यांनी अडीच-तीन तासांच्या लांबीची जी नऊ नाटकं लिहिली त्यात त्यांची ही वैचारिक भूमिका वारंवार डोकावताना दिसते. या नऊ नाटकांचा त्यांनी ‘नवरत्नहार’ असाच उल्लेख केला आहे. त्यांनी नाटय़लेखनाची सुरुवात केली ती १९१९ च्या ‘स्वराज्यसुंदरी’ या नाटकाने. हे नाटक पाच अंकी असून, त्यात २३ प्रवेश आहेत. प्रत्येक प्रवेशात साधारणपणे चार पात्रांचा संचार दिसतो. राजकारणात ‘नाटक’ अंतर्भूत असतं, त्यात असंख्य पात्रांचा वावर असतो आणि राजकारणाला सततच्या घटना-प्रसंगांनी एक स्वाभाविक गतिमानता प्राप्त झालेली असते. राजकारणात दिवास्वप्नं, स्वप्नं, पडद्यामागच्या कारवाया, राणाभीमदेवी थाटाची भाषणं,  स्वपक्ष आणि प्रतिपक्ष संघर्ष, दीर्घ स्वगतं यांचा एक लक्षणीय पट असतो. राजकारणाच्या या स्वरूपविशेषांचा प्रभाव गद्रेंवर खासच पडलेला दिसतो. राजकारणात ‘नाटक’ वा नाटय़मय परिस्थिती असेल तर ती नाटकात असायला हवी आणि तशी ती नाटकात निर्माण करून लोकरंजन आणि लोकशिक्षण दोन्ही साधायला जो उत्साह नाटककाराकडे असावा लागतो, तो गद्रेंपाशी अमाप होता. त्यामुळे ते नाटक या ‘पब्लिक प्लॅटफॉर्म’कडे येणं अपरिहार्य होतं. त्यात भरीस भर म्हणून त्यांना संगीताचीही आवड होती. त्यामुळे १९१९ सालातलं हे नाटक ‘संगीत नाटक’ असण्यावाचून पर्याय नव्हता. ‘स्वराज्यसुंदरी’च्या पाच अंकांत २३ रागांतली तब्बल ५७ गाणी आहेत. अंकानुसारी ही पदसंख्या १४, १५, १३, ११ आणि ५ अशी आहे. ही पदरचनाही बहुधा नाटककाराचीच असावी, कारण त्या पदांमध्ये काव्य कमी आणि गद्यात्मक विधाने जास्त आहेत. गद्रे हे पत्रकार होते हे इथे लक्षात घ्यायला हवं. ज्या रागांमध्ये ही पदे सादर झाली त्यांत

भूप / हमीर / मांड / पिलु / जीवन पुरी / शंकरा / झिंझोटी / यमन / भीमपलास / बागेश्री / केदार / झंपा / सूरदास मल्हार / सारंग / पुरिया धनाश्री/ मांड जोगी / मालकंस / खमाज/ यमनकल्याण / मिश्र पिलु / देस / जंगला / भैरवी यांचा समावेश आहे.

लोकमान्य टिळकांचा राजकारणी, नाटय़कलेचे चाहते आणि हितचिंतक, एक उच्च कोटीचा बुद्धिमान नेता, ज्वालाग्राही वक्ता, पत्रकार या नात्यांनी गद्रेंशी चांगलाच संबंध आला होता. गद्रे यांच्या पत्रकारितेवर आणि अफलातून चविष्ट वार्ताकनावर लोकमान्य खूश असायचे. टिळकांचे विचार आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व यांचा मोठाच प्रभाव त्यांच्यावर नि:संशयपणे होता. यातूनच बहुधा ‘संगीत स्वराज्यसुंदरी’चा जन्म झाला असावा असं मानायला भरपूर वाव आहे. असं म्हटलं गेलं आहे की, लोकमान्यांच्या स्वराज्य मोहिमेला बळ आणि लोकपािठबा देण्यासाठी, या मोहिमेच्या प्रचार आणि समर्थनासाठीच या नाटकाची निर्मिती झाली. स्वराज्याची मागणी करण्यासाठी टिळक इंग्लंडला गेले होते. तेव्हा ‘स्वराज्य’ नावाची कुणी सुंदरी आहे आणि तिला स्वयंवरात प्राप्त करून घेण्यासाठी टिळक इंग्लंडला जातात अशी कल्पना करत गद्रेंनी हे  नाटक लिहिलं आहे. या नाटकात टिळकांवरून बेतलेलं पात्र म्हणजे ‘हिंदवीर’! हिंदवीर आणि स्वराज्यसुंदरी यांचा नाटकाच्या अखेरीस विवाह होतो. याचाच अर्थ हिंदूस्थानात स्वराज्य आणण्याचं आद्य कार्य लोकमान्यांनी केलं आहे, हे अधोरेखित करणं! ‘हिंदूस्थान देशाचे जे राजकारण असेल ते पार्लमेंटच्या पद्धतीने, लोकशाही पद्धतीने- जसे तुम्ही तुमच्या देशाचं चालवता; तसे आमच्या देशाचे शासन चालवण्याचा आम्हाला अधिकार असला पाहिजे’ अशी ठाम भूमिका टिळकांनी घेतली. शक्य तिथे सहकारिता आणि जरूर तिथे सनदशीर विरोध यालाच टिळकांनी ‘प्रतियोगी सहकारिता’ असे नाव दिले. जुलमी कायदे रद्द करणे, पूर्ण प्रांतिक स्वराज्य, हिंदू-मुसलमान ऐक्य आणि भाषावार प्रांतरचना हे त्यांचे मुद्दे होते.

