अलीकडेच पुण्यात होणारी नास्तिक परिषद काहींनी तिच्या आयोजनाला आक्षेप घेतल्याने  रद्द करण्यात आली. खरे तर आस्तिक-नास्तिकतेची चर्चा, त्यावरचा वितंडवाद आणि त्याची मीमांसा हे आपल्याला नवीन नाही. पूर्वापार हे चालत आलेले आहे. महाराष्ट्र तर सुधारणावादी चळवळी आणि वैचारिक खंडनमंडणात नेहमीच अग्रभागी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर हे घडावे हे अधिक दुर्दैवी आहे. त्यामुळेच यासंबंधात सर्वस्पर्शी चर्चा घडावी म्हणून हा लेख.. 

जगाच्या पाठीवर आस्तिक आणि नास्तिक यांच्यामधील वाद फार प्राचीन आहे. हे दोन शब्द इंग्रजीतील अनुक्रमे ‘ktheist’ आणि ‘atheist’ या शब्दांसाठी समानार्थक पर्याय म्हणून मराठीत वापरले जात असले तरी एकूण भारतीय संदर्भात त्यांचा अर्थ काहीसा वेगळा होतो. त्यांचा साधारण रूढ अर्थ पाहिला तर ‘आस्तिक’ म्हणजे ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारा आणि ‘नास्तिक’ म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा असा आहे. काही दशकांपूर्वी अमिताभचा ‘नास्तिक’ या नावाचा चित्रपट आल्याचे अनेकांना आठवत असेल. त्यातील नायकाची ईश्वरावर श्रद्धा नसते, म्हणून तो ‘नास्तिक’!

balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

(अस्तित्वात) नाही अशी ज्याची बुद्धी अथवा धारणा आहे त्याला नास्तिक मानावे अशी मूळची समजूत. पहिल्यांदा हा शब्द वेदांचे प्रामाण्य मानायचे किंवा नाही यावरून प्रचारात आला. जो वेदांचा प्रमाणग्रंथ म्हणून स्वीकार करतो तो ‘आस्तिक’ आणि जो करीत नाही तो ‘नास्तिक’ असा हा साधा-सरळ मामला होता. त्यानुसार दर्शनांचे अथवा तात्त्विक संप्रदायांचे वर्गीकरण होई. न्याय, वैशेषिक, वेदांत अशी दर्शने आस्तिक; कारण ती वेदप्रामाण्य मानतात. चार्वाक (लोकायत), बौद्ध, जैन ही दर्शने नास्तिक; कारण ती वेदप्रामाण्य मानत नाहीत. अर्थात याचा अर्थ असा नाही की, नास्तिक दर्शनांना त्यांचे प्रामाण्यग्रंथ नसतात. त्या, त्या दर्शनांचे प्रामाण्यग्रंथ आहेतच.

आता वेदप्रामाण्य मानले याचा अर्थ ते दर्शन ईश्वराचे अस्तित्व मान्य करीलच असे नाही. मीमांसादर्शनाची एक शाखा ईश्वर नसला तरी चालेल अशा मताची होती. तेव्हा ती लोकायतप्राय झाली असल्याची टीका होई. सांख्य दर्शन तसे वेद मानणारे. पण त्याची एक शाखा निरीश्वरवादी होती. तिला निरीश्वर सांख्य असे संबोधले जाई.

देव आणि वेद यांच्या बरोबरीने परलोकाचाही विचार केला जाई. परलोकाचे म्हणजे स्वर्ग-नरकाचे अस्तित्व मानतो तो आस्तिक आणि जो मानत नाही तो नास्तिक. म्हणजे आता वेद आणि ईश्वर न मानणारे जैन दर्शन परलोकाच्या विचार केला तर आस्तिक ठरेल. बौद्धांचा महायान पंथही आस्तिक ठरेल. स्वत: गौतम बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व मानल्याचा पुरावा नाही. पण नंतर त्यांनाच देव मानून त्यांची पूजा करणारे संप्रदाय निघाले.

