scorecardresearch

अभिजात: रेन्वां गोतावळय़ात रमणारा कलाकार

संघर्षांविना मोठा होऊ शकलेला कलाकार विरळाच. प्रत्येकाचा कस वेगवेगळय़ा तऱ्हेने लागत असतो.

अभिजात: रेन्वां गोतावळय़ात रमणारा कलाकार

अरुंधती देवस्थळे

संघर्षांविना मोठा होऊ शकलेला कलाकार विरळाच. प्रत्येकाचा कस वेगवेगळय़ा तऱ्हेने लागत असतो. रेन्वांच्या वाटय़ाला आलेला संघर्ष दोन प्रकारचा- पहिली तिसेक वर्ष आर्थिक चणचण आणि आयुष्याच्या उत्तरार्धात संधिवात आणि पक्षाघातामुळे आलेली शारीरिक दुखणी; परिणामी कलेला पडलेली मर्यादा.. पण या दोन्ही कठीण कालखंडांत रेन्वांनी चित्रकलेत सुख शोधलं आणि माणूस म्हणून ते नेहमी विनम्र, ऋजू आणि दातृत्वात उमदे राहिले.
पिएर ओगुस्तँ रेन्वां (१८४१-१९१९) यांचा जन्म एका गरीब शिंदेपी कुटुंबातला. पाच भावंडं. बालपणीच त्यांचं कुटुंब मूळ खेडय़ातून पॅरिसला आलं. प्राथमिक शिक्षण कॅथॉलिक शाळेत झालं. मोठेपणी मात्र त्यांनी कॅथॉलिक चर्चमध्ये कधी पाय ठेवला नाही. रेन्वां १२-१३ वर्षांचे असताना त्यांना शाळा सोडून मातीची आकर्षक भांडी बनविणाऱ्या कारखान्यात काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करावी लागली. दिवसा नोकरी करून ते रात्री कलाविद्यालयात शिकायला जात. इथे त्यांना लुव्रला वरचेवर जाऊन थोरामोठय़ांचं काम बघून त्याची रेखाचित्रं काढायची असत. पुरेसे पैसे साठल्यावर त्यांनी ‘एकोले द बुज्वा’मध्ये प्रवेश घेतला. सरकारी साहाय्याने चालणाऱ्या सलोंच्या प्रदर्शनांमध्ये भाग घेणं हा नवोदित चित्रकारांना एकमेव मार्ग होता. तिथे पंखाखाली घेणारे चित्रकार एदुआर्द मोनेसारखे ज्येष्ठ मित्र मिळाले. छोटे फटकारे, पूरक प्राथमिक रंग आणि प्रकाशाच्या योजनेतून सुंदर चित्रं साकार करणाऱ्या रेन्वांच्या इम्प्रेशनिस्ट चित्रांवर मोनेंचा स्पष्ट प्रभाव दिसतो. सुरुवातीच्या काळात रेन्वां आणि मोनेंना त्यांचे बझैल, सिस्ली आणि पिसारोसारखे सधन इम्प्रेशनिस्ट मित्र मदत करत, रेन्वांना स्वत:च्या घरी ठेवून घेत. मेहनती रेन्वां झपाटल्यासारखे रोज जमेल तेवढी/ तशी चित्रं काढत. या काळात त्यांनी अनेक पोट्र्रेट्स केली चरितार्थासाठी. त्यात मित्रवर्य सेझाँचं पोट्र्रेट होतं, एका श्रीमंत चाहत्याने करवून घेतलेलं. रेन्वांची सुरुवात निसर्गसुंदर फॉटनब्लोमध्ये रमणारे इम्प्रेशनिस्ट म्हणून झालेली असली तरी ते लवकरच वेगळय़ा दिशेने गेले. पोर्टेट्स, विशेषत: स्त्रियांची चित्रं काढायला त्यांना वेगळी शैली हवी होती. त्यांचं एक वैशिष्टय़ म्हणजे, त्यांनी आपल्या सगळय़ाच इम्प्रेशनिस्ट मित्रांची पोट्र्रेट्स किंवा कुटुंबासहित चित्रं काढली होती. सिस्ली, मोने, सेझाँ, बझैल, मारी कसाट, वोलार्ड वगैरेंची. आणि त्यांना ती भेटही दिली होती.

