अंकल मुल्क यांच्याकडे साहित्य आणि कला क्षेत्रांतल्या अनुभवांची जी समृद्ध पोतडी होती, तशी इतक्या खुलेपणाने कोणी नंतर कधी मला उघडून दाखवल्याचं आठवत नाही. कुठल्याही मोजपट्टीवर बरोबरीची नसणारी मैत्री अशी अगदी अकल्पित सुरू झाली. मग कळत गेलं की, ही अंकल मुल्क यांची जीवनशैलीच होती…
१९८० ची सुरुवात… दिल्लीत नवीनच दाखल होऊन जर्नालिझम शिकून नोकरी शोधणाऱ्या माझ्यासाठी कोणी गॉडफादर नसल्यानं प्रत्येक सुचवलेला दरवाजा ठोठावत, मिळतील ती छोटी-मोठी कामं करत (हिंदीत सांगायचं तर ‘घास काटत’ किंवा ‘पापड बेलत’) व्यवसायात शिरावं लागतं असा तो कालखंड होता. नवी दिल्ली तेव्हा कमालीची सुंदर होती. भरपूर हिरवी, कमी गजबजलेली, मोठ्या रुंद रस्त्यांची, मारुती आणि जागतिकीकरणाआधीची, प्रदूषण काबूत असलेली… सांस्कृतिक घटनांनी कायम सजत राहणारी. राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, एनएसडी, तिन्ही अकादम्या आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, श्रीराम सेन्टर यांचे महिन्यातून एकेक कार्यक्रम पाहिले तरी हरखून जायला व्हायचं. आपण देशाच्या राजधानीच्या हिंदी- इंग्रजीभाषी मोठ्या कॅन्व्हासवर दाखल झालो आहोत, हे भान त्या जगाकडे कुतूहलपूर्ण डोळे फाडफाडून बघणाऱ्या मला फार लवकर आलं, यात नवल नव्हतं. मनासारखी नोकरी न मिळण्याचं दु:ख, मला माझ्या राजधानीबरोबरच्या नव्यानवलाईत ठसठसत असायचं. पण कारंथ साहेबांच्या मावळतीत एनएसडीचं एखादं नाटक, भीमसेन जोशींचं गाणं, उस्ताद अल्लारखाँ आणि झाकीर हुसेन यांच्यातली जुगलबंदी, शिवकुमार शर्मांचं संतूर किंवा हरिप्रसाद चौरासियांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम, बिरजू महाराज किंवा सितारा देवींचं नृत्य, हुसैन साहेबांचं एखादं प्रदर्शन, तिजनबाईंची पांडवनी असो वा भवानी भवाई… असे भारून टाकायचे की हा अंमल महिनोंमहिने टिकायचा. मुख्य म्हणजे हे कार्यक्रम मोफत असल्याने फक्त बसच्या तिकिटाचे पैसे खिशात असले की पुरे होतं. आपण बेकारीतही खूप काही नवीन अनुभवतो, शिकतो आहोत हे त्या अवस्थेतही स्वत:ला कळत होतं. पण ‘अजून नाहीच का मिळाली नोकरी?’ सारख्या कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या प्रश्नांनी ‘मेरा नंबर कब आयेगा?’ हे माझ्या आयुष्याचं थीम साँग झालं होतं.
तर अशाच एका छोट्याशा कामाच्या निमित्ताने अरनॉल्ड हाईनमनच्या ऑफिसमध्ये गेले होते. तिथे काम करणाऱ्या रश्मी सक्सेनामुळे मला राजधानीत भेटलेले पहिलेच सेलेब्रिटी होते मुल्क राज आनंद! स्वातंत्र्योत्तर तब्बल तीन पिढ्यांना शाळा वा कॉलेजच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकांत हमखास भेटणारे, खणखणीत सामाजिक जाण बाळगणारे बुद्धिप्रामाण्यवादी लेखक! मी तिथे आल्यावर आत प्रकाशक बॉसबरोबर (गुलाब वझीरानी ) मुल्क राज आनंद बसलेत असं कळलं. ते दोघे फाळणीच्या आधी पेशावरजवळचे म्हणून त्यांच्या मैत्रीला एका हरवलेल्या भूतकाळाचं परिमाण होतं. त्यांच्या कधी पंजाबी- उर्दू तर कधी इंग्लिशमध्ये आगामी कथासंग्रहावर चर्चा चाललेल्या होत्या. एव्हाना सहसंपादक रश्मीचे ते अंकल मुल्क बनले होते. मी तिला शाळेतला एक धडा आणि कॉलेजमध्ये शिकलेली ‘Untouchable’ ही कादंबरी वगैरे सांगत म्हटलं, ‘‘मला भेटवशील त्यांना?’’ तिनं सहज आत जाऊन त्यांना विनंती केली आणि आम्हा दोघींना आत बोलावणं आलं. मानेवर रुळणाऱ्या रुपेरी केसांचे, सत्तरीच्या उत्तरार्धातले मिस्टर आनंद पहिल्याच खळाळत्या संभाषणात माझेही अंकल मुल्क झाले. इतकंच नव्हे, तर त्यांनी ‘‘उद्या रश्मीबरोबर तू चहाला ये दुपारी. मी जवळच हौज खासमध्ये राहतो.’’ असं आमंत्रण देऊन टाकलं. ‘‘गुलाब, तू मात्र ऑफिसमध्ये बसून काम कर हां!’’ म्हटल्यावर आम्ही सगळेच हसलो.
