बातमीदारी करत होतो. अधूनमधून आशाताई भेटायच्या. कार्यक्रमात किंवा वार्ताहर परिषदेत. छान मराठी बोलायच्या. एकदा मुंबई मराठी पत्रकार संघात आशाताई-सुधीर फडके अशी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स होती. दोघं वेळेवर आले. फडक्यांनी प्रास्ताविक केलं नि प्रश्नोत्तरं सुरू झाली. फडकेच उत्तरं देत होते. सगळं आखीवरेखीव वगैरे. टेबलावर चिवडा-लाडू, गाठियाच्या बशा ठेवलेल्या. पत्रकार संघात तेव्हा एक गुबगुबीत मांजर रुबाबात फिरताना दिसायचं. ते तिथं हजर झालं नि आशाताईंच्या खुर्चीला रेलून बसलं. आशाताई मांजरासमोर थोडा थोडा चिवडा, गाठ्या टाकू लागल्या. निघताना त्यांनी मला विचारलं, ‘‘पत्रकार संघात इतरही प्राणी राहतात काय?’’ असा स्लेजहॅमर आशाताई दणक्यात हाणायच्या.

आशाताईंचा अमेरिकेतला कार्यक्रम. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन-मोनिका ल्यूइन्स्की प्रकरण तेव्हा बरंच गाजत होतं. ते आशाताईंच्या लक्षात होतं. दोन गाण्यांमध्ये ताई काहीतरी चटकदार, खुसखुशीत बोलायच्या. ‘‘आर. डी. बर्मनसाहेबांना किती दूरदृष्टी होती पाहा. या गाण्याला वीस वर्षं झालीएत नि ते आजही टवटवीत आणि आपलं वाटतंय,’’ असं म्हणून ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ हे ‘कारवां’चं गाणं गाऊ लागल्या. सभागृहावर हास्याचा नायगारा आदळला.

परदेशी राहणारी मराठी कुटुंबं आशाताईंच्या कार्यक्रमाला हमखास यायची. कुणीतरी उभं राहून सांगू लागे, बहुधा महिला : ‘‘आशाताई, आम्ही मूळचे कोल्हापूरचे (किंवा जळगाव किंवा सातारचे.). वीस वर्षं अमेरिकेत राहतोय. ‘ये रे घना ये रे घना’ (किंवा ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’) म्हणाल, प्लीज?’’ ताबडतोब ताई मराठी गाणी म्हणायच्या.

लतादीदी काय नि आशाताई काय, दोघींचं नाव जगभरात दुमदुमलं. दोघींना pan Indian appeal तर होतंच; पण आशाताई करकरीत मर्हाटी होत्या. महाराष्ट्रानं दीदींना डोक्यावर घेतलं नि आशाताईंना कडेवर. मराठी स्त्रियांना आशाताईंबद्दल विशेष आपुलकी. लतादीदी तर गौरीशंकर, पण आशाताई म्हणजे सह्य्कडा.

मराठी संत मंडळींवर आशाताईंचं निस्सीम प्रेम. नातीचं नाव जनाई ठेवलं. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ हेच आशाताईंचं जीवनसूत्र होतं. बातमीसंदर्भात अधूनमधून आशाताईंना फोन करावा लागे. त्या स्वत: फोन घ्यायच्या. मूड असला तर छान बोलायच्या. घरातल्यांची ख्यालीखुशाली विचारायच्या. अधूनमधून त्याही फोन करायच्या.

एकदा सकाळी फोन आला. माझ्या भाचीनं घेतला. पलीकडून आशाताई म्हणाल्या, ‘‘मी… आशा.’’ मुम्मुनला वाटलं मामाची सहकारी किंवा मित्र असेल. तिनं उत्साहात आशाताईंना विचारलं : ‘‘हाय… तू कशी आहेस?’’ माझं धाबं दणाणलं. मी शेजारीच बसलो होतो. पट्दिशी फोन घेतला नि ‘सॉरी’ म्हणालो. ‘‘आशाताई, भाची लहान आहे. तिच्या लक्षात नाही आलं.’’

पलीकडून आशाताई म्हणाल्या, ‘‘असू दे. दोन लहान, उनाड मुली बोलताहेत एकमेकींशी, तर बोलू दे की!’’

पत्रकार संघात एका गुणी फोटोग्राफरच्या चित्रांचं प्रदर्शन भरणार होतं. उद्घाटनाला आशाताईंनी यावं अशी छायाचित्रकाराची इच्छा होती. त्यानं माझ्या मागे लकडा लावला : ‘‘आशाताईंना आण ना.’’ मी ताईंना जरा भीत भीतच विचारलं.

