प्रभा मराठे

कथ्थकचे अविस्मरणीय जादुगार अशी ख्याती असलेले कथ्थक सम्राट पं. बिरजू महाराज नुकतेच कालवश झाले. त्यांनी कथ्थक नृत्यात काळानुरूप अनेक आधुनिक बदल केले. शिष्यांच्या कलाने घेत त्यांना शिकवण्याचं कसब त्यांच्यापाशी होतं. कथ्थक नृत्यशैली लोकाभिमुख करण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. आपल्या या गुरूला मानवंदना देणारा लेख..

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
religion of lion
नावावरून सिंहांचाही धर्म शोधायचा का?
Alexei Navalny dies in prison
अग्रलेख: मौनाचे मोल!

पं. बिरजू महाराज म्हणजे माझ्या दृष्टीने परिपूर्ण कथ्थक. कथ्थकच्या बोलांना अर्थवाही बनवायचे काम त्यांनी आपल्या आविष्कारातून केले. बंदिशीच्या बोलांवर हस्तक केले तर ते आपले मन एवढे रिझवत नाही, पण त्यामध्ये आविर्भाव केला की माझा हात कोणीतरी पकडला आहे आणि मी तो सोडवून घेत आहे असा भाव निर्माण होतो. मग ते अधिक सुंदर आणि पाहणाऱ्याला आनंददायी वाटते. कोरडी बंदिश केवळ हात-पाय आपटून सादर नाही करायची, तर तिला भावार्थ प्राप्त करून द्यायचा ही त्यांची खासियत होती. पं. बिरजू महाराज हे त्यांच्या लखनौ घराण्याच्या सातव्या पिढीतील कलाकार. अर्थातच सात पिढय़ा जाईपर्यंत काळ किती बदलत जातो. प्रथम कथिक जमात होती. म्हणजे आपल्याकडे कथेकरी बुवा असतात तसे. ते मंदिरामध्ये ईश्वराचे वर्णन करणे एवढेच करीत असत. त्यामध्ये मनोरंजन करण्यासाठी बंदिशी आल्या. पुढे मुघल कालखंडात कथ्थक आले. आता आपण आधुनिक रंगमंचावरून कला सादर करतो. या प्रवासामधून जाताना जे कलात्मक बदल करावे लागले त्याला महाराजजींनी अतिशय उंचीवर नेऊन ठेवले. आधुनिक काळात हेच कथ्थक त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडायला सुरुवात केली. कोणत्याही बंदिशीमध्ये समेला येताना पहिल्यापासून कथ्थक नर्तक एकच ‘खडन’चा हस्तक करीत होते. हात वरती आकाशाकडे आणि डावा हात खाली पृथ्वीकडे इशारा करून. हा प्रकार नीरस नाही का होणार? मग महाराजजींनी वेगवेगळ्या पद्धतीने हस्तक करण्यास सुरुवात केली. बंदिशीचा आकृतिबंध पोहोचल्यानंतर त्याला कुठला हस्तक केला असता शोभिवंत दिसेल असा विचार करून ते समेला वेगळे हस्तक करायला लागले. प्रेक्षकांना वैविध्य पाहायला मिळाल्यामुळे ते छान वाटू लागले. पण त्यासाठी त्यांना बुजुर्ग मंडळींशी थोडा झगडा करायला लागला. आमच्या खोलीच्या शेजारी त्यांचे काका पं. शंभू महाराजजींची शिकवणी सुरू असायची. अनेकदा ते दरवाजा उघडून यायचे आणि ‘ये क्या सिखा रहे हो?’ असा प्रश्न करायचे. खास बंदिशी आपल्या घराण्यातील मुलांना, नातवंडांना शिकवायच्या, बाहेरच्या विद्यार्थ्यांना शिकवायच्या नाहीत असा त्याकाळचा प्रघात. त्यामुळे महाराजजी वेगळी बंदिश शिकवायला लागले की त्यांना काका रागवायचे. एकदा महाराजजींनी त्यांची समजूत घातली. ‘आपण माझे हस्तक पाहा. कथ्थकच्या बाहेर जाऊन मी वेगळे काय करतो हे आपण बुजुर्ग असल्याने मला समजावून सांगा..’ त्यांनी केलेले वेगवेगळ्या पद्धतीचे हस्तक पाहून शंभू महाराज यांनी ‘तुम तो कथ्थक की शान बढा रहे हो..’ अशी त्यांची प्रशंसा केली होती. वाद न करता त्यांनी बुजुर्गाचा विश्वास संपादन केला होता. आपण ज्या प्रेक्षकांसमोर कथ्थक करतो त्यांच्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने सादर करावे लागते, हे त्यांनी पटवून दिले होते. रंगमंचावर नृत्य करताना प्रेक्षक २५ फूट अंतरावर असतात. त्यांना इतके बारकावे दिसत नाहीत. मग त्यांच्यासाठी हाताबरोबरच देहबोलीतूनही भाव दाखवावे लागतात, तर प्रेक्षकांना ते दिसू शकते. असे बदल केल्याने त्यांचे नृत्य सर्वाना आवडायचे.

