‘‘माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळातली गोष्ट आहे ही… सज्जाद हुसेन हे फार मोठे संगीतकार. हिंदुस्तानी रागदारी तर त्यांना उत्तम येत होतंच, शिवाय अरेबिक, पर्शियन संगीतातही ते माहीर होते. म्हणूनच त्यांच्या चाली मधुर असल्या तरी गायला फार कठीण असत. त्यात ते स्वभावानं अगदी कडक. त्यांच्याकडे गायची संधी मला मिळाली, तेव्हा लोकांनी मला आधीच घाबरवून टाकलं – ‘सज्जादसाब फार तिरसट आहेत. रफी आणि लतालासुद्धा रागावतात, ‘अबे बदसुरे’ असं म्हणतात! एखादी जागा त्यांच्या मनासारखी गायकाच्या गळ्यातून आली नाही तर मुस्काटात द्यायला देखील कमी करत नाहीत. त्यांच्यापुढे तुझी डाळ काय शिजणार!’ यावर मग मी एक युक्ती शोधली.

गाण्याच्या रिहर्सलला सज्जादसाहेबांच्या समोर गेले, तेव्हा त्यांच्या पाया पडून म्हणाले, ‘मास्टरजी, मला अजिबात गाता येत नाही, मी काही बाकायदा गाणंबिणं शिकलेली नाही. मला लहान मुलं आहेत, त्यांचं पोट भरण्यासाठी मला गाऊन पैसे मिळवावे लागतात; तेव्हा तुम्ही हवी तितक्या वेळा माझ्याकडून तालीम करून घ्या, मी गाण्याचा सराव हजार वेळेलादेखील करेन, पण तुम्ही माझ्यावर रागावू नका. कारण कुणी रागावलं की माझा आवाज बसतो आणि मी गाऊच शकत नाही. तुम्ही माझे गुरू आहात आणि मी तुमची शिष्या आहे असं समजून मला तुम्ही गाणं शिकवलंत तरच मी गाऊ शकेन!’ मग काय, सज्जाद साहेब एकदम खूश झाले आणि म्हणाले, ‘‘बेटा, आजपासून तू माझी शागीर्दा. मी तुला शिकवेन तसं तू गायलीस तर या इंडस्ट्रीत तू सगळ्यांना मागे टाकशील, नाव कमावशील!’ नंतर त्यांनी मला कित्येकदा गायला बोलावलं, पण ते एकदाही माझ्यावर रागावले नाहीत, उलट फार प्रेमानं माझ्याशी ते वागत-बोलत.’’

मग त्या म्हणाल्या, ‘‘तुम्हाला मी माझ्या यशाची गुरुकिल्ली सांगतेय बरं… मी स्वत:ला कधीच ‘ग’ची बाधा होऊ दिली नाही… मी नेहमीच असं समजत आले की आज मी चांगलं गायले नाही तर उद्या मला कोणीही गायला बोलावणार नाही. त्यामुळे प्रत्येक गाणं उत्तम म्हणजे उत्तमच झालं पाहिजे या ईर्ष्येनं मी गायले. दर रेकॉर्डिंगच्या वेळी माईकच्या समोर उभी राहिले की मी मनात म्हणते, ‘हे बघ आशा, ही तुझी शेवटची संधी आहे असं समज आणि गा!’ त्यामुळे प्रत्येक गाणं मी जीव तोडून गायले आहे. तुम्हाला माझं एखादं आनंदाचं, रोमँटिक किंवा कॅब्रेचं गाणं ऐकताना वाटेल की ही बाई काय मजेत गायली आहे! पण कित्येकदा मी मनातल्या दु:खाचे कढ आवरून, दोन-दोन दिवस फक्त पाणी पिऊन अर्धपोटी अवस्थेत गायली आहे. हे मी काही अभिमानानं नाही सांगत… मला एवढंच सांगायचं आहे की माझं गाणं, माझं करिअर मी कष्टातून घडवलं आहे. तो काही फुलांच्या पायघड्या पसरलेला प्रवास नव्हता. माझ्यासारखी जिद्द बाळगून, वाटेल तेवढे कष्ट घ्यायची तयारी असेल तरच तुम्ही या इंडस्ट्रीत पाऊल टाका… मग यश मिळेलच!’’

जगविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले हे सांगत होत्या. बारा-पंधरा वर्षांपूर्वी पुण्याच्या पत्रकार भवनात आशाजी अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमाला राजी झाल्या होत्या… ‘मी बोलीन ते छापायचं नाही, रेकॉर्ड करायचं नाही आणि एकही फोटो काढायचा नाही’ या अटीवर! तेव्हा काही पत्रकार आणि माझ्यासारखे संगीतक्षेत्रातले काही मोजके जिज्ञासू यांच्यासाठी आशाजी अगदी मनमोकळं बोलल्या, थोडं गायल्याही. तेव्हाचे आशाजींचे हे उद्गार म्हणजे त्यांच्या संगीतकथेचं सार आहे असं म्हणता येईल! जिद्द या गुणाचं मूर्तिमंत रूप म्हणजे आशा भोसले!

ज्यांनी गायलेली चित्रपटगीतं, भावगीतं ही किमान चार पिढ्यांतल्या कोट्यवधी लोकांच्या भावजीवनाचं अविभाज्य अंग आहेत अशा ‘आशा भोसले’. सुमारे सात दशकांच्या गायन कारकीर्दीत सर्वाधिक गीते (सुमारे साडेबारा हजारहून अधिक) ध्वनिमुद्रित करण्याचा जागतिक विक्रम ज्यांच्या नावावर नोंदवला गेला अशा या गायिका. कोणत्याही आव्हानाला निडरपणे सामोरं जाण्यार्या एका अतीव जिद्दी स्त्रीच्या संघर्षमय आणि कष्टसाध्य आयुष्याची सुफळसंपूर्ण कथा म्हणजे आशा भोसले यांचं आयुष्य. सांगलीत ८ सप्टेंबर १९३३ या दिवशी सुरू झालेली ‘आशा’ नावाची अद्भुतरम्य कथा मुंबईत १२ एप्रिल २०२६ रोजी पूर्ण झाली. कलात्मक कारकीर्द आणि वैयक्तिक जीवन या दोन्हींत संघर्षमय प्रवास करणार्या आशाजींची ही कथा सर्वच कलायात्रिकांना प्रेरक ठरते.

आशाजींच्या गायनात सर्वप्रथम प्रभाव पडतो तो त्यांच्या आवाजाचा आणि स्वरांचा! मुळातच कलदार असलेल्या आवाजाला आशाजींनी रियाजानं कसदारही केलं होतं. त्यामुळेच आशाजी केवळ सुरेल गातात असं नाही, तर त्यांची प्रत्येक हरकत, मुरकी, तान ही कोरीव, दाणेदार, स्पष्टच असते. प्रत्येक स्वरन् स्वर सूर्यप्रकाशाइतका लख्ख! इतका ऊर्जावान आणि प्रकाशमान स्वर क्वचितच कुणाचा असतो. त्यांचा आवाज साफ आहे – तिथे कणसूरपणा, अहेतुक थरथर, अस्पष्टता अजिबात नाही. शिवाय त्यांचा आवाज बुलंदही आहे – त्यात किरटेपणा, किनरेपणा, कोतेपणाही बिलकूल नाही. तो खणखणीत असूनही भावपूर्ण आहे. आशाजींच्या स्वरात रग आणि रंग दोन्ही भरपूर आहे! तो हसरा, खट्याळ होतो, तसा आर्तगंभीर, अंतर्मुखही होतो.