‘‘येते’’ म्हणाल्या. अलीकडे मोठे कलावंत अपिरियन्स मनी घेतात असं ऐकतो. दहा मिनिटांसाठी दहा लाख रुपये, वगैरे. तेव्हा मात्र तसं काही नव्हतं. पत्रकार मंडळींचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर तर आशाताई आनंदानं यायच्या.

आल्या. व्यासपीठावर बसल्या बसल्या त्यांनी मला फोटोग्राफरचं नाव विचारलं. मोठ्या अक्षरात नाव लिहून मी तो कागद हळूच ताईंकडे सरकवला. पंधराएक मिनिटं बोलल्या. छान बोलल्या, पण चिठ्ठीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. फोटोग्राफरचं नाव साफ विसरल्या. चुकीचं नाव घेत होत्या. तरीही फोटोग्राफर खूश होता. आशाताई कार्यक्रमाला आल्या ना, खूप झालं. आशाताईंचा निरोप घ्यायला त्यांच्या गाडीपर्यंत गेलो. म्हणाल्या, ‘‘चुकले ना मी? भलतंच नाव घेतलं. मला वाटलंच काहीतरी गडबड झालीए.’’

‘‘पण आशाताई, मी तुम्हाला नाव लिहून दिलं होतं.’’

‘‘मला वाचताना चष्मा लागतो.’’

‘‘मग चष्मा लावत का नाही ?’’

‘‘अरे, ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आ जा’ आणि ‘मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ अशी गाणी गाणारी अल्हड मुलगी कधी चष्मा लावेल काय?’’

जगणं नि कला हा गुंतडा अजबच.

एकदा आशाताईंनी मुलाखतीची वेळ दिली. म्हणाल्या, ‘‘तू सकाळी अकराला घरी ये. मला बाहेर जायचंय. गाडीत बोलू.’’ ठरल्याप्रमाणे मी ‘प्रभुकुंज’ला पोचलो. धिप्पाड सिक्युरिटीवाला मला आत सोडीना. हुज्जत घालू लागला. आशाताईंनी बोलावलंय हे त्याला पटेना. ‘‘जो तो हेच सांगत असतो… निघा इथून. जाव…’’

एवढ्यात आशाताई खाली आल्या. ‘‘मी वाट पाहत्येय तुझी.’’ मी सगळा प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी त्या माणसाला सौम्य आवाजात रग्गड दम भरला. आम्ही गाडीत बसलो. ‘‘वाईट वाटलं तुला?’’ ताईंच्या आवाजात भिजकेपण होतं.

मी : ‘‘सिनेमावाल्यांचे दरवान ही एक मोठी आफतच असते. सगळे एकजात दुष्ट असतात.’’

आशाताई : ‘‘असंच काही नाही. पंचमच्या (आर. डी. बर्मन) बिल्डिंगचा नेपाळी गार्ड रात्री इमारतीच्या आवारात बसून गोड नेपाळी गाणी गात असतो. तो खूप समंजस आहे.’’ नंतर बाहेरून कळलं की अधूनमधून आर. डी. बर्मन त्या नेपाळी गुरख्याला गायला सांगायचे.

साल नेमकं आठवत नाही. आशाताईंना राज्य सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला नि आठवड्याभरात रवींद्र नाट्य मंदिरात सोहळा झाला. मला म्हणाल्या, ‘‘घरी ये. एकत्र जाऊ.’’ गाडीत म्हणाल्या, ‘‘मी काय बोलू?’’

‘‘मी काय सांगणार? तुम्ही सुरेख बोलता.’’

सुरेख बोलल्या. म्हणाल्या, ‘‘पुरस्कार, पैसा या गोष्टी मिळत असतात. मला काम हवंय. माणूस कामामुळे ओळखला जातो.’’ भाषणाच्या शेवटी एक उर्दू शेर म्हटला : ‘शोहरत की बुलंदी भी एक दिन का तमाशा हैजिस शाख पर बैठे हो वह टूट भी सकती है’ (यश, कीर्ती या घडीभरच्या गोष्टी. ज्या फांदीवर बसलाएस ती मोडकळू शकते.)

अतोनात दु:खामुळे माणूस एकतर मोडून पडतो नि आक्रोश करू लागतो किंवा दु:खापेक्षा मोठा होतो. आशाताईंनी दुसरा पर्याय निवडला. नि आयुष्याच्या भट्टीतून सुलाखून निघाल्या. त्याच सुमारास आशाताई आपल्या आठवणी लिहीत होत्या. प्रेस कॅापी तयार करण्याचं काम माझ्याकडे आलं. सगळा मजकूर ताई स्वत: लिहायच्या. पहिली दोन प्रकरणं त्यांनी मला वाचायला दिली. मजकूर visual अंगानं लिहिला होता. पहिल्या प्रकरणाचा पहिलाच परिच्छेद – नेमके शब्द आठवत नाहीत, पण आशय सांगतो : ‘सकाळची वेळ. घराला लांबच लांब पॅसेज. समोरून एक उंच, धिप्पाड माणूस सावकाश पावलं टाकत येतोय. नुकतीच अंघोळ झाली असल्यामुळे तो प्रसन्न नि तेज:पुंज दिसतोय. ओले, कुरळे केस पाठीवर रुळताहेत. अंगात पीतांबर. कपाळ भव्य. मी बाबांना निरखून पाहत्येय.’

