अरुंधती देवस्थळे

कुठल्याही दीर्घकाळासाठी दिलेल्या  फेलोशिपचा संकेत असतो- जाण्याआधी तुमच्या कामाचा एखादा नमुना यजमान संस्थेच्या संग्रहासाठी मागे ठेवून जायचा असतो. लेखक/ अनुवादक मंडळींनी त्यांची  पुस्तकं, कवींनी त्यांची एखादी कविता, चित्रकारांनी छोटंसं चित्र, नाटय़/ नृत्य किंवा मिश्र मीडियाच्या कलाकारांनी त्यांचं रेकॉर्ड केलेलं काही.. तर कॅनेडियन मिश्रवंशीय मैत्रीण सब्रीना इम्प्रेशनिस्टिक वाटणाऱ्या निसर्गचित्राची प्रतिकृती करण्यात गढून गेलेली दिसली. आधीच्याच आठवडय़ात तिने तिचं कुठल्याशा फि निश सागावरचं ४५ मिनिटांचं नृत्यनाटय़ सादर केलेलं. ‘‘तू चित्रं पण काढतेस?’’ या माझ्या वेडपट प्रश्नाला (दिसत नव्हतं का समोर!!) तिने गंभीरपणे उत्तर दिलं की, मूळ चित्र तिच्या आजोबांचं- जॉर्जियातले नामांकित चित्रकार डेव्हिड काकाबत्झ यांचं आहे. त्या रात्री तिने मला त्यांची २०-२५ चित्रं तिच्या कॉम्प्युटरवर दाखवली. त्यांच्या काही ऐकलेल्या आठवणीही सांगितल्या. ते त्यांच्या काळात देशातले नावाजलेले चित्रकार होते. जॉर्जियन सरकारने कलेची प्रातिनिधिक म्हणून पाठवलेली त्यांची चित्रं जगातल्या अनेक कलासंग्रहालयांत लावलेली आहेत, हेही तिने सांगितलं.

Famous painter SH Raza prakriti painting stolen from warehouse of auction house at Bellard Pier Mumbai news
प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Dilip Halyal, comedian Dilip Halyal,
ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन
Challenges for Kashmiri Press
लालकिल्ला : काश्मिरातील गाडली गेलेली पत्रकारिता 
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
bhopal Theft, flats, mp news,
धूम-२ चित्रपटाची नक्कल करून १५ कोटींचे सोने चोरण्याचा प्रयत्न; पण खिडकीतून उडी मारताना पडला अन्…
Kamala Harris accepts the Democratic presidential nomination
अन्वयार्थ : शिकागोचा सांगावा…
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?

डेव्हिड काकाबत्झ (१८८९- १९५२) यांचा जन्म जॉर्जियातल्या एका खेडय़ात गरीब कुटुंबात झाला. मोठय़ा भावाने तेराव्या वर्षी आपल्या ईमेरेती प्रांताचा इतिहास सांगणारं हस्तलिखित रेखीव शैलीत तयार केलं होतं- अगदी नकाशांसहित; म्हणून त्याची शाळेत झालेली वाहवा धाकटय़ासाठी प्रेरणा ठरली होती. पर्वतीय आसमंत, झाडंझुडपं, त्यावर बागडणारी फुलपाखरं आणि दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी आकाशाचे बदलणारे रंग, चमचमत वाहणारी रिओनी नदी, रंगीबेरंगी मासे आणि या सगळ्यात हुंदडणारा डेव्हिड.. ‘आयुष्यात मला कळलेलं पहिलं सत्य म्हणजे रंग’ म्हणणारा! हे सगळं डोळ्यांत भरून रंगवाल्याच्या दुकानात जायचं. मोठय़ा बुधल्यांमध्ये रंग साठवलेले असायचे. त्याच्या मेहेरबानीने कानाकोपऱ्यातून रंग खरवडून घ्यायचा आणि घरी येऊन हाताला लागेल ती वस्तू रंगवायची.. सुरुवात अशी झाली. लाकडाच्या तुकडय़ांवर कधी चित्रं, तर कधी ते तासून/ रंगवून बनवलेलं काहीतरी. ही त्याची प्रवृत्ती शिक्षकांनी हेरली आणि सातवीत असताना त्याने काढलेल्या देशातल्या थोर व्यक्तींच्या पोट्र्रेटस्चं प्रदर्शन शाळेत भरवलं आणि त्याला त्यासाठी मानधनही दिलं. ही प्रोत्साहित करणारी पहिली कमाई! वडील बोट चालवत. एकदा त्यांचं असंच कोणीतरी काढून दिलेलं चित्र डेव्हिडने पाहिलं. हे त्याने पाहिलेलं पहिलं खऱ्याखुऱ्या माणसाचं चित्र. त्याने डेव्हिडचं आयुष्यच बदललं. त्याने त्याची प्रतिकृती काढली, आणि नंतर प्रतिकृतींचा सपाटाच लावला. गरिबाच्या चित्रकार पोराचं जेवढं कौतुक व्हायचं तेवढं झालं. आपण चित्रकार बनायचं हा विचार तेव्हापासून सुरू झाला. डेव्हिड सुरुवातीला स्थानिक शाळेत कला शिकला, पण तिच्या मर्यादा लवकरच लक्षात आल्या. गावातल्या जुन्या चर्चमधलं स्थापत्य आणि कोरीवकाम त्याला फार आवडायचं. त्याची वही चित्रांनी भरून जायची. हळूहळू चित्राचं प्रमाण आणि निसर्गचित्रांना खोली कशी द्यावी हे त्याला उमगत गेलं. डेव्हिड स्वत:ला कायम शिकवत राहिला आणि त्याची प्रगती जलरंगातील चित्रांतून दिसत राहिली.