त्यांच्या गाण्यात सुमारे दोन सप्तकांचा पल्लाही विनासायास व्यापला जातो. आशाजींचे मंद्र सप्तकातले स्वर रुंद, घुमारदार लागतात, मध्य सप्तकातले स्वर गुंजनयुक्त, खुले असतात; आणि तार सप्तकातले स्वर निमुळते, टोकदार असतात. मला आठवते, पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलता बोलता सहजच त्या ‘भाली चंद्र असे धरिला’ हे नाट्यपद गुणगुणल्या.. त्यात मंद्र मध्यम असा साफ, रुंद लागला की क्या बात है! आणि त्याला दाद देण्यापूर्वीच त्या सरकन तान घेऊन तार पंचमावर अशा काही शिताफीने जाऊन आल्या की अत्यानंदच.

आपल्या गळ्यावर आशाजींचा काबू असा काही विलक्षण की एखाद्या तानेत झपकन लय बदलतील, कधी नखरेल मुरकी गात असताना एकदम मींड घेतील. रागदारी किंवा ठुमरी-दादरा, लोकगीत शैलीतलं गाणं असो की पाश्चिमात्य रॉक एन रोल, हिपहॉप, पॉप शैलीतलं किंवा अरबी-फारसी, आफ्रिकन शैलीतलं गाणं असो, मराठी लावणी, नाट्यगीत, भक्तिगीताची धाटणी असो की गझल, कव्वाली, मुजरा… त्या त्या गाण्यानुसार आवाजाचा नादगुण बदलणं आणि शब्दोच्चारांसह स्वरोच्चारही बदलणं ही आशाजींची खासियतच! ‘नवरंग’ चित्रपटातलं ‘आ दिल से दिल मिला ले’ हे गाणं तर त्यांनी इतक्या वेगळ्या आवाजलगावानं गायलं आहे की कुणी निराळीच गायिका गात आहे असं वाटावं! ‘परदे में रहने दो’ किंवा ‘हतुबा’मधला मध्य आशियाईपद्धतीचा स्वरलगाव किंवा काही गाण्यांत त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीनं सोप्रानो प्रकारचा केलेला आवाजाचा वापर आपल्याला थक्क करतो. जगभरातल्या गायनप्रणालींतले आवाजलगाव आशाजींनी किती सहजपणे आत्मसात करून प्रभावीपणे वापरले आहेत! हे असं अन्य कोणाही भारतीय गायिकेला साधलेलं नाही. या बाबतीत आशा भोसले म्हणजे ‘जागतिक संगीतातल्या गायनतंत्रांच्या संस्कृती-समन्वयक’च म्हणता येतील!

हिंदी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी, असमी, दाक्षिणात्य भाषांपासून इंग्लिशपर्यंत नाना देशी-विदेशी भाषांतली गीतं त्यांनी गायली, ती अशा सफाईनं की वाटावं त्यांची रोजच्या बोलण्यातली भाषाच जणू ती आहे! शब्दोच्चारांत स्पष्टता, त्या त्या भाषेचा लहजा जपत केलेलं भावपूर्ण उच्चारण आणि त्या त्या भाषेला अनुकूल असा नादरंग (टोनल कलर) राखत केलेलं उच्चारण यांमुळे आशाजींची गाणी भाषिक दृष्ट्याही आस्वादनीय आणि अभ्यसनीय ठरतात.

आशाजींची गाणी म्हणजे काव्याचा शब्दार्थ, भावार्थ आणि चित्रार्थ (म्हणजे सिनेमॅटिक सिच्युएशन) हे तीनही लक्षात घेऊन केलेलं गायन! त्यांच्या गायनातला अभिनय इतका सरस आहे की अनेकदा पडद्यावर अभिनेत्रीनं केलेला अभिनयही फिका वाटतो. आशाजी गैरफिल्मी गाणंही अशा चित्रमयतेनं गातात की ऐकणार्याच्या मनात एक दृश्यप्रतिमा तयार होतेच. त्यांचं गायन असा रसरशीत ऐन्द्रीय अनुभव तर देतंच, शिवाय गीतातल्या भावभावनांचे तरल पदर श्रोत्यांच्या मनात दीर्घकाळ तरंगत राहावेत असा सखोल ठसाही आपल्या कानामनावर त्या उमटवतात.

