रघुनंदन गोखले

क्युबामध्ये जन्मलेला जोस रॉल कॅपाब्लांका याच्या खेळाचा झंझावात पहिल्या महायुद्धाआधीपासून जगाने अनुभवला. त्याच्या सरकारने या खेळाडूला सदिच्छादूताचा दर्जा देऊन आपल्या देशाची प्रतिमा उंचावली. पुढे उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या जगज्जेत्याचा वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी मृत्यू झाला, पण ‘बुद्धिबळ खेळाडूंचे मानसशास्त्र’ या ग्रंथाद्वारे त्याचे नाव आजही या जगात अजरामर राहिलेले आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

चार दिवसांपूर्वीच जोस रॉल कॅपाब्लांका या महान जगज्जेत्याचा ८१ वा स्मृतिदिन होता. अनेकांच्या मते (यात बॉबी फिशरपण आलाच) आतापर्यंतच्या जगज्जेत्यांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता बघता कॅपाब्लांकाचा पहिला क्रमांक लागतो. आपण पूर्वी वाचलं आहेच की, वडिलांच्या मांडीवर बसून त्यांचा खेळ बघून कोणीही न शिकवता हा चार वर्षांचा मुलगा बुद्धिबळ शिकला. त्याचं डावाचा अंतिम भाग खेळण्याचं कौशल्य आणि त्यामधील अचूकता बघून त्याला त्याचे समकालीन बुद्धिबळपटू ‘बुद्धिबळाचे यंत्र’ म्हणत असत.

१९ नोव्हेंबर १८८८ साली क्युबाची राजधानी हवाना (ऌं५ंल्लं) येथे जन्मलेला कॅपाब्लांका दुर्दैवानं जास्त जगला नाही. उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी ८ मार्च १९४२ रोजी अकाली मृत्यू झाला; परंतु या देखण्या जगज्जेत्यानं खेळलेले डाव आजही आपल्यात त्याची आठवण म्हणून आहेत. क्युबन सरकार दरवर्षी त्याच्या स्मरणार्थ एक मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते. २०१७ साली भारताच्या ग्रँडमास्टर शशिकिरणनं या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं.

कॅपाब्लांकानं वयाच्या १७व्या वर्षी न्यू यॉर्कच्या कोलंबिया महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता त्याचं कारण वेगळंच होतं. त्याला त्या महाविद्यालयाच्या बेसबॉल संघात प्रवेश हवा होता. तेथे बचाव फळीत उत्कृष्ट खेळ दाखवणारा कॅपाब्लांका एक दिवस सहज प्रसिद्ध मॅनहॅटन बुद्धिबळ क्लबमध्ये गेला आणि त्याला पुन्हा एकदा बुद्धिबळ वेडानं झपाटलं. पुढच्याच वर्षी (१९०६) जगज्जेता इमॅनुएल लास्कर तेथे आला होता. त्या वेळी क्लबनं आयोजित केलेल्या जलदगती स्पर्धेत लास्कर खेळत असताना पहिला क्रमांक मिळवून कॅपाब्लांकानं सर्वाना चकित केलं. या वेळेपर्यंत तरुण कॅपाब्लांकानं बुद्धिबळाचं पुस्तकही उघडलेलं नव्हतं.

नंतरची दोन वर्षे त्यानं संपूर्ण अमेरिकेचा दौरा करून प्रदर्शनीय सामने खेळले. ६४० डाव खेळूनही त्याचा स्कोअर होता ९६% ! अभ्यासाचे बारा वाजले होतेच. त्यामुळे त्याची शिष्यवृत्ती बंद झाली होती. १९०९ साली त्यानं अमेरिकेतील सर्वोत्तम खेळाडू फ्रँक मार्शलचा १५-८ अशा फरकानं पराभव केला, परंतु तोपर्यंत कॅपाब्लांकानं अजून एकही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा खेळली नव्हती. फ्रँक मार्शलला सॅन सॅबेस्टियन (स्पेन) येथे १९११ साली होणाऱ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेचं निमंत्रण आलं होतं.