आठवड्यातून दोन दिवस मी ‘प्रभुकुंज’ला सकाळी अकराला जायचं नि दोन तास काम करायचं असं ठरलं. हे वेळापत्रक लवकरच कोलमडलं. कारण आशाताईंचं सैंपाकाचं पॅशन. सकाळी खूप गडबडीत असायच्या. मग ठरलं की, ध्वनिमुद्रण किंवा तालमीसाठी बाहेर जाणं झालं तर मी ताईंबरोबर जायचं नि गाडीत बोलायचं. एरवीसुद्धा ‘चल रे माझ्याबरोबर’ म्हणायच्या. कुठं गिरगावात कंदील आणायला किंवा तालमीला. म्हणायच्या, ‘‘दुपारचं घरात बसून राहिलं की मनावर बुरशी चढते.’’

ग्रॅंट रोडच्या मासळी बाजारातल्या कोळणी तर आशाताईंच्या सख्ख्या सख्या. ‘आगं आवार ये, आशा. सुरमई बघ कशी हाय… बदामाची बर्फी,’ असं सुरू असायचं. आशाताईंनी आपल्या मोठेपणाचं ओझं ना स्वत: कधी बाळगलं, ना इतरांवर लादलं. त्यांच्या घरी शिरताना मनावर दडपण येत नसे. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत घराचं दार सताड उघडं. त्या सहा-आठ महिन्याच्या काळात आशाताईंना जवळून पाहता आलं. त्यांच्याकडे कडू-गोड आठवणींचा मोठा पेटारा होता. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट नि मग तिसरी, चौथी. सांगताना कुठंही कडवटपणा नाही, धुसफुस नाही.

एकदा दीदींचा विषय निघाला. आशाताईंनी दोन झगझगीत वाक्यात दोघींतला फरक सांगितला. ‘‘लतादीदी म्हणजे कुठच्याशा प्राचीन मंदिरात दिवा लावणारी भारदस्त, सा्त्विवक स्त्री; तर केसांच्या जटा, मोठ्ठे डोळे, मळलेला परकर-पोलका अशी गल्लोगल्ली फुलं विकणारी, हसरी नि खट्याळ मुलगी म्हणजे मी.’’

एकेकदा स्वत:ची खिल्ली उडवायच्या. एकदा एका हिंदी संगीतकारानं त्यांना आग्रहानं जेवायला घरी बोलावलं. त्या गेल्या. गप्पा छान सुरू होत्या. संगीतकार आणि त्याच्या बायकोनं ताईंचा पुष्कळ मानसन्मान केला वगैरे. संगीतकाराच्या बायकोनं मोठ्या हौसेनं आशाताईंना आपले
नवे दागिने दाखवले. ‘‘हे सगळे खरे की काय?’’ असं आशाताईंनी तिला विचारलं. ती वैतागली. म्हणाली, ‘‘माझा नवरा दिवसरात्र एवढी मेहनत करतो. तो माझ्या अंगावर खोटे दागिने चढवेल काय?’’ हा प्रसंग सांगताना आशाताई खळखळून हसत होत्या. हसल्या की सहा-सात वर्षांच्या वाटायच्या. निरागस, नटखट. दीदींचंही असंच.

गणपतरावांशी लग्न झाल्यावर नवरा-बायको बोरीवलीला दौलत नगरात राहू लागले. सकाळी सैंपाक, धुणं-भांडी करून नि थोडं खाऊन आशाताई कामाच्या शोधात बाहेर पडायच्या. बरोबर बहुधा गणपतराव असायचेच. कधी ‘बॉम्बे टॉकीज’ तर कधी ‘रणजित’ किंवा ‘फेमस स्टुडियो.’ नशिबानं एखादं गाणं वाट्याला आलं तर शंभर रुपये बिदागी मिळायची. दादरला कबुतरखान्याजवळ एक मराठी खाणावळ होती. तिथं दोघं जेवायचे. आठ आण्याची राइस प्लेट.