आशाजींच्या गाण्यांत एक ‘संवाद तत्त्व’ आहे. त्यामुळे त्यांचं गाणं सर्वसामान्यांना आपलं, आपलंस आणि आपल्यातलं वाटतं! गाण्यातून आशाजी आपल्याशीच हितगुज करताहेत असा प्रत्यय येत राहतो. ‘मेरा नाम है शबनम’, ‘रात अकेली है’ किंवा ‘बाई माझी करंगळी मोडली’ अशा ‘बोल-गाण्यां’त बोलणं ते गाणं यांच्या दरम्यान त्या किती सहज वावरतात!
आशाजींचं गुणवर्णन करताना हे लक्षात घ्यायला हवं की त्यांचे असे सगळे गुण केवळ नैसर्गिक देणगी नव्हेत, तर त्यांनी अथक परिश्रमानं ते आत्मसात केले होते. त्यांच्या कारकीर्दीच्या आरंभीच्या चार-पाच वर्षांच्या काळातली त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या गाण्यात अर्धेकच्चेपणा जाणवतो – आवाजात उगीच कापरेपणा होता, स्वरांत अस्पष्टता होती, शब्दोच्चारही विशेष कोरीव आणि प्रभावी नव्हते. परंतु अत्यंत सजगपणे त्यांनी हे अवगुण दुरुस्त केलेले जाणवतात. ‘माझं गाणं निर्दोषच असायला हवं’ हा अट्टहास त्यांनी बाळगला आणि दोषांवर हेतुपूर्वक मात केली, हे महत्त्वाचं.
आशाजी गाऊ लागल्या तेव्हा आधीच्या दणदणीत आवाजांना गारद करून लता मंगेशकर यांचा विलक्षण प्रभावी स्वर चित्रपटसृष्टीत सिद्ध झाला होता. लता मंगेशकर यांनी आपल्या निसर्गदत्त देणगी आणि मेहनत यांच्या जोरावर पार्श्वगायनाच्या क्षेत्रात जी सांगीतिक अधिसत्ता निर्माण केली होती, तिच्यापुढे इतर कोणाचेही अस्तित्व फिके होते. अशा परिस्थितीत आशाजींची स्पर्धा आधी होती राजकुमारी, शमशाद बेगम, गीता दत्त यांच्याशी. अर्थातच सुरुवातीला कमी बजेटच्या सी ग्रेड, बी ग्रेड चित्रपटांत बरीचशी नगण्य सांगीतिक स्तराची गाणी आशाजींना गावी लागली. चित्रपटातल्या मुख्य नायिकेसाठीची उत्तमोत्तम चालींची गाणी लताजींना आणि अन्य पात्रांसाठीची फुटकळ, फारसा सांगीतिक दर्जा नसलेली गाणी आशाजींना अशी सरसकट विभागणी बरेचसे संगीतकार करत. त्यातच भर म्हणजे आशाजींवर अल्लड, छचोर, उत्तान गाणीच त्या छान गातात असा शिक्का मारला गेला. (आपण लोक एखादा शिक्का मारून कलावंताची एकच एक प्रतिमा बनवायची आणि त्याची कला अवरुद्ध करायची यात माहीर आहोत!) पण हळूहळू स्वत:च्या गायनाचा स्तर सुधारत, आपले सांगीतिक क्षितिज विस्तारत आशाजी स्वत:चं स्थान निर्माण करत गेल्या. व्यवसाय-व्यवस्थापनशास्त्रात एक सिद्धांत आहे की, ज्या क्षेत्रात तुम्हाला मागणी नसते त्या क्षेत्रात तुम्हाला अशी कामगिरी करावी लागते की ज्यामुळे तुमची अशी खास मागणी तयार होते. त्यातून स्वत:चा एकमेवाद्वितीय असा ‘निश एरिया’ म्हणजे प्रभावक्षेत्र जो निर्माण करतो तो व्यावसायिक मोठा मानला जातो. या सिद्धांताचं प्रत्यक्ष उदाहरण पाहायचं असेल तर मला वाटतं, आशा भोसले यांची सांगीतिक कारकीर्द अभ्यासावी!