थोडक्यात, आस्तिक्य-नास्तिक्याचे अर्थचक्र मुख्यत: वेदप्रामाण्याच्या संदर्भात फिरू लागले असले तरी त्याचा स्पर्श नंतर देव आणि परलोक यांनाही झाला. इतकेच नव्हे तर मूळचा वेदांचा संदर्भ मागे पडून ईश्वराचे अस्तित्व मानणे किंवा न मानणे हाच कळीचा मुद्दा ठरला. वेदप्रामाण्य मानणे या अर्थाने आस्तिक असणारे वैदिकधर्मीय ईश्वरही मानतात अशी पक्की समजूत रूढ झाली. निरीश्वर सांख्य किंवा त्यांचे बांधव म्हणता येतील असे पूर्वमीमांसेच्या एका शाखेचे अनुयायी अल्पसंख्य होत होत तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील नोंदींपुरते उरले. त्यामुळे हे अंतर्गत तपशीलही फारसे ज्ञात नसतात.

उपरोक्त काटेकोर आणि सुनिश्चित अर्थनिर्धारणाच्या दृष्टीने पाहिले तर वेद, ईश्वर आणि परलोक नाकारणारे ‘लोकायत दर्शन’ ही नास्तिकतेची पराकोटी ठरते. इतर अनेक दर्शनांच्या बाबतीत अर्थाच्या समोच्चरेषा (contours) वाकडय़ातिकडय़ा कराव्या लागतील.

भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर पराकोटीचे नास्तिक असलेले चार्वाक किंवा लोकायत दर्शन मागे पडले याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे इतर नास्तिक दर्शनांनी धर्म नाकारला नाही. बौद्धांनी भले वेद नाकारला असेल, देव नाकारला असेल, पण त्यांचा धर्म होता. जैनांचाही धर्म होता. त्यामुळे त्यांना ‘अवैदिक धर्म’ असे म्हणण्यात येते. लोकायत हे अवैदिक दर्शन आहे. (अवैदिक) धर्म नव्हे. नुसत्या दर्शनाला लोकाश्रय कसा मिळणार? त्यामुळे नावात ‘लोक’ (लोकायत) असला तरी चार्वाकाचा विस्तार होऊ  शकला नाही.

साहजिकच निरीश्वरवादी या अर्थाने नास्तिकतेचे प्रतिनिधी बौद्धांना मानण्यात येऊ लागणे स्वाभाविक होते. बौद्ध आणि वैदिकांचा तुंबळ वाद याही कारणामुळे झाला. बौद्ध वेदप्रामाण्य मुदलातच मानत नसल्यामुळे वेद सांगतात म्हणून ईश्वरावर श्रद्धा ठेवा असे त्यांना सांगायची सोय नव्हती. त्यासाठी त्यांच्याशी वाद करायचीच जरुरी होती. हा वाद प्रसिद्ध न्याय दार्शनिक उदयनाचार्य यांनी केला. त्यांनी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या युक्तिवादाचा ग्रंथच लिहिला.

कुमारील भट, शंकराचार्य, उदयनाचार्य यांच्या वैचारिक हल्ल्यांमुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या बौद्ध धर्माला इस्लामच्या आक्रमणाने पुरते नामोहरम केले. त्यांच्या नालंदासारख्या महाविद्यापीठाचा विध्वंस झाला. उरले होते ते बौद्ध भिक्षू तिबेटच्या रोखाने गेले.

हे सांगायचे कारण म्हणजे त्यानंतर भारतात नास्तिकांचा पक्ष धरून वाद करील, आव्हान देईल असा प्रबळ प्रतिस्पर्धी कोणी उरलाच नाही. त्यामुळे नास्तिकांचा पक्ष आस्तिकांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये पूर्वपक्षाइतकाच मर्यादित राहिला. चार्वाक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या काळातील वादविवाद हे आस्तिकांच्या वर्तुळातील अंतर्गत वाद होते. ही परिस्थिती अकराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत अशीच राहिली.

एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिशांच्या राजवटीमुळे या परिस्थितीत पालट झाला. राज्यकर्ते ब्रिटिश स्वत: ख्रिस्ती धर्माचे पालन करणारे असले तरी त्यांना वादविवादाचे वावडे नव्हते. सर्व प्रकारचे विचार समजून घ्यावेत, त्यांचे खंडनमंडन करावे, अंतिम निवाडा बुद्धिप्रामाण्याने व्हावा, ही ‘एन्लायटनमेंट’ संस्कृती त्यांना मान्य होती. अशा प्रकारचे मुक्त वातावरण ना इस्लामी सत्ताधीशांच्या काळात होते, ना पोर्तुगीजांच्या वसाहतींमध्ये.

ब्रिटिशांमुळे पाश्चात्य जागतिक ज्ञान-विज्ञान- तत्त्वज्ञानाचे प्रवाह भारतात दाखल झाले. वादविवादांना, चर्चाना पुन्हा एकदा संस्थात्मक रूप मिळाले. ही प्रक्रिया विशेषत: बंगाल आणि महाराष्ट्रात घडली. तेव्हाही चर्चेचा केंद्रबिंदू धर्म हाच होता. मात्र, धर्माची चर्चा करता करता धर्म व धर्माचा केंद्रबिंदू असलेल्या ईश्वर नावाच्या गोष्टीची चिकित्सा केली जाते, हे येथील विद्वानांना अवगत झाले. कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथांमधील वाद जसा त्यांना समजला, त्याचप्रमाणे थॉमस पेन नावाच्या अमेरिकन विचारवंताने पारंपरिक ख्रिस्ती धर्मावर केलेल्या टीकेची माहितीही त्यांना मिळाली. पेनने न्यूटनच्या आधुनिक विज्ञानाशी सुसंगत ठरावी अशी ईश्वराची वेगळी संकल्पना मांडल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच महात्मा जोतिराव फुल्यांचा निर्मिक साकारला.

एकोणिसाव्या शतकात येथे घडलेल्या प्रबोधनात सर्व गोष्टी बुद्धीने पारखून घेण्याच्या प्रक्रियेला बळ मिळाले. धर्मचिकित्सा करता करता कधीतरी ही प्रक्रिया ईश्वरापर्यंत पोहोचणे अपरिहार्य होते. मात्र, त्यासाठी आणखी थोडे थांबावे लागणार होते. १९२० नंतर भारतात कार्ल मार्क्‍सचा विचार दाखल झाला. हा विचार जडवादी असून ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा तर होताच, पण धर्मसंस्थेलाही नाकारणारा होता.

धर्माची बुद्धिनिष्ठ चिकित्सा करण्याची परंपरा महाराष्ट्रात यापूर्वीच सुरू झाली होती. उपयुक्ततावाद आणि समाजशास्त्रीय डार्विनवादी उत्क्रांतीवाद या मिल व स्पेन्सर यांच्या मतांच्या आधारे गोपाळ गणेश आगरकर यांनी हिंदू धर्माची चिकित्सा केली. त्यांच्या या चिकित्सेचा प्रभाव विनायक दामोदर सावरकरांवरही पडला.

मात्र, या दोघांना नास्तिक म्हणण्यापेक्षा अज्ञेयवादी म्हणणे न्याय देणारे ठरेल. अर्थात १९२० नंतर चर्चेत उतरलेल्या सावरकरांना मिल-स्पेन्सर यांच्याप्रमाणे आता मार्क्‍सही ठाऊक झाला होता. मात्र, त्यांच्या मतांवर मार्क्‍सचा प्रभाव नाही.

१९२० नंतर नव्याने दाखल झालेले मतप्रवाह म्हणजे बटरड्र रसेलचा अनुभवनिष्ठ बुद्धिवाद ऊर्फ पॉझिटिव्हिझम आणि फ्रॉईडचे मनोविश्लेषण. महाराष्ट्रातील विचारवंतांनी त्यांच्या मिश्रणातून ‘नवमतवाद’ म्हणून ओळखली जाणारी एक वेगळीच प्रणाली निर्माण करायचा प्रयत्न केला होता याची नोंद घ्यायला हवी. अर्थात हा प्रयत्न फसला, हेही सांगायला हवे.