मी खूपच उशिरा म्हणजे वयाच्या २३-२४ व्या वर्षी पं. बिरजू महाराजजी यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. पुण्यामध्ये मी कथ्थक शिकत होते. त्याकाळी चांगल्या घरातील मुलींनी नृत्य शिकणे हे चांगले समजले जायचे नाही. पण लष्करात असलेले माझे वडील सुधारक वृत्तीचे होते. त्यामुळे त्यांनी मला रोहिणी भाटे यांच्या क्लासला घातले. तिथे मी कथ्थक शिकले. मुंबईला बिर्ला मातोश्रीमध्ये १९५९ च्या सुमारास पं. बिरजू महाराजजींचे नृत्य पाहिल्यानंतर मी अक्षरश: चकित झाले. इतकं सुंदर नृत्य असू शकतं हे त्यांच्याकडे पाहून ध्यानात आलं. तेव्हा मी त्यांच्याकडे शिकायचं ठरवलं. १९६० च्या काळात हे अवघड होतं. कारण तेव्हा पुण्याहून दिल्लीला थेट रेल्वे नव्हती. इथून मुंबई आणि मुंबईहून दिल्ली असे जावे लागत असे. त्यामुळे दिल्ली बहोत दूरच होती. पण मला भीती वाटली नाही. दिल्लीच्या ‘भारतीय कला केंद्रा’मध्ये मी महाराजजींच्या समोर गेले. त्यांनी मला बॅले युनिटमध्ये काम करण्याचे सुचविले. हळूहळू त्यांच्या शैलीचा परिचय झाला. केंद्र सरकारची ‘अ‍ॅडव्हान्स्ड ट्रेिनग इन आर्ट’ ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर गुरू म्हणून मला त्यांच्याकडे शिकायला मिळाले. पुण्यात मी जे शिकले होते त्यापेक्षा काही गोष्टी फार वेगळ्या होत्या. त्यातही अतिशय अवघड वाटलेली गोष्ट म्हणजे चक्कर. आम्ही चौडय़ावर चक्कर घ्यायचो. लखनौ घराण्यात टाचेवर चक्कर असते. इथे मी २७ चकरा मारून नायिका झाले होते. पण तिथे तीन चकरा घ्यायला त्रास झाला. तसेच कलाईचे वळण अवघड गेले. कलाईच्या छोटय़ा आकृतीतून महाराजजी वेगवेगळे भाव दाखवत असत. गुरू म्हणून ते विद्यार्थ्यांला कधी नाउमेद करत नसत. उलट, ‘अभी काफी घुमने लगी है तुम्हारी कलाई..’ असे म्हणून ते प्रोत्साहन देत असत. त्यांनी सगळ्याच शिष्यांमध्ये नृत्य शिकण्याची आवड निर्माण केली. शिकवताना साध्या गोष्टीतून ते तत्त्व सांगायचे. बंदिशीच्या हस्तकाबरोबर देह कुठे, कधी वाकवायचा, नजर कुठे हवी, हे बारकाईने शिकवायचे. त्यामुळे एकेक तुकडा पंधरा-पंधरा दिवस ते शिकवीत असत. बारीकसारीक गोष्टी ते सहजगत्या समजावून सांगायचे. चक्कर करताना हाताने गोल करता तसे नजरेनेही गोल करता आला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.