‘ Bal du moulin de la Galette’ (१३१ x १७५ सें. मी. ऑइल ऑन कॅनव्हास, १८७६) हे त्यांचं गाजलेलं पहिलं इम्प्रेशनिस्टिक चित्रं. हे तेव्हाच्या पॅरिसमधल्या मध्यमवर्गीयांच्या नेहमीच्या रविवार दुपारचं दृश्य होतं. सुंदर पोशाख करून लोक अशा खुल्या हॉलमध्ये किंवा बागेत जमत, एकमेकांशी गप्पा-गोष्टी, खाणं-पिणं, नृत्य असं सगळं चाले. इथेही हेच दृश्य आहे. गुलाबी, पिवळय़ा, हिरव्या आणि काळसर निळय़ा कपडय़ातील माणसं दाटीवाटीने उभी. काही समोरासमोर, काही पाठमोरी, बाजूने दिसणारी, काहींच्या चेहऱ्यावर, केसांवर आणि मधल्या रिकाम्या जागांमध्ये सूर्यप्रकाशाचा खेळ. या बागेला बाभळीच्या झाडांचं तोरण. इम्प्रेशनिस्टिक खुल्या फटकाऱ्यातून साकार झालेलं एका काळाचं चित्रण. याच्याच जवळपास जाणारं ‘’ Le Dé jeuner des canotiers ( Luncheon of the Boating Party)हे रेन्वांचं चित्रं (१३० x १७ २.५ सें. मी. ऑइल ऑन कॅन्व्हास, १८८१). त्या वेळी त्याला सहा आकडी किंमत आली होती. प्रकाशाचा कुशल वापर आणि पाहतच राहावे असे. झरझर मारलेले ब्रशचे फटकारे ही या चित्राची वैशिष्टय़ं आहेतच. त्याबरोबर चित्रांत कुत्रा घेऊन बसलेली रेन्वांची सहचरी आलीन, चित्रकार कैबोट, दोन पत्रकार आणि दोन फिल्म स्टार्स हे सगळे ओळखू येणारे म्हणून हे चित्र आणखीच महत्त्वाचं ठरलं. यावर रेन्वांना आवडणाऱ्या लुव्रमधल्या वेरोनिजच्या सुप्रसिद्ध ‘Wedding Guests at Cana’चा प्रभाव जाणवणारा. आता हे चित्रं वॉशिंग्टनच्या एका आर्ट गॅलरीमध्ये आहे. पुढे दिलदार कैबोटने इम्प्रेशनिस्ट मित्रांची ६९ चित्रं (त्यापैकी ८ रेन्वांची) विकत घेऊन नंतर ती लुव्रला भेट दिली. पुढे १८८३ मध्ये, रेन्वांनी केलेली युगुलांची ‘डान्स’ मालिकाही चांगली विकली गेली. म्युझी डॉझीमध्ये भेटलेलं ‘The Reader’ हे रेन्वांचं एका त्या काळच्या वाचनात बुडून गेलेल्या नवतरुणीचं इम्प्रेशनिस्ट चित्रं अतिशय लोभस. कुठल्याही अभ्यासिकेत लावावं असं. आर्थिक स्थैर्य आल्यावर त्यांनी केलेल्या अल्जेरिया, इटली आणि प्रोवेन्समध्ये केलेल्या भटकंतीने विशेषत: इटलीच्या मास्टर्सचं काम पाहून रेन्वांची शैली अभिजाततेकडे झुकणारी, रेषेवर भर देणारी बनली..