त्याला नाटक बसवून सादर करायचीही हौस. घरातल्या सर्वाना त्यात भूमिका मिळत. असंच गावच्या नाटक कंपनीत सेट डिझाईन करण्याचं काम त्याला मिळालं आणि त्याने त्याचं नाव झालं. आधीच्या पिढय़ांमधल्या चित्रकारांचं काम बघून शिकत चित्रकार बनलेल्या डेव्हिडनी देशाच्या कलेच्या प्रगतीचा लेखाजोखा करून ठेवलेला असल्यामुळे त्यांना जॉर्जियाचे पहिले कला-इतिहासतज्ज्ञ मानलं जातं. १९१८ पर्यंत जॉर्जियन कला स्थापत्यकेंद्रित होती, तिचे नमुने कागदपत्रांत आहेत. त्यांचं सुसूत्र वर्गीकरण नंतर त्यांनीच केलं. काकाबत्झ यांच्या पिढीत  व्यावसायिक चित्रकलेसारख्या आविष्काराची सुरुवात झाली. त्यांनी रशियात येऊन सेंट पीटर्सबर्गमध्ये दोघा-तिघा नामी चित्रकारांकडून प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते ऑइल ऑन  कॅनव्हासचं माध्यम वापरू लागले. या काळात त्यांनी पेन्सिलमध्ये केलेल्या पाच सेल्फ पोट्र्रेट्सपैकी चार रशिया व अमेरिकेतल्या वेगवेगळ्या कलासंग्रहालयांत आहेत. एक पोट्र्रेट (९८  ६८ सें. मी.)जॉर्जियन सरकारने परत खरेदी करून देशाच्या कलासंग्रहालयात लावलं. शांत, गंभीर वृत्तीचा हा तरुण कलाकार. काळा बंद गळ्याचा कोट, पांढरा शर्ट आणि हिरवी पँट. ताठ मानेने उभा. नजर समोर.  आधीचं बरंच काम पेन्सिलने केल्याने त्याची स्पष्ट रेषेवर व छोटय़ा फटकाऱ्यांवर कायम राहिलेली पकड आणि शिकताना पाहिलेल्या क्लासिसिझम व आवां गार्ड शैलींचा मिश्र प्रभाव. 