खिलाडूवृत्तीच्या मार्शलनं आयोजकांना कॅपाब्लांकालाही स्पर्धेत घेण्याची गळ घातली. लक्षात घ्या! नुकतीच कॅपाब्लांकानं मार्शलची अक्षरश: धुलाई केली होती. तरीही अशा प्रतिस्पध्र्याला बरोबर घेऊन जाणं म्हणजे अत्युच्च खिलाडूवृत्तीचा आविष्कार होता, पण स्पेनमध्ये नवीन अडचण निर्माण झाली. जगातील आघाडीचे खेळाडू निमझोवीच आणि बर्नस्टाईन यांनी कॅपाब्लांकाच्या सहभागाला विरोध दर्शवला. ‘‘आम्ही अनेक स्पर्धा जिंकून येथे आलो आहोत आणि अशा नवख्या खेळाडूंबरोबर आम्हाला खेळायला लावणं हा आमचा अपमान आहे,’’ या शब्दांत त्यांनी विरोध व्यक्त केला. परंतु आयोजक हटले नाहीत आणि जगातील उत्कृष्ट १३ खेळाडू अधिक नवखा कॅपाब्लांका अशी १४ जणांची स्पर्धा सुरू झाली.

पहिलाच डाव कॅपाब्लांका विरुद्ध बर्नस्टाईन असा लागला आणि कॅपाब्लांकानं इतका सुंदर खेळ करून बर्नस्टाईनला हरवलं की तो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट डावाचा मानकरी ठरला. निमझोवीचलाही त्यानं सहज हरवलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे २१ वर्षांचा कॅपाब्लांका या स्पर्धेचा विजेता ठरला. नवख्या खेळाडूला विरोध करणाऱ्या निमझोवीच आणि बर्नस्टाईन यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. तुम्हाला माहीत नसेल, पण शेवटपर्यंत या दोघांनाही कॅपाब्लांकाला हरवता आलं नाही! उगाच नाही आपल्याकडे एक म्हण आहे – ‘तुम्ही म्हाताऱ्याला लाथा घालू शकता, पण तरुणाला डिवचू नका.’ ही म्हण शब्दश: घेऊ नका, पण तरुण/ लहान मुलांच्या वर्तमानावरून त्यांची परीक्षा करू नका, एवढाच बोध ही म्हण आपणास देते.
कॅपाब्लांकाला आता जागतिक दर्जाचा खेळाडू मानलं जाऊ लागलं. गंमत म्हणजे, कायम पहिला क्रमांक मिळवणाऱ्या कॅपाब्लांकाला त्याच्या मायदेशात हवनाला (Havana ) १९१३ साली झालेल्या स्पर्धेत फ्रँक मार्शलच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. त्या दोघांमध्ये झालेला डाव बघण्यासाठी ६०० प्रेक्षक हजर होते आणि त्या खिलाडूवृत्तीच्या प्रेक्षकांनी मार्शलने आपल्या हिरोला पराभूत केल्यावरदेखील टाळय़ांच्या कडकडाटात मानवंदना दिली होती.

या स्पर्धेच्या दरम्यान क्युबन सरकारनं मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. त्यांनी कॅपाब्लांकाला आपल्या परराष्ट्र खात्यात महत्त्वाचे पद देऊ केले. त्या काळी ब्रँड अँबेसेडर हा शब्द नव्हता तरी क्युबन सरकारनं या तरुण खेळाडूंच्या मार्फत आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम केलं. कॅपाब्लांकाला दुसरं काहीही काम नव्हतं; फक्त सतत वेगवेगळय़ा देशांत जाऊन बुद्धिबळ खेळणं हे त्याच्या आवडीचं काम होतं आणि तेही सरकारी इतमामात राहून! क्युबन सरकारनं आपल्या नव्या ब्रँड अँबेसेडरला पहिलं काम दिलं ते सेंट पिटर्सबर्ग इथं १९१४ साली होणाऱ्या एका मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जाऊन खेळण्याचं! रशियात जाताना कॅपाब्लांकाला वाटेत लंडन, पॅरिस आणि बर्लिन येथे प्रदर्शनीय सामने खेळण्याचं कामही होतंच. ते त्यानं चोख बजावलं. बर्लिन येथे तर त्यानं २-२ डावांच्या छोटय़ा सामन्यात टीचमन आणि मिझेस या प्रख्यात खेळाडूंना सर्व डावांत पराभूत केलं.