आशाजींच्या स्वरात तारुण्यानं मुसमुसलेला मादकपणा, यौवनरस पुरेपूर होता. किशोरकुमार यांच्याबरोबर गायलेल्या ‘हाल कैसा है जनाब का’, ‘पिया पिया मोरा जिया पुकारे’, ‘अरे यार मेरी तुमभी हो गज़ब’, ‘सी ए टी कॅट’, ‘मैं सितारों का तराना’… अशा युगुलगीतांत तर आशाजी उत्साहानं खळाळत्या स्वरांत असं काही गातात की प्रवृत्तीनं म्हातार्या माणसालाही यौवनाचे कोंब फुटावेत! ‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपटातील विश्वामित्र-मेनका प्रसंगातल्या कथक नृत्यातील गीतात त्यांनी जो काही आवाजाचा रसरशीत लगाव ठेवला आहे आणि तान घेतली आहे की, तपाला बसलेल्या विश्वामित्राचाच काय, कोणाचाही तपोभंग व्हावा! मात्र म्हणून हा एकच रंग त्यांच्या गाण्यांत प्रभावी होता असं नाही. किती वैविध्यपूर्ण भावनांची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
मराठीत सुधीर फडके, वसंत प्रभु, वसंत पवार, वसंत देसाई, यशवंत देव, श्रीनिवास खळे, अनिल-अरुण, आणि बंधू हृदयनाथ मंगेशकर, मुलगा हेमंत भोसले यांनी नाना धाटणीची गाणी आशाजींकडून गाऊन घेतली आहेत. त्यातून आशाजींनी मराठी शब्दप्रधान गीतगायनाचा एक मानदंडच तयार केला.
मात्र आशाजींचा हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नव्हता. वैयक्तिक, कौटुंबिक जीवनातल्या चढउतारांना सामोरं जात असताना आपली सांगीतिक कारकीर्दही फुलवण्याचं दुहेरी आव्हान आशाजींच्या पुढे होतं. अनेकदा त्यांना डावललं गेलं, पैसे बुडवणे किंवा पाणउतारा होणे, श्रेय नाकारले जाण्याचे असे प्रसंग आले. हाताशी आलेला घास कुणी अचानक काढून घ्यावा असे प्रसंगही आले. पण ही बाई डगमगली नाही! विलक्षण धैर्यानं आपलं स्थान त्यांनी निर्माण केलं आणि टिकवलंही. बरं, कष्टानं निर्माण केलेलं हे स्थान त्यांना वारंवार सिद्ध करावं लागलं आणि तरीही ज्या श्रेयाच्या त्या हक्कदार होत्या ते त्यांना दर वेळी मिळालंच असंही नाही!
आशाजींच्या गुणवत्तेचा समग्रपट वापरला जाईल अशी गाणी त्यांना देणारे संगीतकार अगदी बोटावर मोजण्याइतकेच होते. आशाजींच्या सांगीतिक गुणवत्तेची बूज राखून, त्यांच्या गुणवत्तेचा कस लागेल अशी यथायोग्य गाणी त्यांना वेळोवेळी देणार्या संगीतकारांत ओ. पी. नय्यर यांच्यासह रवी, खय्याम, जयदेव, सी. रामचंद्र, मराठीत सुधीर फडके, दत्ता डावजेकर, प्रभाकर जोग, श्रीधर फडके, आनंद मोडक यांचा उल्लेख नक्कीच करावा लागेल.