याच दरम्यान रशियातील विविध प्रांतीय परंपरागत आणि लोककलांचा युरोपियन मार्केटमध्ये खप वाढला होता. काकाबत्झच्या निसर्गचित्रांवर जॉर्जियाची छाप होती. त्यांचं लँडस्केपही सहज ओळखू येण्यासारखं. ती चित्रं पाहून जाणकारांना प्रश्न पडला, की इतक्या सुंदर देशात एक आधुनिक निसर्गचित्रकार तयार व्हायला इतका वेळ का लागला? कारण कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावानंतर अनेक शतकं जॉर्जिया मध्ययुगातच अडकून राहिल्यासारखा होता. ख्रिश्चन युरोपशी दुरावा होताच. म्हणून युरोपमधल्या रेनेसान्सपासूनही वंचित राहिलेला. इराण आणि तुर्की आक्रमणं, मंगोल अतिक्रमण या सर्वानी जॉर्जियाचं अस्तित्वच धुरकट करून टाकलं होतं. नंतर अठराव्या शतकात रशियन अधिपत्य सुरू झालं. श्रीमंत अमीर-उमरावांचं शिरकाण करून त्यांची मालमत्ता/ कला सरकारखाती जमा झाली. त्यामुळे काकाबत्झ आणि त्यांच्या पिढीतल्या कलाकारांच्या  लँडस्केप्समधून कलेचं पुनरुज्जीवन झालं. लोकांचं लक्ष आपल्या देशाकडे जावं, जगाने इथलं कलाकौशल्य पारखावं असं त्यांना वाटे. 

या काळात फौविस्ट, क्यूबिस्ट, शुष्कीन आणि मोरोझोव यासारख्यांची सिम्बॉलिस्ट शैली आणि त्यातील प्रयोगांबद्दल बरंच सेंट पीटर्सबर्गमध्ये पोहोचत होतं आणि एका मिश्र प्रभावातून त्यांची शैली बनत चालली होती. त्यांचं ‘ईमेरेती- माय  मदर’ (ऑइल ऑन  कॅनव्हास  १३९  १५७ सें. मी.- १९१४) हे घराच्या मागच्या अंगणातलं ओंडक्यावर बसलेल्या आईचं विणत असतानाचं चित्र अतिशय खरंखुरं. समोरचं वाढलेलं गवत, कुंपण आणि लाकडी फाटक.. पलीकडे दिसणारी हिरवी, पिवळी, फिकट नारंगी शेतं. पर्वतावर पडणाऱ्या मावळतीच्या उन्हामुळे तयार झालेला रंगांचा गालिचा. मागे एक पांढरं फुलपाखरू. राखाडी वेषातल्या आईची काळ्या केसाची एक वेणी, खेडवळ चेहरा, मांडीवर विणलेली पांढरी शाल. निळी रानफुलं. मागाहून जाणारी अरुंद वाट. आईचा रांगडा, रापलेला चेहरा. सगळ्या आसमंताला शांत, फिक्या मोरपिशी हिरव्याची डूब. मधेच एक लालभडक रंगाचं छप्पर असलेलं बैठं घर. पोस्ट- इंप्रेशनिस्टिक शैलीत केलेलं हे चित्र.. त्यात ईमेरेतीचं सत्व उतरलेलं.  