सेंट पिटर्सबर्गला पोचल्यावर कॅपाब्लांकानं तरुण अलेक्झांडर आलेखाइन, दस -चोटीमिस्र्की आणि झनोस्को- बोरोवस्की यांच्याशी असे २-२ डावांचे छोटे सामने खेळले. झनोस्को – बोरोवस्कीशी हरलेला एक डाव वगळता बाकी सर्व डाव त्यानं जिंकले. १९२७ साली त्याला हरवून जगज्जेता झालेला आलेखाइन याला कॅपाब्लांकाविषयी अतिशय आदर होता.

सेंट पिटर्सबर्ग येथे आघाडीवर असताना दोन घोडचुका करून दुसरा आलेल्या कॅपाब्लांकाविषयी आलेखाइन लिहितो, ‘‘मला कळत नसे की माणूस इतक्या जलद विचार कसा करू शकतो? कॅपाब्लांका आमच्यापैकी कोणालाही जलदगती सामन्यासाठी पाचपट रकमेचं आव्हान देत असे आणि जिंकतही असे. त्याचा स्वभाव आनंदी आणि विनोदी होता, त्यामुळे बायकांमध्ये तो लोकप्रिय होताच.’’ यावरून मला कॅपाब्लांकाविषयीची एक कथा आठवते. एकदा एका स्पर्धेसाठी कॅपाब्लांकानं आयोजकांना कळवलं की तो स्पर्धेत भाग घेईल आणि बरोबर त्याची पत्नी असेल. त्या काळी बुद्धिबळपटूंना सिनेनटासारखी प्रसिद्धी नसे आणि त्यामुळे जगज्जेता आणि त्याची पत्नी यांची व्यवस्था हॉटेलमधील चांगल्यातील चांगल्या सूटमध्ये करण्यात आली. स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याच वेळी कॅपाब्लांकाच्या खऱ्या पत्नीनं- ग्लोरियानं हवानामधून युरोपमध्ये येऊन आपल्या नवऱ्याला चकित करायचं ठरवलं. डाव सुरू असताना कॅपाब्लांकाची नजर प्रेक्षकांमध्ये गेली आणि त्याला धक्का बसला कारण त्याची ग्लोरिया त्याच्याकडे बघून हसत होती. मी वाचलेली कथा इथपर्यंत होती. पुढे काय झालं हे लेखकानं दिले नव्हतं, पण आपल्या संपूर्ण आयुष्यात हरलेल्या ३२ डावांपैकी एक हा जगज्जेता त्या दिवशी हरला असावा. लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.

कॅपाब्लांका जगज्जेता कसा झाला याची कथाही मनोरंजक आहे. १९२० साली कॅपाब्लांकाला सतत स्पर्धा होत्या आणि त्यामुळे २६ वर्षे जगज्जेत्या इम्यानुएल लास्करनं एक खुलं पत्र लिहिलं की कॅपाब्लांकानं आजपर्यंत सर्वोत्कृष्ट खेळ केला आहे आणि त्यामुळे तो जगज्जेता होण्यास पूर्णपणे पात्र आहे. म्हणून लास्कर स्वत:हून जगज्जेतेपदावरून पायउतार होत आहे. आणि यापुढे कॅपाब्लांकाला जगज्जेता समजण्यात यावं.क्युबातील लोकांना हे पसंत नव्हतं आणि त्यांनी २०,००० डॉलर्स जमवून मार्च १९२१ मध्ये लास्कर – कॅपाब्लांका सामना आयोजित केला होता. पहिल्या महायुद्धात सर्वस्व गमावून बसलेल्या लास्करनं केवळ पैशासाठी हा सामना खेळायचं ठरवलं आणि तो सहजी पराभूत झाला. त्यामुळे कॅपाब्लांका आता १९२१ मध्ये अधिकृत जगज्जेता झाला.