आजच्या जेन-झीमधल्या मुलांनाही आशाजी ‘रीलेव्हंट’ आणि ‘रिलेटेबल’ वाटतात. अलीकडेच आशाजींचे एक गाणे मी माझ्या विद्यार्थ्यांना ऐकवत होतो तेव्हा कुणी चटकन म्हणून गेला, ‘काय गायली आहे आशा!’ आशाजींचा उल्लेख संपूर्ण आदर बाळगूनही केवळ ‘आशा’ असा सहजपणेच एकेरी केला जातो. मोठी माणसं जेव्हा सर्वांनाच जवळची, आपलीशी वाटतात तेव्हाच असं घडतं, नाही का! अर्थात त्यात आशाजींच्या मोठेपणाबरोबरच अजूनही एक बाब कारणीभूत आहे, ती म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वातला दिलखुलासपणा, जिन्दादिली. आपल्या सहजसुंदर गाण्या-बोलण्यानं कोणत्याही पिढीच्या रसिकाला वयाचं अंतर कापून चटकन आपल्याशा करणार्या आशाजींची दिलखुलास दानतही नक्कीच लोभस होती. आशाजी खर्याखुर्या ‘परफॉर्मर’ होत्या. गाण्यांच्या कार्यक्रमात त्या अशा काही झोकानं वावरत, नाचत आणि नाचवत, लोकांशी संवाद साधत की श्रोते आणि त्यांच्यातलं अंतर सहजच मिटून जायचं.
आरंभी मास्टर नवरंग नागपूरकर यांच्याकडे त्या गायन शिकल्या, उत्तरायुष्यात उस्ताद अली अकबर खांसाहेबांच्या त्या गंडाबंध शिष्याही झाल्या. वडील दीनानाथ मंगेशकरांची नाट्यगीते आशाजींनी विलक्षण तडफेनं गायली आहेत, आणि ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ किंवा ‘जूठे नैन बोले’सारख्या रागप्रधान गाण्यांतल्या सरगम, तानांत त्यांच्या तयारीचा अंदाज येतो. सूरश्री केसरबाई केरकर यांनी म्हणे ‘आशानं मेहनत घेतली तर ती ख्याल गायकी चांगली गाऊ शकेल,’ असं म्हटलं होतं… पण ते काही प्रत्यक्षात आलं नाही. असो! सार्यांनीच सारंच गावं असा आग्रह धरता येत नाही. मात्र जे गावं ते उत्तमात उत्तम गावं असा आदर्श आशाजी आपल्यासमोर ठेवून गेल्या, ही फार मोठी गोष्ट आहे, नाही का!
आशाजी माणूस होत्या. सर्वगुणसंपन्न देवी नव्हत्या. कोणत्याही माणसात असतात तसे दोष त्यांच्यातही असतील आणि त्यांनी चुका केल्या असतीलही… त्याच्याविषयी उलटसुलट बोललं गेलं, टीकाही झाली. हल्ली तर अर्धवट, ऐकीव माहितीवर काहीही तारे तोडणारे व्हिडीओज्, पोस्ट यांचं पेव फुटलंय. कुणाच्याही नियंत्रणाबाहेर असलेल्या त्या पेवाच्या आधारे सरसकट मूर्तिभंजन किंवा मूर्तिभजन करणारे भरपूर असतात. त्यांच्यापासून कुणीही सुटत नाही! पण त्यामुळे आशाजींच्या गाण्याबद्दल असलेलं आपलं प्रेम, आदर उणावण्याचं काहीच कारण नाही.
मोठ्या लोकांचे पाय मातीचेच असतात, पण आभाळापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या उंचीकडेच तर आपण पाहायचं असतं ना! ज्यांच्या सांगीतिक कष्टांचा आणि जिद्दीचा आदर्श बाळगावा अशा, जगभरातल्या माझ्यासारख्या लाखो कलाकारांना प्रेरणास्थान असलेल्या आशा भोसले यांच्या चिरतरुण स्वराला लाख लाख सलाम!
keshavchaitanya@gmail.com
(लेखक संगीतकार आणि संस्कृतिसंगीतशास्त्राचे अभ्यासक आहेत.)