त्या दुपारी मोठीशी सुंदर बाग असलेल्या त्यांच्या सुंदर प्रशस्त घरात आमची जी चौफेर खातिरदारी झाली ती मध्यमवर्गीय, त्यात सध्या कामधाम नसलेल्या माझ्यासाठी कमालीची होती… उच्चभ्रू, अत्यंत सुरुचीपूर्ण दिवाणखाना. भिंतीवर एम. एफ. हुसैन, सतीश गुजराल आणि अमृता शेरगिल ऐसपैस स्थानापन्न झालेले, गडद निळं पर्शिअन कार्पेट. सगळा रईसी इंग्रजी थाट! अतिसुंदर क्रोकरी आणि वेंगर्समधून मागवलेल्या पॅटीज, दोन प्रकारच्या पेस्ट्रीज आणि नाजूक सेटमधून आलेला अर्ल ग्रे चहा. या चहात फक्त एक छोटा नाजूक चमचा दूध घालायचं असतं हेही मी पाहून शिकले. गप्पा अशा रंगल्या की तास- दीड तासांत चहाची संपणारी बैठक संध्याकाळी सातपर्यंत चालली. रश्मी आणि मी त्यांच्याच पंथातल्या, म्हणजे इंग्रजी साहित्याच्या म्हणूनही अंकल मुल्कना आमच्याशी किती बोलू असं झालं होतं. वयामुळे आणि मधेच येणारी खोकल्याची उबळ यामुळे त्यांचा आवाज खरखरीत झालेला होता, पण विचारशक्ती तल्लख, आतली मधाळ माया न लोपलेली. आम्हालाही त्यांच्या केंब्रिजच्या आठवणी, प्रोफेसरांच्या गमती- जमती, त्या काळचं लंडन, त्यांचं बर्ट्रांड रसेलवरलं शोधकार्य, टी. एस. इलियट, ई. एम. फॉर्स्टर, जॉर्ज ऑरवेल यांच्याबरोबरच्या मैत्रीचे किस्से ऐकायला प्रचंड मजा येत होती. इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या समकालीन भारतीय लेखकांबद्दल ते फारसं मतप्रदर्शन करत नव्हते यावरून आम्ही काय ते समजलो होतो. ते गप्पिष्ट होते खरे, पण न आत्मस्तुती की न वायफळ बोलणं. पंचविशीत लिहिलेल्या ‘Untouchable’ (१९३५) मागची कहाणी समजली. त्यांच्या एका काकूला का मामीला एका मुस्लीम महिलेबरोबर जेवल्यामुळे घरातून बाहेर काढून वाळीत टाकण्यात आलं होतं. आणि त्याच तणावाखाली धक्क्यानं तिचा मृत्यूही झाला होता. ते तरुण मुल्कना लागून राहिलं होतं. पण घरातल्या मोठ्यांपुढे बोलण्याची प्राज्ञा नव्हती. पण त्यानंतर आपण असले जाती /धर्मभेद मुळीच पाळायचे नाहीत असं त्यांनी ठरवून टाकलं होतं आणि त्यातून इंग्रजी साहित्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचलेला ‘बखा’ जन्मला होता. त्यांच्याकडे साहित्य आणि कला क्षेत्रांतल्या अनुभवांची जी समृद्ध पोतडी होती तशी इतक्या खुलेपणाने कोणी नंतर कधी मला उघडून दाखवल्याचं आठवत नाही. कुठल्याही मोजपट्टीवर बरोबरीची नसणारी मैत्री अशी अगदी अकल्पित सुरू झाली. मग कळत गेलं की ही अंकल मुल्क यांची जीवनशैलीच होती. प्रतिष्ठित आणि नवखे लेखक, कलावंत, गायक, नर्तक, नट सगळ्यांना आनंदानं आणि विशेष म्हणजे समानतेनं सामावून घेणारं हे घर म्हणजे अंकल मुल्क आणि नर्तनामुळे मूर्तिमंत ग्रेस भासणाऱ्या शिरीन मॅम यांच्या मनाच्या सौंदर्य आणि उदारतेचं प्रतीक होतं.