पं. बिरजू महाराज यांच्याबरोबर कधी नृत्य करण्याची संधी मिळाली नसली तरी त्यांच्या रचनांमध्ये मी नृत्य करत असे. कथ्थकमध्ये भुवई उडवण्याचे काम आलेच पाहिजे. महाराजजींकडून ते आम्हाला शिकता आले. पं. बिरजू महाराज यांच्याइतका साधा, सज्जन आणि प्रेमळ माणूस मी कधीच पाहिला नाही. ‘भारतीय कला केंद्र’ होते मंडी हाऊसजवळ आणि मी लोधी कॉलनीमध्ये राहायला होते. मी बसने जायचे. सकाळी साडेआठ वाजता घरातून निघायचे. पोहोचायला तासभर लागायचा. जेवणाच्या वेळी ‘तुझे जेवण झाले का?’ असे महाराजजी विचारायचे. तेव्हा मी सकाळीच घराबाहेर पडले, असे मी त्यांना कसे सांगणार? थोडय़ा वेळाने मी जेवण केले नसल्याचे त्यांना समजायचे. तेथे येणाऱ्या विक्रेत्याकडून फळे घेऊन ते मला द्यायचे. ‘जेवण झाले ना, आता फळं खा..’ असं सांगून ते फळं द्यायचे.

नर्तक किंवा मुख्य कलाकार हा संगतकारांबरोबर कसा वागतो यावर त्याचे माणूसपण नीट समजते. पं. बिरजू महाराजजी यांनी संगतकारांमध्ये कमतरता आहे हे कधीही प्रदर्शित केले नाही. त्यांच्याबरोबर वाजवणारा तबलावादक चांगला नसला तरी ते त्याला सावरून घ्यायचे. तबलावादक कमी पडतो हे प्रेक्षकांना कधीच कळायचे नाही. एकदा षण्मुखानंद सभागृहामध्ये त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळी प्रख्यात तबलावादक त्यांच्या संगतीला होता. महाराजजी सुरुवात करताना ठाय लयीमध्ये वेगवेगळ्या उपज-तिहाया करीत असत. संगत करणाऱ्या तबलावादकाला काही ते जमले नाही. लय पकडण्याऐवजी तो आपले प्रभुत्व दाखवायला गेला. ‘लयकारी बहोत हो गयी, अब हम भजन करेंगे..’ असे म्हणत महाराजजी यांनी विषयच बदलून टाकला. ‘रंगमंचावर जाण्याआधी आपण बोलून घेऊ,’ असे महाराजजी एका मोठय़ा तबलावादकाला म्हणाले होते. ‘काय बघायचे ते रंगमंचावरच!’ अशी भूमिका घेणाऱ्या त्या तबलजीला तिहाया करताना समेवर येण्याचे काही जमेना. थोडा वेळ गेल्यानंतर महाराजजींनी नृत्यातून ते सहजपणे कळेल असे दाखवले, तेव्हा कुठे त्या वादकाला तो लहजा सापडला. ‘तुम्ही कोणता वचपा काढला?’ असे मध्यंतराला तबलावादकाने विचारताच, ‘मी आपला लपंडाव खेळत होतो,’ अशी मिश्किल टिप्पणी महाराजजींनी केली होती.

नृत्य पाहताना आपण काय पाहतो? भरतनाटय़म्, कथकली, मणिपुरी या नृत्यशैलींमध्ये वापरली जाणारी भाषा ही भारतभरातील सर्व प्रांतांमध्ये समजत नाही. कथ्थकमध्ये उत्तर भारतीय भाषा म्हणून हिंदूी असल्याने कथ्थक लोकप्रिय होऊ शकले. महाराजजींनी तांत्रिक लयकारीला अर्थवाही बनविले. पोपट उडताना ते पाचपटीची लयकारी करून दाखवायचे. त्यामध्ये हस्तकातून पोपट उडतानाचा आनंद लुटताना पाचपट किती किचकट आहे हे प्रेक्षकांना समजायचे नाही. तांत्रिक क्लिष्टता त्यांनी अर्थवाही बनविली. लहान मुलांना शिकवताना ‘मिरची, धनिया और टमाटर की चटणी खा रे खा रे खा रे’ अशी तिहाई त्यांनी केली होती. प्रेक्षकांना खूप गंमत वाटायची आणि नृत्य पाहताना आनंद येत असे. दूरध्वनीवरील संभाषणाची तिहाई त्यांनी केली होती. माणसांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणांवर तिहाई करत असल्याने लोकांना त्यांचे नृत्य आवडायचे. लयकारी सोपेपणाने सांगण्यातून त्यांचे नृत्य समजून घेण्यासाठी प्रेक्षकांना कष्ट पडले नाहीत, ही पं. बिरजू महाराज यांच्या शैलीची खासियत होती.

शब्दांकन- विद्याधर कुलकर्णी lokrang@expressindia.com