जनक शिवसृष्टीचे!

बाबासाहेबांचे शिवचरित्र घराघरांमध्ये पोहोचविण्याचे भगीरथ प्रयत्न महत्त्वाची भूमिका बजावेल.

शिवाजी महाराजांप्रति अखंड आयुष्य समर्पित केलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले, त्या सोहळ्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या भाषणातील काही संपादित अंश..

सत्कार समारोहाचे आदरणीय अध्यक्ष पु. ल. देशपांडेजी, माननीय बाबासाहेब पुरंदरे..

बाबासाहेब पुरंदरे यांनी दहा हजारांहून अधिक भाषणं केली आहेत. अगदी तिकीट खरेदी करून लोक त्यांची भाषणं ऐकायला येतात. भाषणं मीसुद्धा देतो, पण मी माझ्या भाषणासाठी तिकीट लावण्याचा विचारही कधी केला नाही; कारण मला कल्पना आहे की माझी भाषणं ऐकायला तिकीट खरेदी करून कुणीही येणार नाही. त्यामुळे माझ्या भाषणांतून विनातिकीट लोकशिक्षणाचं काम सुरू आहे. परंतु बाबासाहेबांचं भाषण ऐकायला मात्र लोक आवर्जून हजेरी लावतात. त्यांनी पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत आणि त्या पुस्तकांच्या लाखांपेक्षा जास्त प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आणि या सर्व पुस्तकांच्या केंद्रस्थानी छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या प्रेरणेतूनच त्यांचा ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास झपाटल्यागत झाला आहे. त्यांच्या या झपाटलेपणाच्या वृत्तीमुळेच त्यांनी केवळ  महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला आपल्या कार्याने प्रभावित केले आहे. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप..’ छत्रपती शिवाजी महाराज हे एक राष्ट्रपुरुष होते. शिवरायांची उशिरा ओळख झालेले अनेक नेते त्यांचे महत्त्व स्वीकारत नाहीत; परंतु ज्यांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना आदर्श म्हणूनच पाहिलं ते बाबासाहेब शिवशाहीर म्हणून विख्यात आहेत. त्यांचं शरीर वर्तमानात असतं, पण मन मात्र शिवकाळातच वावरतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये त्यांचं मन सतत घुटमळत असतं.. त्यांच्याशी संवाद साधत असतं. शिवकालीन कथा २४ तास त्यांची सोबत करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांची एकाग्रता म्हणजे महाभारतातील अर्जुनाला केवळ पक्ष्याचा डोळा दिसणाऱ्या गोष्टीसारखी आहे. ही कठीण साधना त्यांनी प्रतिभा, परिश्रम, निष्ठा आणि आत्मीयतेने आदर्शवादातून संपादित केली आहे. मला नागपूरमध्ये त्यांच्या कल्पनेतून साकारलेले ‘जाणता राजा’ हे नाटक पाहण्याची संधी मिळाली. संपूर्ण स्टेज भारलेलं होतं. आणि समोर जे होतं ते केवळ भव्यदिव्य! स्टेजवर घोडे, हत्ती पाहून मला आश्चर्य वाटलं. पण या चमत्कारामागे बाबासाहेब पुरंदरे यांची प्रतिभा, दग्दर्शन आणि अथक मेहनत होती. मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी अन्य भारतीय भाषांमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र रसाळ भाषेत लोकांसमोर आणावे. गुजरातमधील लोकांमध्ये शिवाजी महाराजांबाबत खूप भ्रम होते. त्यासंदर्भात ‘सुरतेच्या लुटी’चा उल्लेख केला जातो. पण हळूहळू लोकशिक्षणातून आणि लोकजागृतीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे रूप गुजरातच्या लोकांसमोर आणले गेले आणि आज तिथे महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे. याकामी बाबासाहेब पुरंदरे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी अन्यभाषिकांसमोरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचे वास्तव आणावे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना लाभलेला ‘पुण्यभूषण’ हा पुरस्कार म्हणजे लोकांच्या मान्यतेचा सन्मान आहे. हा बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान नसून आपला सन्मान आहे. त्यांना हा पुरस्कार देऊन आपण स्वत:लाच गौरवांकित केले आहे.

क्रांतिकारकांचे स्मरण, प्रतिभेचे योग्य मूल्यमापन हे समाजाच्या जागृतीचे लक्षण असते. त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा जनमानसात रुजवला. माझी प्रार्थना आहे की, त्यांना दीर्घ, निरामय, उदंड आयुष्य लाभो. कारण अजून त्यांना शिवसृष्टी साकारायची आहे. त्यात समाज म्हणून आपलेही सहकार्य असायला हवे. आपण राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे असे स्मारक का निर्माण करू शकत नाही, ज्याची तुलना जगातील भव्य स्मारकांत होईल. आपल्याकडील सांस्कृतिक वारशाचा सन्मान व्हायला हवा. बाबासाहेबांनी सगळ्या गडकिल्ल्यांची भ्रमंती करून शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले यांचे लोकांना पुन्हा स्मरण करून दिले. मी राजस्थानमधील दुर्गाची दुर्दशा पाहतो, तेव्हा ते पाहून मला अतीव दु:ख होतं. आपण आपल्या इतिहासाचे रक्षण करू शकत नाही? आपल्याला आपल्या इतिहासाचाच विसर पडत चालला आहे. आपली परंपरा ही आपल्या अपमानाचा विषय नाही. पाश्चात्त्य देश- जे भौतिकवादी म्हणून ओळखले जातात, ते आपल्या पारंपरिक सांस्कृतिक वारशाचे जतन करतात आणि त्यांच्या नव्या पिढीसमोर तो वारसा सादर करतात. आपल्याकडे ते काम बाबासाहेबांनी केलं आहे. याकरता मी त्यांचा आभारी आहे. ते दिवसरात्र जे परिश्रम करत आहेत ते भारावून टाकणारं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुपतपातशाहीची स्थापना केली. स्वराज्याची स्थापना केली. पण त्यांच्यावर मुस्लीमविरोधी असा शिक्का मारला गेला नाही. देशाला योग्य पथावर न्यायचे असेल तर शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण करून असा पुरुषार्थ प्रकट करावा लागेल, की देशाच्या भविष्याबाबत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जी स्वप्ने पाहिली ती काही अंशी तरी पूर्ण होतील. त्यासाठी बाबासाहेबांचे शिवचरित्र घराघरांमध्ये पोहोचविण्याचे भगीरथ प्रयत्न महत्त्वाची भूमिका बजावेल.

(डॉ. सतीश देसाई यांच्या सौजन्याने)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Atal bihari vajpayee speech babasaheb purandare punyabhushan award zws

Next Story
रसग्रहण : ललितकलांच्या अभ्यासाचे अपरिचित दालन
ताज्या बातम्या