त्या काळातल्या राजकारणाशी- म्हणजे टिळकपक्षीय राजकारणाशी- ज्या नाटकांचा थेट-अथेट संबंध असायचा त्यात जहाल-मवाळ राजकारण आणि संबंधित व्यक्ती यांचा समावेश असायचाच. तसा तो ‘स्वराज्यसुंदरी’मध्येही आहेच. या नाटकात एक पात्र हे ‘पात्र’ म्हणून न येता भारतीय राजकारणात होऊन गेलेली प्रत्यक्षातील व्यक्ती म्हणूनच येतं. ते पात्र वा ती व्यक्ती म्हणजे ‘भारतीय राजकारणाचे पितामह’ म्हणून ओळखले गेलेले दादाभाई नौरोजी!

नाटकाला सुरुवात होते.. सूत्रधाराचा पारंपरिक शैलीशी पूर्ण फारकत घेणारा प्रवेश संपता संपता दादाभाई एका भूताच्या स्वरूपात प्रत्यक्ष रंगमंचावर अवतरतात आणि हिंदवीराशी संवाद साधत, त्याची कानउघाडणी करत त्याच्याकडून राष्ट्रकार्याची शपथ घेतात. या प्रसंगी ते त्याला जी तलवार भेट देतात त्या तलवारीचं नाव आहे ‘सनदशीर तलवार’! या तलवारीची मूठ ‘नीती’ आणि तिची धार ‘सत्यपालन’ ही असल्याचं दादाभाई सांगतात. नाटकातल्या पात्रांची नावं ही प्रतीकात्मक आहेत. पण ही प्रतीकात्मकता अगदीच क्रूड पद्धतीची आहे. हिंदवीर, स्वराज्यसुंदरी, वाग्देव, ओंगल, प्रेमराज, पोटभेदे ही नावे याची साक्ष देतात. नाटकात मवाळ पक्षाचं आणि मवाळ मंडळींचं जितकं काळंकरडं चित्र रंगवता येईल तितकं नाटककार मन:पूर्वक रंगवतो. मवाळ पक्ष हाच देशात कलह निर्माण करणारा आहे असा एकूण सूर आहे. (हे अगदी तंतोतंत आजच्या ‘सत्शील’ (?) भाजप आणि ‘कलहप्रिय’ (?) भाजपेतर यांच्या संबंधांसारखं नाही का वाटत?)

‘स्वराज्यसुंदरी’ या नाटकाला १९१९ मध्ये लोकांचा तुडुंब प्रतिसाद मिळाला यात अजिबात नवल नाही. तो काळच लोकमान्यांचा होता. मात्र, आज हे नाटक वाचताना त्यातले अनेक दोष ढळढळीत लक्षात येतात. मुख्य म्हणजे नाटकावर ब्रिटिश सरकारकडून बंदीची कुऱ्हाड चालू नये म्हणून ब्रिटिश साम्राज्याबद्दल उघड उघड स्तुतीची भूमिका यात घेतलेली आहे. नाटककाराला दुसरीकडे राष्ट्रवादी भूमिकाही घ्यायची आहे. यात नाटकाची नको तशी ओढाताण झाल्याने नाटकाला आवश्यक ती स्पष्टता आलेली नाही. नाटकात संदिग्धता वारेमाप आहेच, पण ती नाटककाराचा कच्चेपणा उघड करणारी आहे. नाटकाच्या साऱ्या पसाऱ्यात अतिरेकी प्रतीकात्मतेने अर्थच हरवतो की काय अशी स्थिती अनेकदा आलेली दिसते.

नाटकाचं कौतुक जर करायचं तर त्यात दादाभाईंच्या भूताचा, रंगमंचावर लखलखाट होऊन अवतरणाऱ्या हिंदमातेचा भाग मोठा आहे. नाटकात रंगमंचावर लखलखाट होऊन एकाएकी हिंदमाता भगव्या वेषात प्रकट होते.. सर्व जण विनम्र होतात. इंग्लंडला जाणाऱ्या हिंदवीराला जणू निरोप द्यायलाच ती प्रकट झाली आहे. ती म्हणते, ‘‘बाळे स्वराज्यसुंदरी, बाळा हिंदवीरा, तुम्हांला आशीर्वाद देण्याकरितां मी या मूर्त स्वरूपांत प्रकट झाले आहे. बाळांनो, श्वेतभूमीच्या थोर राजाधिराजांची परवानगी घेऊन लवकरच परत घरी या आणि सुखाचा राष्ट्रीय संसार करूं लागा. तुम्ही परत आल्यावर जर आपल्या दिव्य राष्ट्रीय संसाराने आपल्या कोटय़वधि बांधवांना सुख द्याल तर मीहि संतुष्ट होईन व तुलाला कोणत्याहि प्रकारचे न्यून पडू देणार नाही. बाळांनो, देवाचा संसार जसा अद्वैतपूर्ण आहे तसाच राष्ट्राचाहि संसार अद्वैतपूर्णच आहे; समजलांत?’’ अनंत हरी गद्रे यांच्या या नाटकाचा ‘प्रचारी नाटक’ म्हणून विचार अधिक करता येईल यात शंका नाही. कारण गद्रेंना तेच तर करायचं होतं!!