आता कॅपाब्लांकाला जग जिंकण्यासाठी बाहेर पडायचं होतं आणि त्यानं खरोखरच सर्व जग पादाक्रांत केलं. १९२२ ची लंडन आंतरराष्ट्रीय स्पर्धा कॅपाब्लांकानं १५ पैकी १३ गुण मिळवून दिमाखात जिंकली आणि कहर म्हणजे १९२४ सालच्या न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाचव्या फेरीत रिचर्ड रेटीकडून कॅपाब्लांका पराभूत झाला त्या वेळी बुद्धिबळ जगतात जणू काही भूकंप झाला. कारण जगज्जेत्याचा गेल्या ८ वर्षांतील हा पहिलाच पराभव होता. त्यानंतर जगज्जेता हळूहळू आपल्या अढळ स्थानावरून घसरू लागला होता. न्यूयॉर्क १९२७ स्पर्धेत भाग घेण्यासाठी कॅपाब्लांका पोचला त्या वेळी त्याची स्वत:कडून फार अपेक्षा नव्हती. ‘‘१९११ साली मी जिंकलो होतो त्या वेळी मी चांगला खेळत होतो. आता माझ्या प्रतिस्पध्र्यानी पुष्कळ प्रगती केली आहे,’’ असे उद्गार त्यानं काढले. मग स्पर्धा सुरू झाली आणि कॅपाब्लांकानं कमालीचा खेळ करून पहिला क्रमांक पटकावलाच, पण स्पाइलमन विरुद्धच्या डावासाठी सर्वोत्कृष्ट विजयाचं बक्षीसही मिळवलं.

असा हा जगज्जेता १९२७ साली आव्हानवीर अलेक्झांडर अलेखिन विरुद्ध अति आत्मविश्वासामुळे जगज्जेतेपद गमावून बसला. तोपर्यंत कॅपाब्लांकाशी एकही डाव जिंकू न शकलेला अलेखिन जगज्जेतेपदासाठी कसून तयारी करून आला होता. आता कॅपाब्लांका संपला अशीच लोकांची भावना झाली होती. परंतु नव्या उमेदीनं उभा राहून कॅपाब्लांकानं जोमदार खेळ केला. तरीही ब्युनॉस आयर्स येथील १९३९चं ऑलिम्पियाड सोडलं तर पहिलं बक्षीस त्याच्या नशिबात नव्हतं. ऑलिम्पियाडमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचं सुवर्णपदक हा त्याचा अखेरचा सुवर्ण क्षण ठरला.वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ७ मार्च १९४२ रोजी मॅनहॅटन बुद्धिबळ क्लबमध्ये बुद्धिबळ बघताना कॅपाब्लांकाला मेंदूतील रक्तस्रावामुळे चक्कर आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता या तिसऱ्या जगज्जेत्याचा माऊंट सिनाई इस्पितळात मृत्यू झाला. योगायोग म्हणजे दुसरा जगज्जेता इमानुएल लास्कर आदल्या वर्षी याच इस्पितळात मरण पावला होता.

आपल्या संपूर्ण आयुष्यात अवघे ३२ डाव हरणारा कॅपाब्लांका गेला, पण त्याचे असंख्य डाव आणि त्याने लिहिलेल्या तीन पुस्तकांपैकी ‘बुद्धिबळ खेळाडूंचे मानसशास्त्र’ या अप्रतिम पुस्तकाद्वारे अजूनही आपल्यात आहे.