बोरीवलीच्या डॉ. हिंदळेकरांच्या दवाखान्यात १९४९ साली हेमंतचा जन्म झाला. त्याच्या सोळाव्या वाढदिवसाला डॉ. हिंदळेकरांनी ताईंना शुभेच्छा पत्र पाठवलं. तेव्हा ताईंचं पुष्कळ नाव झालं होतं. पत्र हाती पडलं नि दुसर्याच दिवशी रेकॅार्डिंग रद्द करून त्या बोरीवलीला हिंदळेकरांना भेटायला गेल्या. मी बोरीवलीचा. डॉ. हिंदळेकरांचा दवाखाना शाबूत आहे काय, असं एकदा आशाताईंनी विचारलं. आहे नि गुटगुटीत आहे हे त्यांना सांगायचं होतं. राहून गेलं.
आशाताईंनी कष्ट खूप केले. पहिली काही वर्षं तर त्या आणि किशोरकुमार बड्या संगीतकारांच्या खिजगणतीत नसायचे. बरीच वर्षं कॅब्रे-मुजरा गायिका अशी आशाताईंची संभावना करण्यात येई. आपण एक विसरतो की, आशाताईंच्या गाण्यांमुळे तथाकथित पतित स्त्रियांना आत्मसन्मान मिळाला, मान्यता मिळाली. प्रेक्षकांनी fallen womanला स्वीकारलं. ती हिंदी सिनेमाच्या विचारव्यूहाचा एक भाग झाली.

एकदा संगीतकार खेमचंद प्रकाशांचं रेकॅार्डिंग होतं. आशाताई आणि किशोरकुमार संध्याकाळी सातला ‘फेमस’ला पोचले. रात्री एक वाजता माईक लावला. तालीम झाली. साऊंड चेकच्या वेळी ध्वनिमुद्रक खेमचंदबाबूंना म्हणाला, ‘‘या दोन्ही गायकांना घरी पाठवा. यांचा आवाज माइकला अनुकूल नाही.’’ आशाताई, गणपतराव आणि किशोरकुमार चालत चालत महालक्ष्मी स्टेशनला आले. किशोर-दा तर फार वैतागले होते. आशाताई म्हणाल्या, ‘‘धीर धरा. आपलेही दिवस येतील.’’

दिवस आले ते झांजा वाजवत. १९७०च्या दशकात आर. डी.-आशाताई-किशोरकुमार हे त्रिकूट अनोखं संगीत घेऊन आलं. नव्या पिढीला हवं असलेलं ते संगीत भन्नाट, धीट आणि सायकेडेलिक होतं. मधुर होतं नि मॅडही होतं.

जमाना बदलतोय हे गाण्यावरून कळतं. जागतिकीकरण आपल्याकडे दाखल झालं १९९१ साली; पण ‘दम मारो दम’ आणि ‘जान-ए-जां ढूंढता फिर रहा’ या गाण्यांमुळे भारताच्या खिडक्या सटासट उघडल्या.

मात्र, परंपरा आणि नवं गाणं यांतला समतोल आशाताईंनी चोख सांभाळला. ‘पिया तू अब तो आजा’ तूफान चाललं तर दुसरीकडे ‘उमराव जान’च्या अभिजात गजलांची आणि ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’चीही रसिकांना भुरळ पडली. जयदेव, खय्याम यांच्या मनमोहक गजला त्या गायल्या आणि बॉय जॉर्जबरोबर रेकॅार्ड केली.

आनंदनं (आशाताईंचा मुलगा) दुबई, अबूधाबीत हॉटेल सुरू केलं तर ताईंनी त्याला निरनिराळ्या वानग्यांची भली मोठी यादी करून दिली. तिथं प्रत्यक्ष गेल्यावर तर त्यांनी भटारखान्याचा ताबाच घेतला. विशाल समुद्रात अक्राळविक्राळ देवमाशाशी एक साहसी दर्यावर्दी रात्रंदिवस झुंजत असतो; तो रक्तबंबाळ होतो, पण हार मानत नाही. आशाताई तसं जगल्या. विलक्षण धैर्यानं आणि काळाला पुन:पुन्हा आव्हान देत देत.

छोट्या छोट्या खोक्यात माणसांना कोंबण्याची जगाची रीत. प्रत्येक खोक्यावर expiry date असते. अशा हवाबंद खोक्यात मावणं हा आशाताईंचा स्वभाव नव्हता. स्वत:च्या अटींवर जगल्या. संकटं अमाप आली. उपहास, अपमानाचे प्रसंग खूप. पण दु:खाचा गाजावाजा केला नाही. रडल्या-भेकल्या नाहीत. आपल्यावर झालेल्या अन्यायाचं इमोशनल सादरीकरण केलं नाही.

डोंगराएवढे कष्ट केले. वादळातून मार्ग काढला. सगळ्यांना मागे टाकून पुढे गेल्या. त्यांनीच एका गाण्यात म्हटलंय : ‘मैं तो आगे बढ गई, पीछे जमाना रह गया…’

ambarish.mishra@icloud.com