यानंतर ३-४ भेटींचा सिलसिला सुरू झाला. त्यांच्या दिल्लीच्या घरातील ग्रंथसंग्रह आणि जतीन दास, वेद नय्यर यांसारख्या दिल्लीकर चित्रकारांच्या चित्रांनी सुशोभित… त्यांची अभ्यासिका हे एक स्वतंत्र प्रकरण होऊ शकेल. त्यात शास्त्रीय आणि पाश्चात्त्य अभिजात संगीताच्या टेप्स, एलपीज, फोटोंचे अल्बम्स. पिकासोशीही दोस्ती झाली होती म्हणे! त्याची २-३ चित्रं त्यांच्या कफ परेडच्या घरात होती असंही ते ओघात कधीतरी सहज बोलून गेले होते. त्यांनी मुंबईहून कलेवरील सुरू केलेल्या दर्जेदार ‘मार्ग’ त्रैमासिकाचे १९४६ ते आजवरचे अंक हेच मला भारून टाकणारे होते. वर त्यांची खुली परवानगी की, आम्ही इथे असलो नसलो तरी तू येऊन या अभ्यासिकेत हवा तेवढा वेळ घालवू शकतेस. पथ्य एकच : इथून काही हलवायचं नाही. जे काय वापरशील ते त्याच जागी परत ठेवायचं! पण मग अंकल मुल्क आणि शिरीन मॅम मुंबईला गेले दीर्घ मुक्कामासाठी. त्यांच्या २५, कफ परेड या पत्त्यावरून त्यांनी एक- दोन पत्रंही पाठवली होती. ते दिल्लीत अधूनमधून येतात, पण जास्त मुंबईतच असतात हेही समजलं. दुर्दैवानं या औदार्याचा फायदा घेता आला नाही. कारण तेवढ्यातच मला युनेस्कोसाठी आशियात काम करणाऱ्या एका संस्थेत नोकरी मिळाली आणि मी घड्याळ आणि शेड्यूल्सला बांधली गेले.
रश्मीनेही नोकरी बदलली म्हणून अंकल मुल्कना अनायास जोडणारा धागा तुटला. त्यांची तब्येतही आता पहिल्यासारखी साथ देत नव्हती असं ऐकलं. त्यांची खूप आठवण यायची अधूनमधून, पण अचानक कसं जायचं या संकोचानं राहून जायचं. अनेक वर्षांनी एकदा कुठल्या तरी नृत्याच्या कार्यक्रमात लहानखुऱ्या शिरीन मॅम त्यांच्या बहिणीसह भेटल्या. तरुणपणी वजीफदार भगिनी, पारसी समाजाचा कडक विरोध सहन करून कथ्थक नृत्याबरोबर, सिनेमांत कोरिओग्राफी करत असं दोघांकडून आधी ऐकलं होतं. आसपास परिचितांचा घोळका होता. फोन नंबर्सची देवाणघेवाण झाली. पण मी लेकीचं मातृत्व, संसार आणि नोकरीत अशी काही गुरफटले होते की काही गोष्टी करायला प्रयत्न अपुरे पडत.
वर्षं उलटत गेली. अगदी अनपेक्षितपणे ते ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मध्ये साहित्योत्सवात भेटले. मी आता त्यांना अंधूकशी आठवत होते हे साहजिकच होतं. आपण फाळणीनंतरच्या साहित्यावर बोलणार असल्याचं म्हणाले. प्रत्यक्षात जगलेली रक्तरंजित फाळणी ही त्यांची शेवटपर्यंत साथ देणारी जखम होती. एव्हाना ते नव्वदीच्या आत-बाहेर असावेत. दात बरेचसे गेल्याने व आवाज साथ देत नसल्याने त्यांचं बोलणं जवळून कळत नव्हतं, तर ते व्यासपीठावरून कसे बोलतील याचा मला अक्षरश: घोर लागला होता आणि झालंही तसंच. कारण परफेक्शनिस्ट अंकल मुल्कना त्यांचं भाषण कोणी वाचून दाखवणं पसंत नव्हतं. मला प्रसंग आठवला की अजून भरून येतं. एका उमद्या ऐतिहासिक बुरुजाचं हळूहळू ढासळत जाणं समोर उभं राहून बघण्यासारखं होतं ते. वर भोवतालच्या दिल्ली युनिव्हर्सिटी व जेएनयूच्या नव्या दमाच्या श्रोत्यांची निरंकुश शेरेबाजी…
अंकल मुल्कनी अरविंदला आणि मला स्कोलास्टिकच्या कामात माझी जागा वापरा असा आग्रहपूर्वक फोन केला होता, पण ती भेट राहिलीच. त्यांनी २००४ मध्ये वयाचं शतक गाठण्याआधी जगाचा निरोप पुण्यात घ्यावा, हाही एक योगायोग!
arundhati.deosthale@gmail.com