संस्थात्मक पातळीवरून विचार करायचा झाल्यास वाई येथील धर्मनिर्णय मंडळाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. त्यातील मंडळींनी ‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनवाद’ नामक विचारसरणीचा पुरस्कार केला. धर्माची विवेकाच्या आधारे चिकित्सा करून त्यात कालानुरूप बदल घडवून आणायला हवेत असा या मंडळींचा आग्रह होता. संस्थापक स्वत: स्वामी केवलानंद (नारायणशास्त्री मराठे), के. ल. तथा भाऊजी दप्तरी, महादेवशास्त्री दिवेकर आणि अर्थातच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नावे या संदर्भात विशेष महत्त्वाची आहेत. महादेवशास्त्री ‘किलरेस्कर’ मासिकाने उघडलेल्या बुवाबाजीविरुद्धच्या मोहिमेत क्रियाशील होते. दप्तरींची मांडणी सकारात्मक समीक्षा पद्धतीची होती. तर्कतीर्थानी मार्क्‍सवादाचा अंगीकार केल्यामुळे ते नास्तिक बनले. त्यांनी हिंदू धर्माची चिकित्सा करणारे ग्रंथलेखनही केले. अर्थात शास्त्रीजींची ही भूमिका अखेपर्यंत टिकली नाही. आयुष्याच्या शेवटी तर ते अज्ञेयतेतून सश्रद्धतेकडे वळले होते. याच काळात अरुण शेवते यांनी आणि नंतर मी स्वत: (सहकाऱ्यांसह) तर्कतीर्थाच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यातून हे स्पष्ट होते.

महाराष्ट्रात बुद्धिप्रामाण्यवादी लोकांची संख्या कमी नाही. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचीही भर पडली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा या चळवळीत मोठा वाटा होता. डॉक्टरांची भूमिका ही धर्मशुद्धीची होती. ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यावर त्यांचा भर नव्हता. ती भूमिका डॉ. श्रीराम लागू यांची. मात्र, या भूमिकांची सरमिसळ होऊन त्यांना मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या लोकांमध्येही संभ्रम पसरला, हे मात्र खरे.

पराकोटीच्या नास्तिक दर्शनाचा- म्हणजेच लोकायत दर्शनाचा उल्लेख याआधी झालेला आहेच. पूर्वी लोकायताची चर्चा होताना ती सहसा माधवाचार्यानी ‘सर्वदर्शनसंग्रहा’त मांडलेल्या चार्वाकाच्या (पूर्व)पक्षावरून केली जायची. मार्क्‍सवादी प्रभावामुळे बंगालमधील अभ्यासक डॉ. देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी या दर्शनाचा सखोल अभ्यास करून ग्रंथ लिहिला. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील अभ्यासकांवर पडणे साहजिकच होते. डॉ. सदाशिव आठवले, प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. आ. ह. साळुंके यांनी नास्तिकांचा पक्ष उचलून धरल्याचे दिसते.

आस्तिक-नास्तिकतेच्या या वादाशी जातीयवादाचा फारसा संबंध नसल्याचेही नमूद करायला हवे. स्वत: बृहस्पती, चार्वाक यांच्यासह वर्तमान नास्तिकांमध्ये ब्राह्मण विचारवंतांचाच भरणा अधिक दिसतो याचीही नोंद घ्यायला हवी. या प्रकरणाला सामाजिक वादाचा संदर्भ दिला जाऊ  नये तसेच राजकीय वादांचीही फोडणी दिली जाऊ  नये. तसे करता आले तर दोन्ही पक्षांची वैचारिक समृद्धी वाढेल व भारतीय तत्त्वज्ञान पुढे जाईल. डोकी ही फोडण्यासाठी नसून चालविण्यासाठी असतात, हेही लक्षात घ्यायला हवे. याबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होईल तेव्हा ती दुसऱ्या बाजूला चिडवण्यासाठी वा डिवचण्यासाठी नसून, समजून घेण्यासाठी व समजून देण्यासाठी असली पाहिजे आणि त्यातही स्थलकालाचे तारतम्य दाखवले पाहिजे. युजीन हॅबरमास या आधुनिक विचारवंताने संवादाधिष्ठित समाजाचे अस्तित्व लोकशाहीसाठी आवश्यक मानले असल्याची आठवण या ठिकाणी करून देतो.