फ्रेंच रिव्हिएरावरच्या ‘कान्यू सुर मेर’मधलं रेन्वांचं दुमजली घर आता त्यांचं संग्रहालय बनलंय. बाहेरच्या हिरवळीवर ‘लार्ज व्हिनस व्हिक्टोरीअस’चं ब्रॉन्झमधलं सहा फुटी शिल्पं गीनोच्या साहाय्याने रेन्वांनी केलेलं (१९१५-१६). रेन्वांच्या चित्रातल्या असोत वा शिल्पातल्या- स्त्रिया कमनीय वगैरे नाहीत, त्या गुबगुबीत असतात. त्यांच्या न्यूड्स आकर्षक सौंदर्यापेक्षा ओंगळपणाकडे झुकणाऱ्या वाटतात. इथेही भारदार व्हिनस, छोटंसं मस्तक, झुकलेले खांदे, स्थूल पोट आणि कमरेखालचं जरा सुटलेलं शरीर.. हे शिल्पं या दोघांनी आधी केलेल्या ‘जजमेंट ऑफ पॅरिस’ या बैठय़ा शिल्पावर ठेवलंय. पायथ्याशी पाणी, दगडगोटे आणि पाणवनस्पती असाव्यात असे तपशील रेन्वांनी देऊन ठेवलेले.

मित्रांनी भेटीला येण्याची त्यांना कायम असोशी असे. मोठं घर असल्याने पाहुणे आरामात राहू शकत. चित्रकार बेर्थे मॅरिसॉटशी त्यांची खूप घट्ट मैत्री. मोने आणि रेन्वांसारखेच, ही दोघेही शेजारी- शेजारी उभे राहून चित्रं काढत. बेर्थेची लेक ज्यूलीची (मोने) तिच्या आईबापांच्या माघारी, रेन्वां कुटुंबाने आयुष्यभर ज्या जबाबदारीने देखभाल केली तिला तोड नाही. ते शेवटची १०-१२ वर्ष इथेच राहिले. संधिवाताने हालचाली कठीण होत चालल्या होत्या. त्या काळात ते इतके हडकले होते की, खुर्चीवर बसणंही अशक्य झालं होतं. गरम पाण्याच्या झऱ्यांचा उपाय निष्फळ ठरला. बोटं वेडीवाकडी झाली असली तरी ते ब्रश बोटांमध्ये अडकवून, कधी दोन्ही हातांनी मिळून चित्रं काढत. चेनस्मोकर असल्याने त्यांना लगेच सिगरेट पेटवता यावी अशी व्यवस्था करावी लागे. तेव्हाही The pain passes, but the beauty remains म्हणणारे रेन्वां : Thanks to be painting which even late in life still furnishes illusions and sometimes joy. I can assure you this is not easy but it’ s so pretty. असं लिहितात. चित्रांत मात्र आनंदी, उत्साही रंगांची उधळण असे. त्यांच्या कलाप्रवासात शेवटची काही वर्ष आसपासच्या निसर्गचित्रांचं किंवा स्त्री देहाचा सोहळा मांडलेली.

१९१० नंतर आपला अस्तराग सुरू झाल्याचं जाणवून रेन्वांनी स्वत:ची आणि कुटुंबाची अनेक पोट्र्रेट्स काढली आहेत. जीन आणि कोको ही रेन्वांची मुलं शेवटची तीन वर्ष त्यांच्याजवळ राहून, त्यांच्या रेखाटनांवर आधारित काचेच्या आणि मातीच्या वस्तू बनवत. रेन्वांच्या व्यक्तिमत्त्वात अतक्र्य कंगोरे होते. लग्नाआधीच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या त्यांच्या जीन त्राहोट या मुलीबद्दल त्यांनी त्यांच्या बायकोला- अलीनला (तिच्या आक्रस्ताळय़ा स्वभावामुळे?) किंवा त्यांच्या तीन मुलांना काही सांगितलं नव्हतं. ते कायम तिच्या संपर्कात असत, तिला आर्थिक मदत करत; पण हे सत्य शेवटपर्यंत गुपितच राहिलं. अलीनबरोबरच्या नात्याबद्दलही त्यांनी मित्रांना अनेक वर्ष अंधारात ठेवलं होतं.