कला आणि निसर्ग हे एक अद्वैत आहे हे त्यांच्या मनात खोलवर रुजलं होतं. दरवर्षी ते सुट्टीत घरी जात आणि खूप वेळ निसर्गाचे विभ्रम न्याहाळत. परतताना गावी काढलेल्या चित्रांची एक मालिका बरोबर असे. इथल्याच दृश्यांची आधीची चित्रं पाहिली तर रंग गडद, शुद्ध आणि हलके होत गेल्याचं लक्षात येतं. मध्यंतरी त्यांनी रशियात काही वर्ष सक्तीची असलेली सैन्यातली नोकरी केली. १९१८-१९ मध्ये जॉर्जियाला स्वातंत्र्य मिळालं आणि बदलांची सुरुवात झाली. जनमानसात एक नवा आत्मविश्वास, नव्या आशा, नवा राष्ट्राभिमान निर्माण झाला. हा  काकाबत्झ यांच्या जीवनातला सर्वात सर्जनशील काळ. या काळात त्यांचे वेगवेगळ्या शैलीतले मास्टरपीसेस घडून आले. १९१८ मध्ये त्यांनी राजधानी तबिलिसीत (मूळची तिफलीस) पायी फिरून केलेली पेन्सिलमधली रेखाचित्रांची मालिका आजही देशाच्या कलासंग्रहालयात आहे. मध्ययुगीन कलेचे इतस्तत: विखरून पडलेले नमुने शोधून कला-परंपरेची पुनर्माडणी सुरू झाली. अनेक आक्रमणांतून वाचलेला मूळचा देश परत उभारला जाऊ लागला. त्यांना सरकारी मदतीने इटली आणि पॅरिसमध्ये मोठय़ा कलाजगताशी जोडणारा सहा महिन्यांचा मुक्काम मिळाला. त्यांना प्रायोगिकतेत वैविध्य जोपासणारा पॅरिसचा आंतरराष्ट्रीय मंच सोडून घरी परतवेना. ते आठ वर्ष तिथेच राहिले. ‘ब्रिटनी’ (१९२१) ही मालिका याच उत्कट प्रेमातून जन्मलेली. पांढरी पार्श्वभूमी आणि ओल्या कागदावर लावलेले रंग आणि त्यामुळे चित्राला मिळणारी गहराई.. उत्तर-पश्चिम फ्रान्सचा अशक्य सुंदर किनारा आणि इंग्लिश चॅनलच्या मोहिनीतून कोण वाचलंय आजवर? त्यातून त्यांनी शिडांवर केलेली अमूर्त चित्रांची अतिशय सुंदर मालिका तयार झाली. जॉर्जियाला परतल्यावर त्यांनी ‘Paris- 1920-23’ हे पुस्तक लिहिलं. आपले अनुभव देशबांधवांपर्यंत (विशेषत: प्रतिकूलतेशी झगडणाऱ्या कलाकारांसाठी!) पोहोचावेत म्हणून. ‘Art & Space’ हे त्यांचं दुसरं पुस्तक.

‘ईमेरेतीआ रेड रोड’(ऑइल ऑन कॅनव्हास- ६३   ८४ सें. मी.- १९१८) हे त्यांचं बहुचर्चित चित्र आधुनिक जॉर्जियन कलेत प्रातिनिधिक मानलं जातं. डोंगरावर दिसणारा किल्ला, एकामागे एक डोंगरांची रांग.. सूर्यप्रकाशाने उजळलेली, पुढे पसरलेली हिरवी शेतं- तुकडय़ातुकडय़ांच्या गोधडीसारखी, मधेच झाडाझुडपांच्या सावल्या आणि लाल मातीचा रस्ता, एकमेकांशेजारी लहान-मोठे हलके फटकारे, ग्राफिक रेषा आणि सपाट लावलेले रंग व त्यातून जुळून येणारं नितळ चित्र. त्यांच्या निसर्गचित्रांत लांब-रुंद पॅनोरामा नाही. निवडलेल्या भागावर लक्ष केंद्रित करण्याची फोटोग्राफरसारखी वृत्ती ‘ईमेरेतीआ’ मालिकेत दिसते. त्यांनी पॅरिसमध्ये सिनेमॅटोग्राफी शिकून नंतर जॉर्जियाच्या स्थापत्य, चित्रकला आणि निसर्गावर काही डॉक्युमेंटरीज् बनवल्या होत्या. नाटकंही लिहिली. सेट्सही डिझाईन केले होते.

‘A Picture is a great word. The price of a picture is the great effort invested by the artist into its production, the labour that expresses the artistls soul.  Creating a picture demands great discretion of the artist, which also deprives him of the right to draw even a single accidental line…’ म्हणणाऱ्या काकाबत्झनी आयुष्याच्या उत्तरार्धात काही लाकूड आणि धातूंतली शिल्पंही केली.  मिश्र माध्यमांतून इन्स्टॉलेशन्सही केली. त्यांना उत्स्फूर्तपणे नृत्य करण्याचीही आवड आणि सवय होती. जीवनच पूर्णपणे कलेला समर्पित असलेले डेव्हिड काकाबत्झ आणि त्यांच्या निमित्ताने जगाच्या नकाशावरचा संघर्षमय इतिहास असलेला जॉर्जिया माहीत होणं हा योगायोग खरा; पण त्यांच्या चित्रांनी मनावर अमीट छाप सोडली, हेही खरंच.

arundhati.deosthale@gmail.com