१९१२ मधल्या पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचं परावलंबित्व वाढलं होतं, तरी प्रसिद्धीची कमान उंचावत होती. कलासमीक्षक ज्युलिअस मेअर ग्राफी आणि जवळचा मित्र अल्बर्ट आंद्रे यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या ताकदीच्या मोनोग्राफ्समुळे रेन्वां सुखावले होते. म्युरर, बार्न्ससारखे कला संग्राहक त्यांची चित्रं चांगली किंमत देऊन शेकडय़ाने खरेदी करत होते, त्यांच्या १८१ चित्रांचं एक स्थायी प्रदर्शन फिलाडेल्फियाच्या बार्न्स फाऊंडेशनमध्ये आहे. शेवटची काही वर्ष त्यांना रिचर्ड गीनोसारखा संवेदनशील सहयोगी मिळाला आणि तो त्यांच्या रेखाचित्रांवरून मातीची शिल्पं बनवी आणि मग ती धातूंमध्ये येत. घरात त्यांच्या दोन्ही स्टुडिओज्मध्ये – एक मोठा आणि वरच्या मजल्यावर जरा लहान – सोयीस्कर अशी करवून घेतलेली व्हीलचेअर आहे. समोर ईझल आणि पॅलेट. रेन्वां शेवटपर्यंत चित्रं काढत राहिले.

रेन्वां नीट माहीत करून घ्यायचे असतील तर बार्बरा एहरलीच व्हाईट यांनी लिहिलेलं Renoir An Intimate Biography हे सुंदर पुस्तक पाहावं. अतिशय संतुलित, वाचनीय. रेन्वां खूप पत्रं लिहायचे. त्यांनी लिहिलेल्या सेझाँ, मोने, मारी कसाट, मैलोल, बेर्थे मॅरिसॉटसारखे कलाकार मित्र, वोलार्ड, पॉल डुरंन्ड रुएलसारखे आर्ट डिलर्स आणि त्यांचे स्वत:चे कुटुंबीय अशा सगळय़ांना लिहिलेल्या छोटय़ा-छोटय़ा, पण संवेदनशील पत्रांतून त्यांची सहृदयता जाणवत राहते. अनेकांना उदारहस्ते मदत करणारे रेन्वां खरेखुरे ‘फॅमिली मॅन’ होते. त्यांची ले कोले, ईस्वा आणि नाईसची घरं सुसज्ज होती, त्यामुळे नंतर प्रेमहीन झालेलं लग्न न मोडता, कधी एकत्र तर कधी दूर राहून, शांत मनाने समांतर आयुष्य जगता येत होतं. त्यांच्या कलाकार मुलाने- ज्याने त्यांच्यावर My father Renoir’ हे पुस्तक लिहिलं आहे (१९५८). रेन्वां कुटुंबात अनेक वर्ष मदतनीस आणि त्यांच्यासाठी मॉडेलिंगही करणाऱ्या गाब्रिएलाला त्यांनी आपली १६ चित्रं भेट दिली होती. मनाचा असा उदारपणा अन्य कोणी कलाकाराने दाखवलेला माझ्या तरी पाहण्यात नाही.
कलाजगताला आपल्या ४६०० हून अधिक चित्रांनी समृद्ध करणाऱ्या रेन्वांना १९१९ मध्ये फ्रान्सच्या सरकारने Legion d’’ Honneur ने सन्मानित केलं होतं; पण त्यांच्या लाडक्या लुव्रने सप्टेंबरमध्ये जे केलं ते कलेच्या इतिहासातलं रेशीमपान! रेन्वांची ढासळती तब्येत पाहून लुव्रने त्यांच्यासाठी एक अपवादात्मक सन्मान आयोजित केला. लुव्रमध्ये लावली जाणारी कला इतिहासजमा कलाकारांची असते; पण रेन्वांना आपल्या चित्राचा हा सन्मान याचि देही याचि डोळा पाहण्याचं भाग्य लाभलं. त्यांनी केलेलं ‘पोट्र्रेट ऑफ मादाम शार्पेन्तिअ’ (१८७६) लुव्रने विकत घेऊन योग्य जागी लावलं आणि उभे न राहू शकत असलेल्या रेन्वांना बांबूच्या पालखीत बसवून ते दाखवायला आणलं. लुव्रवासीय कलेवर जिवापाड प्रेम करणाऱ्या उमद्या, मृदुभाषी स्वभावाच्या रेन्वांनी त्यांच्या एकेक प्रिय चित्राचा, जवळ जाऊन जिव्हाळय़ाने निरोप घेतला .. आणि त्यानंतर तीन महिन्यांनी जगाचाही!
arundhati.deosthale@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 02:00 IST

संबंधित बातम्या